प्रवीण चौगुले

आजच्या लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर-२मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकांतर्गत भारताचे शेजारील देशांशी असणारे संबंध अभ्यासणार आहोत. भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात नेहमीच शेजारील देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य दिलेले आहे. कारण शेजारील देशांशी असणारे संबंध सामरिक व गैरसामरिक सुरक्षेला प्रभावित करत असतात. भारताच्या शेजारील देशांमध्ये पाकिस्तान, अफगणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव आदी देशांचा समावेश होतो. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत भारताचे संबंध कशा प्रकारे उत्क्रांत होत गेले याचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. याचबरोबर समकालीन परिप्रेक्षामध्ये आर्थिक व व्यूहात्मक पाश्र्वभूमी अभ्यासाव्या लागतात.

आरंभापासूनच भारताचे शेजारील देशांशी संबंध समानता व परस्परांचा आदर या मूलभूत तत्त्वावर आधारित आहेत. भारत व चीन यांच्यातील संबंधांमध्ये स्पर्धा व सहकार्य या दोन्ही पलूंचा समावेश होतो. सीमापार नद्यांच्या पाण्याचा वापर, व्यापार असमतोल, सीमा प्रश्न, इ. द्विपक्षीय मुद्दे दिसून येतात. तसेच भारत व लगतच्या प्रदेशावर गंभीर परिणाम करू शकणाऱ्या कठीण व मृदू सत्ता वाढवण्याचे प्रयत्न नेहमीच चीनकडून केले जातात. उदा. डोकलाम मुद्दा, ‘द स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’.

*  २०१३

‘मोत्यांची माळ’ (The string of pearls) विषयी आपले आकलन काय आहे? हे भारताला कशा प्रकारे प्रभावित करते? याचा सामना करण्यासाठी भारताकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांची संक्षिप्त रूपरेखा द्या.’

भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध सीमावाद, दहशतवाद व काश्मीर प्रश्न या ज्वलंत मुद्दय़ांभोवती फिरताना दिसतात. सध्या पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाला. या पाश्र्वभूमीवर भारत-पाकिस्तान संबंधांची दिशा काय असेल हे सर्वस्वी नव्या नेतृत्वावर अवलंबून आहे.

‘ढाका, बांगलादेश येथील शाहबाग स्क्वेअरमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये समाजात राष्ट्रवादी व मूलतत्त्ववादी यांच्यामधील मतभेद उजेडात आले. भारतासाठी याचे काय महत्त्व आहे?’

भारत-श्रीलंका संबंध मित्रत्वाचे राहिले आहेत. सध्या श्रीलंकेमध्ये चीनचा प्रभाव वाढताना दिसतो.

‘भारत-श्रीलंका संबंधांच्या संदर्भामध्ये, देशांतर्गत घटक कशा प्रकारे परराष्ट्र धोरण करतात यावर चर्चा करा.’

भारत व भूतानमधील संबंध परिपक्व बनलेले आहेत. भारत हा भूतानचा व्यापार व विकासातील मोठा भागीदार आहे. भारत व म्यानमारमधील संबंध १९९०च्या दशकापासून सुरळीत झाले. सीमेवरील कारवाया, अमली पदार्थाची तस्करी रोखणे याबाबत दोन्ही देश संयुक्तपणे प्रयत्न करतात. भारत व मालदीवमधील संबंध सर्वसाधारणपणे सौहार्दपूर्ण राहिलेले आहेत. अलीकडे भारताने मालदीवला दिलेली दोन हेलिकॉप्टर्स त्यांनी परत केलेली आहेत. परिणामी द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव दिसून येतो. परीक्षेमध्ये येणारे प्रश्न चालू घडामोडींच्या अनुषंगाने विचारण्यात येतात. याकरिता वृत्तपत्रांमधील लेख, वर्ल्ड फोकस हे नियतकालिक व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संकेतस्थळ व वार्षिक अहवाल पाहावेत.

‘मागील दोन वर्षांमधील मालदीवमधील राजकीय घडामोडींविषयी चर्चा करा. या घटना भारताकरिता चिंतेचे कारण होऊ शकतात का?

* २०१४

‘२०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा साहाय्यक दल (करआ) ची प्रस्तावित माघारी या क्षेत्रातील देशांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. भारताला आपल्या सामरिक हितसंबंधांची सुरक्षा करण्याची गरज आहे आणि भारतासमोर अनेक आव्हाने आहेत. या तथ्याच्या पाश्र्वभूमीवर परीक्षण करा.’

सद्य:स्थितीमध्ये भारत व नेपाळ यांच्यातील संबंधांमध्ये तणाव दिसून येतो. नेपाळमधील प्रस्थापित व्यवस्थेतील काही घटकांमध्ये भारताबाबत दीर्घकाळापासून असलेला संशय याला कारणीभूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नेबरहूड फर्स्ट’ या धोरणांतर्गत २०१४ मध्ये नेपाळला भेट दिली होती. नेपाळच्या राज्यघटनानिर्मितीमध्ये भारताच्या प्रतिसादाला नेपाळच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेपाच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले.

भारत-बांगलादेशातील संबंधांमध्ये सुधारणा होत आहे. ‘दोन्ही देशांदरम्यान जमीन देवाण-घेवाण करार महत्त्वपूर्ण आहे.

* २०१५

‘दहशतवादी कारवाया आणि परस्पर अविश्वास यांनी भारत-पाकिस्तान संबंधांना व्यापून टाकले. खेळ व सांस्कृतिक आदानप्रदान यांसारख्या सॉफ्ट पॉवरचा वापर दोन्ही देशांमध्ये सद्भावना निर्माण करण्यात उपयुक्त ठरेल. समर्पक उदाहरणांसह चर्चा करा.’

भारत व अफगणिस्तानमधील संबंध सलोख्याचे राहिले आहेत. अफगाणिस्तान भारतासाठी ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य आशिया व पश्चिम आशियाचे प्रवेशद्वार असल्याने सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण आहे. भारताने २०११मध्ये अफगणिस्तानसोबत सामरिक भागीदारी करार केला.

* २०१७

‘चीन आशियामध्ये संभाव्य लष्करी शक्ती स्थान विकसित करण्यासाठी आर्थिक संबंध व सकारात्मक व्यापार शेष यांचा वापर करत आहे.’ या वाक्याच्या पाश्र्वभूमीवर शेजारी देश म्हणून भारतावर याचा काय परिणाम असेल चर्चा करा.’