सागर भस्मे

मागील लेखातून आपण ‘राष्ट्रीय पायाभूत पाइपलाइन’ उपक्रम, तसेच ‘पंतप्रधान गतिशक्ती’ या योजनेबाबत माहिती घेतली. या लेखाद्वारे आपण सेवा क्षेत्र या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये सेवा क्षेत्र म्हणजे काय? या क्षेत्राचे अर्थव्यवस्थेमधील महत्त्व, या क्षेत्रासमोरील आव्हाने, तसेच सेवा क्षेत्राची सद्य:स्थिती काय आहे इत्यादी बाबींचा सविस्तरपणे आढावा घेऊ.

Food Management
UPSC-MPSC : कृषीमूल्य व किंमती आयोग नेमका काय आहे? या आयोगाची कार्ये कोणती?
agricultural production in India
UPSC-MPSC : भारतात कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या योजना कोणत्या?
parliament
UPSC-MPSC : संसदेची रचना कशी असते? राष्ट्रपती हे संसदेचा भाग असतात का?
commercial bank
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : व्यापारी बँका म्हणजे काय? त्या कशा प्रकारे कार्य करतात?

सेवा क्षेत्र (Service Sector) :

अर्थव्यवस्थेमधील प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक क्षेत्रांपैकी तृतीयक क्षेत्रास सेवा क्षेत्र, असेदेखील म्हटले जाते. सेवा क्षेत्रामध्ये अशा आर्थिक कृतींचा समावेश होतो; ज्या स्वतः वस्तूंचे उत्पादन तर करीत नाहीत. मात्र, प्राथमिक क्षेत्र व द्वितीय क्षेत्रात निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाकरिता मदत करीत असतात. उदा. वाहतूक, साठवणूक, बँकिंग, दळणवळण इत्यादी. तसेच सेवा क्षेत्रामध्ये वस्तूंच्या उत्पादनात मदत न करणाऱ्या सेवांचाही यामध्ये समावेश होतो. त्यामध्ये शिक्षक, डॉक्टर, वकील यांच्यासारख्या वैयक्तिक सेवा, प्रशासकीय व लेखा सेवा इत्यादी सर्वांचा समावेश होतो. अलीकडील कालखंडामध्ये अद्ययावत म्हणजेच माहिती तंत्रज्ञानावर आधारित काही नवीन सेवांच्या निर्मितीला सेवा क्षेत्रामध्ये गती प्राप्त झाली आहे. सेवा क्षेत्राचे स्वरूप हे प्रचंड व्यापक असून, त्यामध्ये असंघटित क्षेत्राद्वारे प्रदान केलेल्या सेवांपासून ते उच्च तंत्रज्ञानाच्या प्रगत सेवांपर्यंतच्या सर्व सेवांचा समावेश यामध्ये होतो.

सेवा क्षेत्रास खरी चालना ही १९९० च्या दशकातील झालेल्या सुधारणांद्वारे मिळाली. १९८० च्या दशकाच्या मध्यभागी सेवा क्षेत्राचा विस्तार होऊ लागला होता. परंतु, १९९० च्या दशकात जेव्हा भारताने पेमेंटच्या गंभीर समतोलाच्या समस्येला प्रतिसाद म्हणून आर्थिक सुधारणांची मालिका सुरू केली, तेव्हा त्याला गती प्राप्त झाली.

हेही वाचा – UPSC-MPSC : सागरी वाहतुकीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजना कोणत्या?

भारतातील सेवा क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या सेवा पुढीलप्रमाणे :

  • व्यापार, हॉटेल आणि रेस्टॉरंट
  • वाहतूक, साठवणूक व दळणवळण
  • वित्तपुरवठा, विमा, रिअल इस्टेट व व्यवसाय सेवा
  • सामुदायिक सेवा आणि वैयक्तिक सेवा
  • बांधकामांशी संबंधित सेवा

सेवा क्षेत्राचे अर्थव्यवस्थेमधील महत्त्व :

भारतीय अर्थव्यवस्थेला वृद्धिंगत करण्यात सेवा क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. गेल्या दशकामध्ये भारताच्या गतिशील सेवा क्षेत्राची अतिशय वेगाने वाढ झाली आहे. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये जी एकूण वाढ झाली आहे, त्यापैकी ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ ही सेवा क्षेत्रामुळेच झाली आहे. सेवा क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे नेतृत्व करीत असून, या वृद्धीने आता दोन अंकी पल्ला गाठला आहे. इतर विकसनशील देश या बाबतीत भारताच्या मागे आहेत.

देशाच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. तसेच भारताच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचे योगदान ५० टक्क्यांहून अधिक आहे. सेवा क्षेत्र हे केवळ भारताच्या जीडीपीमध्ये योगदान देणारेच प्रबळ क्षेत्र नसून, या क्षेत्राने लक्षणीय विदेशी गुंतवणूकही आकर्षित केली आहे. तसेच या क्षेत्राने निर्यातीमध्येदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हे सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यामध्येही आघाडीवर आहे.

रोजगार निर्मितीमध्येही भारतातील एक प्रमुख स्रोत म्हणून सेवा क्षेत्र ओळखले जाते. सेवा क्षेत्र भारतीय लोकसंख्येच्या एकूण ३०.७ टक्के लोकांना रोजगार पुरवते. सेवा क्षेत्राच्या वृद्धीमुळे भारत जागतिक आउटसोर्सिंग हब बनले आहे. त्यामध्ये विशेषतः आयटीबीपी आणि ज्ञानाधारित सेवांचा समावेश होतो. सेवा क्षेत्र हे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्यामध्ये महत्त्वाचे योगदान देते. त्यामध्ये सॉफ्टवेअर, अभियंता, डॉक्टर इत्यादी अनेक उच्च कुशल व्यावसायिकांची निर्मिती करते.

भारतातील व्यावसायिक सेवा निर्यात वाढवणे, जागतिक सेवा बाजारपेठेतील वाटा वाढवणे व जीडीपीमध्येही अनेक पटींनी वाढ करणे अशा दिशेने सरकार महत्त्वपूर्ण प्रयत्न करीत आहे. ज्ञानाधारित सेवांद्वारे निर्माण केल्या गेलेल्या अद्वितीय कौशल्यामुळे आणि स्पर्धात्मक कायद्यामुळे भारत हा जगातील एक अद्वितीय उद्योगांची बाजारपेठ बनला आहे. भारतीय सेवा उद्योगाला स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत व डिजिटल इंडिया यांसारख्या अनेक सरकारी उपक्रमांचे समर्थन आहे. अशा वातावरणाला सरकार प्रोत्साहन देत आहे; जे सेवा क्षेत्राला बळकटी देत आहे.

भारतात सेवा क्षेत्रासमोरील आव्हाने कोणती? :

भारतातील सेवा क्षेत्र आर्थिक वाढ आणि रोजगाराचे प्रमुख चालक असतानाही या क्षेत्राला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामधील काही महत्त्वाच्या आव्हानांचा आढावा आपण समोर घेणार आहे.

१) पायाभूत सुविधांची अडचण : अपुऱ्या पायाभूत सुविधा ही एक महत्त्वाची समस्या आहे. कारण- या अपुऱ्या पायाभूत सुविधा वाहतूक आणि दळणवळण सेवांच्या कार्यक्षम वितरणात अडथळा आणतात.

२) कुशल कामगारांची कमतरता : भारतात मोठ्या संख्येने पदवीधर आणि कुशल व्यावसायिकांची उपलब्धता आहे; मात्र कर्मचाऱ्यांकडे असलेले कौशल्य आणि सेवा क्षेत्राच्या मागण्या यांच्यामध्ये तफावत पाहावयास मिळते.

३) तंत्रज्ञानाचा अवलंब : भारताने आयटी आणि सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असतानाही इतर अनेक सेवा उद्योग कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकतेसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये मागे असल्याचे पाहावयास मिळते. आजच्या या जागतिक सेवांच्या वातावरणात डिजिटल परिवर्तन होणे आवश्यक आहे.

४) डेटा गोपनीयता आणि सुरक्षा : या डिजिटल युगात डेटा गोपनीयता आणि सुरक्षिततेबद्दल चिंता अधिक स्पष्ट झाली आहे. सेवाप्रदात्यांनी जटिल डेटा संरक्षण कायद्याने नेव्हिगेट करणे आणि ग्राहक डेटाची सुरक्षित हाताळणी सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

५) नियामक जटिलता : जटिल आणि वारंवार बदलणारे नियम सेवा क्षेत्रातील व्यवसायांसाठी अडथळे निर्माण करू शकतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : सागरी वाहतूक म्हणजे काय? स्वातंत्र्योत्तर काळात सागरी वाहतुकीच्या विकासासाठी कोणते प्रयत्न करण्यात आले?

भारतातील सेवा क्षेत्राची सद्य:स्थिती :

भारताच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा १९५०-५१ मध्ये ३१.९ टक्के होता; जो आता २०२२-२३ मध्ये ५० टक्क्यांच्या वर गेल्याचे पाहावयास मिळते.‌ सेवा क्षेत्राने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८.४ टक्के वार्षिक वृद्धी दर नोंदविला आहे. तसेच कार्यकारी लोकसंख्येला पुरवलेली रोजगार क्षमता विचारात घेतल्यास सेवा क्षेत्राचा वाटा हा १९६१ मध्ये १२.४ टक्के इतका होता; जो २०११ मध्ये NSSO च्या आकडेवारीनुसार २६.९ टक्के इतका वाढला आहे. २०२१-२२ मध्ये भारतात थेट विदेशी गुंतवणूक ८२ अब्ज डॉलर एवढी होती. सेवा क्षेत्र हे विदेशी गुंतवणुकीचे प्रमुख क्षेत्र म्हणून ओळखले जात आहे . तसेच भारतीय सेवा क्षेत्र एप्रिल २००० ते जून २०२३ दरम्यान १,०५,४००.८८ अब्ज डॉलरचा FDI प्रवाह मिळवणारा सर्वांत मोठा प्राप्तकर्ता होता.