इव्हेंट मॅनेजमेंट ही संज्ञा गेल्या काही वर्षांत आपल्या सर्वाच्याच परिचयाची झाली आहे. कॉर्पोरेट जगतात नोकरभरतीपासून निरोप समारंभापर्यंत; जनसामान्यांच्या आयुष्यातील अगदी बारशापासून थेट पंचाहत्तरीपर्यंत; मनोरंजन उद्योग, प्रोमो पार्टीज, संगीताची मैफल, फॅशन परेड; तर राजकारणी मंडळींच्या प्रचार मोहिमा, प्रचार सभा; क्रीडा क्षेत्रात, शाळा- महाविद्यालयांमधील सांघिक क्रीडा स्पर्धापासून ते थेट मुंबई, मॅरेथॉनसारख्या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यांचे व्यवस्थापन आज इव्हेंट मॅनेजमेंट संस्थांद्वारे करण्यात येते. एखादा दिमाखदार सोहळा किंवा नियोजनबद्ध सभा घडवून आणण्याचे सारे श्रेय या व्यक्तींचे असते. या करिअर क्षेत्रातील व्यक्तींना पडद्यामागचे कलाकार म्हटलेले अधिक उचित ठरेल.
इव्हेंट मॅनेजमेंट कार्यक्षेत्राचा आवाका खूप मोठा आहे आणि वाढती बहुस्तरीय लोकसंख्या, गेल्या दोन-तीन दशकांत बोकाळलेला चंगळवाद, भारतीयांची उत्सवप्रियता, समारंभाच्या आयोजनासाठी प्रत्येकाला भेडसावणारी वेळेची कमतरता आणि वाढलेली क्रयशक्ती हे सर्व लक्षात घेता इव्हेंट मॅनेजमेंट कार्यक्षेत्रातील नोकरीच्या, स्वयंउद्योगाच्या भरपूर संधींची शक्यता अगदी स्पष्ट दिसून येते.

कामाचे टप्पे
* संकल्पना चित्र तयार करणे (कन्सेप्ट व्हिज्युअलायझेशन)- प्रस्तावित इव्हेंट किंवा समारंभ प्रत्यक्ष कसा असेल किंवा दिसेल याचे कल्पनाचित्र स्पष्ट होणे.
* समारंभाचे नियोजन करणे – कार्यक्रमाच्या आयोजनासाठी, आवश्यक कामांच्या पूर्ततेसाठी आराखडा तयार करणे.
* समारंभाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे- संपूर्ण कार्यक्रमाच्या आवश्यक त्या प्रमाणकानुसार यशस्वी सादरीकरणासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता भासेल आणि त्यासाठी किती खर्च येईल याचे अचूक अंदाजपत्रक करणे गरजेचे ठरते.
* समारंभाचे आयोजन- कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी, आवश्यक त्या गोष्टींचा  घटनाक्रम आखणे.
* कामांचा समन्वय साधणे- अंतिम कार्यक्रम उभारणीच्या कामांतर्गत येणारी लहान कामे   विभागून ती वेगवेगळ्या व्यक्तींवर सोपवणे आणि कामात सुसूत्रता आणणे.
* समारंभाची प्रत्यक्ष अंमलबजावणी- प्रत्यक्ष कार्यक्रम आखणी आणि त्याची सुरक्षित अंमलबजावणी करणे.
शैक्षणिक अर्हता
या क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही विद्याशाखेतील बारावीपर्यंतचे शिक्षण आवश्यक असते, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त असणे आवश्यक असते.  जनसंपर्क व्यवस्थापन विषयातील पदवी आणि विपणन विषयातील पदव्युत्तर शिक्षण अशी पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांना इव्हेंट मॅनेजर म्हणून नोकरीची संधी मिळू शकते.
देशातील अनेक संस्था या विषयातील पदवी-पदविका अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देतात. मात्र, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, उमेदवार नेमणुकीच्या वेळेस वेगवेगळ्या विद्याशाखेतून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देताना दिसतात. उदा. पर्यटन, व्यवस्थापन, विपणन, आदरातिथ्य वगरे. म्हणजेच या करिअर क्षेत्राची आवड असेल तर अन्य विद्याशाखेतील पदवी प्राप्त केलेले विद्यार्थीही या क्षेत्रात प्रवेश करू शकतात.

नोकरीची क्षेत्रे
चित्रपट किंवा मालिका प्रॉडक्शन हाऊसेस, फॅशन उद्योग, हॉटेल, आदरातिथ्य संबंधित क्षेत्र, जाहिरात क्षेत्र, इव्हेंट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी या क्षेत्रांत जनसंपर्क अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, पार्टी अँकर, तांत्रिक विकसन अधिकारी, क्रिएटिव्ह डिझायनर, सूत्रसंचालक, व्हॉइस आर्टस्टि अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे सांभाळण्याची संधी मिळू शकते.

व्यक्तिगत तयारी
* वेळेवर कामे पूर्ण करण्यासाठी अथवा समारंभाच्या आयोजनादरम्यान अष्टौप्रहर काम करण्याची मानसिक व शारीरिक तयारी असावी.
* कामाच्या डेडलाइन्स सांभाळाव्या लागतात.
* सांघिकरीत्या काम करावे लागते.  समाजाच्या विविध स्तरांत मिसळून काम करण्याची  तयारी हवी. अनेकदा विविध कार्यक्षेत्रांतील सन्मान्य व्यक्तींना जवळून पाहता येते, भेटता येते, त्यांच्याशी तसेच कामासंबंधात इतरांशी संवाद साधण्याकरता एटिकेट, मॅनरिझम, संवाद साधण्याचे कसब अंगी बाणवायला हवे.
* एखादा मोठा समारंभ, कार्यक्रम आपण समर्थपणे आयोजित केला, ही बाब  आत्मविश्वास वृिद्धगत करणारी असते, मात्र, ते सांघिक यश असते, हे विसरता कामा नये.

आघाडीच्या शिक्षण संस्था
* इव्हेंट मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट, आय.ई.एस. मॅनेजमेंट कॉलेज, मुंबई.
http://www.emdiworld.com
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, मुंबई. http://www.niemindia.com
* इंटरनॅशनल सेंटर फॉर इव्हेंट मार्केटिंग, नवी दिल्ली.
http://www.eventmanagementindia.com

आवश्यक कौशल्ये
जनसंपर्क
या क्षेत्रात जम बसवायचा तर विविध वयोगटांच्या, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांतील, समाजाच्या विविध स्तरांतील व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित करणे हिताचे ठरते. याचे कारण या पेशात वेगवेगळ्या व्यक्तींची मदत भासू शकते.
कल्पनाशक्ती
एखादा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणे हा या इव्हेंट मॅनेजमेन्टचा प्रमुख उद्देश असल्याने, नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील कल्पना शोधून त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उत्तम कल्पनाशक्ती आवश्यक ठरते.
विपणन कौशल्य
स्वत:च्या कल्पना, ग्राहकांच्या गळी उतरवून त्यांच्याकरवी कामाची संधी मिळवणे आणि केलेल्या कामाचे मोल ग्राहकापाशी सिद्ध करणे याकरता विपणन कौशल्य आवश्यक असते.
व्यवस्थापन कौशल्य
एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळणे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींकडून, ग्राहकांच्या अपेक्षांप्रमाणे काम करून घेणे याकरता व्यवस्थापकीय कौशल्यांची गरज भासते.
निर्णयक्षमता
कार्यक्रमाच्या आयोजनात जर आयत्या वेळी काही नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली, तर लवकरात लवकर प्रभावी निर्णय घेऊन काम तडीस नेणे महत्त्वाचे ठरते.
अद्ययावत माहिती हवी
या क्षेत्रात टिकून राहायचे असल्यास विविध क्षेत्रांमधील घडामोडी, अद्ययावत बदल यांची माहिती करून घेणे आवश्यक ठरते. उदा. अद्ययावत तंत्रज्ञान, नवीन फॅशन, नवीन पद्धती वगरे. आयोजनात सतत नावीन्यपूर्ण बदल हेही गरजेचे ठरतात.

– गीता सोनी
geetadsoni1971@gmail.com