scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशी आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?

महाराष्ट्राचा भूगोल : या लेखातून आपण महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, विस्तार, तसेच त्याच्या राजकीय व प्रशासकीय विभागांविषयी जाणून घेऊया.

geographical structure of Maharashtra,
महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशी आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात राज्याचा कितवा क्रमांक लागतो? ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

सागर भस्मे

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील मृदा, वने आणि त्याच्या प्रकारांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, विस्तार, तसेच त्याच्या राजकीय व प्रशासकीय विभागांविषयी जाणून घेऊ. भारतामधील सध्या २८ घटक राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. भारताच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्य स्थित असून, उत्तर भारत व दक्षिण भारतास जोडणारी ही विशाल भूमी आहे. पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस साधारणपणे पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरलेला असून, तो भारताचे ९.३% क्षेत्रफळ व्यापतो. क्षेत्रफळानुसार देशात महाराष्ट्राचा ३,०७,७१३ चौ.कि.मी. क्षेत्रफळासह तिसरा; तर लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो.

imd predicted hailstorm in north central Maharashtra
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Halve the price of high priced garlic
लसूण स्वस्त; ग्राहकांना दिलासा, परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू
Second phase of Loksatta District Index on February 15 mumbai
‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’चे दुसरे पर्व १५ फेब्रुवारीला
maharashtra weather update marathi news, maharashtra rain prediction marathi news, maharashtra cold wave marathi news
राज्यासह देशाच्या काही भागात पावसाचे सावट, थंडीचा जोर वाढण्याचीही शक्यता

महाराष्ट्राचा अक्षांश व रेखांश विस्तार बघितल्यास १५° ४८’ उ अक्षांश ते २२° ६’ उ अक्षांश आणि ७२°३६’ पू रेखांश ते ८०° ५४’ पू रेखांश पर्यंत आहेत. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोनाकृती असून, तो दक्षिणेकडे चिंचोळा तर, उत्तरेकडे रुंद होत गेलेला आहे. म्हणजेच पाया कोकणात व निमुळते टोक ईशान्येस गोंदियाकडे आहे. महाराष्ट्राचा ८७% भाग हा दख्खन पठाराने व्यापलेला आहे, जो की, भारतीय द्वीपकल्पाचा एक भाग आहे.

१९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी वाढीस लागली. संयुक्त महाराष्ट्रची मागणी ही त्याच्याही आधीपासून अस्तित्वात होती. महाराष्ट्राच्या एकीकरणाचा विचार साहित्य संमेलनातूनदेखील मांडला जाऊ लागला. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली; ज्यामध्ये आजचे गुजरात राज्य, संयुक्त महाराष्ट्र व मुंबईचा समावेश होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा परिणाम म्हणून अखेर एप्रिल १९६० मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषावार प्रांतरचनेस मान्यता देण्यात आली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली, तेव्हा महाराष्ट्रात २६ जिल्हे आणि चार प्रशासकीय विभाग होते. तसेच २३५ तालुके, २८९ शहरे व ३,५७७ खेडी होती. तेव्हा मुंबई (कोकण), पुणे, औरंगाबाद व नागपूर असे चार प्रशासकीय विभाग होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : सातपुडा पर्वतरांग; भूवैज्ञानिक निर्मिती आणि खनिजे

महाराष्ट्राच्या प्रशासकीय कामकाज सोईस्कर व सुलभरीत्या करता यावे यासाठी प्रशासकीय विभाग करून त्यांची कालांतराने विभागणीसुद्धा करण्यात आली. पुढे चालून नाशिक व अमरावती असे दोन प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आले. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, लातूर, जालना, गडचिरोली, मुंबई उपनगर, वाशिम, नंदुरबार, हिंगोली, गोंदिया, पालघर असे १० जिल्हे उदयास आले. सध्या महाराष्ट्रात ऑगस्ट २०१४ नुसार ३६ जिल्हे आणि सहा प्रशासकीय विभाग आहेत.

प्रशासकीय विभागानुसार त्यातील जिल्हे, तालुके यांचा थोडक्यात आढावा :

१) कोकण विभाग : महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली लांब व चिंचोळी किनारपट्टी कोकण आहे. कोकण प्रशासकीय विभागात सात जिल्ह्यांसह ४७ तालुके (मुंबई उपनगरातील तीन तालुके वगळून) आहेत. कोकणातील सात जिल्हे म्हणजे ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग होय.

२) पुणे विभाग : पुणे विभाग सह्याद्री पर्वतरांग व पर्जन्यछायेच्या भागांत मोडतो. या प्रशासकीय विभागात पाच जिल्हे येतात आणि ते म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर. या जिल्ह्यांमध्ये एकूण ५८ तालुके आहेत.

३) नाशिक विभाग : महाराष्ट्राच्या उत्तर–पश्चिम भागात वसलेल्या पाच जिल्ह्यांना मिळून नाशिक विभाग तयार झालेला आहे. त्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) समाविष्ट आहेत आणि एकूण ५४ तालुके नाशिक विभागामध्ये आहेत.

४) औरंगाबाद विभाग : महाराष्ट्रात सर्वांत मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद विभाग आठ जिल्ह्यांचा समावेश असलेला आहे. या आठ जिल्ह्यांत बीड, औरंगाबाद (आताचे संभाजी नगर), जालना, लातूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, नांदेड यांचा समावेश आहे. तसेच सर्वाधिक तालुके म्हणजेच ७६ तालुके या प्रशासकीय विभागात आहेत.

५) अमरावती विभाग : महाराष्ट्राच्या उत्तर–पूर्व दिशेला अमरावती विभाग यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला व वाशिम या पाच जिल्ह्यांचा मिळून बनलेला आहे; ज्यात ५६ तालुके आहेत.

६) नागपूर विभाग : महाराष्ट्राचे पूर्वेचे टोक म्हणजे नागपूर विभाग होय. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया हे सहा जिल्हे आणि ६४ तालुके मिळून बनलेला प्रशासकीय विभाग म्हणजे नागपूर आहे.

त्याचप्रमाणे राज्यात एकूण ३५५ तालुके आहेत. तसेच, स्थानिक प्रशासनासाठी राज्यात ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या व २७,८७५ ग्रामपंचायती आहेत. नागरी भागात २९ महानगरपालिका, २४१ नगर परिषदा, १२८ नगरपंचायती व सात कटक मंडळे (कँटोन्मेंट बोर्ड्स) आहेत. तसेच, २०११ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात वस्ती असलेल्या गावांची संख्या ४०,९९५ व वस्ती नसलेल्या गावांची संख्या २,७०६; तर शहरांची संख्या ५३४ आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राचा भूगोल : भीमा नदीप्रणाली

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे नामकरण आणि स्थापना वर्षे

कालांतराने महाराष्ट्रातील विविध भागातील लोकांनी चळवळी, आंदोलने, प्रदर्शने करून प्रदेशाची वृद्धी, विकास, भरभराट होण्यासाठी, तसेच राजकीय व प्रशासकीय सुलभतेसाठी राज्याच्या जिल्हावार रचनेत बदल घडवून आणले आहेत. त्याचप्रमाणे १ जानेवारी १९८१ ला कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ‘रायगड’ असे करण्यात आले. १ मे १९८१ मध्ये रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग; तर अहमदनगर (अताचे संभाजी नगर) मधून जालना जिल्हा निर्माण करण्यात आला. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना १६ ऑगस्ट १९८२ चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोलीची निर्मिती झाली आणि त्याच वर्षी २६ ऑगस्टला उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्हा वेगळा करून एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला. ४ ऑक्टोबर १९९० साली शरद पवार मुख्यमंत्री असताना मुंबई उपनगरमधून मुंबई शहर प्रशासकीय सोईकरिता हा नवीन जिल्हा बनविण्यात आला. १ जुलै १९९८ रोजी नंदुरबार व वाशीम असे दोन नवीन जिल्हे निर्माण झाले. नारायण राणे मुख्यमंत्री असताना १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली जिल्ह्याचे; तर भंडारा जिल्ह्याचे गोंदिया जिल्ह्यात विभाजन करण्यात आले. १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर जिल्हा निर्माण झाला. अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रशासकीय व राजकीय रचना बघायला मिळते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc maharashtra geography what is geographical structure of maharashtra mpup spb

First published on: 06-10-2023 at 15:35 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×