तीन मुलं पदरी आणि अचानक यांची कंपनी बंद पडली. अशा वेळी कराडची आमच्या आळीतली एक मैत्रीण भेटली. तिने विचारले, ‘मला पोळय़ा करून देशील का?’ मी हो म्हटलं, तोच माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला.
लग्न झाले आणि मी कराडहून डोंबिवलीसारख्या शहराला आले. एकदम वेगळे वातावरण. पाठोपाठ तीन मुलगे झाले. तोपर्यंत सर्व छान चालू होते. १९६५ साली लहान मुलगा वर्षांचा असताना यांची कंपनी बंद झाली. सोळाव्या वर्षी लग्न झालेले. शिक्षण कमी. जगाचा अनुभव शून्य. असेच थोडे दिवस गेले. दरम्यान कराडची आमच्या आळीतली एक मैत्रीण मला भेटली. तिच्या दोन्हीही मुली लहान म्हणजे अगदी वर्षांचे अंतर. तिने मला विचारले, ‘मला पोळय़ा करून देशील का?’ मी हो म्हटलं. तोच माझ्या आयुष्याचो टर्निग पॉइंट होता. मी तिच्या पोळय़ा, कधी तरी भाजी असे करून देऊ लागले. तिच्या शेजारी गाडगीळ आडनावाचे कुटुंब राहत होते. त्यांच्या पत्नीच्या बाळंतपणात, घरातल्यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची सोय करून देण्याचे काम आले. ती जबाबदारी आनंदाने पार पाडली. पण मी एक मनाशी ठरवले होते कुणाच्या घरी जाऊन स्वयंपाक करायचा नाही, आपल्या घरून जमेल तेवढे करायचे.
 हळूहळू कानगोष्टीप्रमाणे माझे डबे वाढू लागले. १९९२-९३ सालापर्यंत माझे एकूण २५ ते ३० डबे होते. सकाळी साडेआठ वाजता डबावाला यायचा. तेव्हा सर्व डबे तयार ठेवावे लागत. भाज्या स्वच्छ करणे, धुऊन-चिरून ठेवणे अशी रात्री सर्व तयारी करून ठेवायची व सकाळी ४ ते ८ स्वयंपाक करायचा. भात, भाजी, आमटी, पोळी, चटणी, दही असे पदार्थ डब्यात असत. सकाळचे आवरले की दुपारी शिवणकाम सुरू. तीच मैत्रीण मुलींचे फ्रॉक शिवायला द्यायची. कष्ट खूप होते, पण डोळय़ापुढे मुलांना खूप शिकवण्याचे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न होते. त्यामुळे कष्ट जाणवत नव्हते. नंतर कंपनी चालू झाली, पण मी माझे डबे चालू ठेवले कारण पगार खूप कमी होता. १९९३ सालापर्यंत तीनही मुलांची लग्ने झाली. दोन इंजिनीअर, एकाचा उद्योग, एक परदेशात आहे. दारात गाडी आहे.
माझे वय आज ७२ आहे. मुलांच्या संसाराची गाडी व्यवस्थित झाल्यावर डबे बंद केले. मुलांनी आणि सुनांनी कष्टांचे चीज केले. मी गेले २० वर्षे आनंदात आयुष्य जगते आहे. चार वर्षांपूर्वी माझा साथीदार मला सोडून गेला. पण शेवटी कोणी तरी एकटे राहणार हे स्वीकारायला पाहिजे. पण मैत्रिणीने विचारलेल्या एका प्रश्नाला मी होकारार्थी उत्तर दिलं आणि माझं आयुष्य बदललं.