हेमा होनवाड
‘चारचौघं ज्या वाटेनं जातात त्या मळलेल्या वाटेनं चालावं, ते सोपं असतं’ असं मोठे सांगतात, पण आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्या दोघी बहिणी आणि त्यांची आई यांनी वेगळा रस्ता स्वत: निवडला आणि आनंदानं आजही त्याच रस्त्यावरून त्या आपली जीवनगाणी गात मज्जेत चालत आहेत. त्या दोन अस्सल शेतकरी बहिणींना भेटून, त्यांनी शेतातून खुडलेल्या ताज्या राजगिऱ्याची भाजी आणि आदितीनं गप्पा मारता मारता थापलेल्या गरम भाकरीचा आस्वाद घेऊन झाल्यावर सहज या ओळी सुचल्या…


‘‘हाका मारतेय बहिणीला ।
चल चल लवकर पेरणीला ।।
चिखलाची मेंदी पायाला ।
वरुणराजाच्या स्वागताला ।।


आदिती आणि अपूर्वा संचेती या दोन गोड, मृदू, कणखर, धाडसी बहिणी आणि त्यांच्या तितक्याच खंबीर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहण्याचं बाळकडू मिळालेल्या आईला, कल्पनाताईंना भेटून अपार आनंद आणि प्रेरणा मिळाली.

तरुण वयात शेतात राहून राबण्याचा, साधी सरळ जीवनशैली जगण्याचा पर्याय या दोघींनी स्वीकारला. बुद्धिमत्ता, जोडीला दृढनिश्चय आणि आईवडिलांचा पाठिंबा मिळाला हे खरं, पण एका पारंपरिक राजस्थानी जैन कुटुंबात जन्म झाल्यावर, अशी वेगळी वाट मुलींनी निवडणं हे सोपं नव्हतं. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं बाळकडू त्यांना आजीकडून, म्हणजे आईच्या आईकडून मिळालं. कारण ती तर त्यांच्या समाजातील एक कर्तृत्ववान, वैचारिकदृष्ट्या काळाच्या आधी जन्मलेली स्त्री होती. आजीच्या लग्नात या समाजातील ती पहिली अशी वधू होती, जी ‘घुंगट’ न घेता लग्नाला उभी राहिली. अख्खा गाव ते बघायला लोटला होता. काही जणांनी संतापून दगडफेक केली. पण आजी घाबरली नाही. आजोबाही पुरोगामी विचारांचे होते. त्यामुळे पुढेही धर्म, जात किंवा सामाजिक, आर्थिक स्तर अशा कारणांमुळे घरात कोणत्याच प्रकारे भेदभाव कधी होत नसे. साहजिकच ते व्यापक विचार संक्रमित होऊन तो वारसा आदिती-अपूर्वापर्यंत सहज पोहोचला.

दुसरा एक प्रवाह आजीकडून आईमार्फत नातींपर्यंत पोहोचला. तो म्हणजे श्रम करण्याचा. घरातील सगळी कामं सगळे करत. आजोबासुद्धा कामावरून आले की समोर दिसतील ती छोटी-मोठी कामं सहजपणे करू लागायचे आणि त्याचा परिणाम म्हणजे अगदी जावई जरी भेटायला आले, तरी त्यांचं पाहून आपोआप तेही कामाला लागायचे. खरं तर त्यांच्या घरी त्यांना अशी सवय नसायची. हे अनुभव हृदयात जपत कल्पनाताई सासरी आल्यानंतर सासरच्या पारंपरिक वातावरणात राहून मोठ्यांचा योग्य तो आदर राखून वागत.

पण मुलींचे जन्म झाल्यावर मुलींना जे आवडतं ते करण्याचा, शिकण्याचा मोकळेपणा त्यांना मिळालाच पाहिजे या मूल्यावर त्या ठाम होत्या. घरात सुरुवातीला मतभेद, वाद झाले, म्हणून त्यांनी शांततेच्या मार्गानं बदल घडवायचं ठरवलं. वाद न घालता स्वत:ला जे योग्य वाटेल ते करत जायचं. वडिलांचा सहभाग होता म्हणजे सगळं त्यांना पटत होतं असं नाही, पण त्यांनी कधी अडवलंही नाही आणि कालांतरानं पाठिंबाच दिला.

कल्पनाताईंनी ‘एलएलबी’ केलं. तरी त्या रमल्या मुलांबरोबर काम करण्यामध्ये. समविचारी संस्था त्यांनी भरपूर धडपड करून, त्यासाठी वेळ काढून, भेटी देऊन शोधून काढल्या. तशा दोन संस्था शेवटी त्यांना पुण्यात मिळाल्या. एक ‘अक्षरनंदन’ शाळा आणि एक मुलांसाठी काम करणारी ‘बालभवन’ संस्था! त्याशिवाय जवळच्याच दांडेकर पुलाजवळच्या वस्तीतील मुलींसाठीही त्यांनी काम सुरू केलं.

आदिती मोठी. तिच्या जन्मापासून त्यांचा पालकत्वाचा प्रवास सुरू झाला. मूल दोन महिन्यांचं झालं की आईसुद्धा दोन महिन्यांची ‘आई’ होते. हे त्यांनी मनोमन स्वीकारलं. शाळा व संस्थेच्या शिबिरांमध्ये भेटलेल्या अनुभवी, तज्ज्ञ व्यक्तींचे शब्द त्यांनी एखाद्या स्पंजप्रमाणे शोषून घ्यायला सुरुवात केली.

आदिती पहिल्यापासून सहज शाळेत गेली, तिथे रमली. शिक्षकांची आवडती झाली, पण अपूर्वाला शाळेत जायचं नसायचं. उशिरा उठायची. कल्पनाताई गृहभेटीसाठी एकदा दांडेकर पुलाजवळच्या वस्तीत गेल्या असताना, तिथल्या काही मुली शाळा सुरू झाली तरी घरीच होत्या. कारण विचारल्यावर, ‘‘आत्ताच तर शाळा सुरू झालीय. पहिले काही दिवस काहीच घेत नाहीत बाई. ८-१० दिवसांनी गेलो, तरी काही बिघडत नाही.’’ असं बिनधास्त उत्तर त्यांनी दिल्यावर कल्पनाताई विचारात पडल्या. मुलींची ही पहिली पिढी शिकत होती.

आई-वडील शिकले नव्हते, तरी अडाणी नव्हते आणि मुली शिकतील यावर त्यांचा ठाम विश्वास होता. शिक्षित आई-वडिलांना मात्र एकही दिवस मुलानं शाळा बुडवलेली चालत नाही आणि ‘‘मी त्यातलीच होते,’’ कल्पनाताई म्हणाल्या. त्या अनुभवानंतर, ‘आपण तरी अपूर्वाच्या का मागे लागायचं? तिला आतून वाटेल तेव्हा ती आपोआप तयार होईल.’ असा विचार करून त्या शांतपणे वाट पाहू लागल्या. आणि एक दिवस तीच आपण होऊन म्हणाली, ‘‘आई, चल ना मला शाळेत जायचंय!’’

अतिशय चिकित्सक पद्धतीनं कल्पनाताईंनी मुलींसाठी शाळेचा शोध घेतला. अनेक शाळा काळाच्या प्रवाहानुसार बदललेल्या नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. जी शाळा निवडली ती मुलांच्या कला आणि विचारांना वाव देणारी, पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे गेल्यावरच खऱ्या शिक्षणाची सुरुवात होते. या विचारांच्या पायावर विकसित होणारी शाळा होती. त्यांनी शिक्षणावरील अनेक विचारवंतांची पुस्तकं वाचण्याचाही झपाटा लावला. प्रशिक्षण घेण्यावर भर दिला. त्यामुळे आईकडून मिळालेल्या मूल्यांमध्ये भर पडली. पालक म्हणून जाणीवपूर्वक स्वत:ची वाढ होताना शाळा व घर यामध्येही एकसूत्रता होती. स्वत:मध्ये बदल करण्याची त्यांची तयारी विलक्षण होती. पालकत्वासाठी ‘Learning to learn’ हा सगळ्यात महत्त्वाचा गुण त्यांनी आत्मसात केला.

मुलांना चारचौघांसारखं वागायचा, चौकटीत बसण्याचा आग्रह केला नाही, तुलना केली नाही, मोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी मिळत गेली तर मोठेपणी मुलांची शरीर-मन-बुद्धी निरोगी राहण्याची शक्यता खूप पटींनी वाढते. ती जीवनात येणाऱ्या चढ-उतारांना समर्थपणे, लवचीक राहून तोंड देऊ शकतात. आणि स्वत:ला आनंद मिळेल, पर्यावरणाला पूरक असेल आणि ज्यामध्ये स्पर्धा, एकमेकांवर कुरघोडी करण्याची गरज उरणारच नाही असं ‘करिअर’ निवडण्याचं स्वातंत्र्य घेऊ शकतात या कल्पनाताईंच्या मूळ विचारांना या अभ्यासामुळे पुष्टीच मिळाली.

रोज लांबच्या शाळेत जाण्या-येण्यासाठी खर्च किती करायचा याचा विचारही मुलींना विश्वासात घेऊन त्यांनी केला. अर्ध अंतर बसमधून आणि अर्ध चालत अशी शाळेत ये-जा करताना आर्थिक गणिताशीही त्यांची ओळख झाली. पुढे आदितीने सूक्ष्म जीवशास्त्राचा अभ्यास करताना उन्हाळी सुट्टीत दोन महिन्यांसाठी तमिळनाडूतील अन्नमलाईच्या राष्ट्रीय उद्यानात राहून पांढऱ्या पोटाच्या निळ्या दयाळ पक्ष्याच्या शीळेचा अभ्यास केला. तेव्हा स्मार्ट फोन नव्हते. प्रवास एकटीनं केला. अतिशय वेगळ्या वातावरणात एकटीनं राहताना त्या वातावरणाशी तिला छान जमवून घेता आलं याचं श्रेय आई आणि मुलगी, दोघींना जातं.

जेवणाला वेगळी चव, राहण्याच्या जागेत असंख्य गैरसोयी, तरीही अनुभवातून शिकण्याचा निश्चय तिनं कायम ठेवला. नंतर पदव्युत्तर शिक्षण तात्पुरतं बाजूला ठेवून, ज्या प्रकल्पासाठी तिनं मदत केली त्याचं सादरीकरण ऐकायला प्राध्यापकांसोबत जर्मनीला जाणं तिला अधिक महत्त्वाचं वाटलं. त्या वेळी ख्रिाश्चन लिपर्त यांनाही ती भेटली. ते स्वत:च्या हातांनी पर्यावरणपूरक घर बांधून वेगळं जीवन जगत; वाहन न वापरता ते सगळीकडे चालत जात. त्या भेटीमुळे आदितीला प्रेरणा मिळाली. पण फक्त प्रेरणा आणि उत्साहाची पुंजी पुरेशी नाही हेही तिला माहीत होतं. आणखी अनुभव घ्यायला हवे होते.

परत आल्यावर तिनं केरळमधील वायनाड येथे राहून ‘गुरुकुल वनस्पती’ अभयारण्यामध्ये शिक्षण घेतलं. त्याबरोबरच ती ‘आनंदवना’त हातमागावरील सतरंजी, राजेंद्र सिंह यांच्याकडे जलसंधारणाची प्रक्रिया, आणि आसाममध्ये ‘शांती साधना’ आश्रमात हातमाग शिकली. प्रयोगशील आणि सेंद्रिय शेतीसाठी प्रसिद्ध वसंत फुटाणे यांच्याकडे पूर्ण वर्षभर राहून सगळ्या ऋतूंचा अनुभव घेत ती शेती शिकली. तेव्हाच आपल्याला शेतीच करायची आहे, हा तिचा निर्णय पक्का झाला.

अपूर्वानं दहावीनंतर वेगळ्या पद्धतीनं चाललेल्या शाळा तिथे राहून अनुभवण्यासाठी कणवू आणि पदुच्चेरी (पूर्वीचं पाँडीचेरी) येथील शाळांना भेटी दिल्या. नंतर दक्षिण भारतात अनेक शाळांमध्ये एक-दोन महिने राहिली. हेमलकसा, आनंदवन, अंध मुलांची एक शाळा, बेंगळूरू येथील ‘पूर्णा सेंटर फॉर लर्निंग’, जेन साही यांची ‘सीता शाळा’ आणि शिवाजी कागणीकरांच्या बेळगावजवळच्या रात्रशाळांमध्ये राहून अनुभवातून शिकत गेली.

डॉ. श्रीनाथ कालबाग यांच्या ‘विज्ञान आश्रमा’त वर्षभर यंत्रांची देखभाल आणि दुरुस्ती कशी करतात ते शिकली. शिकण्यासाठी निर्भय मनानं अपूर्वानं भारतभर संचार केला. समाज आणि शाळा यांच्यातील परस्परसंबंध; त्यांची आवश्यकता आणि महत्त्व; मुलांच्या जगण्याचे विविध पैलू आणि ते सक्षमपणे हाताळणं, निव्वळ साक्षरतेच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थपूर्ण जगण्याकडे मुलांना घेऊन जाणं शक्य आहे हा विश्वास तिला या शाळांमध्ये मिळाला. इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांची तिला आवड होती. पुढे त्याच विषयांचा अभ्यास करण्याचा निर्णय तिनं घेतला.

या सगळ्या गोष्टी करायला आर्थिक पाठबळ प्रचंड लागतं, असा आपला एक समज असतो. माझाही तसा गैरसमज होता. पण वेगळी वाट निवडताना सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे परस्पर विश्वास आणि नवीन दृष्टिकोन समजावून घेऊन स्वीकारण्याची तयारी. त्या काळात त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या फारसं सक्षम नव्हतं. तरीही भक्कम आत्मविश्वास आणि काम करण्यासाठी तत्पर असल्यानं आपल्या सक्रिय सहभागानं त्या माणसं जोडून ठेवत. घरात टीव्ही नव्हता. त्यामुळे दूरचित्रवाणीवरच्या मालिका, चित्रपट यामध्ये त्या कधी गुंतल्या नाहीत. आत्मसात केलेली हस्तकौशल्यं त्या प्रेमानं इतरांना शिकवायच्या. स्पर्धेमध्ये बक्षिसं मिळवण्याची ईर्षा त्यांच्या मनात नव्हती. पोहण्याचा, खेळायचा भरपूर आनंद घेण्यासाठी बक्षिसांच्या मागे धावण्याची गरज नाही हे त्यांना उमजलं होतं.

आज आदिती, अपूर्वा, त्यांचे समविचारी जोडीदार, आपल्या मुलांना आणि आई-वडिलांना घेऊन पुण्याजवळच्या शेतावरच राहतात. या वेगळ्या वाटा निवडताना त्यांना ताण नसेल का आला? मग एवढ्या खंबीर त्या कशामुळे राहू शकल्या? पालकत्व हे मूल जन्माला घातल्यावर आपोआप येत नाही तेही शिकावं लागतं हे त्यांनी जाणलं होतं. पहिल्या लेखात उल्लेखलेले चारही स्तंभ त्यांच्या मनात खोलवर रुजले होते. (स्वत:चा शोध, एकमेकांबरोबर राहणं, स्वत:च्या हातांनी काम करणं आणि शिकायला शिकणं.) हे तर त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहेत.

मी निघण्यापूर्वी अपूर्वानं गायलेल्या गीताची ओळ – ‘हर मानवको है जागृत होना…’ खूप काही सांगून जाते

हेमा होनवाड (लेखिका)