04 December 2020

News Flash

निरामय घरटं : निरंतर निश्चल!

बदल होतच असतात, पण बदलांना सामोरं जातानासुद्धा काही मूल्यं निश्चल राहू शकतात.

निरंतर आणि निश्चल हे शब्द आपल्याला कोणत्या वागण्याबाबत कायम लागू पडणारे बनवायचे आहेत, हे ज्याचे त्याने आपला जगण्याचा मार्ग आखताना ठरवायचे असते.

उमा बापट – umaajitbapat@gmail.com

बदल होतच असतात, पण बदलांना सामोरं जातानासुद्धा काही मूल्यं निश्चल राहू शकतात. निरंतर आणि निश्चल हे शब्द आपल्याला कोणत्या वागण्याबाबत कायम लागू पडणारे बनवायचे आहेत, हे ज्याचे त्याने आपला जगण्याचा मार्ग आखताना ठरवायचे असते. आपल्या घरटय़ात ‘निरामय’ स्थिती अनुभवण्यासाठी काही मूल्यांपासून हलून आणि ढळून चालणार नाही. या अर्थानं आपण ‘निरंतर निश्चल’ अशी वाट चालत राहायची आहे, याची खूणगाठ बांधू या.

नवीन वर्ष आलं म्हणता म्हणता सरत जातं. चालू वर्षांतले शेवटचे दोन महिने उरतात आणि पुढील वर्षांची चाहूल लागायला सुरुवातही होते. ‘निरामय घरटं’ ही लेखमालाही याच टप्प्यावर पोहोचली आहे. या सदरातील उर्वरित लेख आपल्या भेटीला येतीलच. दरवेळी नव्या लेखातून वेगळा विचार आला, तरी सर्व विचार प्रत्यक्षात उतरवणं आणि जगताना सातत्य टिकवणं महत्त्वाचं आहे. भारतीय पालकत्व हे ‘चिर-पालकत्व’ असतं, असं या सदराच्या सुरुवातीपासूनच म्हटलं आहे. समाज म्हणून पुढच्या पिढीसाठी आपली बांधिलकी कायम असणार आहे. तसंच नवनवीन आव्हानांना तोंड देणं न संपणारं आहे. त्यामुळे निरामय घरटय़ाचा प्रवास निरंतराचा आहे.

लहान वयात मुलांचं वेगळेपण ही पालकांसाठी कौतुकाची बाब असते. या लेखमालेत पूर्वी नमूद केल्याप्रमाणे आवडता पक्षी म्हणून एखाद्या मुलीनं गिधाडाचं चित्र काढलं, तर चारचौघांपेक्षा ती किती भन्नाट विचार करू शकते, असं पालकांना वाटू शकतं. पण मुलं जशी मोठी होत जातात, तसं बऱ्याच वेळा समाजमान्य चौकटीला धरून मुलांचे निर्णय असावेत अशी पालकांची नकळत अपेक्षा होऊ शकते. मुलांनी निवडलेले शिक्षणाचे विषय, कामाचं क्षेत्र किंवा जोडीदार हे फार वेगळं, भन्नाट असायला अजिबात हरकत न घेणारी कुटुंबं तुलनेनं कमी सापडतील. निरंतर आणि निश्चल जपता येणारी आपली तत्त्वं, मूल्यं, जीवनपद्धती कोणती, याचा विचार गांभीर्यानं, खोलवर होत राहणं किती महत्त्वाचं आणि गरजेचं असतं, ते अशा प्रसंगांतून विशेषत्वानं जाणवेल. मुलानं केलेली वेगळी निवड फक्त त्याच्या बालपणी चालेल आणि मोठेपणी ‘निरनिराळे सारे’ आपल्या जीवनात सामावून घेण्याचा मंत्र पाळणं चालणार नाही, अशी आपली धारणा असणार आहे का? ‘निरनिराळे सारे’ या विविधतेचं कुटुंबाकडून कायम स्वागत होणार आहे का?, कुटुंबाचं वय वाढेल त्यानुसार ‘निकोप स्वातंत्र्या’ची बदलती रूपं आपण पेलू शकणार आहोत का?, असा विचार अंतर्मुख होऊन करता येईल.

‘निरामय घरटं’ या सदरात आत्तापर्यंत अनेक ‘नि’ आपण विचारात घेतले. ती सारी ‘नि’ अक्षरानं सुरू होणारी शीर्षकं आपल्या जीवनशैलीमध्ये गुंफता येतील. कायमस्वरूपी आणि त्यापासून विचलित न होता निरंतर आणि निश्चलपणे जपताही येतील. अविरतपणे हे अंगीकारताना परिस्थितीतले बदल लक्षात घ्यायला लागतील. ‘बदल ही एक न बदलणारी बाब’ हे तर आपण जाणतो. वय किंवा परिस्थिती बदलू शकते. परंतु बदलांना सामोरं जातानासुद्धा काही मूल्यं निश्चल राहू शकतात. मुलानं मोबाइलवर खेळताना संयम शिकणं असेल, नाही तर बाबानं पालकत्वाची जबाबदारी पाळताना सामाजिक कार्यक्रमातला सहभाग संयमानं कमी करणं किंवा ज्येष्ठ नागरिकांनी नातवंडं घरात असताना दूरचित्रवाणीवर काय बघायचं हा संयम राखणं असेल. आयुष्यातील वेगवेगळया वयात ठरवून संयमानं वागणं हे मूल्य ढळत नाही ना, हे पाहता येईल. लहान मुलांना संयमाचं महत्त्व पटवत राहायचं आणि आपणही बदलत्या वयाला बदलत्या स्वरूपात ते नियमित पाळायचं, हे सातत्यानं, न गोंधळता करत राहाणं म्हणजेच निरंतर आणि निश्चल!

एखादी गोष्ट एखाद्या वेळी करणं, वेगवेगळया वेळी वेगवेगळ्या गोष्टी करत जाणं आणि सातत्यानं काही गोष्टी करत राहाणं यात फरक पडतो. सातत्य टिकवणं हे एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. चिकाटी, न कंटाळणं, परिस्थितीनुसार बदलत जाणं, या सगळ्या बाजू प्रयत्नपूर्वक जमवाव्या लागतात. व्यवसायातील सातत्य टिकवणं, एका प्रमुखानं जबाबदारी दुसऱ्याकडे हस्तांतरित करणं, व्यवसायाची मूल्यं आणि संस्कृती याबाबतचा वारसाही पुढे देणं, व्यवसायाचा भविष्यवेध घेण्याची दृष्टीसुद्धा नव्या, जबाबदार गटापर्यंत पोहोचवणं या सगळ्याला मिळून ‘कंटिन्युइटी माइंडसेट’ असा शब्दप्रयोग मध्यंतरी वाचनात आला. त्या शब्दाला जोडून माझा विचार सुरू होता. सातत्यानं काही करणं, हा मनोवृत्तीचा एक पैलू आहे. व्यावसायिक क्षेत्रापलीकडे व्यक्तिगत जीवनातही हा पैलू आपल्या वागण्यात काय प्रमाणात उतरला आहे, यावर आपल्या जगण्यावर अनेक अर्थानं परिणाम होणार असतात. नववर्ष सुरू होताना काही जण व्यायामाचा संकल्प करतात. नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यात नव्या जोमानं सुरुवातही होते. नव्याची नवलाई ओसरते, काहींची पूर्णच थांबते. काही लोक मात्र वर्षांनुर्वष कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा व्यायाम बारा महिने करतात. व्यायाम हा त्यांच्या जगण्यात निरंतर चालू राहणारा अविभाज्य भाग असतो. या अर्थानं ते व्यायामापासून कोणत्याही वयात हटणारे नसतात. निरंतर आणि निश्चल हे दोन पैलू असे एकमेकांबरोबर खुलतात.

विविध वयातली आणि विविध बाबतींतली अशी उदाहरणं आपल्यासमोर नक्की तरळून गेली असतील. नव्या शैक्षणिक वर्षांत नियमित अभ्यास करायचा निश्चय. काही विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत अभ्यासातला नियमितपणा, शैक्षणिक यश संपादन करण्यातही खंड न पडणं आणि त्यांची निश्चल अभ्यासू वृत्ती बघायला मिळते. तर काहींच्या बाबतीत ते लहानपणी अभ्यासू असतात, पण कालांतरानं अभ्यासावरचं लक्ष उडालेलं असतं.  काहींची कथा बरोबर उलटी असते. लहानपणी कधी अभ्यास केल्याचं आठवत नाही, पण पुढील आयुष्यात मात्र अभ्यास सोडलेला नसतो.

क्वचित एखाद्याला कुठे यायला उशीर झाला, तर ते प्रासंगिक वागणं असतं. वरचेवर उशीर व्हायला लागला तर ती सवय जडायला लागते. ती सवय बदलली नाही आणि सगळ्याच बाबतीत दिरंगाई पसरायला लागली तर हा हळूहळू स्वभाव बनू शकतो. कोणत्याही विषयाबाबत,

कु णाशीही वागताना जर वक्तशीरपणाचा अभाव अविभाज्य मिसळला, तर हे त्या व्यक्तित्वाचं एक रूप ठरून जातं. प्रासंगिक वर्तन ते व्यक्तिमत्त्वाचा पैलू अशा या पायऱ्या असतात.

निरंतर आणि निश्चल हे शब्द आपल्याला कोणत्या वागण्याबाबत कायम लागू पडणारे बनवायचे आहेत, हा ज्याचा त्यानं आपला जगण्याचा मार्ग आखण्यासारखं आहे. प्रत्येक व्यक्ती कशाबाबत आणि किती प्रमाणात निश्चल आणि निरंतर असेल, हे कायम भिन्न असणार आहे. सजग पालक, एक स्वस्थ कुटुंब आणि सुसंस्कृत समाज म्हणून आपण काही मूल्यं, सवयी, पद्धती निरंतर आणि निश्चल जपत आलो आहोत. भारतीय कुटुंबपद्धती, विविधतेला सामावून घेणारा समाज, ही काही ठळक उदाहरणं. बदलांचं स्वागत करणाऱ्या संस्कृतीची पाळंमुळं सांभाळत आपल्याला हा प्रवास पुढे चालू ठेवत नित्य तजेलदार करायचा आहे.

फक्त संपन्न वातावरणात एखादं मूल्य आपण जपणार आहोत, की परिस्थिती बिकट झाली तरी आपण मूल्यांची सोबत सोडणार नाही? ‘करोना’ विषाणूच्या पाश्र्वभूमीवर टाळेबंदीत अन्नपदार्थ,भाजीपाला अशा गोष्टींची कमतरता भासेल अशी धास्ती वाटल्यावर आपण शेजाऱ्याला सहकार्य करू शकलो, की शेजाऱ्याबरोबर स्पर्धा? या वेळी ‘निर्मळ लेणं’ आपल्यात किती मुरलं आहे?, आपला तो स्थायीभाव आहे का?, हे ज्याचं त्यालाच उमजलं असेल.  रांगोळीचे ठिपके रेखीवपणे जोडत गेलं, की सुबक रांगोळी साकारत जाते. चित्रकोडय़ाचे सगळे तुकडे जोडले, की एक पूर्ण चित्र आकारतं. ‘निरामय घरटं’ या सदरातले सगळे ‘नि’ जोडत गेलो, तर आपल्या जीवनातही आयुष्याचं एक मोठं चित्रकोडं जुळत जाऊ शकतं. निरागसता जपणं, निखळ जगणं, जीवनात निवांत रमू शकणं, हे निरंतर चालू राहण्यासाठी आपल्याला ‘नेमकी निवड’ करावी लागेल. नित्य नेमे काही गोष्टींचं विसर्जन करावं लागेल. असे वेगवेगळ्या लेखांचे ठिपके जोडले जातील. हे सगळं जमण्यासाठी न कंटाळता कष्ट घेणं म्हणजेच ‘निरलस श्रमणं’, ‘नियोजित पूर्वतयारी’ आपण विसरणार नाही. तरीही ‘निसर्ग नियमानं’ काही गोष्टी घडणारच आणि हे प्रत्येकाचं भिन्न असणार, हे भान आपल्याला राहील. आपल्या लगतच्या तसंच विस्तारित कुटुंबालाही ‘निस्सीम प्रेमानं’ कवेत घेता येईल. अर्थातच प्रसंगी निंदा निभावून, निर्भय कणखर राहून निराशेला झटकून आशेकडे प्रवास होत आपलं निजसुख शोधायचा मार्ग सापडत जाईल. यापुढेही लेखमालेत येणारे ‘नि’ या मालेत गुंफले जातील.

कापडाचे वेगवेगळे तुकडे एकमेकांना जोडून गोधडी वा क्विल्ट बनवायची पद्धत आहे. त्यातल्या प्रत्येक तुकडय़ाचं स्वत:चं वेगळं रंगरूप, पोत, स्पर्श असतो. ‘निरामय घरटं’ या सदरातील प्रत्येक लेखातील ‘नि’चं स्वतंत्र अस्तित्वही जाणवेल. एकेक लेख स्वतंत्र पाहिला, तरी त्यात आशयघन, अर्थपूर्ण संवाद साधलेला दिसेल. प्रत्येक वाचकाच्या अनुभवविश्वाशी वेगळ्या तुकडय़ाचं रंग रूप, पोत जुळेल. कापडांचे तुकडे जोडून सुंदर दुपटं शिवायची पद्धत आपल्याकडे होती. जुनी कापडं वापरून मऊ झालेली असतात, प्रत्येक तुकडय़ाशी मायेचा बंध जुळलेला असतो. कडकपणा धुऊन टाकून मऊसूत झालेलं आणि आठवणींचा ओलावा असलेलं उबदार पांघरूण किंवा अंथरूण नव्या बाळासाठी मोठय़ा हौशीनं आणि तितक्याच कष्टानं शिवलं जायचं.

एक-एक धागा पक्का होईल, हे बघितलं जायचं. हातानं शिवलं म्हणून ते उसवायचं नाही. आपल्या कुटुंबानंच शिवलेलं हे बाळलेणं पुढे दिलं जायचं.

घराघरात अस्थिरता, चिंता मागे ठेवून समाधान, स्वस्थता लाभावी, या कृतीरूप तळमळीनं हे लेखरूपी ‘कुटुंबलेणं’ शिवलं आहे. मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र यावर आधारित आणि भारतीय कुटुंबपद्धतीची बलस्थानं अधोरेखित करणारं, योग्य परंपरेची दृढता आधुनिक काळात नव्या रूपात सामावणारं ‘निरामय घरटं’ साकारलं आहे. विचारनिष्ठ भक्कम धाग्यानं विणलेल्या आणि माणुसकीच्या ओलाव्यानं भरलेल्या या नानाविध ‘निं’बरोबर  निरंतर, निश्चल, तरीही ‘नित्य नूतन’ जगू या!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 6:34 am

Web Title: how to face changes niramay gharta dd70
Next Stories
1 पडसाद : नवीन विचारास चालना
2 आली माझ्या घरी (ही) दिवाळी..
3 मनावरची काजळी पुसताना..
Just Now!
X