सुहास पाटील

नवोदय विद्यालय समिती (NVS) (भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत एक स्वायत्त संस्था) मार्फत जवाहर नवोदय विद्यालयांतील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता इयत्ता ६ वीमधील प्रवेशासाठी ‘जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट’ (JNVST-२०२४) शनिवार दि. २० जानेवारी २०२४ रोजी घेतली जाईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ नुसार ग्रामीण भागातील होतकरू मुला/ मुलींना गुणवत्तापूवर्ण दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतूने भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत नवोदय विद्यालय समिती मार्फत ‘जवाहर नवोदय विद्यालये (जेएनव्ही)’ सुरू करण्यात आली. सध्या देशातील २७ राज्यांत आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ६४९ जवाहर नवोदय विद्यालये सुरू आहेत. (यात अजा/ अजची लोकसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्य़ांसाठी अधिकचे २२ जेएनव्ही आणि एक स्पेशल जेएनव्ही यांचा समावेश आहे.)

नवोदय विद्यालय समितीद्वारे जवाहर नवोदय विद्यालयांत ६ वी ते १२वीपर्यंत सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. आज देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांत एकूण १४ लाखांच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशभरातील ८ विभागांपैकी पुणे विभागांतर्गत महाराष्ट्रातील ३३ जिह्यांत, गुजरातमधील ३३ जिह्यांत, गोव्यातील २ जिह्यांत, दादरा नगर हवेलीमधील १ जिह्यात व दमण आणि दिव मधील २ जिल्ह्य़ांत जवाहर नवोदय विद्यालये आहेत. महाराष्ट्र व गुजरातमधील एका आदिवासी बहुल जिल्ह्य़ात प्रत्येकी १ स्पेशल जवाहर नवोदय विद्यालय स्थापन केले आहे.

विशेषत्वाने दर्जेदार शिक्षणाकडे लक्ष दिल्याने २०२२ साली जेएनव्हीमधील विद्यार्थ्यांनी केलेली दैदीप्यमान कामगिरी – (१) ७,५८५ विद्यार्थ्यांमधून जेईई (मेन्स) परीक्षेत ४,२९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (२) ३,००० विद्यार्थ्यांमधून जेईई (अ‍ॅडव्हान्सड) परीक्षेत १,०१० विद्यार्थी उत्तीर्ण. (३) २४,८०७ विद्यार्थ्यांमधून एनईईटी परीक्षेत १९,३५२ उमेदवार यशस्वी झाले. (४)  उइरए बोर्ड परीक्षेचा २०२२-२३ चा निकाल – १० वी ९९.१४ टक्के; १२ वी ९७.५१ टक्के

जवाहर नवोदय विद्यालयातील सन २०२४-२५ मधील इ. ६ वीतील प्रवेशासाठी पात्रतेच्या अटी – (१) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विद्यार्थी ५ वी इयत्तेत ज्या जिह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे त्या जिह्याचा रहिवासी असावा आणि त्या जिह्यातील शासनमान्य शाळेत शिकत असावा. (२) ग्रामीण कोटय़ातून प्रवेशासाठी विद्यार्थी इ. ३ री, ४ थी व ५ वीची परीक्षा शासन मान्यताप्राप्त ग्रामीण भागातील शाळेतून उत्तीर्ण झालेला असावा. (३) विद्यार्थ्यांचा जन्म दि. १ मे २०१२ ते ३१ जुलै २०१४ दरम्यानचा असावा. (४) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पूर्वी ५ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार आणि रिपीटर (पुन्हा बसलेले) प्रवेशास पात्र नाहीत.

प्रवेश क्षमता : प्रत्येक जवाहर नवोदय विद्यालयातील प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता आहे ८०. यातील ७५ टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. उरलेल्या जागा त्या जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरल्या जातील. १/३ जागा मुलींसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग उमेदवारांना भारत सरकारच्या धोरणानुसार जागा राखीव आहेत. जवाहर नवोदय विद्यालयामधील इ. ६ वीतील प्रवेशासाठी – सिलेक्शन टेस्ट (JNVST-२०२४) (लेखी परीक्षा) (शनिवार दि. २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० ते १३.३० पर्यंत घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेस ११.०० वाजेच्या आत हजर राहणे बंधनकारक आहे.) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ८० प्रश्न, १०० गुण, कालावधी २ तास. दिव्यांग उमेदवारांना अतिरिक्त ४० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. (१) मेंटल अ‍ॅबिलिटी टेस्ट (बुद्धिमत्ता चाचणी) – ४० प्रश्न, ५० गुण, वेळ ६० मिनिटे. (२) अ‍ॅरिथमॅटिक टेस्ट (अंकगणित) – २० प्रश्न, २५ गुण, वेळ ३० मिनिटे. (३) लँग्वेज टेस्ट – २० प्रश्न, २५ गुण, वेळ ३० मिनिटे. विद्यार्थ्यांना तीनही सेक्शनसाठी एकच प्रश्नपत्रिका दिली जाईल. प्रत्येक ३० मिनिटांनी बेल वाजविली जाईल. ओएमआर उत्तरपत्रिकेवर उत्तरे फक्त निळय़ा किंवा काळय़ा रंगाच्या बॉलपॉइंट पेनाने मार्क करावयाची आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला १.२५ गुण दिले जातील. चुकीच्या उत्तराला गुण वजा केले जाणार नाहीत. (लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिट कार्ड पाहूनच प्रवेश दिला जाईल, जे त्यांना http://www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.) कोणाही विद्यार्थ्यांला दुसऱ्या वेळेला या सिलेक्शन टेस्टसाठी बसता येणार नाही.(उर्वरीत पुढील अंकात)

suhassitaram@yahoo.com