Success Story: आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वप्न साकारण्यासाठी लोक खूप कष्ट घेतात. या यशाच्या प्रवासात काहींना सतत अपयश, नकार पचवावा लागतो; तर अनेकांना सहज यश मिळतं. आज अशाच एका तरुणीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, जी एकेकाळी इयत्ता सहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाली होती. परंतु, UPSC च्या परीक्षेत तिला सहज यश मिळालं.

खरं तर, परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर अनेकांकडून ती व्यक्ती आयुष्यातही कधी यशस्वी होऊ शकणार नाही, अशी मोहोरच जणू त्यांच्यावर उमटवली जाते. मग टोमणे मारून, त्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न केला जातो. परंतु, शालेय परीक्षेत अनुत्तीर्ण झालेली व्यक्ती आयुष्याच्या मार्गावरही अनुत्तीर्ण होते, असं नाही. आयएएस अधिकारी रुक्मिणी रियार या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहेत.

अभ्यासातील हुशारीअभावी सहावीत अनुत्तीर्ण

रुक्मिणी रियारचे वडील बलजिंदर सिंग रियार हे होशियारपूरचे निवृत्त उपजिल्हाधिकारी आहेत. रुक्मिणी तिच्या शालेय जीवनात अभ्यासात फारशी चांगली नव्हती आणि त्यामुळे ती सहावीत अनुत्तीर्ण झाली. एकदा तो अनुत्तीर्ण झाल्याचा शिक्का बसल्यानंतर तिला तणाव आणि नैराश्याने घेरले. पण, मग त्या निराशेच्या अंधारात तिला स्वतःच्या ध्येयाचा दिवा सापडला आणि त्याच्या प्रकाशात वाटचाल करीत तिने लवकरच या सर्व तणावग्रस्त परिस्थितीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि मग अपयशाची पुढची पायरी यशाची असते हे तिने कुत्सितपणे बोलणाऱ्यांना दाखवून दिले. मग पुढे तिने अभ्यासात खूप मेहनत घेतली आणि शालेय शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण केले.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई येथून सामाजिक शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, रुक्मिणीने यशोधा, म्हैसूर व अन्नपूर्णा महिला मंडळ, मुंबईसारख्या बिगर-सरकारी संस्थांमध्ये (एनजीओ) इंटर्नशिप केली. एनजीओमध्ये असताना, तिला नागरी सेवांमध्ये आवड निर्माण झाली आणि तिने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०११ मध्ये रुक्मिणीने तिच्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून, उल्लेखनीय यश मिळवले आणि ऑल इंडिया रँक (एआयआर) २ मिळवली. कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता, तिने हे चमकदार यश मिळवले होते हे विशेष.