मी १२वी वाणिज्य शाखेत शिकतो आहे. मला रेल्वेत मोटरमन व्हायचे आहे. त्यासाठी कोणता अभ्यासक्रम करावा लागेल?

ऋतिक दामोदर

रेल्वे मोटारमन होण्यासाठी इच्छुक उमेदवाराने आयटीआयमधून मोटार मेकॅनिक वा संबंधित विषयाचे प्रशिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
मी १२वी विज्ञान शाखेमध्ये शिकत आहे. मी बोर्डाचा अर्ज भरला आहे. परंतु मला काही कारणांमुळे परीक्षेला बसावेसे वाटत नाही. पुढच्या वर्षी मला कला शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. तरी मला कला शाखेत प्रवेश मिळेल काय? पुढील शिक्षणासाठी काही अडचणी येतील का?

सुरज कोल्हे

तुम्हाला पुढच्या वर्षी कला शाखेत प्रवेश मिळू शकेल. त्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करू शकता. पुढील शिक्षणासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मात्र तुम्ही यंदा १२ वीची परीक्षा दिली नाही तर एक वर्ष वाया जाणार आहे, ही बाब लक्षात असू द्यावी. आजच्या अत्यंत स्पर्धेच्या काळात असे एखादे वर्ष वाया जाऊ  देणे योग्य ठरेलच असे नाही. पालक व शिक्षकांसोबत चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा.

 

मी बीसीएच्या शेवटच्या वर्षांला आहे. मला पदवीनंतर सॅप ( रअढ ) हा अभ्यासक्रम करायचा आहे. त्याविषयी सविस्तर माहिती सांगाल का?

पियुश प्रभुणे

सॅप याचा अर्थ सिस्टिम्स, अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स इन डेटा प्रोसेसिंग असा आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना करिअरच्या विविध  संधी मिळण्याची अधिक शक्यता राहू शकते. व्यवसायवृद्धीसाठी अत्यावश्यक असलेली कौशल्ये त्यांना या शिक्षणातून मिळतात. त्याचा त्यांना लाभ होऊ  शकतो. ढोबळ मानाने या प्रशिक्षणात फायनान्शिएल अकांउंटिंग अ‍ॅण्ड कंट्रोलिंग/ प्रॉडक्शन प्लॅनिंग/, मटेरिअल्स मॅनेजमेंट यासारख्या विषयांचा समावेश असतो.

ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था-

  • इनफिनिटी कन्सल्टिंग, हैदराबाद
  • पाथ रिमांयडर सॉफ्टवेअर सोल्युशन्स हैदराबाद
  • स्कॉ इन्फो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड.

वेगवेगळ्या संस्थांची फी ही वेगवेगळी असेल. प्रशिक्षणाचा कालावधी आठ ते १२ आठवडे.

संपर्क – http://www.sap.com/india/training-certification.html

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)