मुलाखत कक्षातील वातावरण कसे असते याची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली. या लेखामध्ये प्रत्यक्ष मुलाखतीमधील प्रश्नोत्तरे आणि संवाद कशा प्रकारे घडतात व या दरम्यान उमेदवाराने कोणत्या बाबींबाबत दक्षता घ्यायला हवी ते पाहू.

योग्य पद्धतीने प्रतिसाद देता यावा यासाठी मुलाखत मंडळाकडून विचारले जाणारे प्रश्न लक्षपूर्वक ऐकावेत. एखादा प्रश्न विचारला जात असताना पूर्णपणे ऐकून घ्यावा. सदस्य बोलत असताना त्यांचे बोलणे तोडून मध्येच बोलायला सुरुवात करू नये. पूर्ण प्रश्न ऐकल्यानंतरच उत्तराला सुरुवात करावी. प्रश्न विचारणाऱ्या सदस्याकडे पाहून उत्तर द्यावे. गरज पडल्यास काही क्षण विचार करावा, योग्य शब्दांची निवड करावी आणि मगच उत्तर द्यावे. विशेषत: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीदरम्यान िहदी किंवा इंग्रजीमधून उत्तर देताना योग्य शब्दांच्या निवडीबाबत काळजी घ्यायला हवी. काही क्षण विचार करून उत्तर दिले तर वेळ संपली म्हणून गुण कमी करायला तो कुठला रिअ‍ॅलिटी शो नाही. उलट अशा वेळी तुमचे गांभीर्य मुलाखत मंडळाच्या लक्षात येते.

मुलाखतीतील प्रश्नांची उत्तरे चूक किंवा बरोबर अशी नसतात. ती स्वीकारार्ह किंवा अस्वीकारार्ह असतात. एखाद्या विषयाबाबत तुमची सहमती विचारली असेल तर होय सर! मी या मताशी सहमत आहे, अशा शब्दांमध्ये सहमती दर्शवून त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण द्यावे. असहमती दर्शवितानाही नम्रपणे आपले मुद्दे मांडून आणि योग्य शब्द वापरून दर्शवावी. तुमची उत्तरे व्यवहार्य व खरी असावीत. तुमचे मत तरीही अमान्य करण्यात आले तर त्यावर खिलाडूवृत्तीने व्यक्त व्हावे. हट्टाग्रह किंवा अति आत्मविश्वास दर्शवणारी देहबोली असू नये. उत्तरांमध्ये धीटपणा असावा, पण अहंभाव किंवा अविचार असू नये. काही वेळा वस्तुनिष्ठ माहितीसुद्धा विचारली जाते. तुमच्याकडे ही माहिती नेमकेपणाने असेल तरच द्यावी. अंदाजे दिलेली आकडेवारी किंवा तथ्यात्मक माहिती ही गंभीर चूक समजली जाते हे नेहमी लक्षात ठेवावे. तेव्हा प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे उत्तर द्यावे.

प्रश्न नीट कळला नाही तर तसे नम्रपणे सांगून त्याबाबत विचारावे. त्याने गुण कमी होत नाहीत. उलट तुमचा प्रामाणिकपणा लक्षात येतो. प्रश्नाच्या अर्थाबाबत तुम्हाला संदिग्धता वाटली तर त्याबाबत तपशील मागण्यास हरकत नाही. माहीत नसलेल्या मुद्दय़ाबाबत प्रश्न विचारलेला असल्यास आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे प्रामाणिकपणे कबूल करावे. उमेदवाराला पृथ्वीतलावरील सर्व गोष्टींची माहिती असायला हवी अशी मुलाखत मंडळाची अपेक्षा नसतेच. त्यामुळे अशा विषयावर तर्क बांधून, ओढूनताणून उत्तर देण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. Honesty is the best Policy  हे नेहमी लक्षात ठेवावे.

मुलाखत जशी ज्ञानाची परीक्षा आहे तशी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचीही परीक्षा आहे. चांगल्या उत्तराची स्तुती किंवा उत्तर न देता येण्याची स्थिती, दोन्ही तुम्ही कसे हाताळता, कशा पद्धतीने सामोरे जाता, ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा आहे. मुलाखत मंडळाकडून तुमच्या दृष्टीने चांगल्या असलेल्या उत्तराबाबत प्रतिक्रियेची अपेक्षा करू नका व तुमच्या चांगल्या-वाईट कुठल्याही उत्तराबाबतची तुमची मन:स्थिती तुमच्या देहबोलीतून सामोरी येऊ देऊ नका.ोुलाखत पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराने कक्षाबाहेर येण्याची वेळ येते. पण अशा वेळी मुलाखत मंडळाकडून उमेदवाराला मुलाखत संपली तुम्ही आता बाहेर जाऊ शकता, असे सांगितल्याशिवाय उमेदवाराने आपल्या आसनावरून उठू नये किंवा समोर ठेवलेली कागदपत्रांची फाइल आवरायला घेऊ नये. मुलाखत मंडळाकडून सांगितल्यानंतर शांतपणे, कागदपत्रांचा जास्त आवाज न होऊ देता फाइल घ्यावी व सहजतेने आसन सोडावे. खुर्चीवरून उठल्यानंतर खुर्ची पूर्ववत ठेवावी. व्यवस्थित उभे राहून मुलाखत मंडळाचे चेअरमन व सदस्यांना प्रसन्नतापूर्वक अभिवादन करावे. धन्यवाद म्हणायला विसरू नये. मुलाखत कक्षातून बाहेर येताना चालण्याचा, दरवाजा उघडण्याचा आवाज येणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेर पडताना मागे वळून सदस्यांकडे पाहणे टाळावे. असे बारीकसारीक आचरणाचे संकेत पाळले की मुलाखतीचा अनुभव चांगलाच ठरतो.