भारतीय परंपरा आणि संस्कृती या या घटकविषयामध्ये प्राचीन ते आधुनिक भारतातील साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला या मुद्द्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
कोणत्याही समाजाची संस्कृती ही श्रद्धा, कला, नीतिनियम, कायदा आणि रीति-रीवाज या सगळ्यांनी मिळून बनलेली असते. हे सगळे घटक एकमेकांवर परिणाम करतात आणि एकत्रितपणे ‘संस्कृतीला’ आकार देत असतात. आयोगाच्या दृष्टिकोनातून ‘कला प्रकार, साहित्य आणि स्थापत्य’ या बाबींना जास्त महत्त्व आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन श्रद्धा, नीतिनियम या बाबी त्या कालातील साहित्य या घटकाच्या माध्यमातून अभ्यासता येतील.
प्राचीन भारतातील प्रागैतिहासिक चित्रकला (Prehistoric paintings), संस्कृतीमधील स्थापत्य (Architecture) व शिल्पकलांचा अभ्यास पुढील मुद्यांच्या अनुषंगाने करायला हवा – त्यांची वैशिष्टये, त्यातून प्रतीत होणाऱ्या श्रद्धा, आर्थिक बाजू व सामाजिक पैलू.
वैदिक व उत्तर वैदिक काळातील साहित्य समजून घेणे आवश्यक आहे. या साहित्यातील धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक बाबींचा तौलनिक अभ्यास करायला हवा.
मौर्य काळातील स्थापत्य (स्तूप, गुहा, राजवाडे) व शिल्पकला विशेषतः अशोकाचे स्तंभ तसेच ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथातील ठळक बाबी यांचा अभ्यास आवश्यक आहे.
मौयोत्तर व गुप्त काळातील स्थापत्य (स्तूप, गुहा), साहित्य विशेषतः संस्कृत व संगम साहित्य आणि शिल्पकलांच्या गांधार, मथुरा व अमरावती शैलींचा तौलनिक अभ्यास आवश्यक आहे. साहित्यातील समाजवर्णन महत्त्वाचे आहे. शिल्पकलांचा अभ्यास काळ, स्थापत्य आणि चित्रकला (उदा. अजिंठा इ.) यांचा विशेष अभ्यास करायला हवा. या काळातील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आढावाही आवश्यक आहे. गुप्तांच्या नाण्यांचा आढावा सामाजिक, राजकीय व धार्मिक पैलूंच्या अनुषंगाने घ्यायला हवा. स्थान, विषय, रचना, रंग वापर इ. च्या अनुषगाने करायला हवा. गुप्त काळातील
फाहियान, ह्युएन त्साँग, इत्सिंग यांचे आपापल्या काळातील समाजवर्णन, स्थापत्य व इतर कला तसेच राजकीय वर्णन पाहणे महत्त्वाचे आहे.
प्राचीन काळातील तक्षशिला, वल्लभी, नालंदा, विक्रमशीला, उदंतपुरी येथील विद्यापीठांची माहिती असावी. शिक्षण व्यवस्था तसेच कनिष्क, चंद्रगुप्त २ आणि हर्षवर्धनाच्या काळातील विद्वानांचे कार्य पहायला हवे.
मध्यकालीन भारतातील साहित्यामध्ये विषय, भाषा, शैली इ. बाबत कमालीचे वैविध्य आढळते, विजयनगर साम्राज्यकालीन संस्कृत व तेलुगू साहित्याचा आढावा मुख्य साहित्यकृती, विषय, समाज वर्णन, आर्थिक-राजकीय जीवनाचा आढावा या अनुषंगाने घ्यावा.
सिंधू, वैदिक व उत्तर वैदिक संस्कृती मधील धार्मिक सामाजिक पैलूंचा अभ्यास करतानाच त्यांचा सध्याच्या धार्मिक व सामाजिक व्यवस्थांशी काही संबंध आहे का? याचे विश्लेषणही करायला हवे.
साहित्य व दृश्य कलांवर ग्रीक, पार्शियन अशा बाह्य लेखन पद्धती, विषय, शैलीचा प्रभाव असल्यास त्याचा आढावा घ्यायला हवा.
मुख्य साहित्यकृतीचा विषय, त्यातील समाजवर्णन, आर्थिक राजकीय जीवनाचे प्रतिबिंब यांचा थोडक्यात आढावा घ्यावा, सल्तनतकाळातील पार्शियन व अरेबिक साहित्याचा आढावा ग्रंथ व लेखन अशा टेबलामध्ये घ्यावा व या ग्रंथांमधील सर्वसाधारण विषय, वर्णन इ. माहित असावे.
तुघलक, लोधी आणि मोगल (विशेषतः अकबर व शाहजहान) आणि विजयनगरच्या राजांची यांची स्थापत्यकला विकासाच्या टप्प्यांच्या अनुषंगाने अभ्यासायला हवी. उदा. कमानीच्या रचनेचा विकास.
अकबर व जहांगीर यांच्या काळातील चित्रकलेचा व शैलींचा विषय, आकृत्यांचा वापर, रंग, माध्यम इ. अनुषंगाने करायला हवा. याच पैलूंबाबत राजपूत शैली, पहाडी व दख्खनी शैलींचाही थोडक्यात आढावा घ्यावा लागेल. बाह्यशैलींचा काही प्रभाव असल्यास तो लक्षात घ्यावा. मुगल दरबारातील संगीताचा विकास लक्षात घेणे गरजेचे आहे.
मध्यकालीन भारतातील इतिहासाचे स्त्रोत म्हणून ‘साहित्य’ अत्यंत महत्त्वाचे आहे.
अभ्यासक्रमात नमूद नसला तरीही इस्लामी व हिंदू संस्कृतीचा एकमेकांवरील प्रभाव साधारणपणे समजून घ्यायला हवा.
आधुनिक भारताच्या संस्कृतीमध्ये दिल्ली आणि कोलकात्यातील स्थापत्य विशेषतः ब्रिटिश Monuments चा आढावा घ्यायला हवा. यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असायला हवा.
आधुनिक काळातील चित्रकार थोडक्यात यांच्या शैलीचा आढावा घ्यावा. विशेषतः ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’ मधील चित्रकार समजून घ्यायला हवेत.
शास्त्रीय संगीत क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांचे योगदान यांचा आढावा इंडीया ईयर बुक मधून घेता येईल.
कलेशी संबंधित विविध महत्त्वाच्या संस्थांची माहिती, कार्य याबाबत इंडीया ईयर बुक उपयोगी पडेल.
वेगवेगळ्या प्रदेशातील शास्त्रीय व लोकनृत्याचे प्रकार नीट समजून घ्यावेत. यामध्ये महाराष्ट्रातील लोककलांवर जास्त भर देणे संयुक्तिक ठरेल.
भारतीय इंग्रजी व हिंदी साहित्यातील वेगवेगळे प्रवाह लक्षात घ्यावेत. मराठी साहित्यातील भक्ती साहित्य, साठोत्तरी साहित्य, नव्वदोत्तरी साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य अशा सर्व प्रवाहंबाबत आढावा घेणे आवश्यक आहे.
या घटकावर किमान २५ गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येतील असा अंदाज आहे त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.
