सर्वसामान्यपणे ‘गाठोडे’ हा शब्द म्हटला की माझ्या डोळ्यांसमोर बोहारीणच येते. जुने कपडे देऊन घासाघीस करून अगदी चकचकीत स्टीलची नवी भांडी मिळाली की आपल्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहतो. हा आनंद दोन कारणांसाठी. घरातील अडगळ निघाल्याचा आणि काही नवीन मिळाल्याचा!
सहज मनात विचार आला. आपण सगळेच आपल्याबरोबर वासनांचे गाठोडे घेऊनच जन्माला आलो आहोत. ‘वासनाक्षय’ म्हणजे हळूहळू घरातील रद्दी बाहेर काढणे. या वासनांचे गाठोडे सहजपणे बाहेर निघत नाही. वासना वळण देऊनच बाहेर काढाव्या लागतात. रिप्रेशन म्हणजे दाबून टाकणे आणि चॅनेलायजेशन म्हणजे वळण लावणे, तिसरे म्हणजे डिफेन्स रिअ‍ॅक्शन. बेलसरे फार सुंदर सांगतात, प्रपंचात राहूनच हे करणे शक्य आहे. तुकारामांनी आपले गाठोडे रिकामे करण्यासाठी पांडुरंगाचा रस्ता धरला आणि म्हणाले. ‘माझे मनोरथ पावविले जैं सिद्धी, माझ्या वासना सिद्धी पावल्या आणि समाधाने जीव राहिला निश्चल’. जीव समाधानी झाला. म्हणजे वासनांचे गाठोडे रिकामे केल्यावर मिळते ती शांती, तृप्ती आणि समाधान आणि परमानंद!
कटी चक्रासन
आज आपण कटी चक्रासन करू या. दोन्ही पायांत अंतर घेऊन दंडस्थितीत उभे राहा. आता डावा हात उजव्या खांद्यावर ठेवा आणि उजवा हात पाठीमागे घ्या. आता उजव्या खांद्यावरून जास्तीतजास्त मागे पाहण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीत मानेला व पोटाच्या स्नायूंना बसणारा पीळ यांवर लक्ष एकाग्र करा. श्वास रोखू नका. विरुद्ध बाजूला ही कृती पुन्हा करा. या आसनाच्या सरावाने कंबर, पाठ, मान यांतील स्नायू सक्षम होतात. आळस काढण्यासाठी, तणावमुक्तीसाठी हे आसन उपयुक्त आहे.

आनंदाची निवृत्ती – इंटरनेटची किमया
छाया देशपांडे
मी टेलिफोन खात्यात ३७ वर्षे नोकरी केली. त्या काळात घर आणि नोकरी सांभाळून आपण काही तरी वेगळे शिकावे, अशी मनापासून इच्छा होती. पण रोजच्या तारेवरच्या कसरतीत ते काही जमले नाही. पण निवृत्तीनंतर मात्र बऱ्याच नवीन गोष्टी शिकण्यात रस घेतला. उदा. बागकाम, ब्रेललिपी शिकणे इत्यादी परंतु आजारपणामुळे त्या गोष्टीही अर्धवटच राहिल्या.
मग लक्षात आले, नवीन पिढीच्या बरोबर राहण्यासाठी संगणक येणे आवश्यक झाले आहे. योगायोग असा की माझ्या सुनेने कॅनडातून येताना, ‘आई तुमच्यासाठी काय आणू’, असे विचारले. मी तत्काळ तिला संगणक आणण्याची आज्ञा देऊन टाकली आणि ती खरोखरच नवा कोरा लॅपटॉप घेऊन आली.
 मी जरी नोकरी करीत होते तरी आमच्या आयुष्यात त्यावेळी इंटरनेटचा प्रवेश झाला नव्हता. त्यामुळे त्याबद्दल आमची पाटी कोरीच होती. सुनेने तिच्या धावत्या भेटीत मला संगणक कसा ओपन करावा, इंटरनेट सुविधा व स्काइप कसा चालू करावा इत्यादी प्राथमिक गोष्टी शिकविल्या. त्या माहितीच्या आधारे मी सर्वज्ञ झाले, असे मला वाटले, पण प्रत्यक्ष संगणक वापरताना अनेक अडचणी आल्याने ते सहज भाजी करण्याइतके सुलभ नाही हे लक्षात आले. मी संगणक माहितीचे पुस्तक आणले पण मला ते उमगेना. माझी ही फजिती पाहून अनेकदा माझी नातवंडे गालातल्या गालात हसत. पतिराज तर मी संगणक मागवून मोठा गुन्हा केलाय असेच जणू डोळे मोठे करून सांगायचे. आपली कुवत नसताना एवढय़ा महागडय़ा वस्तू आणण्याचा कशाला घाट घालावा, असे भाव मला त्याच्या चेहऱ्यावर दिसायचे.
 पण मी चिकाटी सोडली नाही. कोणी ‘वंदा वा निंदा’ मी प्रयत्न करीतच राहिले. अनेकांबरोबर चर्चा करून संगणकाच्या क्लासला दाखल झाले. त्या शिक्षिकेला माझे कौतुक वाटले. या वयात माझी नवीन शिकायची तयारी बघून तिने माझे अभिनंदन केले. शिकताना वर्गात सर्व समजले असे वाटायचे, पण बाई उजळणी घ्यायला लागल्या की ‘पुढे पाठ मागे सपाट’ अशी अवस्था होत असे. पण मी हार मानली नाही. मला ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमाची आठवण झाली. मग कारण नसताना मी अनेकांना मेल पाठवायला, सोबत फोटोज् पाठवायला सुरुवात केली. त्या बरोबरीने गुगल सर्च करणे त्यातून वेगवेगळय़ा साइट्स बघणे सुरू केले.
मी आता फेसबुक अकाऊंटही मी ओपन केले आहे. फेसबुकवर माझे नाव व फोटो बघून परदेशातील बालगोपालांनी कौतुक केले. प्रत्येक जण मला ‘हाय’ करीत होते, पण मला कुठे चॅटिंग करता येत होते! मग त्यासाठी मी मदत घेतली, माझ्या सोसायटीतील बालमित्रांची. प्रशांत आणि अक्षय यांना अनेक शंका विचारून मी त्रास देत असे, पण तेही कौतुकाने, न कंटाळता माझ्या शंकांचे निरसन करायचे, आजही करतात. आता मला बऱ्याच गोष्टी समजावयास लागल्या व चुकीच्या दुरुस्त्या करता येऊ लागल्या.
 एकदा गुगलवर सर्च करून प्र.के.अत्रे व पु.ल. देशपांडे यांची भाषणे ऐकली व मला संगणक शिकल्याचा मनापासून आनंद झाला. माझा मुलगा ‘कॅनडात ये’ असे आमंत्रण देतो तेव्हा ‘नायगरा फॉल्सचे दर्शन’ मी माझ्या संगणकावर घेते, असे विनोदाने सांगते.
 नवीन पिढीच्या बरोबर आपण राहिल्यास त्यांना मनापासून आनंद होतो, हे मी स्वानुभवाने सांगते. माझी सून तर तिने दिलेल्या संगणकाचा योग्य प्रकारे उपयोग करते त्यामुळे माझ्यावर फिदा आहे.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

खा आनंदाने! – मिठाची  गोष्ट !
वैदेही अमोघ नवाथे   आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com
एखाद्या पदार्थात मीठ जर जास्त झालं की तो पदार्थ खारट आणि कमी झालं की बेचव अशी पंचाईत होते. बरं डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ नेहमी सांगतात, मीठ म्हणजे ‘पांढरा शत्रू’, वापरा पण जपून! ( काही वेळा पूर्णच बंद करायला सांगतात.) अन्नाला चव आणणारं मीठ वापरायचं तरी किती? असा प्रश्न बऱ्याच आजी-आजोबांना असतो. तर आज आपण ‘मिठाची’ काही तथ्य समजावून घेऊ या.
सर्वाधिक सोडियम टेबल मिठामध्ये (सोडियम क्लोराईड) आहे. आपल्या शरीराला ५-६ ग्रॅम मिठाची गरज असते. आपण रोज अंदाजे १४-१६ ग्रॅम मीठ खातो. ज्या व्यक्तीला अतिरक्तदाबाचा त्रास आहे त्या व्यक्तीने आहारतज्ज्ञ/डॉक्टरांच्या सल्ल्याने २-४ ग्रॅम मिठाचे सेवन करावे, अथवा मीठ वज्र्य करावे. दिवसाला ४ ग्रॅम मीठ म्हणजे १ छोटा चमचा. बऱ्याच अन्नपदार्थामध्ये नैसर्गिकरीत्या मीठ असते. प्रक्रिया केलेले अन्न म्हणजेच- ब्रेड / बिस्कीट / नूडल्स / चिप्स / पापड / लोणची वगैरे – अतिमिठाचे भांडार. म्हणून कोणतेही डबाबंद पदार्थ घेताना त्यातील सोडियमचा जरूर विचार करावा. त्यासाठी लेबल वाचणे उत्तम. बाजारात असलेले लो सोडियम मीठ किंवा सैंधव प्रमाणात वापरलेलेच उत्तम.
‘कमी मिठाची’ चव आणि अन्नाची लज्जत वाढवण्यासाठी दालचिनी, लवंगा, जायफळ, आले, जीर, मिरपूड, कढीपत्ता, लिंबाचा रस, ओवा, धणे, चिंच, गूळ वगैरे पदार्थ नक्कीच उपयोगी पडतात.  
१ चमचा मीठ = २३०० मिग्रॅ सोडियम आणि १ चमचा बेकिंग सोडा = १००० मिग्रॅ सोडियम
पायाला सूज असणे, संधिवाताचा त्रास, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचा आजार वगैरे बऱ्याच व्याधींमध्ये मिठाचे पथ्य पाळणे जरूर असते. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे सल्ला बदलतो. पण औषध चालू आहे, आजार नियंत्रणाखाली आहे म्हणून अति मीठ सेवन करणे योग्य नाही. आहारातील मिठाचे प्रमाण कमी केल्यावर ‘अळणी’ चवीची आपोआप सवय होते मग आपण काही वेगळं ‘पथ्य’ पाळत आहोत ही ‘सल’ मनातून निघून जाते.
ज्वारी किंवा बाजरी पराठा
साहित्य – १ कप ज्वारी (पांढरी बाजरी) पीठ / बाजरी पीठ, १ कांदा पात किंवा शेपू किंवा मेथीची पाने -बारीक चिरलेली,  १ हिरवी मिरची बारीक चिरलेली, १ छोटा चमचा तेल / गायीचे तूप, चिमूटभर मीठ + मेथीचे दाणे, मोहरी आणि सुकी लाल मिरची एकत्र करून केलेली पावडर (लोणचे मसाला)  
कृती- गरम पाणी वापरून पीठ भिजवावे. पीठ १० मिनिटे बाजूला ठेवा. पिठाचे चार समान भाग करा. हातावर बिस्किटाच्या आकाराप्रमाणे थापा किंवा प्लास्टिकमध्ये ठेवून लाटून घ्या. नॉन स्टिक पॅनवर हलके ब्राऊन आणि खुसखुशीत करा. गरम गरम खा.

कायदेकानू – नातेवाईकांकडून पोटगी
अ‍ॅड. प्रीतेश देशपांडे -pritesh388@gmail.com
मागील भागामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारा विशेष कायदा ‘कल्याण कायदा २००७’ अंतर्गत येणाऱ्या पालक, मुले, पोटगी या संज्ञांमध्ये अंतर्भूत होणाऱ्या विविध व्यक्तींचा व घटकांचा ऊहापोह केला. या भागात आपण संपत्ती, नातेवाईक आदी महत्त्वाच्या संज्ञांमध्ये अंतर्भूत होणाऱ्या गोष्टींची माहिती घेऊ.
कायद्यात सांगितल्याप्रमाणे ‘ज्येष्ठ नागरिक’ या संज्ञेमध्ये ज्या व्यक्तींनी वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहेत अशा व्यक्तींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे या कायद्यामध्ये ‘नातेवाईक’ या शब्दाचीही संज्ञा दिली आहे. या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे ज्या व्यक्तीस मूल-बाळ नाही अशा व्यक्तीस त्याच्या ‘नातेवाईकांकडून’ पोटगी मागता येते. या ‘नातेवाईक’ संज्ञेची व्याख्या ठरलेली आहे.  मूलबाळ नसणाऱ्या या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीमध्ये आणि मिळकतीमध्ये वारसा हक्क मिळवू शकतात, अशा वारसांचा या ‘नातेवाईक’ संज्ञेमध्ये समावेश होतो. या कायद्याअंतर्गत फक्त पोटच्या मुला-मुलींकडूनच नव्हे तर कायद्याच्या संज्ञेत येणाऱ्या ‘नातेवाइकांकडून’ पोटगीचा अधिकार ज्येष्ठ नागरिकांस आहे.
त्याचप्रमाणे नातेवाईक या संज्ञेत ज्येष्ठ व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख असल्याने ज्येष्ठ नागरिकाच्या संपत्तीचीही संज्ञा उद्धृत केली आहे. त्यानुसार संपत्तीमध्ये स्थावर, जंगम, वडिलोपार्जित तसेच स्वकष्टार्जित, दृश्य अथवा अदृश्य, त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीत अथवा संकल्पनेत असणाऱ्या हक्कांचा व हितसंबंधांचाही समावेश होतो. उदाहरणार्थ, एखाद्या वृद्ध व्यक्तीकडे कोणतीही स्थावर वा जंगम मालमत्ता नसेल, परंतु एखाद्या निर्मितीचे वा साहित्याचे बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights) असतील, तर ती त्या व्यक्तीची संपत्ती या कायद्यान्वये समजली जाते.
या कायद्याअंतर्गत वृद्ध व्यक्तीच्या कल्याणाचीही संज्ञा दिली आहे. त्याप्रमाणे वृद्ध व्यक्तींच्या कल्याणामध्ये वृद्ध व्यक्तींसाठीच्या अन्नाची तरतूद तसेच त्यांच्या आरोग्यविषयक सुविधांची आणि इतर सुविधा केंद्राची तरतूद आदींचा समावेश होतो.
मुळातच हा कायदा हा ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत गरजांबरोबर त्यांच्या सर्वागीण कल्याणाच्या उद्देशाने तयार केला असल्याने या कायद्यामध्ये अंतर्भूत सर्वच संज्ञांना विस्तृत रूप दिले गेले आहे.