मंगला बनसोडे / मालती इनामदार

दोन माजी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळवलेल्या, अस्सल रसिकांची दाद मिळवणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी तमाशाला कलेची प्रतिष्ठा मिळवून दिली, राजाश्रयही मिळवून दिला. स्टेजवर लखलखती बिजली बनून नाचणाऱ्या, घरंदाज लावणीच्या अदा करून रसिकांना दिवाणं बनवणाऱ्या विठाबाई स्टेजवरून उतरल्या की वेगळ्याच असायच्या. त्यांच्याकडे वाकडय़ा नजरंनं बघायची कुणाची टाप नसायची. जर केलीच कुणी आगळीक, डोळा मारला, जवळ येऊ बघितलं, तर त्याला वाघिणीचा अवतार दिसायचा. तमाशानं विठाबाईंना थोर केलं आणि त्यांनीही तमाशाला खूप उंचीवर नेलं. उद्याच्या ‘मदर्स डे’ निमित्ताने एका वेगळ्या आईची ही कहाणी

तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर हिच्या आम्ही मुली. आईची ओळख सांगत तमाशाच्या कनातीत लहानाच्या मोठय़ा झालो, जगलो-तगलो. आई म्हणजे बिजली होती. तिच्या घुंगरांची थरथर स्टेजवर सुरू झाली की, खाली बसलेले कुणी गावाकडचे दादा-काका-मामा असोत, की मंत्री-संत्री- चित्रपटातले हिरो, सगळे दिवाणे व्हायचे.

तमाशा कलावंत भाऊ मांग नारायणगावकर आमचे आजोबा. आजी शांताबाई. पंढरपुरात त्यांच्यापोटी आमची आई, विठाबाई नारायणगावकर जन्मली ते वर्ष होतं १९३५चं. आषाढी यात्रेच्या काळात झाली म्हणून ती विठाबाई. आजोबा थोर शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या कलेने प्रभावित झालेले. आजोबा आणि त्यांचा पुतण्या, गाजलेले बतावणीकार, सोंगाडे बापू खुडे या दोघांची जोडी गाजतच होती. सांगायचं काय, तर घरात तमाशा होताच. लावण्या, गवळणी, बतावण्या, भेदिक सगळं बघाय-ऐकाय मिळायचं तिला. आजोबांना समजलं, हिला शाळेची गोडी नाही, मग त्यांनी तिला गावोगाव तमाशा मंडळात भटकाय बरूबर घेतलं. आईनं कितव्या वर्षी बोर्डावर यावं नाचायला? सहाव्या वर्षी! त्या काळचे थोर नाटय़लेखक मामा वरेरकर आजोबांचे मित्र होते. त्यांनी आजोबांना म्हटलं, ‘विठाला माझ्या कलापथकात पाठवून द्या.’ तिथंसुद्धा तिनं नृत्य आणि गायकीचे धडे घेतले. १९५७ मध्ये आजोबा वारले. तमाशामंडळ चालवायची सगळी जबाबदारी एकटय़ा आईवर पडली. तिनंपण ती न डगमगता घेतली उरावर.. १९४० पासून तब्बल २००० पर्यंत अखंड नाचत राहिली. ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची’ म्हणत गात राहिली, गाव-वाडी-पाडय़ापासून मुंबई, थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत लोकांना कलेच्या नशेत झिंगवत राहिली.

आम्ही आठ भावंडं – तीन भाऊ आणि पाच बहिणी. मी मंगला थोरली. मग विजय, संध्या माने, भारती सोनावणे, मालती इनामदार, विद्या, कैलास अन् राजेश. आम्ही बहिणी नारायणगावाला शाळेत शिकायचो. आई कायम गावोगाव तमाशात. तिच्या जिवावर आम्ही मजा करायचो. पुण्याचे मारुती सावंत ऊर्फ अण्णा र्मचट हे आमचे वडील. त्यांनी आईसाठी आपली बायको-लेकरं सोडली. आईसोबत तिची सख्खी बहीण मनोरमामावशी नाचायची. दुसरी बहीण केशरमावशीपण ठसक्यात गायची. मनोरमामावशी तिच्या मुलीला, संगीताला अगदी लहान वयात नाचायला घेऊन गेली. आईलाही वाटलं, मंगलालाही लावू नाचायला. तेव्हा आम्ही असू साताठ वर्षांचे. आम्ही मंगला, मालती आणि बहीण संध्या अशा तिघींना पुण्याला आणून आईनं आमच्या पायात चाळ बांधले. आम्ही तालात नाचतो हे बघून तिला हुरूप आला.  पुण्यात ‘भरत नाटय़ मंदिर’ला काही दिवस आम्ही कथक शिकायलाही जायचो. दुसरी-तिसरीपर्यंत शाळा शिकलो. मग नाचायला लागलो तशी शाळा कायमचीच सुटली.

आईचा तमाशा बाराही महिने जोरात चालायचा. आम्हा सगळ्यांना पोसायची जबाबदारी तिच्यावर होती. बसायची फुरसत कुठे असणार तिला आणि आम्हाला शिकवायला तरी कुठून फुरसत मिळणार तिला? तरी वेळ असायचा तसं घुंगरू कसं बांधायचयं, एक-एक घुंगरू कसं वाजवायचं, कमानी कशा करायच्या, बठकी कशा घ्यायच्या, अदा कशा करायच्या ते तिनं शिकवलं. बाकी मग नेहमी आम्हाला ‘मागं बसा स्टेजच्या’ म्हणायची. आम्ही बहिणी बसून आईला नाचताना पाठमोरं बघायचो. ध्यान आईच्या पायाकडं आणि त्यातल्या चाळांकडं असायचं. आई नाचता-नाचता डोकं जमिनीला टेकवायची एकदम. जिवंत संवाद करायची प्रेक्षकांसोबत. पब्लिकची नजरबंदी करायची. तिला कधी तालीम लागायचीच नाही. गायची काय, नाचायची काय..  पब्लिकच्या टाळ्या-शिट्टय़ा, आरोळ्या आमच्या कानात घुमायच्या. आई स्टेजवर गेली की पब्लिक उठून उभं राहत तिला सलामी द्यायचं. फेटे, टोप्या उडवायचं. मागं बसूनही सगळा माहोल आमच्या नजरंसमोर उभं राहायचा..

आमचा भाऊ कैलासच्या वेळी ती गरोदर असताना आमचा शिखर शिंगणापूरला शो होता. तिला नववा महिना लागला होता. तिचं नाचणं गरोदरपणात खंडलंच न्हाई. त्या शोमध्ये मात्र डाव ऐन रंगात आलेला असताना आईच्या पोटात दुखायला लागलं. ती  म्हणाली, ‘पोरींनो, आता तुम्ही पब्लिक सांभाळा. आम्ही पुढे स्टेजवर नाचत होतो नि आई स्टेजच्या मागं कळा देत होती. तमाशा बघायला आलेल्या आयाबाया स्टेजमागं आल्या. आई बाळंत झाली तशी बायकांनी दगडानं नाळ ठेचली. आई तासाभरात बाळाला कपडय़ात गुंडाळून स्टेजवर आली. तिनं लोकांना विनवणी केली, ‘मायबाप, मी ओली बाळंतीन. एक बार जरा समजून घ्या!’ लोकपण समजूतदार निघालं. त्यांनी ऐकलं. ते उठून गेले. आता असं समजदार पब्लिक नसतंय. आता आमच्या तमाशाचा सहा महिने हंगाम असतो. पावसाळ्यात चार महिने बंद असतो. मग हाल असतात. आईच्या वेळेला तसं नव्हतं. सालभरात जेमतेम पंधरा दिवस आई घरी बसायची. बाकीचा सगळा काळ तिचा जलजलाट असायचा नुसता. पायातल्या घुंगरांना जरा म्हणून दम मिळायचा न्हाई.. पण पैसं मात्र तसे कमीच मिळायचे.

मोठमोठे सिनेअभिनेते तमाशा बघायला यायचे. एकदा राज कपूर आलेले. आईनं सादर केलेली गवळण राज कपूर यांना खूप आवडली. तमाशा संपल्यावर लोकांच्या गर्दीनं आईला घेरलेलं. राज कपूर तिला भेटायला उत्सुक होते. सगळ्या धकाधकीत राजजींचा तिला धक्का लागला. आई एकदम बोलली, ‘ए भाय जरा देखके चलो!’ राजजी हसायला लागले. पुढे आईनं ‘उमज पडेल तर’, ‘रानपाखरं’, ‘छोटे जवान’ अशा काही चित्रपटांतही काम केलं. सिनेमात तिला खूप डिमांड होती, पण तिथं तिचं मन रमलं नाही. फक्त तमाशाच्या कनातीतच तिचा जीव दंगला.

खूप जुन्या काळात गडी नाचायचे. बायका तमाशात नंतर आल्या. आईच्या तमाशासोबतच काळू-बाळू, शिवा-संभा, दत्ता महाडिक, तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर यांचेही तमाशे जोरात चालायचे. आमची आई सोबत यमुनाबाई वाईकर, रोशन सातारकर, कांताबाई सातारकर या सगळ्या एकाच काळात ‘बोर्डावर’ आल्या. आईचा काळ बायकांसाठी बराच नवा होता; पण आई किती धाडसी होती काय सांगावं..

स्टेजवर लखलखती बिजली होती. अस्सल घरंदाज लावणीच्या अदा करून दिवाणं बनवायची बघणाऱ्याला. एकदम नाजूक, सुंदर हरिणी जणू; पण स्टेजच्या खाली उतरली की कुणाची टाप नसायची तिच्याकडं वाकडय़ा नजरंनं बघायची. आन जर केलीच कुणी आगळीक, डोळा मारला, जवळ येऊ बघितलं, तर त्याला वाघिणीचा अवतार दिसायचा! आई रसिकांना मायबाप म्हणायची. वाईट नजर ठेवणाऱ्या पुरुषांना मात्र आईमाईच्या शिव्या द्यायची. कुठंही रात्रीबेरात्री फिरणं, राहणं, ती कशाला घाबरायची नाही. आमच्या लहानपनीचा एक किस्सा आठवतो. एका गावात आमचा रात्री तमाशा व्हायचा होता. दिवसाउजेडी गाडीतून गावात फेरफटका मारत होतो. एका पोलिसानं विनाकारण आमची गाडी अडवली. आई खाली उतरली. पोलीस रंगात येऊन आईला उगाच काहीबाही बोलू लागला. आईनं आवाज चढवला तर मग लागला हफ्ता मागायला. आई बोलली, ‘नाही देणार.’ त्यावर तो चिडून काही तरी खूप वंगाळ बोलला. आईनं खाड्कन मुस्काटात मारली. आमचे सगळे लोक घाबरले, की आता काय होणार? पण पोलीस गपगार पडला. आल्यापावली परत गेला.

मात्र आईला रसिकही खूप अस्सल मिळाले. त्यांना लावणीतल्या जागा बरोबर कळायच्या. भरभरून दाद मिळायची. आताचे लोक फक्त बाईकडं बघतात. बरोबर सोबत नाचणाऱ्या मुलींना घेऊन फिरायचं तर काळजी वाटते. आता सगळी मिळून दीडशे लोकं आहेत माझ्या तमाशामंडळात. आता अस्सल तमाशा नाही राहिला, ऑर्केस्ट्रा झालाय नुसता. आमचाबी नाइलाज असतो. आता पब्लिक अस्सल कला बघायला मागत नाही. त्यांना सिनेमातलं नाचगाणं स्टेजवर बघायला पाहिजे असतंय. फक्त आयटम साँग मागतात. आईसारखी कलावंत आता उभ्या जन्मात होणार नाही. ‘रक्तात न्हाली कुऱ्हाड’ या वगात आई वेडीची भूमिका करायची. तिच्यानंतर आम्हाला कुणालाच ती भूमिका तशी जमली नाही. तिची लोकप्रियताही तशीच होती. आईच्या तमाशाची तिकिटं ब्लॅकमध्ये विकली जायची. तिचा ‘मुंबईची केळीवाली’ वग तर मुंबई-पुण्यात तुफान चालला. तेव्हा फक्त वीस रुपये तिकीट होतं. पाच हजारांत एका शोचा सगळा खर्च व्हायचा. लोक भरभरून बिदागी द्यायचे. पण पशाची किंमत आईनं कधी केली नाही. भोळी होती खूप. कशाचा हिशेब ठेवला नाही.

भाऊ-बापूच्या तमाशाला १९६१ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. भाऊ, आमचे आजोबा तेव्हा वारले होते; पण तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी बापू आणि आईला मानानं पदक दिलं. सत्कार समारंभ संपल्यावर आईच्या लावणीचा कार्यक्रम झाला. स्वत: राष्ट्रपती आणि बाकी सगळे मोठमोठे लोक समोर बसलेले. राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांनी टोपी घातलेली. आई लावणीच्या अदा करता-करता ‘कसं काय टोपीवालं पावनं’ असं माननीय राजेंद्रप्रसाद यांच्याकडेच थेट बघूनच बोलली यावर त्यांनीही दिलखुलास हसत दाद दिली. ‘आंबटशौकिनांची कला, अश्लील वाईट नाद’ असं काही लोकांनी बदनाम केलेल्या आमच्या तमाशाला मोठी इज्जत मिळाली. आई तमाशासम्राज्ञी बनली! नंतर १९८९ मध्ये आईला तेव्हाचे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हातून ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार मिळाला. तमाशानं आईला थोर केलं, आईनंही तमाशाला खूप उंच पोचवलं.

खूप अवघड काळ आईनं धीरानं निभावून नेला. किती आठवणी सांगाव्यात. आम्ही लहानपणी आईच्या साडय़ांच्या घडय़ा घालायचो. ती पाच रुपये द्यायची. खूप आनंद व्हायचा. आईच्या बाळंतपणातही आम्ही दोघी मदत करायचो. राजेशच्या, आमच्या भावाच्या वेळेला आई गरोदर होती. तेव्हा तिच्याकडं आजिबात पैसे नव्हते. सगळ्यांनी तिला सरकारी दवाखान्यात दाखल केलं. सोबतचे सगळेच दरिद्री. आई बाळंत झाली. कुणाकडंच बाळंतिणीला चहा पाजायलाबी पैसे निघनात. एक स्वरूपाबाई नावाची बाई संगीत पार्टीत मालकीण होती. आम्ही तिला विनवून पैसे घेतले. एक हजार रुपये. ती बोलली, ‘हे घ्या पैसे, पण बदल्यात संध्याकाळी फडात नाचायला यावं लागंल.’ मी संध्याकाळी नाचायला गेले तिच्या पार्टीत, अशी वेळ निभावून नेली आम्हीपण.

‘आपलं घुंगरू हाच आपला नवरा. लग्न करतानाही हे लक्षात ठेवा’ आई सांगत असायची. त्या काळात पंधरा-वीस लोकांत टीम व्हायची. जामानिमा खूप लागायचा नाही. पेटी, तुणतुणं आणि तबला. इतर सगळे तमाशे ढोलकी-हलगी-पेटीवर चालायचे. आईनं मात्र तमाशात तबला आणला. आम्ही सगळ्या जणी हलगीवरच नाचायचो. आई मात्र तबल्याची चाहती होती. शास्त्रीय बाजात गायची-नाचायची. आईचा चुलतभाऊ सावळा खुडे तबला वाजवायचा आणि सावरगावचे केरबा आल्हाट हलगीवर असायचे. त्यांची जुगलबंदी काय रंगायची म्हणून सांगू! मुंबईच्या तमाशा थेटरात काही काळ राहिल्यानं तिला वाद्यांची समज खूप चांगली होती. पूर्वी वीज नव्हती, उजेडासाठी तेलाचे टेंभें जळत असायचे. आता वाद्यं, लाईट, रोशनाई केवढं काय-काय असतंय, तरी तिच्यासारखा रंग चढत नाही.. बलगाडीत गावोगाव फिरायचो. गाडीतच झोपायचो. आईने बडय़ा बडय़ा लोकांसमोर कला सादर केली तशी पारावर, ओसरीवर, मातीच्या स्टेजवरपण नाचली. समोर कुणी-कितीही लोक असो, कलेशी बेइमानी केली नाही. अदाकारीत तेवढेच रंग भरले.

आई आम्हाला नेहमी म्हणायची, ‘पोरींनो, तुम्ही माझा हुनर शिका. माझं नाव पुढं चालवा. अमर करा.’  आम्ही सगळ्या भावंडांनी १९८७ नंतर आपापले तमाशे उभे केले. आजही ते जोमात चाललेत. आई नेहमी आम्हाला सांगून-सावरून धंद्यातले हुनर शिकवायची. ‘एक दिलानं वागा’ म्हणायची.  सगळ्या लेकरांवर, तमाशातल्या साथीदारांवर तिचा खूप जीव होता. सगळ्यांना पंखाखाली घ्यायची. कित्येकांना तिनं पशांची मदत केली, खूप जणांच्या पाठीशी उभं राहिली. आता कैलासनं तर आईच्या नावानंच फड काढला. राजेश गायक आहेत. मोहित, रोहित, अनिल, नितीन, सुरेश आणि रोहन, लक्ष्मी, दादासाहेब ही नातवंडं तमाशा फडात सक्रिय आहेत. जावई विजय वाव्हळ, मुसा इनामदार आणि रामचंद्र बनसोडे हेसुद्धा तिचा वारसा चालवतात. आमच्या आईसारखं नाव कुणाला मिळालं नाही. आई म्हणायची, ‘तुम्ही कुणाच्या तमाशात नाचू नका. स्वत: तमाशाची मालकीण व्हा. आपल्या हातात चाव्या ठिवा. तुमच्या तमाशाला गर्दी होईल. आम्हाला दोघींना ‘माली’, ‘मंगल’ म्हणून हाक मारायची. आईच्या नावावर आम्ही आज जगतो. ‘पाहूनं करू नका तुम्ही असा घोटाळा, मारू नका तुम्ही डावा डोळा’ ही तिची लावणी आम्ही करतो तेव्हा लोक वेडे होतात. आम्हा दोघींच्या तमाशालाही आता २५ वर्ष झाली.

आज तमाशाला इज्जत, लोकाश्रय मिळालाय त्याचं मोठं श्रेय आमच्या आईला जातंय. तेव्हाचे मुख्यमंत्री अ. रा. अंतुले यांना आई हिमतीनं सामोरी गेली. त्यांना ती म्हणाली, ‘‘राजानं आश्रय दिला तरच तमाशाची कला टिकल साहेब, तुम्ही काही तरी केलं पाहिजे.’ त्यावर अंतुलेसाहेबांनी सगळ्या तमाशा फडांसाठी डिझेल सवलतीत देण्याचा निर्णय घेतला, तो राबवला. आईच्या फडालाही आर्थिक मदत केली. आता हयात नसलेले विलासराव देशमुख, आर. आर. पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शरद पवार, रामदास आठवले असे अनेक राजकारणीही विठाबाईंच्या कलेचे चाहते होते. त्यांनी वेळोवेळी आईच्या फडाला, इतर तमाशा कलावंतांना आर्थिक मदत केली.

शेवटच्या काळात आई आमच्याकडं नारायणगावाला होती. तिच्या खुशीनं जोगवा मागायलाही जायची; पण अनेकांनी ‘ती भीक मागायला जाते’ असा गैरसमज करून घेतला. ‘पोरं हिला बघत नाहीत, वाऱ्यावर सोडतात’ अशा कायकाय अफवा पसरवल्या. त्याचं आजही खूप वाईट वाटतं. आईच्या हृदयाला छिद्र पडलं होतं. सदुसष्टाव्या वर्षी आई गेली. आम्ही आमच्या विठाबाईची छाया बनलो. आम्हाला विठाबाई नाही बनता येणार. आई जाऊन आता सतरा साल झाले, पण अजून नाचता-नाचता बाजूला उभं राहून आई अदा करतेय की काय असं वाटून जातंय.. मग पायात बळ भरतंय, घुंगरू वाजत राहतेत..

एकदा ‘मुंबईची केळेवाली’ वगनाटय़ाचा शिवाजी मंदिरला प्रयोग होता. आमचा सोंगाडय़ा वामन लोहगावकर अचानक न सांगता गावी गेला. तासाभरात स्टेजवर जायचं होतं. सगळे बावचळले. तो सोंगाडय़ा म्हणजे पेंद्या नावाच्या घरगडय़ाचं पात्र होतं. त्याचे आईसोबत बरेच संवाद होते. आई डगमगली नाही. ती भावाला, कैलासला, म्हणाली, ‘‘तू उभा रहाय सोंगाडय़ा म्हणून.’’ तो गडबडला. म्हणाला, ‘‘मला कसं जमल?’’ तो तेव्हा नवा नवाच स्टेजवर काम करायला लागला होता. आई बोलली, ‘‘उभा राहा समोर, मी शिकवते.’’ खरंच आईनं शिकवलं. दादानं सोंगाडय़ा केला. वग खूप रंगला. गंमत म्हणजे, सदाशिव अमरापूरकर, रिमा प्रेक्षकांत बसले होते. हे आम्हाला तेव्हा कळलं जेव्हा ते दोघं वग संपल्यावर मागे मेकअपरूममध्ये आले. त्या दोघांचीही आईशी जुनी मत्री होती. अमरापूरकरांनी आईला विचारलं, ‘‘तो सोंगाडय़ा करणारा पोरगा कोण आहे? एकदम धमाल आणतो. त्याला माझ्यासोबत द्या. नाटक, सिनेमाच्या लायनीत पुढं जाईल.’’ आई म्हणाली, ‘‘पोटचा पोरगा आहे तो माझा. त्याला तुमच्यासोबत दिलं तर माझ्या तमाशातला एक माणूस हातचा जाणार की!’’ अमरापूरकरांनी हसून मान डोलवली. जाताना दादाला आशीर्वाद दिला, ‘‘खूप पुढं जाशील तू!’’

आमची आई सगळ्या आया असतात तशीच प्रेमळ होती. पण तालमींमध्ये किंवा शोच्या वेळी हसणंखिदळणं, टाइमपास तिला अजिबात खपायचा नाही. नाच असेल किंवा संवाद, ‘काटेकोरपणे कसून सराव केला पाहिजे, स्टेजवर टायिमग चुकलं नाही पाहिजे’ असं ती सतत म्हणायची. स्वत:बाबतही तितकीच कडक असायची. आमचे आजोबा भाऊ नारायणगावकर, आई विठाबाई आणि मी मुलगी, मंगला अशा आमच्या तीन पिढय़ांना सलग राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आई आता हयात नसतानाही आमच्यामागं दैवत बनून उभी आहे, म्हणून हे शक्य झालं.

शब्दांकन – शर्मिष्ठा भोसले

mohitnarayangaokar@gmail.com

chaturang@expressindia.com