फारूक नाईकवाडे

नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पर्यावरण या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत केलेला आहे: ‘पर्यावरण पारिस्थितीकी, जैवविविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण मुद्दे’

मागील वर्षीपासून राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व राजपत्रित संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली. या व त्यामागील राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर एकमध्ये पर्यावरण या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास तयारी कशी करावी याबाबत दिशा स्पष्ट होते. या घटकावर मागील पाच वर्षांत विचारण्यात आलेले काही प्रश्न व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे या लेखामध्ये पाहू.

● प्रश्न १. खालील विधाने पहा.

अ. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्याने जैवविविधता कमी होते.

ब. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे.

क. फ्रान्सिस्को मेंड्झ यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ‘अमेझान गांधी’ म्हणून संबोधत्त.

१) फक्त विधान क बरोबर आहे.

२) फक्त विधान अ बरोबर आहे.

३) फक्त विधान अ आणि ब बरोबर आहेत.

४) विधान अ, ब, क बरोबर आहेत.

● प्रश्न २. ओझोनसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ. ओझोनला पृथ्वीचे संरक्षण कवच म्हणतात.

ब. १९८५ मध्ये ओझोनला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले.

क. १६ सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो.

ड. १९८९ मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली.

पर्यायी उत्तरे

१) फक्त अ, ब आणि क

२) फक्त ब, क आणि ड

३) फक्त अ, क आणि ड

४) वरील सर्व

● प्रश्न ३. औद्याोगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डाट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशात झाली?

१) फ्रान्स २) जर्मनी

३) आयर्लंड ४) नार्वे

● प्रश्न ४. अल्फा, बिटा व गॅमा (Alpha, Beta and Gamma) विविधता म्हणजे काय?

अ. सजीवांची श्रीमंती

ब. सिम्पसन विविधता सूची

क. जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण

ड. व्हीटाकेर ( Whittaker) (1972) यांनी सुचवलेले शब्दार्थ

वरीलपैकी कोण्ते विधान/ विधाने बरोबर आहेत?

१) फक्त अ आणि ब २) फक्त ब

३) फक्त क ४) फक्त क आणि ड

● प्रश्न ५. खालीलपैकी प्रवाळ रांगांची वैशिष्ट्ये कोणती?

अ. हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे.

ब. हे अति जैव इंधन उत्पादक आहेत.

क. ही वनस्पती व प्राणिजन्य श्रीमंत विविधता आहे.

ड. हे पाण्याखाली उष्णकटीबंधीय परिस्थितिकीतंत्र आहे.

पर्यायी उत्तरे

१) फक्त अ आणि ब

२) फक्त अ, ब आणि ड

३) फक्त क

४) वरील सर्व

● प्रश्न ६. जोड्या लावा.

स्तंभ I (प्रजाती) स्तंभ II (प्रकार)

अ. भारतीय गेंडा i) विरळ/ क्वचित

ब. आशियातील हत्ती ii) धोकादायक असलेल्या

क. वाळवंटातील कोल्हा iii) लुप्त /नष्ट होणा-या

ड. गुलाबी डोके असलेले बदक iv) संवेदनशील

पर्यायी उत्तरे

१) अ – i; ब – iv; क – iii; ड- i

२) अ – i; ब – iv; क – i; ड- iii

३) अ – iv; ब – ii; क – i; ड- iii

४) अ – i; ब – iii; क – ii; ड- iv

वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे तयारीसाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.

या घटकावर दरवर्षी पाच प्रश्न विचारण्यात येतात.

अभ्यासक्रमामध्ये नमूद केल्याप्रमाणे या घटकाचा विशेष अभ्यास न करता उत्तरे देता येतील असे प्रश्नांचे स्वरूप आहे. म्हणजेच या विषयाच्या मूलभूत संकल्पना आणि चालू घडामोडी यांच्या अभ्यासाच्या आधारे कामन सेन्स वापरून या प्रश्नांची उत्तरे देता येतात.

सन २०१८ पर्यंत सरळसोट, एका वाक्यात/ शब्दात उत्तरे द्या अशा प्रकारच्या प्रश्नांचे प्रमाण जास्त होते. मात्र २०१९पासून बहुतांश प्रश्न हे बहुविधानी, जोड्या लावा अशा प्रकारचे आहेत.

मूलभूत संकल्पना, त्यांचे उपयोजन, पारंपरिक मुद्दे आणि चालू घडामोडी अशा सर्वच आयामांवर दरवर्षी प्रश्न विचारलेले दिसून येतात. इतर घटकांपेक्षा या घटकाला कमी प्रश्न आणि महत्व दिलेले असले तरी विश्लेषण करुन मुद्देसूद अभ्यास केल्यास विज्ञानाप्रमाणेच या घटकातही पूर्ण गुण मिळवता येऊ शकतात.

या घटकावरील प्रश्न हे इंग्रजीमध्ये तयार करून त्यांचे मराठी भाषांतर केल्याचे लक्षात येते. उदाहरणार्थ वर नमूद केलेला प्रश्न क्रमांक ५. High biomass producer – अति जैव इंधन उत्पादक; rich flora and fauna diversity – वनस्पती व प्राणिजन्य श्रीमंत विविधता. त्यामुळे शक्यतो इंग्रजी प्रश्न वाचून उत्तर देणे श्रेयस्कर ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील विश्लेषणाच्या आधारे या घटकाची तयारी कशी करावी याबाबत पुढील लेखामध्ये पाहू.