सागर भस्मे

मागील काही लेखांतून आपण कोकणातील नद्यांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भीमा नदीप्रणालीसंदर्भात जाणून घेऊ या. भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील भीमाशंकर (पुणे) येथे झाला आहे. या नदीची एकूण लांबी ८६० किमी असून, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये ४५१ किमी क्षेत्र आहे. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून, महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकमध्ये ती कृष्णा नदीला जाऊन मिळते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचा स्वतंत्रपणे विचार केला जातो.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील मृदा आणि तिचे प्रकार

भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होत असून, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, दहिवडी, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यांतील काही भागांचा समावेश होतो. कर्नाटकमधील रायचूरजवळ कुरगुड्डी येथे कृष्णा व भीमा या दोन नद्यांचा संगम होतो. भीमा नदी बाणेर खोऱ्यामध्ये अतिशय खडकाळ आणि अरुंद दरीमधून वाहते. भीमा नदीने महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर, तसेच पुणे व अहमदनगर या जिल्ह्यांची सीमा निश्चित केलेली आहे.

भीमा नदीला उजव्या किनाऱ्यावर इंद्रायणी, भामा, मुळा, मुठा, मान, निरा, बोर व पवना या नद्या येऊन मिळतात. तर, डाव्या किनाऱ्यावर सीना, वेळ, घोड या तीन नद्या येऊन मिळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील वने व त्यांचे प्रकार

प्रमुख उपनद्यांची माहिती खालीलप्रमाणे :

वेळ : वेळ नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेमध्ये धाकले येथे होतो. या नदीची एकूण लांबी ६४ किलोमीटर असून, तळेगाव ढमढेरे येथे ही नदी भीमा नदीत जाऊन मिळते.

इंद्रायणी : इंद्रायणी नदीची एकूण लांबी ९३ किलोमीटर असून, या नदीचा उगम महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील कुरवडे खेड्याजवळ झालेला आहे. आंध्र ही
या नदीची प्रमुख उपनदी आहे. महाराष्ट्रातील देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या काठावरती वसली आहेत.

घोड : घोड नदीची एकूण लांबी २७० किलोमीटर असून, या नदीचा उगम महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेत गावडेवाडी या ठिकाणी भीमा नदीच्या उगमाच्या उत्तरेस १५ किमी अंतरावर झालेला आहे. या नदीच्या उपनद्यांमध्ये कुकडी व मीना या नद्यांचा समावेश होतो. शिरूरजवळ घोड नदी भीमा नदीला येऊन मिळते.

मुळा-मुठा नदी : मुळा नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये बोरघाटाच्या दक्षिणेस होतो. पुण्याजवळ मुळा नदीला उजव्या किनाऱ्यावर मुठा नदी येऊन मिळते. मुठा नदीच्या आंबी व मोशी या दोन उपनद्या आहेत. मुठा व तिच्या उपनद्यांवर महाराष्ट्रामध्ये खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव ही धरणे आहेत. मुळा व मुठा यांचा संयुक्त प्रवाह रांजणगावजवळ भीमा नदीस जाऊन मिळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीरा : नीरा नदीची एकूण लांबी २०९ किलोमीटर असून, या नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिरगावजवळ झालेला आहे. या नदीच्या वेळवंडी व कऱ्हा या दोन प्रमुख उपनद्या आहेत. नीरा नदीचे क्षेत्र प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा व सांगली या तीन जिल्ह्यांमध्ये असून, या नदीवर वीर, भाटघर, नीरा-देवघर ही धरणे बांधलेली आहेत.