गटबाजीमुळे सहकाऱ्यांमध्ये फूट पडते. एकमेकांविषयी विश्वासार्हता कमी होते व टीममधील सहकाऱ्यांबरोबर काम करताना मनामध्ये कायमच साशंकता निर्माण होताना दिसते. गटबाजीमुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकीची भावना राहत नाही. पर्यायाने कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर तसेच मानसिक व भावनिक आरोग्यावर गटबाजीचा खोलवर परिणाम होताना दिसतो.
कोणतीही नोकरी स्वीकारल्यानंतर प्रत्येकालाच वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. कंपनीतील वरिष्ठांनी जरी एखाद्या पदासाठी तुमची निवड केली असली आणि तुमचा टीममध्ये समावेश केला असला तरी देखील कंपनीमध्ये आधीपासून कार्यरत असलेले टीम मधील अनेक जण तुमच्याशी थोडे अंतर ठेवून वागताना दिसतात. ज्यामुळे बऱ्याच जणांना काम करताना एकटेपणा जाणवतो किंवा आपल्याला इतरांपेक्षा वेगळी वागणूक दिली जात आहे असेही वाटते. हे सर्व दीर्घकाळ चालू राहिले तर कंपनीतील टीम मेंबर्सनी आपल्याला स्वीकारलेले नाही अशी भावना मनामध्ये निर्माण होताना दिसते. आपण गटाच्या बाहेर आहोत आपल्याला गटातील इतरांनी सामावून घेतलेले नाही ही भावना देखील मनामध्ये वारंवार निर्माण होऊ लागते. म्हणजेच कंपनीतील गटबाजीला कळत नकळत आपल्याला सामोरे जाणे अपरिहार्य ठरते. कारण या सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणा बाहेरच्या आहेत हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
कामाच्या ठिकाणी काही लोक फक्त आपल्या गटातील लोकांबरोबर काम करतात ठराविक लोकांना सहकार्य करतात आणि गटातील इतर लोकांना दुर्लक्षित करतात याला ‘गटबाजी’ असे म्हणता येईल. किंवा गटबाजी म्हणजे कंपनीतील काही लोकांना वेगळे करून किंवा विभागून त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करणे केव्हा काम करताना नेहमीच एखाद्या गटाला महत्त्व देणे व इतरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे याला देखील गटबाजी करणे असे म्हणता येईल.
गटबाजीमुळे टीम मधील सहकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होण्यास कायमच मदत होते व एकमेकांना सहकार्य करण्यापेक्षा काही वेळा इतरांच्या कामात अडथळा आणणे किंवा काही वेळा महत्त्वाची माहिती अर्धवट सांगणे किंवा उशिरा सांगणे असे देखील प्रकार अनेकदा पाहण्यात येतात.
गटबाजीमुळे सहकाऱ्यांमध्ये फूट पडते. एकमेकांविषयी विश्वासार्हता कमी होते व टीममधील सहकाऱ्यांबरोबर काम करताना मनामध्ये कायमच साशंकता निर्माण होताना दिसते. गटबाजीमुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकीची भावना राहत नाही. पर्यायाने कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर तसेच मानसिक व भावनिक आरोग्यावर गटबाजीचा खोलवर परिणाम होताना दिसतो. कामाच्या ठिकाणी गटबाजीमुळे उत्पादकता कमी होते कंपनीच्या कार्यप्रणालीमध्ये अडथळे देखील निर्माण होताना दिसतात. कर्मचाऱ्यांमध्ये सामंजस्याचा अभाव दिसून येतो. कर्मचाऱ्यांमधील टीमवर्क कमी होते व त्यामुळे मला जे वाटते तेच बरोबर अशा एकांगी विचारसरणीला खतपाणी घातले जाते. गटबाजीमुळे सहकाऱ्यांमध्ये मनमोकळा संवाद राहत नाही ज्यामुळे एकमेकांविषयी गैरसमज व असमंजसता निर्माण होताना दिसते. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होताना दिसते व नोकरीतील समाधान मिळणे हळूहळू दुरापास्त होते.
गटबाजीमुळे महत्त्वाची माहिती लपवून ठेवली जाऊ शकते ज्यामुळे कामांमध्ये येणारी कोणतीही समस्या सोडवणे अवघड होऊन बसते तसेच कोणतेही नवीन उपक्रम कंपनीमध्ये राबवणे त्रासदायक होऊ शकते. जेव्हा कर्मचाऱ्यांना गटबाजीमुळे डावलले जाते किंवा वेगळी वागणूक दिली जाते किंवा कमी लेखले जाते त्यावेळी कर्मचाऱ्यांची काम करण्याची प्रेरणा व उत्साह कमी होताना दिसून येतो व कर्मचाऱ्यांचे कंपनीतील योगदान देखील त्यामुळे प्रभावित होताना दिसते. काम करताना सतत साशंकता निर्माण होते व आजूबाजूचे वातावरण खूपच नकारात्मक झाले आहे असे वाटू लागते. आपण नोकरीच्या ठिकाणी १०० जरी दिले तरी आपण घेतलेल्या श्रमाची व कामाची दखल कोणीच करणार नाही असे वाटू लागते.
अशा वातावरणामध्ये दीर्घकाळ राहिल्याने बऱ्याच जणांना अनेक मनो शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. झोपेच्या तक्रारी, वैचारिक अस्थिरता, पचनसंस्थेचे आजार, स्वत:च्या भवितव्याविषयी साशंकता निर्माण झाल्याने सततची वाटणारी चिंता व काळजी, रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांना निमंत्रण मिळताना दिसते. गटबाजीला सामोरे जाताना आपण स्वत:ची कशी काळजी घ्यायची व गटबाजीचा यशस्वीपणे सामना कसा करायचा याविषयी पुढील भागामध्ये आपण अधिक जाणून घेणार आहोत.
drmakarandthombare@gmail. com