गेल्या काही लेखांमध्ये आम्ही वेगवेगळ्या खेळांबद्दलचे प्रश्न लिहीले आहेत. वाचकांच्या मागणीनुसार आणखीही काही खेळ आणि शारीरिक अॅक्टिव्हीटीजबद्दल आम्ही लिहिणार आहोत. काही उमेदवारांनी आम्हाला ईमेलवर हाही प्रश्न विचारला आहे की या प्रश्नांची तयारी कशी करावी, या प्रश्नांची योग्य उत्तरे कुठून मिळवावी याबद्दलही माहिती द्या. आजच्या लेखात आम्ही प्रश्नांच्या तयारीसाठी कोणते संदर्भ वापरावेत याबद्दल माहिती देत आहोत.

व्यक्तिमत्त्व चाचणीच्या तयारीसाठी एखादे रजिस्टर घ्यावे किंवा डिजिटल पद्धतीने करायचे असेल तर एक फोल्डर करून त्यात वेगवेगळ्या विषयानुसार डॉक्युमेंट्स करावीत. व्यक्तिमत्त्व चाचणी ही डीटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्मवरच बऱ्यापैकी आधारित असते, त्यामुळे या अर्जातील वेगवेगळे भाग म्हणजे वैयक्तिक माहिती, शिक्षण, आई-वडिलांची वैयक्तिक माहिती, आवडीनिवडी-छंद असे वेगवेगळे विभाग करून त्यात वेळोवेळी जी माहिती मिळेल ती नोंद करत राहावी. डीटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्ममधील प्रत्येक शब्द महत्त्वाचा असल्याने रजिस्टर मध्ये नोंद करत असाल तर त्या-त्या शब्दावरती अपेक्षित प्रश्न आणि मुलाखतीसाठी अधिकृत माहिती जेथे मिळेल त्या साधनांचा वापर करावा.

शासकीय माहितीसाठी nic.in वा gov.in या तुमचा जिल्हा, राज्य या विषयावर अधिकृत माहिती देतात. भारत सरकारने सुरू केलेल्या My Gov मेरी सरकार किंवा माझे सरकार https://mygov.in या पोर्टलद्वारे केंद्र शासनाच्या अनेक योजना व उपक्रम याची अधिकृत आणि अद्यावत माहिती निश्चितच मिळते.

विविध राज्य सरकारांच्या उपक्रमाची माहितीही याच पोर्टलवर उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्याची माहिती ‘माझा महाराष्ट्र माझे सरकार’ https://maharashtra.mygov.in या संकेतस्थळावर आपणास मिळेल. भारत सरकार publication division प्रकाशित BHARAT 2025 हे या वर्षाचे year book स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या सर्व टप्प्यावर अधिकृत असे मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे.

आता माहिती कशी मिळवावी हे बघूया. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्रांचे नियमित वाचन खूपच महत्त्वाचे आहे. त्यानंतर काही नियतकालिके उदाहरणार्थ-सिव्हील सर्व्हिसेस क्रोनिकल, योजना, कुरुक्षेत्र इत्यादी. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बरेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससुद्धा सध्या उमेदवारांमध्ये लोकप्रिय आहेत. काही मार्गदर्शकांची यूट्यूब चॅनल्स प्रसिद्ध आहेत. यूपीएससी सनदी सेवेतील यशवंत विद्यार्थी ही टेलिग्राम वा यू ट्यूब वा एक्ससारख्या समाज माध्यमातून आपल्या वाहिनी उघडून परीक्षार्थींना मोफत मार्गदर्शन करतात. या द्रोणाचार्य मंडळींच्या ऑनलाइन मार्गदर्शनाचा योग्य वापरही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एकलव्यांनी करायला निश्चितच हरकत नाही.

एखाद्या खेळाबद्दल माहिती हवी असेल तर त्या खेळाच्या संदर्भातल्या ज्या संस्था असतात त्यांच्या संकेतस्थळावर चांगली माहिती उपलब्ध असते. विविध प्रकारचे खेळ आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजना, फिट इंडिया, खेलो इंडिया सारखे अभियान याबद्दल सविस्तर माहिती स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईट वर मिळू शकते. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या वेबसाईटवरही बरीच माहिती, ऑलिम्पिकचे निकाल उपलब्ध असतात.

कोणत्याही खेळाच्या महत्त्वाच्या स्पर्धा सुरू असतात तेव्हा सर्वच माध्यमांवर त्याबद्दल बातम्या येत असतात. त्या स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या मुलाखती इत्यादी येत असतात. या सर्व माध्यमांमधून बरीच माहिती उमेदवारांना मिळू शकते. यातली महत्त्वाची अद्यावत माहिती, काही वाद-विवाद हे सर्व आपल्या रजिस्टरमध्ये नोंदवून ठेवावे. म्हणजे प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते.

स्पर्धा परीक्षांची तयारी ही निरंतर प्रक्रिया आहे आणि परीक्षार्थींनी अभ्यास करताना परीक्षाभिमुख अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मागील ५ ते १० वर्षांचे पूर्व, मुख्य परीक्षांचे पेपर्स आणि अभ्यासक्रम याचे विश्लेषण करून तसेच मुलाखतीसाठीही मागील वर्षीच्या यशवंत विद्यार्थ्यांना विचारलेल्या आणि तुमच्या डीटेल्ड एप्लिकेशन फॉर्ममधील शब्दांशी साधर्म्य असलेल्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे याची तयारी केल्यास यश तुमचेच आहे.

उमेदवारांच्या मागणीनुसार इतरही अनेक विषयांवर आम्ही पुढच्या काही लेखांमधून लिहीणारच आहोत. कोणत्याही विषयावर या लेखमालेत आम्ही लिहावे अशी उमेदवारांची इच्छा असेल तर आम्हाला ईमेलवर जरुर कळवावे. आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत.