अस्मिता पोतदार

प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

भारताचं आणि टाक्यांच्या भरतकाम कलेचं खूप जवळचं नातं आहे, इथल्या प्रत्येक राज्याची या कलेतली स्वत:ची अशी खासियत आहे. अस्मिता पोतदार यांनी या टाक्यांच्या  माध्यमातून कापडावर व्यक्ती व निसर्ग ‘भरायला’ सुरुवात के ली आणि भरतकामात ‘पेंटिंग’ची अनोखी कला सिद्ध झाली. निसर्गचित्रात सूर्याची किरणं दाखवताना वापरलेली रंगसंगती असो, दगडी शिल्प असो, की मेंदी, जरतारी साडीची किनार, गजरा, नथ, आणि भावदर्शी डोळे दाखवणारं ‘नववधू’ चं चित्र असो, आपल्याला या कलाकृती चकित करतात. आपली ही भरतकामाची परंपरा पुढच्या पिढीसाठी संस्थेच्या माध्यमातून ‘जतन’ करणाऱ्या या चित्रकर्तीविषयी.

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

आयुष्यातली एखादी आठवण, एखादी घटना, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याची दिशा ठरवते, तसंच काहीसं घडलं चित्रकर्ती अस्मिता पोतदार यांच्या बाबतीत! सातवीच्या वर्गात शिकत असताना शाळेच्या सहलीच्या निमित्तानं त्यांनी कोल्हापूरमधल्या ‘न्यू पॅलेस’ला भेट दिली होती. तिथल्या कलासंग्रहालयातला एक भरतकामाचा नमुना त्यांच्या मनाला अतिशय भावला आणि पुढे त्यामुळेच त्यांच्या आयुष्याची दिशा ठरली. त्यांची ही कला जागतिक स्तरावर नावाजली गेली आहे.

भारत देश आणि हातानं केलेलं भरतकाम यांचं खूप जवळचं नातं आहे. आपल्या प्रत्येक राज्याची या कलेत स्वत:ची अशी खासियत आहे. प्रदेश आणि वस्त्रप्रावरणाचा प्रकार यामुळे त्यात विविधता आली आहे. कपडय़ाचा पोत, त्यावरचं नक्षीकाम आणि टाके या सर्व गोष्टी एकत्र येऊन भरतकामाची सुंदर कलाकृती तयार होते. ठिपका, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन यांच्या क्रम आणि संयोजनातून ही नक्षी (डिझाइन) तयार के ली जाते. अलीकडे हाताचं काम आणि मशीनकाम अशा दोन पद्धतींनी भरतकाम के लं जातं. वेगवेगळ्या जाडींचे, विविधरंगी दोरे, विविध प्रकारचे मणी, खडे, आभला (आरसे), जरी, लेस अशा अनेक वस्तू वापरून त्यात विविधता आणली जाते.  काश्मीरचं कशिदाकाम हे साखळी टाक्याचा वापर करून केलं जातं. मूळ टाके सहा प्रकारचे आहेत.  त्या टाक्यांचा उपयोग करून शंभरहून अधिक टाक्यांची निर्मिती केली जाते.  हे मूळचे टाके आहेत- ‘धावटीप/ गोधडी टाका’(‘रनिंग स्टिच’), ‘उलटी टीप/ देठाचा टाका’(‘स्टेम स्टिच’), ‘साखळी टाका’(‘चेन स्टिच’), ‘भरीव टाका’(‘सॅटिन स्टिच’), ‘काजाचा टाका’(‘बटनहोल स्टिच’), ‘गाठीचा टाका’ (‘नॉट स्टिच’).

गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या बंजारा जमातीचे लोक आरसे, रंगीत दोरे यांनी ‘शीशा भरतकाम’ करतात. हिमाचल प्रदेशातील ‘दोरुखा’(दोन्ही बाजूंनी सारखाच दिसणारा ‘चंबा रुमाल’), पंजाबची ‘फुलकारी’, उत्तर प्रदेशची ‘मुकेश’, राजस्थानची ‘पिचवाई’, बंगालमधील ‘कांथा’ असे भरतकामाचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर लखनौची ‘चिकनकारी’ ही जहाँगीर बादशाहची पत्नी नूरजहा हिनं दिलेली देणगी असल्याचं सांगितलं जातं. प्रामुख्यानं पांढऱ्या कापडावर, पांढऱ्या धाग्यानं चिकनकारी केली जात असे. यात चाळीस वेगवेगळे टाके असून, सध्या त्यातले तीस वापरले जातात. जयपूरमधली ‘गोटा किनारी’ म्हणजे जरीच्या कापडाच्या पट्टीनं रेखलेले पक्षी आणि प्राण्यांचे आकार. कांचीपूरम साडय़ांमध्ये ताणा आणि बाणा मोजून केलेलं भरतकाम बघायला मिळतं. त्यात गोपूर, शंख, मोर, हत्ती यांचं नक्षीकाम प्रसिद्ध आहे.

भारतात सांस्कृतिक इतिहासाबरोबर ही कला बहरास आली. मोहंजोदारो, हडप्पा येथील उत्खननात ब्राँझच्या सुया सापडल्या आहेत. भरतकामाची नक्षी कापडावर छापून घेतात. एका लाकडी रिंगवर किंवा चौकटीमध्ये भरतकामाचं हे कापड ताणून बसवलं जातं. त्यामुळे कामात सफाई येते. वरून, खालून सुई कापडाला टोचून, धागा हळुवार खेचून टाके घालत काम पूर्ण केलं जातं. भरतकाम करण्यासाठी चिकाटीनं, सातत्यानं काम करावं लागतं. मध्येच खंड पडला तर शैलीत फरक पडू शकतो. बाजारात हवा तो दोरा नाही मिळाला तर कामात सुसूत्रता येत नाही. या कामात दुरुस्तीला वाव नसतो. त्यामुळे थोडय़ाशा चुकीकरिता कामाचे पूर्वीचे टाके उसवावे लागतात. असं केलं तर कापडाचा पोत आणि कलाकृतीचं  सौंदर्य बिघडतं.

पूर्वी दुपारच्या फावल्या वेळेत, गृहिणी एकत्र बसून भरतकाम, विणकाम करायच्या. शाळांमधूनही हा विषय शिकविला जात असे. अस्मिता पोतदार यांना लहानपणापासून भरतकामाची आवड होती. आपल्या आईकडून अस्मिता यांनी पानाफुलांचं भरतकाम लहानपणीच शिकू न घेतलं. कोल्हापूरच्या वस्तुसंग्रहालयात शाहू महाराजांच्या राणीसाहेब लक्ष्मीबाई यांनी केलेला भरतकामाचा एक अप्रतिम नमुना अस्मिता यांनी सातवीत असताना पाहिला होता. त्यात दोऱ्यांबरोबर मणी आणि इतर सजावटीच्या वस्तू वापरल्याचं प्रथमच पाहायला मिळाल्यामुळे त्यांचं मन हरखून गेलं आणि आपणही असं भरतकाम करायचं त्यांनी  मनावर घेतलं. शालेय शिक्षणानंतर चित्रकलेत पदविका घेतल्यावरही पेंटिंगमधला ‘व्यक्तिचित्रं’ हा विषय रंगांऐवजी दोऱ्यांमधून साकारण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. निसर्गचित्रं, प्राणी, पक्षी, शिल्पकलेचे नमुने असे किती तरी विषय अस्मिता हुबेहूब भरतकामातून निर्माण करू लागल्या.

२००१ मध्ये मुंबईत एका प्रदर्शनात मी त्यांचं ‘भारतीय शेतकरी’ हे चित्र पाहिलं. मीही चित्रकार असल्यामुळे माध्यमातला फरक नजरेनं पारखणं सहज जमतं; पण अस्मिता यांच्या शेतकऱ्याच्या चित्रानं मला संभ्रमात टाकलं. त्याची सुरकुतलेली चर्या, पांढरी दाढी, फेटा हे त्यांनी वेगवेगळ्या पोतांचा परिणाम साधत, रेशमी धाग्यांतून इतकं सुंदर साकारलं होतं, की ते पाहून ‘हे कसं शक्य आहे’ हाच विचार मनात येत होता. अस्मिता चित्रकार असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाचा उपयोग भरतकामात ‘पेंटिंग’चे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी त्यांना होतो. एका निसर्गचित्रात सूर्याची किरणं दाखवताना त्यांनी वापरलेली रंगसंगती थक्क करते. ‘नववधू’ या चित्रात पुन्हा आश्चर्याचा धक्का बसतो. तिच्या हातावरील मेंदी, जरतारी साडीची किनार, केसांत माळलेला गजरा, नाकातली मोत्याची नथ आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तिचं भावदर्शन (तिच्या नजरेत आपण माहेर सोडून जाणार याची खिन्नता असलेली जाणवते), हे सर्व त्यांनी भरतकामातून साधलं आहे. अस्मिता या मूळच्या कऱ्हाडच्या. विवाहानंतर कोल्हापुरात आल्या. कोल्हापूरच्या ‘महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल’ या ठिकाणी त्या कलाशिक्षिका म्हणून नोकरी करतात. नोकरी, संसार आणि त्याबरोबरच भरतकाम कलेतले विविध प्रयोग, प्रदर्शनं यात व्यग्र असतात.

भरतकामात त्यांनी दोऱ्याप्रमाणे ओढून शिवता येईल अशी सर्व माध्यमं पडताळून पाहिली आहेत. धातूच्या तारा, मानवी केस (काळे आणि पांढरे दोन्ही) वापरून त्यांनी चित्रं तयार केली आहेत. मानवी केसांपासून त्यांनी गडद तपकिरी पाश्र्वभूमीवर निव्वळ रेषांच्या साहाय्यानं गांधीजींचं सुंदर चित्र तयार केलंय.  मणी,  मोती, सॅटिन रिबन वापरूनही सुंदर कलाकृती साकार केल्या आहेत. बाळाच्या डोळ्यातला अश्रू ओघळलेला दाखवताना पूर्ण चेहरा न दाखवता फक्त डोळा दाखवला आहे आणि अश्रूची पारदर्शकता रेशमी धाग्यांतून हुबेहूब दाखवली आहे. दगडी शिल्पातला भरीवपणा, कठीणपणाही मऊ रेशमी धाग्यांतून साकारला आहे. त्यांच्या ‘भारतीय शेतकरी’ या चित्राला वस्त्र मंत्रालयातर्फे राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे, तर ‘नववधू’ या चित्राला ‘अँकर’तर्फे राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. शासनातर्फे त्यांना सूरजकुंड मेला, चंडीगड अशा अनेक ठिकाणी कला प्रदर्शन आणि कार्यशाळेसाठी आमंत्रित केलं आहे. सातारा, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांनी कला प्रदर्शनं भरवली आहेत. दोऱ्यांच्या टाक्याचा उपयोग करून त्रिमितीचा आभास निर्माण करण्याचं तंत्र त्यांना अवगत  झालं आहे. आपल्या चित्र प्रदर्शनात त्या नेहमीच प्रात्यक्षिक करून दाखवतात. आजच्या मुलांना हे काम मशीननं न करता हातानं केलं आहे हे पटवावं लागतं. अस्मिता यांच्या मते मन एकाग्र करण्यासाठी मुलांना ही कला शिकवली पाहिजे. परदेशातही त्यांच्या या कलेचं कौतुक झालं आहे. त्यांच्या या कलाकृती अनेक देशांत पोहोचल्या आहेत. शासनानं भारताच्या प्रतिनिधी म्हणून इटलीच्या कला प्रदर्शनासाठी त्यांना पाठवलं होतं.

भरतकाम ही पारंपरिक कला हे हातानं करण्याचं वेळखाऊ आणि चिकाटीचं काम असल्यामुळे अलीकडे हा कला प्रकार शिकण्यास लोक उत्सुक नसतात; पण अस्मिता पोतदार या ही लयाला जाणारी कला परित्यक्ता, विधवा स्त्रियांना मोफत शिकवतात. त्यांना घर चालवण्यासाठी त्यातून मदत मिळावी अशा भरतकामाच्या वस्तू त्यांच्याकडून बनवून घेऊन विक्रीस ठेवतात. आपली ही परंपरा पुढील पिढीसाठी जतन करण्यासाठी त्यांनी एक प्रकल्प हाती घेतला आहे. ‘जतन’ नावाची संस्था- अर्थात ‘स्कूल ऑफ हॅन्डिक्राफ्ट्स आणि म्युझियम’ त्या सुरू करणार आहेत. त्यांचे पती अरुणकुमार पोतदार यांचं निवृत्तिवेतन आणि अस्मिता यांचं जे  काही धन होतं ते पणाला लावून हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. त्यांच्या पतीच्या मते, सांसारिक जबाबदाऱ्या पेलताना येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची, नैराश्याला दूर ठेवण्याची ताकद  त्या दोघांना मिळाली ती या कलेमुळेच.

या ‘जतन’ प्रकल्पात आंतरराष्ट्रीय स्तरावरील भरतकामाच्या नमुन्यांचा संग्रह, भरतकामातले विविध तंत्रांचे नमुने, नवनवीन प्रयोग, त्रिमिती भरतकाम, अस्मिता यांच्या शंभरहून अधिक कलाकृती, कापडी बाहुल्यांचा संग्रह, संदर्भ ग्रंथालय,  माहितीपट दाखवण्याची व्यवस्था या आणि अशा अनेक बाबींचा समावेश असणार आहे. येथे प्रशिक्षण देण्याची योजना असून त्यांचा अभ्यासक्रमही तयार झाला आहे. हे सर्व पती-पत्नी आणि त्यांच्या दोन चित्रकार कन्या मृणालिनी आणि सायली आपापल्या परीनं करत आहेत.

ज्यांना कलादृष्टी आहे, भरतकाम शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्याकरिता अगदी सोप्या पद्धतीनं समजेल अशा भाषेत अस्मिताताईंनी दोन पुस्तकंही प्रसिद्ध केली आहेत. हे सर्व प्रयत्न भरतकामाची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या करत आहेत. ‘कलापूर’ म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरची शान त्या नक्कीच वाढवतील यात दुमत नाही.

चित्रकार जयश्री मगदूम – कोल्हापूर</p>

विशेष आभार – सिद्धेश शिरसेकर – मुंबई