scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : भारतातील वनसंपत्तीचे वर्गीकरण कसे केले जाते? वनस्पतींवर परिणाम करणारे घटक कोणते?

या लेखातून आपण भारतातील वनसंपदा याविषयी माहिती घेऊया.

Forest
भारतातील वनसंपत्तीचे वर्गीकरण कसे केले जाते? वनस्पतींवर परिणाम करणारे घटक कोणते? ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारताच्या हवामान वर्गीकरणविषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखातून आपण भारतातील वनसंपदा याविषयी माहिती घेऊया. जंगल हा शब्द लॅटिन भाषेतील ‘फॉरेस’ (fores ) शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘सीमेवरील किंवा बाहेरील’ असा होतो. सर्वसाधारणपणे जंगलाची व्याख्या लाकूड आणि इतर वनोपजांच्या उत्पादनासाठी राखून ठेवलेले क्षेत्र अशी केली जाते. पर्यावरणीयदृष्ट्या, जंगल हा प्रामुख्याने झाडे आणि इतर वृक्षाच्छादित वनस्पती असलेला एक वनस्पती समुदाय आहे.

Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…
La Nina effect on AQI
विश्लेषण : प्रशांत महासागरातील ‘ला निना’च्या घटनेचा भारतातील हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो? नवीन संशोधन काय सांगते? वाचा सविस्तर….
farm mechanization
UPSC-MPSC : शेतीचे यांत्रिकीकरण म्हणजे काय? भारतात शेतीच्या यांत्रिकीकरणाची आवश्यकता का?
granting bail under UAPA
विश्लेषण : बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) अधिनियमात जामिनासंदर्भातील तरतूद काय आहे? या कायद्यांतर्गत जामीन मिळणे कठीण का?

वनस्पतींवर परिणाम करणारे घटक :

नैसर्गिक वनस्पतींवर परिणाम करणाऱ्या भौगोलिक घटकांमध्ये हवामान (climate), माती (soil) आणि स्थलाकृती (topography) यांचा समावेश होतो. मुख्य हवामान घटक म्हणजे पाऊस आणि तापमान. सर्वसाधारणपणे सांगायचे तर, हिमालय वगळता तापमानापेक्षा पावसाला जास्त महत्त्व आहे. कारण वनस्पतींवर पावसाचा परिणाम तापमानापेक्षा अधिक होतो. मोसमी पावसाची व्यवस्था, कोरड्या हंगामाची तीव्रता व कोरड्या हवामानाचा काळ आणि तापमानाच्या चढउताराशी वनसंपदेचा संबंधदेखील महत्त्वाचा आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : नदीप्रणालीनुसार भारताचे विभाजन कसे करण्यात आले? यामागचा उद्देश काय?

वार्षिक पर्जन्यमानाचा वनस्पतींच्या प्रकारावर मोठा परिणाम होतो. वर्षाला २०० सेमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडणाऱ्या भागात सदाहरित पावसाची जंगले आहेत, तर १०० ते २०० सेमी पाऊस असलेल्या भागात पावसाळी पानझडी जंगले आहेत. ५० ते १०० सें.मी. पर्जन्यमान असलेल्या भागात कोरडे पर्णपाती किंवा उष्णकटिबंधीय सवाना काटेरी वने, तर ५० सेमीपेक्षा कमी पाऊस असलेल्या भागात फक्त कोरडे काटेरी झाडे आढळतात. याउलट, समुद्रसपाटीपासून ९०० मीटरपेक्षा जास्त उंचीवरील हिमालय आणि द्वीपकल्पातील टेकड्यांमध्ये तापमान अधिक महत्त्वाची भूमिका बजावते.

हिमालयीन प्रदेशात जसे तापमान उंचीनुसार कमी-कमी होत जाते, तसतसे वनस्पतींचे आवरण उष्णकटिबंधीय ते उपोष्णकटिबंधीय, समशीतोष्ण आणि शेवटी अल्पाइनमध्ये बदलते. मातीच्या परिस्थितीतील बदलांमुळे देशाच्या विविध भागांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींना जन्म दिला आहे. खारफुटीची जंगले, दलदलीची जंगले आणि समुद्रकिनारा आणि वालुकामय किनारा जंगले ही नैसर्गिक वनस्पती मातीच्या प्रभावाची काही उत्कृष्ट उदाहरणे आहेत. पाऊस आणि तापमानानंतर महत्त्वाचा घटक स्थलाकृती हा वनस्पती प्रकारावर फारसा प्रभाव टाकत नाही; तर स्थलाकृती काही किरकोळ प्रकारांसाठी जबाबदार आहे. उदा. अल्पाइन वनस्पती, भरतीची जंगले इ.

भारतातील नैसर्गिक वनस्पतीचे वर्गीकरण :

भारताच्या विविध भागांमध्ये पर्जन्यमान आणि तापमानाचे असमान वितरण तसेच त्यांच्या ऋतूतील भिन्नता, या विविध जैविक व अजैविक परिस्थितींमुळे मोठ्या प्रमाणात वनस्पतीचे प्रकार आढळतात. त्यामुळे भारतीय जंगलांचे सामान्यीकृत वर्गीकरण करणे अवघड काम आहे. अनेक वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञांनी भारतातील वनांचे विविध पद्धतीने वर्गीकरण केले आहे. एचजी चॅम्पियन (१९३६) ने भारतातील वनस्पतींचे १६ प्रकारामध्ये वर्गीकरण केले. भारतातील वनस्पती खालील तपशीलांनुसार पाच मुख्य प्रकार आणि १६ उप-प्रकारांमध्ये विभागली जातात :

अ) आद्र उष्णकटिबंधीय जंगले

१) उष्णकटिबंधीय आद्र सदाहरित वने
२) उष्णकटिबंधीय अर्ध-सदाहरित वने
३) उष्णकटिबंधीय आर्द्र पर्णपाती वने
४) किनारी आणि दलदल

ब) कोरडी उष्णकटिबंधीय जंगले

१) उष्णकटिबंधीय कोरडे सदाहरित वने
२) उष्णकटिबंधीय कोरडे पर्णपाती
३) उष्णकटिबंधीय काटेरी वने

क) पर्वतीय/मॉन्टेन उप-उष्णकटिबंधीय जंगले

१) उप-उष्णकटिबंधीय रुंद पाने असलेली पर्वतावरील वने
२) उप-उष्णकटिबंधीय आर्द्र टेकडी (पाइन)
३) उप-उष्णकटिबंधीय कोरडे सदाहरित

ड) पर्वतीय/मोंटेन समशीतोष्ण जंगले

१) मॉन्टेन ओले समशीतोष्ण वने
२) हिमालयीन आर्द्र समशीतोष्ण
३) हिमालय कोरडे समशीतोष्ण

इ) अल्पाइन जंगले

१) उप-अल्पाइन वने
२) आद्र अल्पाइन झुडुपे/स्क्रब
३) कोरडे/ ड्राय अल्पाइन स्क्रब

अ) आद्र उष्णकटिबंधीय जंगले :

१) उष्णकटिबंधीय ओले सदाहरित जंगले (Tropical wet evergreen forest) : ही ठराविक पर्जन्य असलेली जंगले आहेत. ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान २५० सेमी पेक्षा जास्त आहे, तसेच वार्षिक तापमान सुमारे २५°-२७°C आहे व सरासरी वार्षिक आर्द्रता ७७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि कोरडा हंगामाचा काळ कमी आहे. उच्च उष्णता आणि उच्च आर्द्रतेमुळे या जंगलातील झाडे त्यांची पाने गाळत नाहीत, म्हणून त्यांना सदाहरित जंगले म्हणतात. ही उंच, अतिशय घनदाट बहुस्तरीय जंगले आहेत.

या जंगलातील झाडे अनेकदा ४५ मीटर उंचीवर पोहोचतात, काही झाडे तर ६० मीटरपेक्षा जास्त उंचीचे असतात. या वनांना वरून पाहिल्यास संपूर्ण आकृतीशास्त्र हिरव्या गालिच्यासारखे दिसते. ही वने घनदाट असल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचू शकत नाही. सदाहरित जंगले पश्चिम घाटाच्या पश्चिम बाजूने (समुद्रसपाटीपासून ५०० ते १३७० मीटरच्या दरम्यान) मुंबईच्या दक्षिणेस, अरुणाचल प्रदेश, अप्पर आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये आढळतात. या जंगलांचे लाकूड बारीक, कठोर आणि टिकाऊ असल्यामुळे त्याचे व्यावसायिक मूल्य जास्त आहे. पश्चिम घाटातील मेसुवा, पांढरे देवदार, कॅलोफिलम, टून, धूप, पॅलेकियम, होपा, जामुन, गुर्जन, चपलाशा, जामुन, मेसुआ, आगर, मुळी, बांबू इ. या जंगलांतील महत्त्वाच्या प्रजाती आहेत.

२) उष्णकटिबंधीय अर्ध-सदाहरित जंगले (Tropical semi-evergreen Forest) : उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलांच्या सीमेवरील, उष्णकटिबंधीय अर्ध-सदाहरित जंगलांचे तुलनेने कोरडे क्षेत्र आहेत. येथे वार्षिक पर्जन्यमान २००-२५० सेमी आहे. सरासरी वार्षिक तापमान २४°C ते २७°C पर्यंत असते आणि सापेक्ष (relative humidity) आर्द्रता सुमारे ७५ टक्के असते. या गोष्टी लक्षात घेता सहाजिकच ही जंगले पश्चिम किनारपट्टी, आसाम, पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी ओडिशा आणि अंदमान बेटांवर आढळतात.

३) उष्णकटिबंधीय आर्द्र पर्णपाती जंगले (Tropical humid deciduos Forest) : ही जंगले दरवर्षी एका विशिष्ट हंगामामध्ये एकत्रितपणे सर्व वनस्पती पाने गाळतात. १०० ते २०० सेमी मध्यम पर्जन्यमान, सरासरी वार्षिक तापमान सुमारे २७°C आणि ६० ते ७५ टक्के सरासरी वार्षिक सापेक्ष आर्द्रता (relative humidity) असलेल्या भागात आढळतात. पश्चिम आणि पूर्व घाटाच्या उतारावरील सदाहरित जंगलांच्या पट्ट्याभोवती, तराई आणि भाबेरसह शिवालिक पर्वतरांगांचा ७७° पु. ते ८८° पू . पर्यंतचा पट्टा, मणिपूर आणि मिझोराम, पूर्वेकडील टेकड्या, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, छोटा नागपूर पठार, ओडिशाचा बहुतांश भाग, पश्चिम बंगालचा काही भाग आणि अंदमान आणि निकोबार बेटे या क्षेत्रामध्ये ही वने आहेत.

या जंगलातील झाडे वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस, जेव्हा पानांसाठी पुरेसा ओलावा उपलब्ध नसतो. सहा-आठ आठवडे पाने गळतात. पावसाळा सुरू झाल्यावर ही जंगले पुन्हा हिरवीगार होतात. उष्णकटिबंधीय आद्र पानझडी जंगले २५ ते ६० मीटर उंच असतात. ही अतिशय उपयुक्त जंगले आहेत, कारण ते मौल्यवान लाकूड आणि इतर अनेक वन उत्पादने देतात. या जंगलात साग, साल, पडौक, लॉरेल, पांढरा चुगलम, बदाम, धुप, चिक्रोसी, कोक्को, हलडू, रोझवूड, महुआ, बिजासल, लेंडी, सेमुल, इरुल, आवळा, कुसुम, तेंदू, पाउला, जामुन, बांबू, इ. मुख्य प्रजाती आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील कृषीची विशिष्ट्ये कोणती? देशात किती प्रकारची हंगामी पिके घेतली जातात?

४) किनारी आणि दलदलीची जंगले (Littoral and swamp forest) : ही जंगले डेल्टा, मुहाने आणि भरती-ओहोटीच्या प्रभावास प्रवण असलेल्या खाड्यांमध्ये आणि आसपास आढळतात आणि त्यांना डेल्टा किंवा भरती-ओहोटीची जंगले असेही म्हणतात. किनार्‍यावर अनेक ठिकाणी ही जंगले आढळतात, तर दलदलीची जंगले गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरीच्या डेल्टापुरती मर्यादित आहेत. या जंगलांचे सर्वात विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे, ते ताजे तसेच खाऱ्या पाण्यात टिकून राहू शकतात आणि वाढू शकतात. याचे एकूण क्षेत्र ६,७४० चौरस किमी आहे, जे जगातील एकूण खारफुटी क्षेत्राच्या सुमारे ७ टक्के आहे.

गंगा डेल्टामधील सुंदरबन हे सर्वात मोठे आणि घनदाट आहे, जिथे मुख्य प्रजाती सुंदरी (हेरिटेरा) मुबलक प्रमाणात वाढते, या भागाला सुंदरबन असे म्हणतात. हे उपयुक्त इंधन लाकूड प्रदान करते. हे कठीण आणि टिकाऊ लाकूड पुरवते जे बांधकाम आणि बोटी बनवण्यासाठी वापरले जाते. सुंद्री, बुर्गीएरा, सोनेरातिया, आगर, केओरा, निपा, अमूर, भारा, रायझोफोरा, स्क्रू पाइन्स, केन आणि पाम इत्यादी महत्त्वाच्या प्रजाती या जंगलात आढळतात. या जंगलांना कांदळवने खारफुटीची वने किंवा मंगरूळ वने इत्यादी नावे आहेत. तसेच या जंगलाला पृथ्वीवरचे वृक (Kidneys of earth) असे संबोधले जाते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc indian geography classification of forest in india and the factors affect on plants mpup spb

First published on: 04-12-2023 at 19:18 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×