नवीन नोकरीतले नवलाईचे दिवस संपल्यावर तुम्ही हळूहळू तिथे जुने होत जाता. थोडेसे बेफिकीरही होता. बरेचदा अशाच परिस्थितीतून काही त्रासदायक, अवघडलेपण देणाऱ्या घटना घडतात. या घटनांतून मार्ग कसा काढायचा ते वेळीच कळले नाही तर मग बिकट प्रसंग ओढवतात. बढतीची संधी जाते व एखादवेळी आपली नोकरीही जाऊ शकते.

कोणते प्रसंग आपल्याला त्रासदायक ठरू शकतात?

  • सततची हालचाल, कामात असताना इतरांना ऐकू जातील अशा आवाजात गाणी गुणगुणणे, अशा विचित्र सवयी असलेल्या सहकाऱ्यांमुळे आपले कामात लक्ष न लागणे.
  • तुमच्या प्रत्येक कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने अडथळे निर्माण करणारे स्पर्धक सहकारी.
  • कामाच्या नावाखाली अप्रस्तुत शारीरिक जवळीक साधून आपल्या मन:स्वास्थ्यावर दडपण आणणारे सहकारी.
  • ऑफिसच्या टवाळ गप्पांमध्ये जाणीवपूर्वक ओढून मग त्यातील एखादे मत तुमच्या नावावर खपविणारे व तुमचे नाव अकारण खराब करणारे सहकारी.
  • तुमच्या कुवतीच्या किंवा कामाच्या मर्यादेपलीकडचे काम वरिष्ठांनी तुम्हाला सांगणे आणि ते तुम्हाला करता न येणे.
  • तुमचे ज्या सहकाऱ्याबरोबर जमत नाही त्याच्याचबरोबर वरिष्ठांनी काम करायला सांगणे.
  • कनिष्ठ, वरिष्ठ किंवा तुमच्याच स्तरावरील सहकाऱ्यांबरोबर तुमचा वादंग होणे, त्यामुळे त्यांचे तुमच्याबद्दलचे मत कलुषित होणे.
  • अतिशय अवघड काम तुम्हाला दिल्याने मन:स्वास्थ्य हरवणे.
  • एखाद्या विषयाच्या सादरीकरणाच्या वेळेला मुद्देच विसरणे. त्यामुळे सर्वासमोर हसे होणे.
  • एखाद्या सहकाऱ्याच्या किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ऑफिसमध्ये जाहीर चर्चा होणे.
  • एखादा सहकारी सर्रास नियमबाह्य़ काम करत असताना दिसणे. कदाचित त्याने तुम्हाला सहभागी होण्यासाठी दडपण आणणे.
  • तुमच्या अथवा अन्य सहकाऱ्यांच्या शारीरिक ठेवणीबद्दल, त्यांनी घातलेल्या कपडय़ांबद्दल मोठय़ा आवाजात अश्लील चर्चा करणे.
  • तुमच्याकडून चुकून संस्थेची गोपनीय माहिती बाहेरच्या व्यक्तीला कळल्याचे निदर्शनास येणे.
  • तुम्हाला परिचित नसलेल्या एखादा सामाजिक किंवा कार्यालयीन शिष्टाचार न पाळल्याने वरिष्ठ किंवा कंपनीचा पाहुणा नाराज होणे.

या आणि अशासारख्या अनेक प्रसंगांना तुम्हाला भविष्यातील दीर्घ कार्यालयीन कारकीर्दीमध्ये तोंड द्यायचे आहे. या प्रसंगांना कसे सामोरे जायचे ते आता पाहू.

  • कामात सदैव सतर्क, सजग व चोख राहा. अनेकदा आपल्याविषयीच्या चुकीच्या गोष्टींची सुरुवात एखाद्या गाफील क्षणापासून होते. असा एखादा प्रसंग येण्याची शक्यता तर नाही ना, याची मनाच्या रडारवर सतत चाचपणी करा.
  • वर दिलेल्या त्रासदायक प्रसंगांच्या यादीमधले प्रसंग प्रत्यक्षात कधी आलेच तर तुमची प्रतिक्रिया काय असेल तसेच तुम्ही ते प्रसंग कसे यशस्वीपणे निभावून न्याल याची मनोमन पूर्वतयारी करा.
  • कालांतराने या पूर्वतयारीची उजळणी करा, लागले तर त्यात बदल करा, म्हणजे असा प्रसंग दुर्दैवानेखरंच आला तर काय करायचे याची रूपरेषा तयारअसेल. पूर्वतयारी असणे म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखेच असते.
  • एखाद्या सहकाऱ्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल आणि तुमच्या कामावर त्याचा परिणाम होत असेल तर घाबरू नका. शांतपणे पण ठाम शब्दात नम्रपणे त्या व्यक्तीला सांगा. तरीही त्रास चालू राहिला तर योग्य पद्धतीने वरिष्ठांकडे तक्रार करा.
  • कुठल्याही प्रकारच्या टवाळगप्पांमध्ये सामील होऊ नका. विशेष भ्रष्टाचारी व अश्लील टिप्पणी करणाऱ्या सहकाऱ्यांपासून त्यांच्या कंपूपासून दूर राहा.
  • कायद्याप्रमाणे प्रत्येक कार्यालयात लैंगिक गुन्ह्य़ांबद्दल दखल घेणारी एक समिती अस्तित्वात असतेच. शारीरिक जवळीक साधून दडपण आणणाऱ्या सहकाऱ्याबद्दल पुराव्यानिशी या समितीकडे लेखी तक्रार करा.
  • तुमच्याकडून एखादी चूक झाली असल्यास
  • वरिष्ठांकडे त्वरित माफी मागा. नि:संकोचपणे शिक्षा स्वीकारा.
  • परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली असेल तर स्वत:हून नोकरी सोडा. कंपनीने हाकलून द्यायची वाट बघू नका.
  • त्रासदायक घटना यशस्वीपणे हाताळणे हे महत्त्वाचे कौशल्य अंगी बाणविण्यासाठी वरील सर्व उपायांबरोबर तुम्ही प्रामाणिक व नम्र असायला हवे, म्हणजे मग ऐनवेळी गडबडून जायला होणार नाही.

dr.jayant.panse@gmail.com