Atul Kumar Success Story In Marathi : एखाद्या सफाई कामगाराला बघून आपण त्या माणसाची चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या माणसाशी तुलना करून मोकळे होतो. पण, एखादा माणूस कुठे काम करतो, काय काम करतो यावरून आपण तो किती हुशार आहे किंवा ढ ही गोष्ट नाहीच ठरवू शकत. कारण- नोकरी न मिळाल्यामुळे, तर कधी घरच्यांच्या जबाबदारीमुळे, तर कधी बिकट परिस्थितीमुळे काही जणांना त्यांचे स्वप्न व शिक्षण पूर्ण शक्य नसते. त्यामुळे छोट्या छोट्या नोकऱ्या करून, ते स्वतःची स्वप्नं पूर्ण करतात आणि वेळ आल्यावर आपण काय करू शकतो हे अगदी जगाला दाखवून देतात. आज आपण अशाच एका माणसाची गोष्ट जाणून घेणार आहोत…

अतुल कुमार उत्तराखंडमधील रहिवासी आहे. अतुल केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांच्या सोईसाठी वापरले जाणारे घोडे हाताळण्यात वडिलांना मदत करायचा. पण, आता अतुलनं मोठी बाजी मारली आहे. अतुल कुमार आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेण्यासाठी सज्ज झाला आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील अतुलने २०२५ मध्ये मास्टर्ससाठी आयआयटी-जॉइंट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि आता त्यानं मद्रासमधील प्रतिष्ठित संस्थेत जागा मिळवली आहे.

IIT चा माहिती नव्हता अर्थ (Success Story)

अतुलला आयआयटी म्हणजे काय हेदेखील माहीत नव्हतं. पाण्याची कमतरता, कोणत्याही प्रकारची माहिती न मिळण्याची सोय यांमुळे मोठं स्वप्न पाहणं राहून गेलं किंवा त्यानं ते पाहिलंच नाही. तसेच त्याला अभियांत्रिकीमध्ये रस नव्हता. पण, जेव्हा एका शिक्षकानं आयआयटीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविण्याची संकल्पना त्याच्यापुढे मांडली आणि त्याचं आयुष्यच बदललं, अशी माहिती अतुल यानं एएनआयला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केली आहे.

जूनमध्ये केदारनाथहून परतल्यानंतर त्यानं जुलै २०२४ पासून आयआयटीमध्ये जाण्याची तयारी सुरू केली. त्यादरम्यान तिकडे नेटवर्क नव्हतं, त्याला तंबूत राहावं लागत होतं. त्यामुळे अभ्यास करणं शक्य नव्हतं. मग यावेळी अतुलचा मित्र महावीर, जो परीक्षेची पूर्वतयारी करीत होता, त्यानं त्याच्या नोट्स शेअर करून अतुलला मदत केली. फेब्रुवारीमध्ये परीक्षा होती आणि त्यासाठी तो जानेवारीपर्यंत नियमितपणे अभ्यास करीत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतुल कुमार हा खेचर चालकाचा मुलगा मुलगा आहे. हा व्यवसाय त्याच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा स्रोत आहे. अतुलच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आहे आणि धाकट्या बहिणीचं शिक्षण नुकतंच पूर्ण झाले आहे. त्यामुळे तो अजूनही केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना घेऊन जाण्यात, त्यांना मार्गदर्शन करण्यात त्याच्या वडिलांना मदत करतो; जेणेकरून तो त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकेल.