‘युनायटेड स्टेट सेक्रेटरी ऑफ स्टेट इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज अवार्ड’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवलेली डॉ. जो ओकी ओदुमकिन ही एक लढवय्यी कार्यकर्ती. मानव अधिकार चळवळीच्या, स्त्री अधिकारांसंबंधीच्या तसेच इतर अनेक सामाजिक प्रश्नांच्या तर्कनिष्ठ तात्पर्यासाठी प्रयत्नशील राहिल्या आणि आतापर्यंत सतराहून अधिक वेळा तुरुंगवासही भोगला. आजही त्यांच्या संघर्ष अविरत सुरू आहे. त्या जोविषयी..
‘‘१९९८ च्या ऑगस्ट महिन्यात जो ओकी ओदुमकिन या नायजेरियन कार्यकर्ती बाईला अपापा येथे एका पत्रकार परिषदेला उपस्थित राहायचे होते. ती त्या वेळी गर्भवती असल्याने प्रवासाला निघण्यापूर्वी ती चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेली. तिला वेणा सुरू झाल्या. डॉक्टर म्हणाली, ‘तू तासाभरात बाळंत होशील. ही प्रक्रिया थांबवण्यासाठी माझ्याकडे औषध नाही!’ त्या वेळी साधारणपणे सकाळचे आठ वाजले होते. सव्वानऊ वाजता जो ओदुमकिन यांनी बाळाला जन्म दिला. त्या सांगतात, ‘‘माझी आई सोबत असल्याने मला बाळाची काळजी करण्याचे कारण नव्हते. मला लवकर स्वच्छ करून द्या, मला प्रेससाठी जायचे आहे, असे मी हॉस्पिटलच्या स्टाफला सांगितले. अपापाला पत्रकार परिषदेला जमलेल्यांपकी अनेकांना माझ्या सपाट पोटाचा अर्थ लागेना. पण ते सत्य होतं.’’
‘जो ओकी ओदुमकिन’ या चळवळ्या बाईच्या आयुष्यातील ही एक घटना! म्हटलं तर एक प्रक्रिया! आणि म्हटलं तर तिच्या एकंदरीतच कार्यशैलीचा, आयुष्यातील प्राधान्यक्रमांचा या घटनेतून आपल्याला सहज अंदाज यावा इतकी स्पष्ट आणि उघड!  अशा या डॉ. जोसेफाईन ओके अदुमकिन या नायजेरियन तरुणीसाठी आणि नायजेरियातील सर्व नागरिकांसाठी ८ मार्च २०१३ हा दिवस नक्कीच विशेष होता! ‘युनायटेड स्टेट सेक्रेटरी ऑफ स्टेट इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज अवार्ड’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉ. जो यांना अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मिशेल ओबामा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला!
हा पुरस्कार ज्यासाठी त्यांनी मिळवला ते कारण होते नायजेरियातील नागरी हक्कांच्या, स्त्रियांच्या अधिकारांच्या आणि लोकशाही मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी दिलेल्या अविरत लढय़ाचे! खरेतर ते केवळ नायजेरियापुरते मर्यादित नाही! कारण त्यांचा हा लढा अखिल मानव जातीसाठी एका नव्या वाटेकडे अंगुलिनिर्देश करतो, जिथे तुम्हाला दिले गेलेले स्वातंत्र्याचे वचन पूर्णपणे पाळले जाईल अशी आश्वस्तता आहे! त्यांना आतापर्यंत मिळालेल्या असंख्य पुरस्कारांची एक लांबलचक यादीच खरेतर त्यांच्या कर्तृत्वाविषयी व लोकप्रियतेविषयी खूप काही सांगून जाते.
अत्यंत संघर्षमय जीवन असलेल्या ‘जो’ या आपल्या आतापर्यंतच्या जीवनात मानव अधिकार चळवळीच्या, स्त्री अधिकारांसंबंधीच्या तसेच इतर अनेक सामाजिक प्रश्नांच्या तर्कनिष्ठ तात्पर्यासाठी प्रयत्नशील राहिल्या. बरेचदा नायजेरियातील सनिकी राजवटीचे प्रमुख बाबनगिदा यांची खप्पामर्जी त्यांनी ओढवून घेतली आणि आतापर्यंत सतराहून अधिक वेळा तुरुंगवासही भोगला. कट्टर कॅथलिक कुटुंबात ४ जुल १९६६ रोजी झारियामध्ये त्यांचा जन्म झाला! क्वारा राज्यातील इलोरिन गावात, इलोरिन विद्यापीठात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. ‘गायडन्स अँड काउन्सेिलग’ विषयात त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, तर ‘हिस्टरी अँड पॉलिसी फॉर एज्युकेशन’ या विषयात त्यांनी १९९६ साली डॉक्टरेट मिळवली.
जो लढा त्यांना पुढे आयुष्यभर द्यायचा होता त्याची पाळेमुळे खरे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील इलोरीन विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा या काळाशी सर्वाधिक निगडित आहेत. त्या म्हणतात, ‘‘इलोरीन विद्यापीठात शिकत असताना ‘लेफ्ट िवग मूव्हमेंट’ नावाचे एक पोस्टर मला दिसले. मी त्यांच्या मीटिंगला गेले. तिथली एक गोष्ट मला खटकली. मीटिंगच्या सुरुवातीला आणि शेवटी ‘प्रेयर’ का म्हटली गेली नाही यासाठी मी तिथे वाद घातला. तिथे असलेले बहुतेक जण माझ्या अंगावरच धावून आले आणि माझी तिथून हकालपट्टी झाली. ही माणसे इतकी िहसक का बनली हे मला त्या वेळी क ळले नाही, पण िहसा हे समस्येचे उत्तर कसे असू शकेल हा विचार मात्र माझ्या मनातून जाईना. ‘इलोरीन विद्यापीठात मला ‘रेव्ह. सिस्टर’ असे नामाभिधान मिळाले ते यामुळेच! आमच्या िलग्विस्टिक्सच्या सरांना माझ्या या नावाबद्दल कळले आणि त्यांनी मला त्यामागचा इतिहास विचारला. मी सांगितल्यावर मार्टनि ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांची चरित्रे त्यांनी मला वाचायला दिली. ‘ज्या गोष्टी आपल्याशी संबंधित आहेत त्यावर आपण जोपर्यंत मौन बाळगत राहू तर आपले आयुष्य तिथेच आणि जसे आहे तसेच संपते.’ मी त्यात वाचलेले हे सुप्रसिद्ध वचन माझ्या वैचारिक बठकीला दिशा देणारे ठरले आहे हे मला नमूद करायला हवे!’’
डॉ. जो यांनी आपल्या सामाजिक चळवळीतील सहभागाची सुरुवात १९८१ साली ‘सेक्रेटरी ऑफ वुमेन इन नायजेरिया’ या संघटनेच्या माध्यमातून केली. पुढे त्या ‘को-ऑर्डिनेटर ऑफ वुमेन इन नायजेरिया’ या संघटनेच्या अध्यक्ष झाल्या. त्याचप्रमाणे लोकशाहीच्या अधिकारांसाठी झगडणाऱ्या ‘री िथक नायजेरिया’च्याही अध्यक्ष होत्या. वुमेन अराइज फॉर चेंज इनिशिएटिव्ह’ ही  संघटना त्यांनी स्थापन केली. सध्या त्या ‘कमिटी फॉर डिफेन्स ऑफ वुमन राइट्स’च्या अध्यक्ष आहेत.
डॉ. जो यांनी आपली कारकीर्द जिथे गाजवली तो देश म्हणजे नायजेरिया! १९९९ साली तिथे लोकशाही प्रस्थापित झाल्यानंतर पूर्वीचे लष्करप्रमुख ओबासांजो यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. २००३ मध्ये पुन्हा ओबासांजो हेच निवडून आले असले तरीही निवडणूक प्रक्रियेबाबत संशय आणि सरकारविषयी असंतोष नायजेरियन जनतेच्या मनात मूळ धरू लागला होता! आपल्या प्रखर सामाजिक जाणिवांवर निष्ठा असणाऱ्या ‘जो’ला आणि तिच्या नवतरुण पिढीला आपल्या देशातील अर्थ-समाजकारण व राजकारण यांची दिशा आणि दशा नेमकेपणाने उमगू लागली होती. नागरी कायदा आणि त्यातील त्रुटींविरोधात हा वर्ग अधिकच आक्रमकपणाने पुढे येऊ पाहत होता! लोकशाहीच्या बुरख्याआड एकाधिकारशाही करणारे, युवकांना आपला शत्रू समजणारे, आपली मते खुलेपणाने व्यक्त करण्याचे कुठलेही स्वातंत्र्य नाकारणारे हे सरकार जनतेला जाचक वाटू लागले. अशा दूषित वातावरणात लोकशाहीची रुजवात कशी होणार ही या युवा वर्गाची तगमग आहे.
आक्षेपार्ह परिस्थितीत पार पडलेल्या आणि म्हणूनच नायजेरियन जनतेला अमान्य असलेल्या निवडणुकीबद्दलचा असंतोष शिगेला पोहोचलेला असतानाचे हे दिवस होते. ‘ऑक्युपाय नायजेरिया’ आंदोलन जोर धरू लागले आणि इथेच जोसेफाइनला नायजेरियन जनतेने संपूर्ण आवेशानिशी लढताना पाहिली. तिच्या अथक परिश्रमांना अंत नव्हता. जो यांची एकंदरीत लढवय्या प्रवृत्ती सत्ताकारण्यांना अडचणीची ठरू लागली! डॉ. जो यांना या लढय़ात आपल्या जिवाला धोका असल्याची जाणीव झाली होती!
आपल्या कार्यात कुठेही दुर्लक्ष व्हायला नको म्हणून अविवाहित राहण्याचा निश्चय केलेल्या जो यांचा पुढे प्रेमविवाह झाला! पतीशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण अजूनही त्यांच्या मनात ताजी आहे. ती भेटही काही सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्यात असते तशी नव्हती. त्यांना एका प्रदर्शनादरम्यान अटक केली गेली आणि खूप मारहाण केली गेली. अगदी मरणोन्मुख अवस्थेत असताना दवाखान्यात न्यावे लागले. तिथे त्यांच्या वडिलांनी सरकारला ‘त्या पुढे असे काही करणार नाहीत’ असे लिहून दिले. त्यांचे वडील निघून गेल्यानंतर दवाखान्यातील स्टाफने त्यांना लावलेले ‘ड्रिप’ त्यांनी हिसका देऊन काढून टाकले. जिथे ड्रिप लावले होते ती नस सुजून हात टम्म फुगला तेव्हा ते दिसू नये म्हणून प्लास्टर लावण्यात आले. त्या सांगतात, ‘‘लॅगोस येथे नेले जात असताना नायजेरियातील थोर तत्त्वज्ञ व राजकारणी चीफ गनी यांनी मला त्या अवस्थेत विव्हळताना बघितले आणि माझ्याभोवतीच्या सुरक्षारक्षकांना माझ्यावर आधी उपचार करा असे सुनावले. तिथे असलेला एक तरुण माझ्याकडे रोखून पाहत होता! गनी यांनी त्याला सांगितले, यीन्का, तू हिला ओळखले नाहीस? ही इलोरीनची जो ओदुमकिन आहे. यांकी आणि माझी तिथे झालेली ओळख पुढे आमच्याच लढय़ातील एक सहकारी म्हणून वाढत गेली आणि वर्षभरातच आम्ही विवाहबद्ध झालो!’’
‘री-िथक नायजेरिया’ आणि वुमन राइट्स कमिशनच्या अध्यक्षपदाच्या कार्यकालात त्यांच्यातील नेतृत्व अधिक बहरले. त्यांनी स्थापन केलेली ‘वुमेन अराइज फॉर चेंज इनिशिएटिव्ह’ ही संघटना खासकरून महिलांनी आपल्या समस्यांबाबत व्यक्त व्हावे म्हणून प्रयत्नशील आहे. नायजेरियातील गुन्हेगारीवर त्यांचे काम चालू आहे. अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे वळणे रोखण्यासाठी आणि आधीच त्यात गुंतलेल्या मुलांना बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत.
आपल्या आयुष्यातील अशाच एका घटनेबद्दल त्यांनी सांगितले आहे. ‘गरिबी, त्यातून येणारे वैफल्य, अशिक्षितपणा, रोजगाराच्या संधींचा अभाव आणि त्यातून जन्माला येणारी गुन्हेगारी प्रवृत्ती हे सर्व नायजेरियातून कधीतरी हद्दपार होईल आणि येथील जनतेला त्यांचे सर्व हक्क सन्मानाने मिळतील असे स्वप्न पाहणाऱ्या जो म्हणूनच नायजेरियन जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांच्यासारख्या लढवय्या नेतृत्वाची आणि निरपेक्ष समाजसेवकांची संपूर्ण मानव जातीलाच आज नितांत गरज आहे.