Success Story: भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य मुले-मुली पाहतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. काही जण कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; पण काही जण असेदेखील असतात, ज्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका अधिकाऱ्याचा प्रवास सांगणार आहोत, ज्यात ते यूपीएससीची परीक्षा न देताच आयएएस अधिकारी झाले.

या अधिकाऱ्याचे नाव अब्दुल नासर असून त्यांचा जन्म केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील थलासेरी येथे झाला होता. लहानपणापासूनच अब्दुल यांना अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबावर आर्थिक संकट उद्भवल्याने या काळात त्यांची आई एका घरातील मोलकरीण म्हणून त्याच घरी राहू लागली. त्यामुळे अब्दुल नासर आणि त्याची भावंडं एका अनाथाश्रमात राहू लागले.

लहान वयात आलेल्या या अडचणींवर मात करत अब्दुल नासर यांनी १३ वर्ष अनाथाश्रमात घालवली. या काळात त्यांचे शालेय शिक्षण यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केले. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी क्लिनर आणि हॉटेल सप्लायर म्हणून काम करायला सुरुवात केली. तसेच अभ्यास सुरू ठेवण्यासाठी त्यांनी घरोघरी वर्तमानपत्रे वाटणे, शिकवणी वर्ग घेणे आणि फोन ऑपरेटर म्हणून काम करणे अशी कामंदेखील केली. या संघर्षमय काळात अब्दुल यांनी शासकीय महाविद्यालयातून पदवी मिळवली.

अब्दुल नासर यांचा आयएएस प्रवास

१९९४ मध्ये अब्दुल यांनी पदवी मिळवल्यानंतर केरळ आरोग्य विभागात सरकारी कर्मचारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अब्दुल यांचे बालपण अनाथाश्रमात गेले, त्यामुळे समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांच्या मनात नेहमी होती. नोकरीच्या काळातही अनेकदा ते समाजसेवेसाठी प्रयत्न करायचे. त्यांचे परिश्रम आणि सेवाभाव पाहून शासनाने २००६ मध्ये त्यांना राज्य नागरी सेवेअंतर्गत उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी दिली.

हेही वाचा: Success Story : करोना काळात गमावली नोकरी आणि सुरू केला स्वतःचा व्यवसाय; महिन्याला कमावतात दोन लाख रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अब्दुल नासर आपल्या मेहनतीने आणि आपल्या कार्याने सतत प्रगती करत होते. २०१५ मध्ये त्यांना केरळचे टॉप डेप्युटी कलेक्टर म्हणून मान्यता मिळाली. तसेच २०१७ मध्ये सरकारने त्यांना आयएएस अधिकारी पदावर बढती दिली आणि २०१९ मध्ये अब्दुल नासर कोल्लमचे जिल्हाधिकारी बनले. अशाप्रकारे अब्दुल नासर हे यूपीएससी परीक्षा न देता आयएएस अधिकारी झाले.