|| सुप्रिया खाडे

‘युनिसेफ’ने २००५ ते २०१३ या काळात भारतात केलेल्या सर्वेक्षणानुसार, १० ते १५ वर्षे वयोगटातील १० टक्के मुलींना, तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील जवळपास ३० टक्के मुलींना कुठल्या न कुठल्या प्रकारच्या लैंगिक आणि शारीरिक हिंसेला सामोरे जावे लागते. आपल्याकडे ‘लैंगिक शिक्षण’ किंवा ‘बाल लैंगिक शोषण’ या विषयांवर मोकळेपणाने बोलले जात नाही. पण सध्याची परिस्थिती बघता पालकांनी मुलांशी अशा विषयांवर संवेदनशीलतेने आणि मोकळेपणाने बोलणे ही काळाची गरज आहे.

‘बाल लैंगिक शोषण’ ही एक जागतिक समस्या आहे आणि दुर्दैवाने भारतातही बालकांचे लैंगिक शोषण दिवसेंदिवस वाढत आहे. गीता पांडे यांनी दिलेल्या बीबीसीच्या एका अहवालानुसार (२०१७), जगाच्या तुलनेत भारतात बऱ्याच मोठय़ा प्रमाणात बाल लैंगिक शोषणाच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, भारतात दर १५ मिनिटाला एका बालकाचे लैंगिक शोषण होते, अशा काही लाजिरवाण्या नोंदीसुद्धा यात नमूद केल्या गेल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या २०१७ च्या अहवालानुसार २०१७ मध्ये पॉक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट) कायद्यांतर्गत ३६०२२ प्रकरणे नोंदवण्यात आली.

‘युनिसेफ’ने २००५ ते २०१३ या काळात भारतात केलेल्या सर्वेक्षणानुसार, १० ते १५ वर्षे वयोगटातील १० टक्के मुलींना, तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील जवळपास ३० टक्के मुलींना कुठल्या न कुठल्या प्रकारच्या लैंगिक आणि शारीरिक हिंसेला सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या भयावह घटनांपासून बालकांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने २०१२ मध्ये पॉक्सो या कायद्याला राष्ट्रपतींकडून मान्यता मिळाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या कायद्यानुसार, तपास आणि प्रतिबंधाच्या प्रत्येक पायरीवर, पीडित मुलगा किंवा मुलीची संपूर्ण माहिती गुप्त ठेवली जाईल, अशी हमी देण्यात आली. या कायद्यानुसार आपल्यासारख्या समविचारी लोकांनी एकत्र येऊन मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे, तसेच इतर संस्थांनीही विविध स्तरांवरचे मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आमच्याकडे आलेल्या दोन घटना सांगाव्याशा वाटतात. मंजूषा (नाव बदलले आहे ) ही एक आठवीत शिकणारी १३ वर्षांची मुलगी. शाळा सुटल्यावर खो-खो खेळून झाला तसा ती मुलींसाठीच्या विश्रांतीकक्षात चालली असताना सुरक्षारक्षकाने तिला पकडलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. तिने मौन स्वीकारलं तसं त्याने आणखी एकदा फायदा घेतला. दरम्यानच्या काळात मंजूषाची शैक्षणिक गुणवत्ता खालावत गेली. तिचं शाळेतलं लक्ष उडालं. ती सतत तिच्या वयापेक्षा मोठय़ा मुलांमध्ये मिसळू लागली. स्वत:वर गरजेपेक्षा जास्त सजू-धजू लागली. खोटी उत्तरं देत शाळा बुडवू लागली. एकदा मंजूषा शाळेचा गणवेश घालून एका मॉलमध्ये फिरताना शाळेच्याच एका माजी विद्यार्थ्यांला दिसली. त्याने मुख्याध्यापकांना कळवलं. त्यांनी तातडीनं एका स्त्री कर्मचाऱ्याला तिकडे पाठवत तिला शाळेत आणलं. मंजूषाच्या पालकांनाही तातडीनं बोलावलं गेलं. तिला जरब बसेल अशी समज देऊन एका समुपदेशकाकडे पाठवलं गेलं. मंजूषासोबत काही सेशन्स झाल्यावर त्या सुरक्षारक्षकाने केलेल्या गैरवर्तनाबाबत समुपदेशकाला समजलं. शाळेनंही पालकांना सहकार्य करत त्या दोन प्रसंगांचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करवलं. त्या सुरक्षारक्षकाची चांगली कानउघाडणी करत, त्याच्याकडून लेखी माफीनामा घेऊन त्याला कामावरून काढून टाकलं गेलं. दोन वर्षांनी मंजूषा दहावी उत्तीर्ण होत शाळेबाहेर पडली तसं त्या पालकांनी शाळेवर मुलांच्या सुरक्षेबाबत शाळा निष्काळजीपणा दाखवत असल्याच्या कारणावरून खटला दाखल केला.

सुधा (नाव बदलले आहे) एक १७ वर्षांची कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारी गोड मुलगी. पूर्वी मुलींच्या शाळेत शिकायची. महाविद्यालयात आल्या आल्या मुलांकडून मिळणाऱ्या कौतुकाच्या नजरा आणि विशेष वागणुकीमुळे जरा बावचळून गेली होती. त्यातच सुधाला अभ्यासाव्यतिरिक्तच्या एक्स्ट्रा-करिक्युलर गोष्टींमध्ये खूप रस होता. त्यात सक्रिय सहभाग घेत असताना तिची अनेक मुलांशी जवळीक वाढली. कामानिमित्त व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स तयार झाले. त्याच्यावर वेळोवेळी कामाव्यतिरिक्त वैयक्तिक गोष्टी आणि फोटो शेअर होऊ लागले.

त्यातले काही काही जरा अश्लीलतेच्या जवळ जाणारे होते. हळूहळू त्या ग्रुप्समधल्या मुलांची भीड चेपली आणि त्या मुलीच्या चुलत भावाने ग्रुपवर पोर्नोग्राफिक पोस्ट टाकली. तो त्याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. सुरुवातीला अश्लील फोटोज, मग लहान आणि नंतर मोठे पॉर्न व्हिडीओज असं काय काय तो नंतर सुधाला पाठवत राहिला. ‘हे सगळं अयोग्य असून १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच बघितलं पाहिजे’ असा उपदेशही करत राहिला. एकदा अपघातानेच सुधाच्या आईच्या हातात तिचा मोबाइल पडला. तिने हा सर्व प्रकार पाहिला. ‘हे सुधाच्या वडिलांना समजले तर ते प्रचंड रागावतील, प्रसंगी सुधाला मारतील’ असं वाटून आई भयंकर घाबरली. सुधाच्या घरात याआधी कधीच लैंगिकतेबद्दल खुली, निरोगी चर्चाच घडली नव्हती. त्यामुळे त्यातलं गांभीर्य तिला कळलंच नव्हतं.

जवळपास ८० टक्के बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत, गुन्हेगार हा मुले आणि त्यांच्या कुटुंबाच्या ओळखीचा असतो. त्यामुळे मुलगा किंवा मुलीने स्वसंरक्षण करावे या गोष्टीवर अवास्तव भर न देता, मुलांना सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण कसे पुरवता येईल, याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिबंधासाठी अनेक सामाजिक संस्था आणि शाळांमधून प्रतिबंधात्मक योजना, मार्गदर्शन आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. या उपाययोजना यशस्वी होण्यासाठी, पुढील काही गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे.

प्रतिबंधात्मक उपाय हे प्रामुख्याने प्रौढांसाठी आणि नंतर लहान मुलांसाठी असावेत, जेणेकरून मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी मोठय़ांवर येईल.

हे उपाय अल्प कालावधीचे आणि नियमित स्वरूपाचे असावेत.

हे उपाय सोप्या आणि योग्य भाषेत सांगावेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचतील.

मुलगा आणि मुलगी दोघेही अशा प्रकारच्या घटनांचे बळी पडू शकतात, याची जाणीव ठेवून उपाययोजना आखाव्यात.

प्रतिबंधात्मक उपाय लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या टीममध्ये स्त्री-पुरुष दोघांचाही समावेश असावा.

हे उपाय ज्या लोकांपर्यंत आपण पोहोचवतोय त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या काय आहेत, लिंग आणि भाषेबरोबर संस्कृती, धर्म, राजकारण, कायदेव्यवस्था अशा सर्व गोष्टी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखताना गृहीत धरणे आवश्यक आहे.

बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित असे काही घटक आहेत, ज्यांच्यामुळे लैंगिक शोषण होण्याचे धोके जास्त संभवतात. त्यात मुलींमध्ये लैंगिक शोषणाचे प्रमाण मुलांच्या तुलनेत जास्त आहे. इतर घटक, जसे की, गरीब परिस्थिती, दत्तक घेतलेले मूल, शारीरिक आणि मानसिक अपंगत्व, मानसिक किंवा भावनिक समस्या, पालकांना अपंगत्व असणे, घटस्फोटित पालक, भावनिक आणि मानसिक आधार नसणे असे काही घटकसुद्धा अशा अत्याचारांसाठी कारणीभूत ठरू शकतात.

मूल जर लैंगिक अत्याचाराला बळी पडले असेल तर त्याच्या वागण्यात फरक पडतो. लैंगिक वर्तन, जसे की, चुंबन, गुप्तांगाला वारंवार स्पर्श करणे, हस्तमैथुन अशा गोष्टी मुलांमध्ये वारंवार दिसून येत असतील किंवा त्यांच्यामध्ये भावनिक पातळीवर जाणवण्याइतका बदल झाला असेल तर त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. बऱ्याच वेळा मुलांवर लैंगिक अत्याचार होऊनही पालकांना या गोष्टी कळून येत नाहीत. कारण लहान मुलांचे लैंगिक शोषण करताना खूप क्वचितच, शारीरिक बळ आणि हिंसेचा वापर केला जातो. गुन्हेगार मुलाला विश्वासात घेऊन अत्याचार लपवण्यासाठी भाग पाडतो. मुलांवर लैंगिक अत्याचार बरेच महिने आणि वर्षांपासून चालू असतो. लैंगिक अत्याचार झाल्यावर, बऱ्याच वेळा मूल उघडपणे बोलू शकत नाही. कारण बऱ्याचदा मुलाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिलेली असते. त्यामुळे मुलाला गुन्हेगाराची भीती वाटते. मुलाला आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही याची भीती असते.

आपल्याकडे सहसा ‘लैंगिक शिक्षण’ किंवा ‘बाल लैंगिक शोषण’ (चाइल्ड सेक्शुअल अ‍ॅब्युज) अशा विषयांवर मोकळेपणाने बोलले जात नाही. पण सध्याची परिस्थिती बघता पालकांनी मुलांशी अशा विषयांवर संवेदनशीलतेने आणि मोकळेपणाने बोलणे ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे शाळांकडूनसुद्धा मुलांना ‘लैंगिक अत्याचार म्हणजे काय? चुकीच्या गोष्टींना कसा विरोध करावा’ या गोष्टी सांगण्यावर भर दिला गेला पाहिजे. तसेच शाळांकडून पालकांसाठीसुद्धा काही जनजागृती करणारे आणि मार्गदर्शक कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत. जेणेकरून मुलांशी अशा विषयांवर मोकळेपणाने आणि संवेदनशीलतेने संवाद साधणे का आवश्यक आहे आणि तो कसा साधला गेला पाहिजे, याबद्दल जागरूकता येईल.

(लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत.)