प्रत्येक व्यक्ती आपापल्या संवेदन क्षमतेनुसारच आपापले जीवन जगत असते. ही संवेदनक्षमता जितकी जड तितकेच त्या व्यक्तीचे जीवन भडक व स्थूल असते. उलट ही संवेदनक्षमता जितकी तरल, तितकेच त्या व्यक्तीचे जीवनही तरल व सूक्ष्म बनते.
आत्मबोध म्हणजे आत्मा किंवा परमात्मा यांचा बोध नव्हे; तर आत्मबोध म्हणजे स्वत:चेच स्वत:ला झालेले आकलन; आणि हे आकलन तेव्हाच होऊ शकते जेव्हा मनुष्य स्वत:विषयी शिकू लागतो. स्वत:विषयी शिकण्यासाठी कोणताही ग्रंथ, कोणताही गुरू अथवा दुसऱ्या कोणाचाही उपयोग नसतो. जेव्हा कोणत्याही बाह्य मदतीशिवाय शिकावे लागते, तेव्हा अवलोकन हा एकच पर्याय शिल्लक राहतो. ज्या गोष्टीविषयी शिकायचे आहे त्या गोष्टीचे अवलोकन.
अवलोकन करणे म्हणजे पाहणे, निरीक्षण करणे, संपर्कात असणे. म्हणूनच आपल्याला स्वत:विषयी शिकायचे असेल तर स्वत:कडे पाहायला हवे, स्वत:चे निरीक्षण करायला हवे. जेव्हा आपल्याला एखाद्या बाह्य गोष्टीकडे बघायचे असते तेव्हा आपण डोळ्यांचा उपयोग करतो. बाह्य ध्वनी ऐकायचा असतो तेव्हा कानांचा उपयोग करतो. परंतु ज्या गोष्टीचे निरीक्षण करायचे आहे ती जर आपल्या आतच असेल तर कोणत्या डोळ्यांनी तिच्याकडे बघायचे? कोणत्या कानांनी आपल्या आत चाललेला कोलाहल ऐकायचा? पाहणे आणि ऐकणे हे शब्दप्रयोग त्या त्या क्रियांशी संलग्न असलेल्या इंद्रियांशी निगडित आहेत. परंतु ज्या गोष्टीकडे पाहावयाचे आहे ती बघण्यासाठी जर यापकी कोणत्याच इंद्रियाचा उपयोग नसेल तर हे शब्दप्रयोगदेखील निर्थक ठरतात. यातून अवलोकनाचा एक नवाच अर्थ उद्घाटित होतो. अवलोकन करणे म्हणजे संवेदणे. आपल्या आत जे काही चालले आहे ते संवेदणे.
आपण जेव्हा बाह्य गोष्टीसंबंधी शिकत असतो तेव्हा त्या गोष्टीविषयी खूप सगळे ज्ञान, खूप सगळी माहिती गोळा करत असतो व त्या ज्ञानाच्या आधारे ती गोष्ट आपल्याला हव्या त्या प्रकारे हाताळत असतो. एखादा शास्त्रज्ञ जेव्हा निरीक्षणाद्वारे एखाद्या गोष्टीसंबंधी शिकत असतो, तेव्हा तो त्या गोष्टीसंबंधी खूप सगळे ज्ञान गोळा करत असतो; ते पडताळून पाहत असतो; त्याचे विश्लेषण, वर्गीकरण करत असतो. परंतु स्वत:विषयी शिकणे म्हणजे स्वत:विषयी खूप सगळे ज्ञान गोळा करणे नव्हे. कारण त्या ज्ञानाचा स्वत:च्या केवळ व्यवस्थापनासाठी उपयोग होऊ शकतो; परंतु त्याचा स्वत:च्या आकलनासाठी काहीच उपयोग नसतो; कारण ज्या गोष्टीसंबंधी शिकायचे आहे त्याच गोष्टीमध्ये शिकण्याद्वारे भर पडणार असेल तर ते शिकणे कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आणि अवलोकनाद्वारे आपण शिकणार असू तर हा प्रश्न विचारणे अपरिहार्य ठरते, की अशा प्रकारे अवलोकन करणे शक्य आहे का, की ज्यातून कोणतेही ज्ञान गोळा केले जात नाहीये. असे अवलोकन म्हणजे नेमके काय? या ठिकाणी पुन्हा अवलोकनाचा एक नवाच अर्थ आपल्या पुढे येतो. अवलोकन करणे म्हणजे संपर्कात असणे, ज्या गोष्टीचे अवलोकन करायचे आहे तिच्या समवेत जगणे. या संपर्कातूनच, अशा प्रकारच्या अवलोकनातूनच ज्या गोष्टीकडे आपण पाहतो त्या गोष्टीचे अंतरंग उद्घाटित होत असते.  
आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा त्या गोष्टीसंबंधीचे विचार आपल्या मनात येत असतात, त्या गोष्टीशी संलग्न अशा भावना आपल्यात उद्दीपित होत असतात. या विचारांकडे आपण पाहतो का? या भावना आपण संवेदतो का? आणि या विचारांकडे, भावनांकडे पाहत असताना जेव्हा आणखी विचार व भावना उद्भवतात, तेव्हा त्यांच्याकडेही आपण पाहतो का? आपल्या आत निर्माण झालेली एखादी प्रतिक्रिया समजावून घेण्यासाठी जेव्हा आपण तिच्याकडे पाहू लागतो तेव्हा आणखीही खूप सगळ्या प्रतिक्रिया आपल्या आत तयार होतात. परंतु या सगळ्या प्रतिक्रियांना आपण बाजूस सारतो कारण आधीची प्रतिक्रिया समजावून घेण्याची आपली प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नसते. याचाच अर्थ आपल्याला काय पाहावयाचे आहे ते आपण आधीच ठरवून टाकलेले असते. ज्या वेळी आपल्याला काय पाहावयाचे आहे ते आपण ठरवतो त्या वेळी पाहण्याची क्रिया थांबलेली असते व विचारप्रक्रिया सुरू झालेली असते. आणि विचार करणे म्हणजे पाहणे नव्हे. अवलोकन करणे म्हणजे आपण अवलोकन करीत आहोत असा विचार करणे नव्हे. विचाराच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय अवलोकन शक्य आहे का?
अवलोकनात कोणत्याही प्रकारची आवडनिवड नसते. आपल्याला आवडेल तेच पाहायचे व आवडत नसेल ते सोडून द्यायचे यातून स्वतचे आकलन होणार कसे? उलट आपल्या आत ज्या ज्या वेळी जे जे घडत असते त्या त्या वेळी ते ते सर्व काही अगदी जसेच्या तसे पाहणे म्हणजे अवलोकन करणे होय. आणि आपण कोणत्याही गोष्टीकडे जसेच्या तसे तेव्हाच पाहू शकतो जेव्हा विचाराचा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होत नसतो. कारण विचारच आपल्याला पूर्वग्रहदूषित बनवत असतो. आपण काय पाहावे, कसे पाहावे, आपण जे पाहत आहोत ते काय आहे, हे सर्व जेव्हा विचारच ठरवू लागतो, तेव्हा अवलोकन संपलेले असते व विचारप्रक्रियेने सर्व सूत्रे आपल्या ताब्यात घेतलेली असतात. परंतु आपल्या आत उद्भवणारी प्रत्येक प्रतिक्रिया जेव्हा आपण आवडनिवडरहितपणे पाहू लागतो, तेव्हा आपल्या लक्षात येऊ लागते, की आपण काय पाहत आहोत याला काहीच महत्त्व नसून पाहण्याची क्रिया स्वत:च अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण आपण काय पाहत आहोत ते सतत बदलत असते, परंतु पाहण्याची क्रिया अव्याहतपणे चाललेली असते. अशा अवलोकनाला मग टिकवून ठेवावे लागत नाही; ते स्वत:च टिकाऊ असते.
अवलोकन करणे म्हणजे संपर्कात असणे. हा संपर्क जेवढा घनिष्ठ, तेवढे ते अवलोकन परिपूर्ण. प्राचीन चीनमध्ये, एखाद्या चित्रकाराला जेव्हा एखाद्या गोष्टीचे चित्र काढावयाचे असे – उदाहरणार्थ एखादे झाड – तेव्हा तो कित्येक दिवस, महिने अथवा वर्ष त्या गोष्टीसमवेत राहत असे. तो त्या गोष्टीशी इतका समरस होऊन जात असे, की तो म्हणजे ते झाडच होऊन जात असे. याचा अर्थ तो स्वत:ला झाडाशी एकरूप करीत होता असे नव्हे, तर त्या झाडाशी त्याचा संपर्क इतका घनिष्ठ होत असे, की त्याचे स्वत:चे वेगळे असे अस्तित्वच शिल्लक राहत नसे. त्या ठिकाणी ते झाडच फक्त उरत असे. त्यानंतरच त्या झाडाचे चित्र काढण्याची प्रक्रिया सुरू होत असे.
निखळ अवलोकनामध्ये स्वत:ची अशी ऊर्जा असते. आपण वर्षांनुवष्रे आपल्यातील एखाद्या प्रतिक्रियेचे अवलोकन करूनही त्या प्रतिक्रियेत जेव्हा कोणताही बदल घडताना दिसत नाही, तेव्हा आपल्या अवलोकनात ऊर्जेचा अभाव आहे हे स्पष्ट होते. अवलोकनाची ऊर्जा कोणाच्या कृपेमुळे मिळत नसते, देवाने दिलेल्या वरदानाच्या रूपानेही मिळत नसते किंवा रेकीत समजतात त्याप्रमाणे दूरच्या कोणत्या तरी विश्वातूनही येत नसते. ती ऊर्जा आपल्या स्वत:च्या जीवनातूनच मिळवायची असते. रोजचे जीवन जगताना आपण विविध प्रकारे ऊर्जेचा अपव्यय करीत असतो; अर्धवट घेतलेल्या अनुभवांमध्ये तिची गुंतवणूक करून ठेवत असतो. आपल्या जीवनात सातत्याने चाललेला संघर्ष, भय, क्रोध, मत्सर, हेवेदावे, स्पर्धा, भांडणतंटा, सुखसंवेदनांचा पाठपुरावा, इत्यादी गोष्टींमधून प्रचंड प्रमाणात ऊर्जेचा व्यय होत असतो. अशा प्रकारे ऊर्जा खर्च झाल्यावर अवलोकनासाठी ऊर्जा कोठून येणार? अवलोकनासाठी ऊर्जा हवी असेल तर तिचा हा अपव्यय थांबला पाहिजे. कारण ऊर्जेविना अवलोकनात उत्कटता येत नाही. उत्कटतेविना अवलोकन निष्प्राण असते, त्यात कोणतेही परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता नसते.
अवलोकनासाठी अत्यावश्यक असा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे संवेदनक्षमता-संवेदण्याची क्षमता. प्रत्येक व्यक्ती आपापल्या संवेदनक्षमतेनुसारच आपापले जीवन जगत असते. ही संवेदनक्षमता जितकी जड तितकेच त्या व्यक्तीचे जीवन भडक व स्थूल असते. उलट ही संवेदनक्षमता जितकी तरल, तितकेच त्या व्यक्तीचे जीवनही तरल व सूक्ष्म बनते. स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडचा हा संवेदनशीलतेचा प्रवास तेव्हाच सुरू होतो जेव्हा आपण आपले रोजचे जीवन आपल्या पूर्ण संवेदनक्षमतेनिशी जगू लागतो. आपल्या रोजच्या जीवनात जे जे काही घडते – मग तो आपल्या भोवताली घडत असलेला अतिमहत्त्वाचा प्रसंग असो अथवा आपल्या आत उमटलेला एक क्षूद्र विचार असो – ते ते सर्व आपण आपल्या पूर्ण संवेदनक्षमतेनिशी उत्कटपणे जेव्हा जगू लागतो, तेव्हा त्या त्या गोष्टीचा निचरा होऊन, त्यात अडकलेली ऊर्जा मोकळी होत जाते व अवलोकनाला अधिकाधिक प्रखर बनवते. अशा अवलोकनातच परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असते. विचार ही द्रव्यात्मक प्रक्रिया असली तरी ती इतर द्रव्यात्मक प्रक्रियेंच्या तुलनेत खूपच सूक्ष्म असते. आणि अशा सूक्ष्म प्रक्रियेचे अवलोकन करायचे असेल तर ते अवलोकनही तितकेच सूक्ष्म असणे आवश्यक आहे. जेव्हा अवलोकन व ज्या गोष्टीचे अवलोकन करावयाचे आहे ती गोष्ट हे दोन्हीही एकाच वेळी  सूक्ष्मतेच्या एकाच स्तरावर एकाच प्रखरतेने असतात तेव्हा त्या दोहोंमध्ये एक वेगळेच नाते प्रस्थापित होते. त्या नात्यात कोणत्याही प्रकारचे द्वैत नसते. एकमेकांवर कोणत्याही प्रकारची कुरघोडी करण्याचा प्रयत्न नसतो; कोणत्याही प्रकारचा संघर्ष नसतो. असे निखळ नाते म्हणजेच प्रेम होय. अशा प्रेमातच कोणत्याही गोष्टीत संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असते. असे प्रेमयुक्त अवलोकन हेच खरे अवलोकन अन्यथा तो विचाराने केलेला अवलोकनाचा केवळ खटाटोपच होय.
किशोर खैरनार
संचालक, कृष्णमूर्ती एज्युकेशन ट्रस्ट
संपर्क :  kkishore19@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art of observation
First published on: 17-08-2013 at 01:01 IST