News Flash

तुलना नकोच!

नुकतीच लोकसत्तातर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

नुकतीच लोकसत्तातर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. करिअर निवड, त्यादरम्यान येणारा ताण याविषयी विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ राजेंद्र बर्वे यांनी स्पर्धा आणि त्यामुळे येणाऱ्या ताणाला कसे सामोरे जावे, याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचाच हा सारांश

नकळत होणारी स्पर्धा

स्पर्धेत उतरल्यानंतर आपल्याही नकळत आपण  स्पर्धा करायला सुरुवात करतो. आपल्याला नेमके काय करायचे आहे? आपली वैयक्तिक आवड काय आहे? हे विसरून स्पर्धेतल्या वातावरणाप्रमाणे वागायला लागतो. फक्त काही सेकंदांमध्ये आपली मनोभूमिका एकदम बदलून जाते. त्यामुळे दुसऱ्यांना हव्या तशा भूमिका आपल्याकडून घेतल्या जाऊ लागतात, हा प्रकार अत्यंत घातक आहे. त्यामुळेच आपल्यावर ताण निर्माण होऊ शकतो.

आपली आवड ओळखा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर ताण का निर्माण होतो? याचा विचार केल्यास  लक्षात येते की, आपली गुणवत्ता काय आहे यापेक्षा इतरांची गुणवत्ता किती आहे? याचा विचार विद्यार्थी करतात. यांच्याप्रमाणे कृती करण्यास सुरुवात करतात. दुसरा कोणत्या क्लासेसला जातो हे पाहून क्लास ठरवतो. आपल्याला काय हवे याचा विचारच केला जात नाही. इतरांनी निवडलेल्या रस्त्यांवर चालायला लागल्यावर मग ते सांगतील त्या दिशेला विद्यार्थी खेचला जातो.

करिअर आणि अभ्यासक्रमाचा सहसंबंध

कोणताही अभ्यासक्रम हा करिअरच्या दिशेने जाणारे एक माध्यम आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला करिअर कशात करायचे? कसे करायचे आहे? माझ्या व्यक्तिमत्त्वाचे त्यात कसे प्रतिबिंब पडेल याचा विचार करायला हवा. आयुष्यात येणारा ताण हा अभ्यासक्रमाचा असतो. करिअरचा नव्हे. पण हे लक्षातच येत नसल्यामुळे स्पर्धा सुरू होते.

तुलनेमुळे येतो न्यूनगंड

आपल्याला आपण कोण आहोत हे ओळखायचे असेल तर बाकीचे लोक काय करतात यापेक्षा स्वत:चा विचार करण्याची गरज आहे. आपण इतरांचा विचार खूप करून त्याच्यापेक्षा आपल्याला किती मार्क मिळाले याचाच विचार करतो. यावरून आपल्याला आपण कुठे आहोत याचा अंदाज नक्की येतो, पण आपली नेमकी किती क्षमता आहे,  हे मात्र समजू शकत नाही. स्पर्धेतील सगळ्यात मोठा तोटा म्हणजे कायमची तुलना. तुलना केल्यानंतर आपण दुसऱ्यापेक्षा आपण कमी आहोत, असे आपल्याला वाटायला लागते. काही वेळा आपण दुसऱ्यापेक्षा जास्त आहोत, असे वाटायला लागते.  पण शेवटी आपली नेमकी किती क्षमता आहे, याचा अंदाज आपल्याला येतच नाही. नापासांच्या वर्गात ४० टक्क्यांचा मुलगा प्रथम येतो, मात्र तोच अत्यंत हुशार मुलांच्या वर्गात बसला तर तो शेवटच्या क्रमांकावर असतो. त्या वेळी त्याच्यात न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. स्पर्धेच्या काळातले हे न्यूनगंड खूप धोकादायक असतात. कारण दहावी-बारावीच्या काळात आपल्या मनामध्ये आलेला न्यूनगंड आयुष्यभर आपली पाठ सोडत नाही. ती परीक्षा होऊन जाते, पण तो गंड टिकून राहतो.

ताणाला विसरून जा

महिनाभरानंतर परीक्षा असते, त्याचा आपण आधीच ताण घेत असतो. म्हणजे पेपर सोपा येणार की कठीण हेसुद्धा आपल्याला माहिती नसते तरीही आपण त्याचा ताण घेतो. तो कठीणच जाईल असा विचार करतो. ताण घेण्यामुळे होणारा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे आपण शक्यतेला खात्रीच बनवून टाकतो. मेंदूला आपण तसेच प्रोग्रॅमिंग करतो. मग त्यालाही भीती वाटायला लागते. ती आपल्या सगळ्यात क्रियांत उतरते. आपले मन त्याचाच विचार करू लागते. या सगळ्याचे पर्यवसान परीक्षा केंद्रात जाताना भयंकर तणावग्रस्त परिस्थितीत होते. त्यामुळे सगळ्यात आधी टेन्शन टाळा. अगदी विसरूनच जा.

सहीची करामत

डॉ. बर्वे यांनी एक गमतीशीर खेळ घेतला. त्यांनी पालकांना उजव्या आणि डाव्या हाताने सही करायला सांगितली. जे डावखुरे होते त्यांची उजव्या हाताची सही वाईट आली तर जे उजव्या हाताने काम करणारे होते त्यांची डाव्या हाताची सही वेडीवाकडी आली.  डॉ. म्हणाले, आपण डावखुरे किंवा उजवे असणे, ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. त्याविरुद्ध वागल्यावर आपली सही चुकते, वेडीवाकडी होते. म्हणूनच पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, मुले जेव्हा स्वत: निवड करत असतात त्या वेळी ते उजव्या हाताने सही करतात. पण दबावाखाली किंवा इतरांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेतात तेव्हा मात्र ती डाव्या हाताने सही करत असतात. मग ती सही अर्थात ती निवडच वेडीवाकडी होते.

प्रायोजक :  या उपक्रमाचे ‘टायटल पार्टनर’ पितांबरी तर असोसिएट पार्टनर विद्यालंकार क्लासेस होते. पॉवर्ड बाय पार्टनर्स अलिफ ओव्हरसीज, सक्सेस फोरम, रोबोमेट प्लस, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन, विद्यासागर क्लासेस आणि चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटन्ट्स, दिलकॅप कॉलेजेस अ‍ॅण्ड इन्स्टिटय़ूट्स, नेरळ, द युनिक अ‍ॅकॅडमी हे होते. तर हॉटेल टिप टॉप प्लाझा हे व्हेन्यू पार्टनर होते.

शब्दांकन – किन्नरी जाधव, श्रीकांत सावंत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 4:43 am

Web Title: career workshop organized by loksatta
Next Stories
1 वेगळय़ा वाटा : मॉडेलिंगच्या विश्वात..
2 करिअरनीती : हुन्नर
3 नोकरीची संधी
Just Now!
X