सागर भस्मे

दक्षिण भारतीय पठार, गोंडवाना भूमीचा भाग असून या पठारावरून वाहणाऱ्या नद्या प्राचीन आहेत. या पठारावर प्राचीन हिमनद्यांच्या खननाचे पुरावे आढळतात. पठारावरील काही नद्यांच्या जलप्रणालीवर हिमालय पर्वताच्या निर्मितीचा परिणाम झाला आहे. हिमालयनिर्मिती होताना भारतीय पठारावर ताण पडून अनेक ठिकाणी प्रस्तरभंग झाले. काही ठिकाणी खचदऱ्या निर्माण झाल्या व अशा खचदऱ्यांमधून वाहणारी नर्मदा व तापी नद्यांची अर्वाचीन जलप्रणाली निर्माण झाली.

महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा व तापी या नद्या द्विपकल्पीय पठारावरील डोंगरात उगम पावणाऱ्या नद्या आहेत. महानदी, गोदावरी, कृष्णा, व कावेरी या नद्या बंगालच्या उपसागरास येऊन मिळतात. त्यांनी तिथे किनारपट्टीत शेतीला उपयुक्त असे सुपीक त्रिभुज प्रदेश निर्माण केले आहेत. तर नर्मदा, तापी या अरबी समुद्राला जाऊन मिळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : भारतीय ऋतू आणि त्यांचे वर्गीकरण

गोदावरी नदी खोरे

गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. या नदीची लांबी १४६५ कि.मी. असून गोदावरी नदी आंध्र प्रदेशातील राजमुद्रीजवळ बंगाल उपसागराला जाऊन मिळते. बंगालच्या उपसागराला मिळण्याच्या अगोदर ती दोन उपनद्यांमध्ये विभाजित होते. ज्यांना वशिष्ठ गोदावरी आणि गौतमी गोदावरी या नावाने ओळखले जाते. गौतमी गोदावरीचे पुन्हा दोन उपविभाग तयार होतात. गौतमी आणि निलारेवू. वशिष्ठ गोदावरीचेही दोन उपविभाग तयार होतात.वशिष्ठ आणि वैनतेय. महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी ही नदी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वत नाशिक जिल्हा, महाराष्ट्र येथे होतो. गोदावरी नदीचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ १५२५८९ चौ.कि.मी. गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, बीड, जालना, नांदेड, परभणी, गडचिरोली जिल्ह्यांमधून वाहते.

  • गोदावरी नदीला दक्षिणेकडून म्हणजे उजव्या बाजूला येऊन मिळणाऱ्या नद्या – सिंदफना, मांजरा, प्रवरा, बिंदुसरा, दारणा.
  • गोदावरी नदीला उत्तरेकडून म्हणजे डाव्या बाजूला येऊन मिळणाऱ्या नद्या – प्राणहिता, शिवना, कादवा, इंद्रावती.

कृष्णा नदी खोरे

भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार करता कृष्णाचे खोरे ८% एवढ्या भागावर पसरले असून ते भारतातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो, जेथे कृष्णा नदीचा उगम होतो, त्या क्षेत्रामध्ये पश्चिमेकडे वाहणाऱ्या सावित्री व गायत्री या नद्या तसेच पूर्वेकडे वाहणाऱ्या कोयना व वेण्णा या नद्यांचाही उगम होतो. कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यांमधून वाहते व बंगालच्या उपसागराला मिळते व तेथे त्रिभुज प्रदेश तयार करते. कृष्णा नदीची एकूण लांबी १,४०० कि.मी. असून महाराष्ट्रात उगम झाल्यानंतर तिची सुरुवातीची दिशा वायव्येकडून आग्नेयेकडे अशी आहे. मात्र कर्नाटकमध्ये प्रवेश केल्यानंतर ती पूर्व दिशेला वाहते.

  • कृष्णा नदीला उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्या : भीमा, दिंडी, मुशी, येरळा, हलिआ, पलेरु, मुन्नेर.
  • कृष्णा नदीला दक्षिण दिशेकडून मिळणाऱ्या उपनद्या : कोयना, वारणा, पंचगंगा, घटप्रभा, वेण्णा, हिरण्यकेशी, तुंगभद्रा, वेद्रावती, दुधगंगा, मलप्रभा आहे.

भीमा नदी खोरे

भीमा नदीचा उगम पश्चिम घाटामध्ये भीमाशंकर- पुणे जिल्हा येथे होतो. ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटक या तीन राज्यांमधून वाहते. तिची एकूण लांबी ८६० किलोमीटर एवढी असून महाराष्ट्रामध्ये केवळ ४५० किलोमीटर एवढी आहे. भीमा नदी खोरे महाराष्ट्रातील पुढील जिल्ह्यात पसरले आहे. ही नदी डाव्या बाजूने म्हणजे उत्तरेकडून कर्नाटक राज्यातील रायचूरजवळील कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

  • भीमा नदीला डावीकडून म्हणजे उत्तर दिशेने मिळणाऱ्या उपनद्या : सीना, घोड.
  • भीमा नदीला उजवीकडून म्हणजे दक्षिण दिशेने मिळणाऱ्या उपनद्या : मुळा, मुठा, निरा, इंद्रायणी

महानदी नदी खोरे

महानदीचा उगम छत्तीसगड पठारावर रायपूर जिल्ह्यात बस्तर टेकड्या सिंहवाजवळ होतो. महानदीची एकूण लांबी ८५८ कि.मी. असून नदीच्या उगमाकडील भागात बशीच्या आकाराचा छत्तीसगड पठाराचा खोलगट भाग येतो. पुढे महानदी प्रथम उत्तरेस व नंतर पूर्वेकडे वाहत जाते व शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. नदीला उजव्या बाजूने आँग, जोंक, तेल व डाव्या बाजूने शोवनाथा, हसदो, मांड, इब या उपनद्या येऊन मिळतात. महानदीने आपल्या मुखाशी विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण केला असून कटक शहरापासून या त्रिभुज प्रदेशाची सुरुवात होते. महानदीवर हिराकुड, टिकारपारा, नारज हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. ओरिसा राज्यातील हिराकुड या मातीच्या धरणाची लांबी सुमारे ४,८०० मीटर आहे.

कावेरी नदी खोरे

कावेरी नदीचा उगम कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या ब्रह्मगिरी डोंगरात होतो. या नदीचे क्षेत्रफळ ८७,९०० चौ.कि.मी. व लांबी ८०५ कि.मी. असून ही नदी प्रथम आग्नेयेला व नंतर पूर्वेला तामिळनाडू राज्यातून वाहत जाऊन शेवटी कावेरीपट्टणमजवळ बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीने आपल्या मुखालगत मोठा त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. कर्नाटकाच्या नैर्ऋत्य भागास व तामिळनाडूच्या मध्य भागास या नदीचा फायदा होतो. श्रीरंगपट्टम व शिवसमुद्रम् येथील धबधबा प्रसिद्ध आहे. कावेरीला डाव्या बाजूने हेमावती, शिशमा व तर उजव्या बाजूने कबान, भवानी, अमरावती या उपनद्या येऊन मिळतात. कर्नाटकातील कृष्णराज सागर प्रकल्प, तामिळनाडूमधील मेत्तूर, निम्न भवानी, वेल्लूर, करार, तिरुचिरापल्ली इत्यादी महत्त्वाचे सिंचन प्रकल्प कावेरी नदीवर उभारलेले आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : द्वीपकल्पीय पठारावरील पर्वतरांगा आणि विस्तार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नर्मदा नदी खोरे

नर्मदा ही मध्य भारतातील एक महत्त्वाची पश्चिम वाहिनी नदी आहे, जी मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकडीच्या शिखरावर उगम पावते. तिची लांबी १३१२ कि.मी. आहे व तिचे एकूण क्षेत्रफळ ९८७९६ चौ. किमी. आहे. ती मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमधून वाहते. मुख्यत्वे करून तिला उत्तर व दक्षिण भारतातील एक पारंपरिक सीमारेषा म्हणून पाहिले जाते. ती गुजरातच्या भरूच जिल्ह्यात अरबी समुद्राला जाऊन मिळते.

  • उजव्या तिरावरील उपनद्या हिरण, उरी, तेंडोनी, कोलार, हातणी आणि ओरसांग.
  • डाव्या तिरावरील उपनद्या – शेर, शक्कर, बंजार, दुधी, तवा, गंजल.