डॉ. मंगला आठलेकरांचा ८ डिसेंबरच्या पुरवणीतील ‘राखीव जागेचा आग्रह’ हा लेख खूप आवडला. जवळपास सर्वच प्रांतात स्वत:चे स्थान निर्माण करताना स्त्रियांना अधिक संघर्ष करायला लागतो, त्यांची वाट अधिक खडतर असते यात वाद नसला, तरी संघर्ष करूनच स्त्रियांनी प्रगती करून घेतली पाहिजे. राजकारणातील राखीव जागा तर स्त्रीला समता कधीच देऊ शकणार नाहीत. वडील, नवरा, भाऊ किंवा मुलगा यांच्या हातात रिमोट कंट्रोल देऊन नावापुरत्या निवडून येणाऱ्या आणखी किती राबडीदेवी आपल्याला हव्या आहेत? या राजकारणात आलेल्या स्त्रिया कोणाच्या तरी हातचे प्यादेच राहणार असतील तर त्यांना राजकारणावर काहीच प्रभाव टाकता येणार नाही. फार क्वचितच या प्याद्यांचा वजीर होताना दिसतो. आरक्षणाच्या कुबडय़ांनी कदाचित संसदेतील व विधिमंडळातील महिलांची टक्केवारी सुधारेल पण स्त्रियांची परिस्थिती कधीही सुधारणार नाही. ना त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
राखीव जागांमुळे अस्तित्वात येणारा आणखी एक संभाव्य धोका जाणवतो. आजही कित्येक कुटुंबांत स्त्रीला नकाराचा अधिकार असतोच असे नाही, राजकारणाची अजिबात आवड नसलेल्या एकाद्या स्त्रीला फक्त मतदारसंघ राखीव असल्यामुळे राजकारणात जबरदस्तीने ढकलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धीम्या गतीने का होईना स्त्रिया प्रगती करताहेत. आरक्षणाने मिळणाऱ्या झटपट बेगडी यशापेक्षा उशिराने का असेना, पण खऱ्या स्त्रीशक्तीचा प्रत्यय देणाऱ्या प्रगतीची आपण वाट पाहूया.
याच अंकात डॉ. अनघा लवळेकरांनी दाखवलेली तथाकथित सुशिक्षित, सुसंस्कृत, पुरोगामी, अभिजन वर्गातील ‘मनातली असमानता’ बरेचदा फक्त धनवाटपाच्या वेळीच प्रच्छन्नपणे दिसते. तोपर्यंत या असमानतेच्या बळी ठरलेल्या स्त्रियांनाही त्याची कल्पनाच नसते. यातही मन उद्विग्न करणारी गोष्ट ही की, अशा वेळी अशा कुटुंबातल्या स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या सुनाच जुन्या हिंदू कायद्याचा फायदा घेऊन कुटुंबातल्या मुलींवर अन्याय करणाऱ्या बंधूंना मदत करताना दिसतात. तत्त्व म्हणून समानता अंगीकारताना वैयक्तिक फायद्या-तोटय़ापलीकडे स्त्रियांनीच जाण्याची गरज आहे.
– यशोधरा कामत, मालाड

समाजमनाचे भान हरवलेला लेख
र.धों.च्या निमित्ताने या सदरातील ‘याची त्यांना बोच का नाही’ (चतुरंग- २४ नोव्हेंबर) हा लेख वाचला. मनोरंजनपर मालिकांत, सिनेमांत काम करणाऱ्या महिलांवर हा लेख प्रामुख्याने बेतलेला आहे. विषय निश्चितच चांगला आहे, पण तो मांडताना नेमका दोष कोणाला द्यायचा यावरून मात्र लेखिकेचा गोंधळ उडालेला दिसतो. यातून त्यांची वैचारिक संदिग्धता समोर येते.
सिनेमा किंवा मालिका या स्त्रीचे वास्तवातले प्रश्न मांडण्यासाठी तयार केल्या जात नाहीत, किंबहुना वास्तवापासून दोन घटका दूर नेण्यासाठी अशा कृती तयार केल्या जातात. मालिकामधील स्त्री ही निर्बुद्ध दाखवली जाते, हा निष्कर्ष त्यांनी कशातून काढला हे समजायला मार्ग नाही. त्यामुळेच चित्रविचित्र आकाराच्या बटा, कानातले मोठे डूल, दंडावर टॅटू अशी ‘ती’ सादर केली जाते, हे विधानही तर्काच्या पलीकडचे वाटते आणि ‘अशा भूमिका करायला ही स्त्री कशी तयार होते’ हा प्रश्न केवळ हास्यास्पदच नाही तर माध्यमाच्या परिघाचे आकलन नसल्याचे द्योतक आहे. याहूनही पुढे जाऊन स्त्रीमुक्ती संघटनेची बाजू घेताना त्या लिहितात- असे अर्धनग्न वावराचे समर्थन करणाऱ्या स्त्रिया स्त्रीमुक्ती संघटनेचे म्हणणे थोडेच मनावर घेणार आहेत. मंगलाताई चळवळ ही कडवा विरोध करणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असते, चळवळीत संघर्ष गृहीत आहे. पुण्यातील मुक्तांगण ही संस्था ही अट्टल दारुडय़ांसाठी आहे. तीही अशा उपचाराला विरोधच करते. त्यातून त्यांना बाहेर काढणे यासाठी चळवळ लागते. त्यामुळे तुमचा हा मुद्दा न पटणारा आहे. मला वाटते यात काही दोष असेल तर तो मुख्य प्रेक्षकांचा आहे .या प्रकारच्या मालिका बघणे त्यांनी सोडून दिले तर अशा मालिका, सिनेमे तयार होणार नाहीत. साधी गोष्ट घ्या, आपण फेरीवाले, रस्त्यावर भाजी विकणारे यांना एका तोंडाने विरोध करतो आणि कुठे लांब जायचे म्हणून त्यांच्याकडूनच खरेदी करतो. ही मानसिकता प्रथम बदलणे आवश्यक आहे.
मुळात समाजात तथाकथित अभिजन हे तीन टक्के असतात आणि बाकी बहुजन असतात. त्यांच्या आवडीनिवडी, अभिरुची ही खूप भिन्न असते आणि व्यापार हा याच ९७ टक्केलोकांसाठी केला जातो, हे वास्तव आहे. ते आधी लक्षात घेऊया. आणि मग आपल्या भगिनींना दोष देऊया!
-शुभा परांजपे, पुणे</p>

अमृता सुभाषांचा उत्कट अनुभव
‘चतुरंग’मधील एक उलट..एक सुलट या सदरातून अमृता सुभाष वाचकांशी साधत असलेला संवाद फार उत्कट वाटतो. त्यांच्या ‘हिरव्या रंगाचे तळे व गाभरा’ या लेखाबद्दल त्यांना शुभेच्छा. त्या फार वेगळ्या विचारांच्या व्यक्ती असल्याचे लेखातून ठायीठायी जाणवते. विचारांची प्रगल्भता त्यांच्यात असल्याची पावती मिळते. त्यांनी जोडलेलं मूर्ती व गाभाऱ्याचं रूपक तंतोतंत पटलं. त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.  
सादरीकरणाची त्यांची पद्धत फार स्पर्शून गेली मनाला, आकलनशक्तीच्या पलीकडील विचार वाटावे अशी क्षणभर अवस्था होते. लेख वाचता वाचता आयुष्याबद्दलचा एक वेगळा अनुभव त्या सहजतेने देतात. जीवन फार जवळून पाहिलेल्या त्या परिपक्व  व्यक्ती आहेत. असे म्हटल्यास वावगे होणार नाही. बऱ्याच जणांच्या आयुष्यात असे प्रसंग येतही असतील, परंतु त्यातून अचूक बोध फार कमी व्यक्ती घेतात. त्यातून एक वेगळा अर्थ देता तुम्ही आयुष्याला, वेगळी अनुभूती प्राप्त होते त्यानंतर. हा अनुभव शब्दात अचूक पकडल्याबद्दल त्यांचे आभार.
-तुषार रेगे, ई-मेलवरून