scorecardresearch

आनंद शब्दातीत

हे सदर सर्वासाठी होतं तरी तरुण मुलं आपल्याशी कशाला मैत्री करतील असं पूर्वी वाटायचं

हे सदर सर्वासाठी होतं तरी तरुण मुलं आपल्याशी कशाला मैत्री करतील असं पूर्वी वाटायचं, पण त्यांच्या ‘फेसबुक’वर फ्रेंड रिक्वेस्ट आल्या. बोलणं झालं. ‘‘माझी आई माझी बेस्ट फ्रेंड आहे.’’ हे लेकीकडून ऐकून आणि या वयातील त्यांची गुपितं शेअर झाल्यानं होणारा आनंद शब्दातीत आहे.

आजचा ‘आपुलाची संवाद आपुल्याशी’ या सदरातील हा शेवटचा लेख. निरोप घ्यायची वेळ झाली आहे. वर्षभर केतकी, मकरंद, अस्मिता, आदित्य यांच्या स्वगतातून आपण भेटत राहिलो. आपल्या बाबतीत घडणाऱ्या किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी लेखात घेण्याचा मी प्रयत्न केला. पहिले काही लेख वाचून, लेख कळत नाही आहेत अशी प्रतिक्रिया काही जणांनी दिली तर त्याच्या विरुद्ध लेख कळायला सोपे आहेत, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. त्या नंतर मात्र मी लेख सोप्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करू लागले. लेखात घडणाऱ्या घटनांपेक्षा प्रत्यक्षात घडणाऱ्या घटना जास्त कंगोरे असणाऱ्या असू शकतात. प्रत्येक वेळेला स्वगतातून इतक्या सोप्या पद्धतीनं, पटकन मार्ग निघेलच असं नाही. विषयाचा आवाका मोठा आहे. तितकाच महत्त्वाचाही आहे. तो समजवून घेऊन, प्रयत्नपूर्वक आपण त्या दिशेने वाटचाल नक्कीच करू शकतो.

यातील काही महत्त्वाचे मुद्दे, कौशल्यं थोडक्यात तुमच्यासाठी पुन्हा एकदा –

* आपल्या विचारातून, स्वगतातून भावना निर्माण होतात.

* कोणतीही भावना चांगली किंवा वाईट नसून उपयोगी भावना किंवा त्रासदायक भावना असतात.

* स्वगतातूनच आपली मते, दृष्टिकोन तयार होतात आणि त्याप्रमाणे आपण वागतो. मग हळूहळू प्रसंगानुसार आपण वागतो आणि ती आपली सवय होते, एक पॅटर्न तयार होतो. त्यातूनच एक ‘कंफर्ट झोन’ तयार होतो. त्याच्या बाहेर यायची आपली तयारी नसते किंवा चौकटीबाहेर काही करावं लागलं  तर त्याचा त्रास होतो. ती चौकट प्रयत्नपूर्वक मोडावी लागते.

* म्हणजेच जे घडतं, जी परिस्थिती आहे त्यावर आपलं वागणं अवलंबून नसून ते आपल्या स्वगतावर अवलंबून असतं.

* आपल्याकडे त्यासाठी पर्याय असतात, काही पर्याय फायदे देणारे असतात तर काही वेळा फायद्याबरोबर त्याची किंमतही द्यावी लागते.

* अर्थात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, अचानक घडतात किंवा अटळ असतात तेव्हा त्या योग्य पद्धतीनं  हाताळणं महत्त्वाचं.

* भावना आणि विवेक यांचा मेळ घालून वागलं तर कोणत्याही गोष्टीचा चांगला परिणाम मिळू शकतो. आपली उद्दिष्टं साध्य करू शकतो.

हे लिहिणं सोपं आहे. पण अंगीकारायला जागरूकतेने प्रयत्न करावे लागतात. लिहायला शिकताना जसं मूल आधी उभ्या, आडव्या, तिरक्या रेषा, अर्धवर्तुळ काढायला शिकतं, मग एक एक अक्षर, नंतर एक एक शब्द मग वाक्य शिकतं. हळूहळू संपूर्णपणे आपसूकपणे त्याला लिहायला येतं. तसंच हळूहळू सरावाने ही कौशल्यं शिकता येतात. प्रत्यक्ष जीवनात आपल्याच फायद्यासाठी वापरता येतात.

सदरासाठी लिहताना खूप वाचन झालं. माझा प्रत्येक लेख संपादकांकडे पाठवायच्या आधीचा वाचक माझा नवरा असायचा. त्यामुळे अशा वेगळ्या विषयांवरही आमच्या चर्चा होऊ  लागल्या. त्यातून माझा माझ्याशी असलेला संवाद खऱ्या अर्थानं कळायला सुरवात झाली आहे. आपल्याच संवादाचे वेगवेगळे कंगोरे समजू लागले आहेत. अर्थात अजून बराच पल्ला गाठायचा आहे. हा प्रवास असाच चालू राहणार.. एक मात्र नक्की आपण आपल्याशी जर चांगल्या प्रकारे संवाद साधू शकलो तर बाकीच्यांशीपण चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो. परिणामी, आम्ही दोघं आणि आमची दोन मुलं यांत अधिक चांगल्या पद्धतीनं संवाद होऊ  लागला. अर्थात विसंवाद नसतात असं मात्र नाही, पण त्यातून पटकन बाहेर पडायला नक्कीच

सुरुवात झाली आहे. हा या लेखमालेमुळे आम्हाला झालेला फायदा.

पहिला लेख प्रसिद्ध झाला तो दिवस आठवतो. संपूर्ण दिवस फोन येत राहिले. नंतरही नातेवाईक, मित्र मैत्रिणी, अगदी मला न ओळखणाऱ्या पण माझ्या नातेवाईकांच्या, ओळखीच्या लोकांचे नातेवाईक, मित्र, मैत्रिणींचे फोन, मेसेजेस येत राहिले. काही जण लेखांच्या विषयी भरभरून बोलत. त्यांच्याकडून वेगवेगळे सल्लेपण येत असत. माझे वॉट्सअ‍ॅपवर कामानिमित्त वेगवेगळे ग्रुप्स आहेत. प्रत्यक्षात आम्ही एकमेकांना ओळखतोच असं नाही, पण ‘चतुरंग’मध्ये लिहिणाऱ्या माधवी गोखले तुम्हीच का अशी बऱ्याच जणांनी विचारणा केली. त्या सर्वाच्या बोलण्यातून जाणवणारी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा बघून मन सुखावलं. लिहण्याची उमेद वाढली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इमेल्स आल्या. यात वेगवेगळे पदाधिकारी, वार्ताहार, निर्माते, शिक्षक, डॉक्टर्स आदी होते. इमेल्स तरुणांच्या, मध्यमवयीन लोकांच्या, वृद्धांच्या आल्या तशाच

९ वी, १० वीतल्या मुलांच्याही आल्या. त्यात एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे या मुलांनी लेख व्यवस्थित वाचले होते आणि सकाळी सकाळी इमेल्स पाठवले होते. त्यांचं खूप कौतुक वाटलं. ‘सत्याचा सामना’, ‘भावनांचा अर्थ’सारखे लेख हृदयाला भिडले, वाचून डोळ्यात पाणी आलं, असं सांगणारे इमेल्स होते. खूप जणांनी फोनवर काय बोलायचं, प्रत्यक्षात तुझ्याशी या विषयावर बोलू, असं सांगितलं. काहींच्या बरोबर बोलणं झालंही.

‘आत्ताचा क्षण’ हा लेख बऱ्याच जणांनी आवडल्याचं सांगितलं. ज्याने त्याने आपापल्या दृष्टिकोनातून तो लेख वाचला. यात गंमत अशी होती की, प्रत्येकाला त्या लेखातील वेगवेगळी वाक्यं आवडली होती. तीन-चार जणांबरोबर लेखातील भाषा वापरून ‘मेसेजिंग’ झालं. हा अनुभव नक्कीच ‘वाढीव’ आणि ‘लई भारी’ होता. (भावनांच्या शब्दकोशात या शब्दांची भर! नवीन जनरेशन यात भर घालत राहीलच) तसाच ‘रागावर ताबा’ हा लेख पण बऱ्याच जणांना आवडला.

कोणी भिशीत लेख वाचला. कोणी आपल्या मुलांना लेख वाचायला दिला. ‘नावडत्याचा स्वीकार’ या लेखामुळे मुलांनी आवडत नसलेल्या विषयाचा वेगळ्या पद्धतीनं कसा अभ्यास करता येईल याचा विचार केलेला बघून खूप आनंद झाला.

सगळ्यात जास्त प्रतिक्रिया मिळाल्या त्या ‘ध्रुव बाळाच्या गोष्टीचा मथितार्थ’ या लेखाला. लेख प्रसिद्ध झाल्या नंतरही बरेच दिवस प्रतिक्रिया येत राहिल्या. त्यातला एक छान अनुभव म्हणजे, एका आजोबांनी त्यांच्या ३ री, ४ थीत ध्रुव बाळाची कविता असल्याचं सांगितलं. ती त्यांना हवी होती. माझ्या आईला फक्त पहिलं कडवं येत होतं. ते मी त्यांना पाठवलं. पण नंतर काही दिवसांनी त्यांनी ती कविता शोधून मला पाठवली.

ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या बहुतेक लेख आवडला, मीही असे अनुभवले, दिशा मिळाली, मोटिव्हेशन मिळाले अशा स्वरूपातल्या होत्या. न आवडल्याच्याही तुरळक प्रतिक्रिया होत्या. कधी ग्रुप वर किंवा फेसबुकवर लेख टाकलाच तर मराठी न येणाऱ्या लोकांचे लाइकचे अंगठे वर बघून खूप गंमत वाटायची.

माझे काही लेख एका बैठकीत कधी लिहून झाले हे कळलं पण नाही. ‘दिवस तुझे हे फुलायचे’ आणि ‘मुलं नाहीत फुलं’ हे दोन लेख एकाच वेळी लिहले, पण शब्दसंख्या जास्त झाल्यानं त्याचे आपोआप दोन लेख झाले. हे लेख खूप समाधान देऊन गेले. माझ्या मुलीने तिच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना या लेखांचे आशय सांगितले. ते त्यांना खूप आवडले. ‘हमारे पेरेंट्स तो ऐसा सोचतेही नही हैं, तुम कितनी लकी हो, तुम्हे ऐसे सोचनेवाले पेरेंट्स मिले हैं’ अशा प्रतिक्रिया मिळाल्या. ही खूप मोठी पावती होती. ऐकून खूप छान वाटलं. ही तरुण मुलं आपल्याशी कशाला मैत्री करतील असं पूर्वी वाटायचं, पण त्यांच्या ‘फेसबुक’ वर फ्रेंड रिक्वेस्ट आल्या. बोलणं झालं. ‘‘माझी आई माझी बेस्ट फ्रेंड आहे.’’ हे लेकीकडून ऐकून आणि या वयातील त्यांची गुपितं शेअर झाल्यानं होणारा आनंद शब्दातीत आहे.

बऱ्याच जणांनी ‘तुमचा नंबर द्या, तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही काउन्सेलिंग करता का?, अपॉइंटमेंट द्या’ अशा आशयाचे इमेल्स पाठवले. पण कोणत्याही गोष्टीचा उल्लेख न करता तुमचा नंबर द्या सांगणे हे मात्र अनुचित वाटलं. मात्र बाकीच्यांविषयी नक्कीच समजू शकतं. यात सर्वात जास्त डिप्रेशनचा त्रास होत असणाऱ्या व्यक्ती होत्या. त्या सगळ्यांना या लेखातून उत्तर देते की, मानसशास्त्रातील कोणतीही पदवी माझ्याकडे नाही किंवा मी समुपदेशक नाही. त्यामुळे मी अपॉइंटमेंट देऊ  शकत नाही. ज्यांना नैराश्याचा त्रास आहे त्यांनी सायकिअ‍ॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्टना भेटायला हवं. त्याची तीव्रता, स्वरूप बघून तेच उपाय सांगू शकतील. व्यायाम, योगाभ्यास, वेगवेगळ्या विषयांचं वाचन आणि त्याचा प्रत्यक्ष अवलंब करणं, छंद जोपासणं या सर्वाचा उपयोग आयुष्य चांगल्या, अर्थपूर्ण जगण्यासाठी तसंच औदासिन्यावर मात करण्यासाठी होईल. पण एकंदरीतच आजकाल नैराश्याचं प्रमाण

वाढलेलं दिसतंय.

आता निरोप घ्यायच्या आधी, तू लिहू शकतेस याची जाणीव करून देणारे सर, लेखांसाठी अतिशय समर्पक, सुंदर चित्र काढणारे चित्रकार निलेश, मला माहीत नसलेले, पण ज्यांचा हातभार माझ्या लेख छापण्यासाठी लागला ते सर्व जण, वाचक, प्रतिक्रिया देणारे वाचक, या माझ्या प्रवासात जे जे सहभागी होते त्या सर्वाचे मनापासून आभार.  सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!!

सदर समाप्त

 

माधवी गोखले

madhavigokhale66@gmail.com

मराठीतील सर्व आपुलाची संवाद आपुल्याशी ( Apulachi-samvad-apulyashi ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Madhavi gokhale comment on lokrang articles experience

ताज्या बातम्या