तंत्रज्ञानातील प्रगतीने मनोरंजन प्रत्येकाच्या तळहातावर आणून ठेवलं आहे. आज स्मार्टफोनवरून नवेजुने चित्रपट पाहणं, यूटय़ूबवरील नवीन व्हिडीओ पाहणं, स्वत:च्या मोबाइलमधीलच नव्हे, तर ऑनलाइन गाणी ऐकणं या सगळय़ा गोष्टींचा आनंद आपल्याला सहज घेता येतो. त्यामुळे एके काळी टीव्हीबद्दल जी ओढ आणि आकर्षण असायचं, ते आता स्मार्टफोनबद्दल वाटतं.
काही दशकांपूर्वी भारतात टीव्हीचंही आगमन झालं नव्हतं, तेव्हा अवघ्या भारताचं मनोरंजनाचं एकमेव माध्यम होतं ते म्हणजे रेडिओ. आज अडगळीत जाऊन पडलेला रेडिओही त्या काळी मोठी पदरमोड करून मिळवावा लागत असे. कारण केवळ बॅण्ड बदलताच वेगवेगळी गाणी, नाटय़श्रुतिका, बातम्या, हवामान, कृषी अंदाज, मार्गदर्शनपर कार्यक्रम हे सारं रेडिओवर ऐकता येत होतं. ‘ऑल इंडिया रेडिओ’ अर्थात ‘एआयआर’च्या रेडिओ सेवेने भारतीयांवर गारूड केलं होतं. गेल्या काही वर्षांत रेडिओचा चेहरामोहराच बदलला. टीव्ही व ‘एफएम’ वाहिन्यांचं प्रस्थ वाढू लागलं आणि त्यांच्या गलबल्यात ‘आकाशवाणी’चा आवाज दबला गेला. असं असलं तरी जुन्याजाणत्या मंडळींना आजही आकाशवाणीचं कौतुक आहे. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या सेवा सुरू आहेत, विस्तारतही आहेत. मात्र, कधी चार भिंतींमध्ये सिग्नल येत नसल्यामुळे, तर कधी ‘चॅनेल्स’ ऐकायला मिळत नसल्यामुळे श्रोते आकाशवाणीला मुकत आहेत. अशा श्रोत्यांसाठी स्मार्टफोनवर ‘ऑल इंडिया रेडिओ लाइव्ह’ (All India Radio Live) हा उत्तम पर्याय आहे. ऑल इंडिया रेडिओनेच विकसित केलेलं हे अधिकृत अॅप म्हणजे सिग्नलच्या कोणत्याही अडचणीविना रेडिओ ऐकण्याचा आनंद आहे. ‘ऑल इंडिया रेडिओ’तर्फे सुरू असलेल्या सर्व वाहिन्या या अॅपवरून ऐकता येतात. विविध भारती, एफएम गोल्ड, रेन्बो यांसह मराठी, उर्दू, गुजराती अशा विविध भाषांतील वाहिन्या या अॅपवर उपलब्ध आहेत. त्यासाठी हेडफोनच्या ‘अॅन्टेना’ची गरजही लागत नाही. इंटरनेटच्या माध्यमातून या वाहिन्या कार्यरत आहेत. अँड्रॉइडवर उपलब्ध असलेलं हे अॅप शेकडो लोकांनी डाऊनलोड केलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2016 रोजी प्रकाशित
रेडिओची गोष्ट
एके काळी टीव्हीबद्दल जी ओढ आणि आकर्षण असायचं, ते आता स्मार्टफोनबद्दल वाटतं.
Written by आसिफ बागवान

First published on: 20-02-2016 at 01:14 IST
मराठीतील सर्व अॅपचं विश्व बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about mobile and smartphone applications