ग्रॅन चॅको येथील पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी एका जीवशास्त्रज्ञ महिलेने पुढाकार घेतला आणि सर्वसामान्य माणसांनाही आपल्या प्रयत्नांमध्ये सामील करून घेतलं. ग्वानॅको या वन्य प्राण्याच्या प्रजातीला वाढत्या मानवी वस्त्या व जंगलांवरील अतिक्रमणे कारणीभूत असल्याचे लक्षात आल्यावर तिने अभिनव मार्ग स्वीकारत या भागाचे संवर्धन करण्याचा विडा उचलला, त्या एरिका क्युलरविषयी.. ३ मार्चच्या जागतिक वन्य दिनानिमित्ताने..
पर्यावरणातलं संतुलन राखण्यासाठी झटणं, ही आज काळाची गरज बनली आहे. जीवसृष्टीतील हजारो जाती-उपजाती एकमेकांवर अवलंबून असतात. त्या शृंखलेतील एकाही जातीचं अस्तित्व धोक्यात आलं, की त्याचे दूरगामी परिणाम इतर अनेक जाती- उपजातींवर होतात आणि पर्यावरणाचा समतोल ढासळतो. प्रत्येक जातीला आवश्यक असं अन्न, पाणी, तापमान यावर माणसाचं आक्रमण होत असतं. माणूस स्वार्थापोटी प्रमाणाबाहेर वृक्षतोड, जनावरांची हत्या अशा गोष्टी करून कधीकधी एखादी प्राणिजात भूतलावरून पूर्णपणे नष्टही करत असतो. अशा वेळेस, माणसाचं जीवनसृष्टीवरचं अतिक्रमण थोपवणं, त्यासाठी पर्यावरण संतुलनाची किती अतीव गरज आहे, याचं ज्ञान असणं तर अत्यावश्यक असतंच, परंतु त्या जोडीला धाडस, चिकाटी आणि कल्पकता यांची जोडही आवश्यक असते. पर्यावरण जतन करण्यासाठी धडपडणाऱ्या एका जीवशास्त्रज्ञ स्त्रीला, २०१२ सालच्या Rolex Award for Enterprise या उच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
तिचं नाव आहे एरिका क्युलर. तिचा जन्म दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया या देशात झाला. ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटीतून तिनं पीएच.डी. मिळवली. २०११ साली तिनं पीएच.डी. साठी सादर केलेल्या प्रबंधाचा विषय होता, लामा या प्राण्याचा पूर्वज असलेला ग्वानॅको हा प्राणी. हा बोलिव्हियातील सर्वात मोठय़ा नॅशनल पार्कमध्ये – ‘का इया ग्रॅन चॅको’मध्ये राहणाऱ्या सस्तन प्राण्यांच्या सत्तर जातींपैकी, सर्वात मोठा वन्य प्राणी आहे. गॅ्रन चॅको हा विभाग अँडीज पर्वतांच्या पूर्वेला, आणि पॅराग्वे नदीच्या पश्चिमेला आहे. हा प्रचंड विभाग बोलिव्हिआ, पॅराग्वे आणि अर्जेटिना या तीन देशांमध्ये पसरलेला आहे. इथली हवा अत्यंत गरम आणि अतिशय कोरडी आहे. (बहुधा हा भाग अँडीज पर्वतांच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडत असावा) परंतु अशा भीषण तापमानात मोठय़ा सस्तन प्राण्यांच्या सत्तर जाती बागडत आहेत. बिबटे, चित्ते, मोठाले आर्माडिलो, ग्वानॅको असे प्राणी या शुष्क आणि खुरटय़ा अशा विषुववृत्तीय जंगलात तग धरून आहेत. या ग्रॅन चॅकोवर झालेल्या माणसाच्या आक्रमणामुळे या जातीचं विशेषत: ग्वानॅको या लामाच्या पूर्वजाचं, अस्तित्व धोक्यात आलं आहे. तीन देश व्यापणाऱ्या विस्तीर्ण ग्रॅन चॅको भागात आता तीन वेगवेगळ्या देशात बोलिव्हिया, पॅराग्वे आणि अर्जेटिनामध्ये प्रत्येकी फक्त दोनशे ग्वानॅको शिल्लक राहिले आहेत.
एरिका क्युलरनं ग्वानॅको वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले, ते वस्तुत: ग्रॅन चॅको वाचवण्यासाठीचेच प्रयत्न होते. तिथल्या शुष्क, खुरटय़ा गवतावर उपजीविका करणारे ग्वानॅको अनेक कारणांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची बेकायदेशीरपणे हत्या तर केली जात आहेच, परंतु गुरं राखण्यासाठी त्यांच्या जागेवर होणारं अतिक्रमणसुद्धा घातक ठरतं आहे. जोडीला प्रचंड प्रमाणावर केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीमुळे ग्वानॅकोचं अन्न असलेलं ग्रॅन चॅकोमधलं गवत नष्ट होऊन त्याची जागा खुरटी, काटेरी झुडपं घेत आहेत. त्यामुळे त्यांना चरण्याजोगी कुरणं नाहीशी होत आहेत. भरीत भर म्हणून, मोठाले रस्ते बांधले गेल्यामुळे, गॅसच्या पाइपलाइन्स टाकल्यामुळे आणि लष्करी तळ उभारले गेल्यामुळे, उरलेले मूठभर संस्थेचे ग्वानॅको एकमेकांपासून अलग पडत आहेत.
ग्रॅन चॅको सुरक्षित ठेवलं की, तेथे बागडणारे हे विविध जातीचे सस्तन प्राणी सुरक्षित राहतील, हे एरिका क्युलरला स्पष्टपणे दिसलं. परंतु पर्यावरणप्रेमींचं आणि संशोधकांचं लक्ष ग्रॅन चॅकोच्या उत्तरेला असलेल्या प्रचंड मोठय़ा अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यावरच केंद्रित झालेलं असतं. अॅमेझॉन खोऱ्याच्या तुलनेत ग्रॅन चॅको त्यांना शुष्क आणि अनाकर्षक वाटत असलं, तरी तिथे वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या अनेक जाती वास्तव्य करत आहेत. पांढऱ्या ओठांचे पेकॉरिस, अँटईटर्स, फ्लेमिंगोज, जाग्वार्स – यादी न संपणारी आहे.
अशा परिस्थितीत गॅ्रन चॅकोला विनाशापासून वाचवण्यासाठी, एरिका क्युलरनं एक कल्पक रीत शोधली. तिनं ग्रॅन चॅकोमध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांचीच मदत मिळवून हा टापू सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले.
या टापूतील सरकारसुद्धा, पर्यावरण जतनासाठीच्या तिच्या प्रयत्नांना, हळूहळू प्रतिसाद देऊ लागलंय. १९९७ साली, बोलिव्हियातील सरकारनं, पूर्व बोलिव्हियात ‘का इया नॅशनल पार्क’ संस्थापित केली. १९९९ साली, स्थानिक लोकांचं सहकार्य मिळवून, एरिका क्युलरनं या नॅशनल पार्कची देखभाल आणि व्यवस्थापन हाती घेतलंच. इथली गवताची कुरणं वाढवण्याचा आणि त्यायोगे ग्वानॅको आणि अन्य वन्य प्राण्यांना चारा मिळवून देण्याचा ते कसोशीनं प्रयत्न करत आहेत.
‘का इया नॅशनल पार्क’मध्ये एरिका क्युलरनं सतरा स्थानिक लोकांना जीवशास्त्र आणि पर्यावरण यांचे धडे दिले आहेत आणि पर्यावरण जतन कसं करावं, यासाठीच्या शास्त्रीय पद्धती त्यांना शिकवल्या आहेत. पूर्वी बहुतांशी शिकारीवर उपजीविका करणारे हे स्थानिक लोक आता मनापासून पर्यावरण जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी ग्वानॅकोंची भीषण अवस्था नोंदवून, जमिनीचा जबाबदारीनं वापर करण्याबाबत जनजागृती करण्याचं काम हाती घेतलंय. स्थानिक लोकांवर ही जबाबदारी सोपवून, क्युलरनं तेथील रहिवाशांनाच त्या टापूचं रक्षणकर्ते बनवलं आहे.
या तिच्या प्रयत्नांमध्ये तिला खूप अडथळ्यांचा सामना करावा लागला. एक स्त्री इतकं महत्त्वाचं काम करतेय, याबद्दल प्रचंड विरोधाला तिला सामोरे जावे लागले. तिने हार मानली नाही. तिनं स्थानिक स्त्रियांनासुद्धा प्रशिक्षण देण्याचा नेटानं प्रयत्न केला. ‘स्थानिक लोकांमध्ये, शिकारीसारखे व्यवसाय स्त्रियांना वज्र्य असतात. त्यामुळे जीवशास्त्राचं स्त्रियांना प्रशिक्षण देण्याचे माझे प्रयत्न फारसे यशस्वी ठरले नाहीत. असं असलं तरी, काही तरुण मुली या कामासाठी पुढे येत आहेत. त्यांना संशोधक आणि व्यवस्थापक म्हणून मदत करावीशी वाटतेय. आता एका मुलीनं जीवशास्त्राचे प्रशिक्षण घेतलं आहे आणि इतर काही मुली स्थानिक युनिव्हर्सिटीत याबाबत अभ्यास करत आहेत. त्यामुळे आशेला जागा आहे.’
‘‘क्युलरच्या प्रयत्नांमुळे, ग्रॅन चॅकोच्या पर्यावरणाची होणारी अधोगती थोपवता येईल, असा आशेचा किरण दिसू लागलाय. तिनं प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं ग्वानॅको वाचवण्याच्या मार्गातली संकटं ओळखली आहेत आणि ग्वानॅकोंच्या संरक्षण संवर्धनासाठी स्थानिक लोकांना सहभागी करून घेतलंय. तिच्या प्रयत्नांना यश मिळतंय, आणि ग्वानॅकोंच्या संख्येत लक्षणीय वाढ होतेय,’’ असंच हॅर्नन टॉरेस हा चिली मधला पर्यावरण संरक्षक म्हणतो.
लुईज एमॉन्सचं, वॉश्िंाग्टन डी.सी.मधील स्मिक्ष्योनियन इन्स्टिटय़ूटमधील संशोधकाचं म्हणणं आहे, ‘‘तिच्या एकटीच्या प्रयत्नांनी ग्वानॅको ही जाती वाचली आहे. तिनं त्यांच्या संरक्षणाचा उपक्रम सुरू केला आणि स्थानिक लोकांकडून ग्वानॅकोची केली जाणारी शिकार पूर्णपणे थांबवली. पर्यावरणाचं संरक्षण बाहेरून करता येत नसतं. जर लोकांना पटलं की, त्यांनी शिकार करणं बंद केलं, तरच प्राण्यांची संख्या वाढेल आणि त्यांनी वृक्षतोड थांबवली, तरच त्यांना अधिक पाणी मिळेल, तरच पर्यावरणाचं संरक्षण करता येतं. त्यासाठी स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांची याबाबतची समज वाढवावी लागते. एरिकानं असं प्रशिक्षण अनेकांना दिलंय. बोलिव्हियासारख्या देशात, एखाद्या स्त्रीला नेतृत्व करणं खूप कठीण जातं. परंतु लोक तिचं म्हणणं ऐकून घेतात. ती लोकांशी उत्तम प्रकारे संवाद साधू शकते आणि कोणत्याही अडथळ्यामुळे हतबल होत नाही. तिचे प्रयत्न अथक सुरू असतात.’’
चाळीस वर्षीय एरिकाचे हे प्रयत्न रोलेक्स अॅवॉर्डनं गौरवण्यात आले. या वित्तसहाय्यामुळे ती तिचे प्रयत्न आता अर्जेटिना आणि पराग्वे देशातील ग्रॅन चॅको टापूतील भागापर्यंत विस्तारू शकेल. स्थानिक लोकांचा संघ उभारून ती त्यांचं पर्यावरण आणि तेथील महत्त्वाची वन्य जाती सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करेल, जगजागृती करेल.
या तीन देशांच्या सरकारांनी चॅको संरक्षणासाठी नव्या पद्धती शोधून त्यांचा अवलंब करावा, असा तिचा प्रयत्न आहे. या मार्गात खूप अडचणी आहेत, कारण या शुष्क टापूवर कब्जा मिळवण्यासाठी परदेशी लोकांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यावरच्या कब्जासाठी या तीन देशांची भांडणं गेल्या दोनशे वर्षांपासून सुरू आहेत. इंधनासाठी उपयुक्त वनस्पतींची लागवड करण्याच्या हेतूनं चॅकोमधली वृक्षतोड वाढू लागलीय. त्यामुळे त्याच्या संरक्षणाची मोहीम क्युलरनं त्वरेनं हाती घेणं गरजेचं झालंय. किंबहुना हेच तिचं पुढील लक्ष्य आहे.
जिथं राजकारणी लोकांना यश मिळवता आलेलं नाही, तिथे चॅकोचे रहिवासी स्थानिक सरकारी संस्थांच्या मदतीनं पर्यावरणाचं संरक्षण करू शकतील, असं तिला वाटतंय. प्रशिक्षण घेऊन तयार झालेल्या अशा स्थानिक लोकांना धोरणं आखण्यात स्थानिक खेडय़ांपासून ते राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण संस्थांपर्यंत, सर्व पातळ्यांवर सहभाग घेता यावा, असे तिचे प्रयत्न आहेत. त्यामुळे त्यांना नव्या नोकऱ्यासुद्धा मिळतील.
तिनं या तीन देशांतील अधिकाऱ्यांना आणि शास्त्रज्ञांना भेटून यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. ती म्हणते, ‘‘चोकोचं पर्यावरण झापाटय़ानं विनाश पावत आहे. परंतु जर तीन देशांनी एकत्र येऊन संघटित प्रयत्न केले, तर ग्वानॅको आणि शिल्लक राहिलेला चाकोचा टापू यांना आपण वाचवू शकू.’’
तिच्या प्रयत्नांना आपण सुयश चिंतू या!