मला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून चालवण्यात येणाऱ्या एमबीए अभ्यासक्रमाबाबत माहिती हवी आहे.

प्रशांत जाधव

एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत ऑनलाइन चाळणी परीक्षा घेतली जाते. यासाठी

विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्याशाखेतून विशिष्ट गुण मिळवून पास व्हावे लागते. ही मर्यादा खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के, तर राखीव संवर्गासाठी ४० टक्के इतकी असेल. साधारण जुलै महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. संपर्क- http://ycmou.digitaluniversity.ac

 मी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांला आहे. मला नौदलात जायचे आहे. त्यासाठी मी काय करू?

प्रशिका रोकडे

नौदलातील प्रवेशासाठीचे काही मार्ग- (१) १०+२ थेट भरती (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र/ गणित आणि रसायनशास्त्र, एकूण किमान गुण- ७० टक्के) (२) आर्टिफिसर अप्रेंटिसशिप (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित, एकूण किमान गुण- ६० टक्के) (३) डायरेक्ट एन्ट्री स्पोर्ट्स (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र/ गणित आणि रसायनशास्त्र, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (४) मॅट्रिक रिक्रूट- कूक (अर्हता- १० वी, किमान एकूण गुण- ३३ टक्के), (५) मॅट्रिक रिक्रूटरयुट- स्पोर्ट्स (अर्हता- १० वी, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (६) म्युझिशियन (अर्हता- १० वी, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (७) नॉनमॅट्रिक रिक्रूट (अर्हता- १० वी, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (८) सीनिअर सेकंडरी रिक्रूट (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (९) सीनिअर सेकंडरी रिक्रूट- स्पोर्ट्स (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (१०) नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी नेव्हल अ‍ॅकॅडमी परीक्षा (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित, एकूण किमान गुण- ६० टक्के), (११) तुम्ही कम्बाईन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस परीक्षा देऊन नौदलात जाऊ  शकता. मात्र त्यासाठी आधी आपणास पदवी प्राप्त करावी लागेल.

मी ११ वी विज्ञान (इलेक्ट्रॉनिक्स) या शाखेत शिकत आहे. मला अभियांत्रिकी करून यूपीएससी व एमपीएससी परीक्षा द्यायची आहे. मी त्या परीक्षेविषयी कोणती माहिती मिळवू?

आकाश पाटील

आकाश, तुमची इच्छा अतिशय चांगली आहे. त्यासाठी तुम्ही ‘लोकसत्ता’ दैनिकामधील करिअर वृत्तान्त नियमितरीत्या वाचत राहा. यामध्ये यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेसंबंधी विस्तृत माहिती नियमितरीत्या दिली जाते. दरम्यान, सामान्य अध्ययन, चालू घडामोडी, इंग्रजी व मराठी भाषाकौशल्य मिळवत राहा.

मी अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षांला आहे. मला महाराष्ट्र पोलीस दलात सामील व्हायचे आहे. मी अर्जसुद्धा भरला आहे. मात्र त्याविषयी मला काहीही माहिती नाही. मी काय करू?

दादा पाटील

महाराष्ट्र पोलीस दलात तुम्हाला पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक या मार्गाने तुम्ही थेट प्रवेश मिळवू शकता. पोलीस उपनिरीक्षकपदासाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्राथमिक आणि मुख्य परीक्षा घेतली जाते. पोलीस उपअधीक्षक पद हे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सामाईक परीक्षेद्वारे भरले जाते. या परीक्षेतील गुणवत्ता यादीतील आपले स्थान आणि आपण सुचवलेला पर्याय (उपजिल्हाधिकारी/ पोलीस उपअधीक्षक/ विक्रीकर अधिकारी इत्यादी) यावर आधारित नियुक्ती मिळू शकते. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेद्वारे आपणास महाराष्ट्र कॅडेर मिळाले तर पोलीस अधीक्षक या पदावरची नियुक्ती मिळू शकते.

मी १२ वीमध्ये असून मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मला बेकिंग आणि पेस्ट्रीमध्ये रस आहे. त्यात करिअर करायचे आहे. मला अमेरिका किंवा दुसऱ्या देशात हे शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी मला १२ वीनंतर कोणते क्षेत्र निवडावे लागेल? कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ

स्वप्निल आळंदे

तुम्हाला बेकिंगसारख्या विषयात करिअर करायचे आहे, हे छानच आहे. परंतु परदेशातील शिक्षण हे महागडे असते, हे लक्षात घ्या. आपली आणि आपल्या पालकांची तशी आर्थिक तयारी असेल तर या पर्यायाचा विचार करा.

बेकरी आणि पेस्ट्री अभ्यासक्रम चालवणाऱ्या अमेरिकेतल्या काही महत्त्वाच्या संस्था

इन्स्टिटय़ूट ऑफ क्युलिनरी एज्युकेशन न्यूयॉर्क / क्युलिनरी इन्स्टिटय़ूट ऑफ अमेरिका / इंटरनॅशनल क्युलिनरी सेंटर, कॅलिफोर्निया/ लि कॉर्डान ब्ल्यू शिकागो / इंटरनॅशनल क्युलिनरी स्कूल वॉशिंग्टन/ सॅन डिएगो क्युलिनरी इन्स्टिटय़ूट – कॅलिफोर्निया/ रेस्टॉरंट स्कूल अ‍ॅट वालनट हिल कॉलेज फिलाडेल्फिया.

भारतातील नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग या संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय संस्थांमध्ये उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते.

महाराष्ट्रातील संस्था- इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट दादर, मुंबई. संपर्क- http://www.ihmctan.edu/

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com