|| डॉ. किशोर अतनूरकर
ऑपरेशन थिएटरमधून, बाळ जन्माला आल्याबरोबर त्याच्या रडण्याचा आवाज बाहेर उत्सुकतेपोटी उभे असलेल्या नातेवाईकांच्या कानापर्यंत जातो, अमुक इतके वाजून इतक्या मिनिटाला, मुलगा किंवा मुलगी झाली. ही खबर इतर नातेवाईकांना देण्यासाठी क्षणार्धात फोनाफोनी सुरू होते. संवादात पहिला प्रश्न-काय झालं? मुलगा किंवा मुलगी, लगेचचा दुसरा प्रश्न-नॉर्मल का सिझेरियन? उत्तर सिझेरियन. सिझेरियनच ना? कोणत्या हॉस्पिटलमध्ये? आजकाल सिझेरियनचं प्रमाण खूपच वाढलंय, कुणाच्याही बाबतीत विचारा, सिझेरियनच झालं असं ऐकायला येतं. मात्र, सिझेरियनचं प्रमाण वाढलंय, हे खरं आहे. किती प्रमाणात सिझेरियन झाले म्हणजे योग्य आणि किती प्रमाणात झाले म्हणजे वाढले, याबद्दल सद्यपरिस्थिती काय आहे याची चर्चा झाली पाहिजे.
सिझेरियनच्या बाबतीत लोकांचा डॉक्टरवर किती अविश्वास आहे याचं मोजमाप करणं तसं अवघड. समाजातल्या लोकांनी सिझेरियनच्या बाबतीत शंका घेणं एक वेळेस मी समजू शकतो, पण एक लेडी गायनॉकॉलॉजिस्टचा नवरा जो स्वत: एक पदव्युत्तर डॉक्टर आहे, त्याने स्वत:च्या बायकोबद्दल- ती अनावश्यक सिझेरियन तर करत नाही ना? जरा तुझं लक्ष असू दे असं म्हटल्यानंतर तर मी उडालोच. एक पदव्युत्तर डॉक्टर, ज्याने एम.बी.बी.एस.चं शिक्षण घेताना सिझेरियन का आणि केव्हा केलं जातं याचा अभ्यास केलेला, डॉक्टरच स्वत:च्या बायकोच्या सिझेरियन करण्याच्या हेतूबद्दल शंका घेऊ शकतो तर सामान्य लोकांचं काय?
बाळंतपणाची अपेक्षित तारीख जवळ येत असतानाच्या कालावधीत रुग्ण आणि नातेवाईकांच्या मनात, नॉर्मल होईल का सिझेरियन करावं लागेल या बाबतीत असणारी अनिश्चितता आणि त्या अनुषंगाने चर्चा मी समजू शकतो, पण अगदी तिसऱ्या-चौथ्या महिन्यातच नातेवाईकांनी म्हणावं- आम्ही ९ महिने तुमच्याकडेच तपासणीसाठी येऊ, फक्त आमची तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, आमच्या रुग्णाची तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी करा, सिझेरियनची वेळ आणू नका. तिसऱ्याच महिन्यात, जगातला कोणताच डॉक्टर हे भाकीत करू शकत नाही, हे जरी खरं असलं तरी लोक असं बोलतात हेदेखील खोटं नाही.
सिझेरियन सेक्शन या ऑपरेशनचे प्रमाण खूपच वाढलेलं आहे यात शंका नाही. पण हे प्रमाण फक्त आपण ज्या शहरात राहतो तिथेच वाढलेलं आहे असं नाही. केवळ आपल्या शहरात, महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे तर सिझेरियनचे वाढते प्रमाण ही गेल्या काही दशकांपासून एक जागतिक समस्या बनली आहे. सिझेरियन सेक्शनचं प्रमाण गेल्या सुमारे ५० वर्षांपासून वाढत आहे. गेल्या दोन दशकांत ते प्रमाण खूप वाढलं. दोन्ही सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रुग्णालयातून सिझेरियन सेक्शनच्या प्रमाणाची वाढलेली टक्केवारी दिसून येते. अर्थात शासकीय रुग्णालयाच्या तुलनेत खासगी रुग्णालयात ते प्रमाण अधिक आहे. खासगी रुग्णालयात ते जास्त का आहे, याची कारणं आणि त्याचा उहापोह आपल्याला करावयाचा आहे. प्रमाणाबाहेर वाढत असलेल्या सिझेरियन सेक्शनच्या या समस्येची दखल, जागतिक आरोग्य संघटनेने १९८५ मध्ये घेतली आणि घोषित केलं की एकूण बाळंतपणाच्या केसेसपैकी, फक्त १० ते १५ टक्के सिझेरियन एवढंच सिझेरियनचं प्रमाण योग्य आहे. यापेक्षा जास्त प्रमाण असल्यास त्याचा मातेच्या किंवा बाळाच्या सुरक्षिततेवर फारसा सकारात्मक प्रभाव पडत नाहीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ते प्रमाण सरकारी रुग्णालयात १३.१ आणि खासगीत ३३.१ टक्के आहे. महाराष्ट्रात तरी परिस्थिती बरी आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात शासकीय रुग्णालयात ४०.६ आणि खासगीत ७४.९ टक्के एवढे आहे. भारतातल्या इतर राज्यांच्या आकडीवारीनुसार, (खासगी रुग्णालय, केरळ-४१ टक्के, तामिळनाडू ५८ टक्के) काही राज्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषापेक्षा खूप जास्त प्रमाण दिसून येतं. अमेरिकेत हे प्रमाण ३२.७ (१४ एप्रिल २०१५) टक्के एवढं तर ब्राझीलसारख्या देशात ते जवळपास ८० टक्क्यांपर्यंत आहे. अमेरिकेत तर आपल्यापेक्षा नॉर्मल डिलिव्हरी होण्याच्या दृष्टिकोनातून जास्त सक्षम यंत्रणा आहे. अमेरिकेतदेखील सिझेरियनचं प्रमाण जास्त आहे म्हणून आपल्याकडे जास्त असल्यास बिघडलं कुठं असं समर्थन मला अजिबात करावयाचं नाही. आकडेवारी अजून बारकाईने पाहिली तर जगात सिझेरियन नावाच्या साथीच्या रोगाची लागण (!) झाली की काय अशी शंका येऊ शकते. सिझेरियनच्या बाबतीतील वस्तुस्थिती काय आहे याचा अंदाज वाचकांना यावा म्हणून, थोडीशी आकडेवारी नमूद केली. यावरून असं लक्षात येतं की, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निकषापेक्षा अधिक प्रमाणात आपल्याकडेच नाही तर जगात इतरत्र बहुतेक ठिकाणी सिझेरियनचं प्रमाण, भरपूर वाढलं आहे.
जगात सर्वत्र सिझेरियनचं प्रमाण वाढत जातंय, याची काय कारणं आहेत आणि ते प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याचा अभ्यास अर्थातच मागच्या दोन दशकांपासून चालू आहे. स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञांच्या जवळपास प्रत्येक परिषदेत याबद्दल चर्चा होते, शोधनिबंध सादर केले जातात. असं असूनही सिझेरियनचं प्रमाण म्हणावं त्या प्रमाणात कमी होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने १९८५ मध्ये सिझेरियनच्या प्रमाणाबाबत जे निकष जाहीर केले त्याला आता ३३ र्वष झाली. त्या काळात, बाळ मातेच्या उदरात सुरक्षित आहे किंवा नाही याचं ज्ञान बिनचूक पद्धतीने होत नसे. सोनोग्राफी, डॉप्लर, सीटीजीसारख्या तंत्रज्ञानाचा आविष्कार झालेला नव्हता. यामुळे, जागतिक आरोग्य संघटनेने १९८५ मध्ये जाहीर केलेल्या, निकषाबाबत पुनर्विचार करावा असा सूर तज्ज्ञांनी लावला. या पाश्र्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करून जाहीर केलं की, १९८५ मध्ये जाहीर केलेल्या निकष हे योग्यच आहेत. साधारणत: १५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात सिझेरियन करून मातेच्या अथवा बाळाच्या सुरक्षिततेच्या प्रमाणात अधिक काही फायदा होईल असं नाही. असं असलं तरी ज्या रुग्णाला वैद्यकीय कारणास्तव सिझेरियनची गरज आहे, तिला सिझेरियन करून घेण्याची सोय ही झालीच पाहिजे; अशाप्रसंगी प्रमाण आणि टक्केवारी विचारात घेण्याची गरज नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या या निष्कर्षांत, त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या मर्यादांचा देखील उल्लेख केला आहे. बाळंतपणाची पद्धत, नॉर्मल का सिझेरियन याचा मानसिक आणि सामाजिक अंगाने अभ्यास भविष्यात करणे गरजेचं आहे असं देखील, त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद केलं आहे. जगात अनेक ठिकाणी विविध प्रयत्न करूनदेखील सिझेरियन सेक्शनचे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, ते कमी करणं हे एक आव्हानात्मक आणि कठीण काम आहे असं या अहवालाच्या सुरुवातीलाच जागतिक आरोग्य संघटनेने हे मान्य केलेलं आहे.
आपल्या घरात कुणाचं सिझेरियन झाल्यानंतर, सामान्य माणूस जागतिक स्तरावर सिझेरियन सेक्शनच्या संदर्भात काय परिस्थिती आहे याचा विचार करून डॉक्टरांबद्दल बोलत नसतो, तसं त्याच्याकडून अपेक्षितदेखील नाही. सिझेरियन करणाऱ्या तमाम डॉक्टरांनी, प्रत्येक सिझेरियन करताना, ते आई आणि बाळ सुरक्षित ठेवून टाळता येण्यासारखं आहे का याचा पुनर्विचार करून, सिझेरियनचं प्रमाण कमी करण्याच्या जागतिक चळवळीला आपण हातभार लावू शकतो याचं भान बाळगून निर्णय घ्यावा असं वाटतं. विविध प्रकारच्या माध्यमाद्वारे चर्चा करणारे समाजातील लोकांनी आणि पत्रकारांनी या परिस्थितीची जाणीव ठेवून प्रतिक्रिया द्यावी ही अपेक्षा. डॉक्टरांनी सिझेरियनच्या बाबतीत मनमानी करावी, असा याचा मर्यादित अर्थ काढू नये.
सिझेरियन सेक्शनचं प्रमाण कमी करणं याचा दुसरा अर्थ नॉर्मल डिलिव्हरची संख्या वाढवणे हा होय. नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढविण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेली शासकीय आणि खासगी क्षेत्रातील यंत्रणा कशी बळकट करता येईल या दृष्टिकोनातून देखील विचार झाला पाहिजे.
atnurkarkishore@gmail.com
chaturang@expressindia.com