मीरा उत्पात
‘कटीवरी हात विटेवरी उभा’ विठ्ठल गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही आपलासा, प्राणसखा वाटेल असा. साधेपणाचा पुतळाच. पण के वळ ‘भक्तीच्या भुके ल्या’ असलेल्या विठ्ठल-रखुमाईला पूर्वापार भक्तांनी आणि राजेरजवाडय़ांनी विलोभनीय दागिने अर्पण केले आहेत. जवळपास ६०० वर्षांपासून देवाला घातल्या जाणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण घडणावळीच्या दागिन्यांमधील वैविध्य आणि कलाकु सर पाहण्यासारखी आहेच, पण प्रत्येक दागिन्यामागे एक रंजक गोष्ट दडलेली आहे. ठरावीक दागिना कधी घालावा, याबद्दल पाळले जाणारे संकेतही लक्षवेधीच. शेकडो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या दागिन्यांविषयी येत्या आषाढी एकादशीच्या (२० जुलै) निमित्ताने.. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रीष्माची काहिली संपून वर्षां ऋतूचे आगमन होते. जलधारांनी धरणी चिंब चिंब भिजते. सगळीकडे कसा आनंद, उत्साह ओसंडून वाहू लागतो आणि सगळ्यांना आस लागते ती विठुरायाच्या भेटीची. सासुरवाशिणीला जशी माहेरची ओढ असते, तशीच ओढ वैष्णवांना विठु माउलीची लागते. इतर तीर्थक्षेत्री भक्त देवदर्शनाची कामना करतात पण इथे प्रत्यक्ष देवच भक्तांची प्रतीक्षा करत उभा असतो.  नामदेवांशी हितगूज करताना पांडुरंग म्हणतात,

आषाढी कार्तिकी विसरू नका मज। सांगितसे गूज पांडुरंग।।

देव म्हणतो, तुम्ही मला वारीच्या निमित्ताने भेटायला या. खरं तर हा वैकुंठीचा राणा. त्रिभुवनाचा स्वामी. पण भक्तांसाठी अगदी आसुसलेला असतो.

तिन्ही त्रिभुवनी नाही मज कोणी। म्हणे चक्रपाणी नामयासी।।

असा भक्तांशी संवाद साधणारा, त्यांच्याशी हितगूज करणारा, त्यांच्या भेटीसाठी आतुर झालेला विठ्ठल आपल्याला अगदी आपलासा वाटतो. आणि त्याच्या भेटीची अनिवार ओढ लागते.

जावे पंढरीसी आवडी मनासी। कधी एकादशी आषाढी हे।

तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी।  त्याची चक्रपाणी वाट पाहे।।

आषाढ शुद्ध द्वितीयेला पलंग निघतो आणि लोड लागतो- म्हणजे त्या दिवसापासून प्रक्षाळपूजा होईपर्यंत देव मंचकी निद्रा घेत नाही,असे मानले जाते. अखंडपणे तो भक्तांना भेटतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला काला झाल्यावर यात्रेची सांगता होते. यानंतर तिथी नक्षत्र पाहून प्रक्षाळपूजा करतात आणि देवाचे नित्य उपचार सुरू होतात.. असा हा विठ्ठल भेटीचा अनुपम्य सोहळा. ही वारीची परंपरा ज्ञातपणाने आठशे वर्षांपासून सुरू आहे. पण विठ्ठल त्याही आधीपासून इथे आहे. असे म्हणतात की, प्राचीन क्षेत्रे दोन आहेत. एक काशी आणि दुसरे पंढरपूर. म्हणून पंढरपूरला दक्षिण काशी असे म्हणतात.

जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा।।

इतकी प्राचीनतम ही विठ्ठलनगरी आहे. भूमीवर ज्या ज्या स्थळी देवाने अवतार धारण केले आहेत, त्या त्या स्थळापासून अवतारकृत्य संपल्यानंतर देव निजधामास गेले. परंतु श्रीविठ्ठल पुंडलिकास दिलेल्या वचनामुळे बद्ध होऊन पंढरपूरलाच अजूनही भक्तांची वाट पाहात उभा आहे. श्रीविष्णूंचा अवतार म्हणजे विठ्ठल, आदिशक्ती श्रीरुक्मिणी माता आणि निरनिराळ्या रूपांत इतर देवांचा वास असल्यामुळे या क्षेत्राला ‘भूवैकुंठ’ असे म्हणतात.

या देवाला भोळ्याभाबडय़ा भक्तांसाठी सगुण-साकार विठ्ठल व्हावे लागले. असं हे विलोभनीय विलक्षण दैवत! याची लोकप्रियता वरचेवर वर्धिष्णू होते आहे. कारण देवाचा आत्यंतिक साधेपणा! इतर देवतांची ‘सकाम’ भक्ती केली जाते. म्हणजे देवाकडे आपण काही मागतो व त्या देवाने ते मागणे पूर्ण केल्यावर आपल्याला तो नवस फे डावा लागतो. ही देवघेव मात्र पंढरपुरात नाही. तो साध्या तुळशीच्या पानानेही संतुष्ट होतो. तरीही त्याला प्रेमाने, श्रद्धेने साध्या भक्तांपासून ते वेगवेगळ्या काळातील राजे, महाराजे, सरदार, पेशवे आदींनी अनेक मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत.

श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांच्या रूपाचे, तेजाचे, सौंदर्याचे वर्णन अनेक संत, पंत आणि तंत कवींनी केले आहे. विठ्ठलाचे सावळे सुंदर रूप मनोहर तर आहेच. परंतु त्याला वेगवेगळ्या पोशाखांनी, दागदागिन्यांनी मढवल्यावर त्याच्या अलौकिक तेजाने नेत्र दिपून जातात. श्री विठ्ठलाच्या सौंदर्याचे रेखीव चित्र काढणारे अभंग अनेक आहेत. त्याच्या दागदागिन्यांचे वर्णन ‘मकर कुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभमणी विराजित।’ यांसारख्या अनेक अभंगांतून केलेले आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या खजिन्यात अनेक मौल्यवान दागिने आहेत. जुन्या काळातील राजेरजवाडे, सरदार यांनी युद्धात विजय मिळवल्यानंतर नजराणा म्हणून, भेटीदाखल किंवा नवस म्हणून दागिने अर्पण केले आहेत. काही प्राचीन दागिने सात-आठशे वर्षांपूर्वीचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी सकवारबाई, संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, शिंदे सरकार, अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस आदींनी वेळोवेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीला अनेक किमती दागिने अर्पण केले आहेत. हे दागिने पूर्वीच्या काळी बडवे, उत्पात यांच्या घरी ठेवलेले असत. परंतु नंतर चोरी-दरोडय़ाच्या भीतीने मंदिरातच खजिने बांधण्यात आले व त्यात दागिने ठेवले गेले. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या वेगवेगळ्या उपचारांमध्ये पूर्वी ‘अलंकार महापूजा’ हा एक उपचार होता. त्या वेळी हे दागिने पाहाता येत असत. आता ही महापूजा बंद आहे.

श्री विठ्ठलाचे दागिने : श्री विठ्ठलाला सोन्याचे पैंजण, तोडे आहेत. सोन्याचे सोवळे (धोतर) आहे. कमरेला अमूल्य असा हिऱ्यांचा कंबरपट्टा आहे. तो नरहरी सोनारांनी घडवला आहे. हातामध्ये तोडे, बाजुबंद, दंडपेटय़ा, मणिबंध, सोन्याची राखी आहे. गळ्यामध्ये सोन्याची तुळशीची पंचेचाळीस पाने असलेली सोन्याच्या मण्यांत गुंफलेली माळ आहे. वीस ते पंचवीस पाचूंनी मढवलेला, मीनाकाम केलेला लहानमोठय़ा सात फुलांचा लफ्फा आहे. देवाची ओळख ज्या कौस्तुभमण्यामुळे होते तो पाचूंनी मढवलेला, गोल नक्षी असलेला कौस्तुभमणी आहे. तो अगदी गळ्यालगत घालतात. बाजीराव पेशव्यांनी अर्पण केलेली हिरे, पाचूंनी गुंफलेली मोत्यांची कंठी आहे. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्यामध्ये एकसारखे असे चव्वेचाळीस मोती आहेत. बोरमाळ, मोत्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, मोहरांच्या माळा असे गळ्यात घालायचे दागिने आहेत. मोहरांवर उर्दू व मोडी लिपीतील अक्षरे आहेत. मोरमंडोळी नावाचा दागिना आहे. त्यात पाचू, हिरे आणि अतिशय मौल्यवान माणिक बसवलेला आहे. नवरत्नांचा हार आहे. त्यात मोती, हिरे, पाचू, पुष्कराज अशी नऊ रत्ने बसवलेली आहेत. पाचूचा पानडय़ांचा हार आहे. डोक्यावरील दागिन्यांमध्ये सहा सोन्याचे मुकुट आहेत आणि तीन-चार चांदीचे, सोन्याचे पाणी दिलेले मुकुट आहेत. सगळ्या मुकुटांत अमूल्य असा हिऱ्यांचा मुकुट आहे. त्याला सूर्यकिरणांचा मुकुट म्हणतात. इतर पाच सोन्याचे मुकुट आहेत. सोन्याची शिंदेशाही पगडी आहे. पाडव्याला चांदीची काठी, खांद्यावर घोंगडी, धोतर, पगडी असा पोशाख असतो. पगडीवर बसवण्यासाठी रत्नजडित शिरपेच आहे. हे चार आहेत. अतिशय पुरातन आणि मौल्यवान पाचू, हिऱ्यांनी मढवलेले आहेत. सोन्या-मोत्यांचे तुरे आहेत. देवाची ओळख ज्या मकरकुंडलांमुळे होते ती कानात घालण्याची सोन्याची मकरकुंडले आहेत. त्यात माणिक आणि पाचू जडवलेले आहेत. कपाळावर किमती नील  व हिरे बसवलेला नाम- म्हणजे सोन्याचे गंध आहे.

वर्षभर निरनिराळे सण आणि सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगस्ट या दिवशी श्री विठ्ठलाला हे दागिने घालतात. नवरात्रात निरनिराळे पोशाख करतात. वसंतपंचमी, रंगपंचमीला पांढरे धोतर, पांढरा अंगरखा आणि पगडी नेसवतात. विठ्ठलाच्या मूर्तीच्या डोक्यावर ती पगडी बांधतात. हे खूप अवघड आहे. पण बडवे मंडळी अतिशय कलात्मक रीतीने पगडी बांधत असत. या वेळी देवाचे रूप अगदी मोहक दिसते.

श्री रुक्मिणी मातेचे दागिने : स्त्रियांना उपजतच दागिन्यांची आवड असते. श्री रुक्मिणी माता तर साक्षात लक्ष्मी. तिला अनेक सुंदर, अमूल्य दागिने आहेत. पायात घालण्यासाठी सोन्याचे वाळे, पैंजण आहेत. सोन्याची साडी आहे. दोन कंबरपट्टे आहेत. एक सोन्याचा आहे. दुसरा माजपट्टा आहे. हा वेगळ्या प्रकारचा कंबरपट्टा आहे. त्याला बसवण्यासाठी किल्ली आहे. रत्नजडित पेटय़ा आहेत. त्या हिरे, माणिक, पाचू अशा रत्नांनी मढवलेल्या आहेत. श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी ‘कमरेला माजपट्टा मातेचा डौल मोठा’ असे रुक्मिणी मातेचे ध्यान करताना म्हटले आहे. हातामध्ये पाटल्या, मोत्यांच्या, रत्नजडित जडावांच्या बांगडय़ा, गोठ, तोडे आहेत. तोडे शिंदेशाही पद्धतीचे आहेत. हातसर आहेत. त्यामध्ये हिरे, माणिक, पाचू जडवले आहेत. चटईची वीण असलेल्या वाक्या आहेत. माणिक, पाचू जडवलेले बाजुबंद आहेत. गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र, दशावतारी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाचूची गरसोळी, लहान सरी, मोठी सरी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, एकदाणी, बोरमाळ, ठुशी, तुळशीचा हार, झेला, पोहे हार, चंद्रहार,चपलाहार, पेटय़ांचा हार, शिंदेशाही हार, तन्मणी, चिंचपेटी, नवरत्नांचा हार, शिंदे हार, जवाच्या माळा आणि हायकोल असे दागिने आहेत. गळ्यातील सारे अलंकार अतिशय मौल्यवान आहेत. यातील नील, पाचू, हिरे यांनी जडवलेला नवरत्न हार निजामाचे दिवाण चंदूलाल यांनी मातेला सुमारे चारशे वर्षांपूर्वी अर्पण केलेला आहे. तो अत्यंत मौल्यवान आहे. दुसरा मौल्यवान दागिना म्हणजे शिंदे हार. जडताचे सोन्याचे आवळे असलेला, पाचूंनी जडवलेला, मोत्यांनी गुंफलेला, तीन तुकडय़ांत विभागलेला हा हार आहे. तो पेशव्यांचे सरदार जयाजी शिंदे यांनी अर्पण केला आहे. अतिशय किमती असा हा हार शिंद्यांचा हार म्हणून ओळखतात. या हाराची रंजक कहाणी आहे. जयाजी शिंदे यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी वेगवेगळी तबकं तयार केली. पण अदलाबदल होऊन रुक्मिणीचा हार विठ्ठलाकडे गेला आणि विठ्ठलाचा हार रुक्मिणीला आला. देवाची इच्छा म्हणून त्यांनी ते हार तसेच ठेवले. रुक्मिणीची उंची कमी असल्यामुळे तो हार रुक्मिणीच्या पायाच्याही खालपर्यंत येत होता. म्हणून तीन तुकडय़ांमध्ये विभागून एकमेकांत अडकवून घालतात. त्याला आवळ्याचा हार असेही म्हणतात. याशिवाय छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला हिऱ्यांचे खोड असलेला तन्मणी आहे. तारामंडल हा एक दागिना आहे. आकाशात चांदण्या पाडतात तेवढा प्रकाश पाडणारी रत्ने या दागिन्यात आहेत.

असे म्हणतात की टिपू सुलतानला काही शाळीग्राम मिळाले. ते कालांतराने मराठेशाहीत आले. त्यात हिरे निघाले. त्यापासून लफ्फा तयार केला आणि तो रुक्मिणी मातेला अर्पण केला.  एक मोत्याची, एक पाचूची, एक माणकाची आणि एक हिऱ्याची- अशा या चार चिंचपेटय़ा. बाजीराव पेशव्यांनी दिलेली गरसोळी आहे. जवाच्या दोन माळा आहेत. त्या खूप जुन्या आहेत. ‘एवढे सगळे दागिने आहेत तर आता तुला कुठला दागिना करू?’ असं रुक्मिणीला देवाने विचारून, ‘तुला आता फक्त सोन्याचा वरवंटाच करायचा बाकी आहे.’ असं म्हणून  मातेला सोन्याचा वरवंटा केला, असं मानलं जातं. तो महत्त्वाचा दागिना म्हणून ओळखतात. त्याला ‘हायकोल’ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सकवारबाई आणि पेशवे या सर्वाचे शिक्के असलेली मोहरांची माळ आहे. कानामध्ये घालण्यासाठी गुजराती पद्धतीचे तानवडे आहेत. द्वारकेवरून रुसून आल्याची ती खूण आहे. सोन्यात गुंफलेली मोती जडावांची कर्णफुले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  सोन्याचे मत्स्यजोड आहेत. त्याच्या डोळ्यांमध्ये माणिक बसवलेले आहेत. खवल्यांमध्ये परब म्हणजे हिऱ्यांचे तुकडे बसवलेले आहेत आणि शेपटीमध्ये लालबुंद माणिक आहेत. अतिशय मौल्यवान असे हे मत्स्यजोड देवाप्रमाणे रुक्मिणी मातेलाही आहेत. कानात घालायच्या बाळ्या आहेत. श्रीधर स्वामी म्हणतात, ‘बाळी बुगडी ल्याली कानी त्र्यलोक्यपती तिचा धनी.’

नाकामध्ये घालायच्या तीन नथी आहेत. एक मोठी मोत्यांची नथ, दुसरी हिऱ्याची नथ आणि तिसरी एक मोत्याची नथ. एक मोत्याची नथ शेजारती करताना घालतात. याशिवाय मारवाडी पद्धतीची नथदेखील आहे. नवरात्रीमध्ये द्वितीयेला रुक्मिणीला मारवाडी लमाणी पद्धतीचा पोशाख करतात. त्या वेळी ही नथ आणि झेला म्हणून एक दागिना आहे तो घातला जातो. या दागिन्यांच्या पदकामध्ये सोन्याचं कान कोरणं, दातकोरणं आहे. हे लमाणी पद्धतीचे दागिने वर्षांतून फक्त एकदा- नवरात्रीत द्वितीयेला घातले जातात. रुक्मिणी मातेला भांगेत घालण्यासाठी सोन्याचा रत्नजडित बिंदी बिजवरा आहे. पेटय़ाची बिंदी आहे. डोक्यात घालण्यासाठी रत्नजडित हिऱ्याची वेणी आहे. तिला मुद्राखडी म्हणतात. रुक्मिणी मातेला चार प्रकारचे सोन्याचे मुकुट आहेत. एक जडावाचा, दुसरा शिरपेच आणि तिसरा नुसता सोन्याचा मुकुट आहे. चांदीचे, सोन्याचे पाणी दिलेले दोन मुकुट आहेत. सोन्याचा चौथा खूप जुना मुकुट आहे तो आता जीर्ण झाला आहे. त्याला परबाचा मुकुट म्हणतात. कपाळावर लावण्यासाठी सोन्याची जडावाची चंद्रकोर आहे. तिला चंद्रिका म्हणतात. तसेच सोन्याचे रत्नजडित सूर्य आणि चंद्र आहेत. याशिवाय मातेला मोठे चांदीचे दोन आणि सोन्याचा एक करंडा आहे. महत्त्वाचे सण, महालक्ष्मीचे तीन दिवस, नवरात्र, या दिवशी मातेची निरनिराळ्या पद्धतीचे पोशाख व दागिने घालून पूजा केली जाते. नवरात्रीत ललितापंचमीला पूर्ण फुलांचा पोशाख केला जातो. अष्टमीला पांढरी रेशमी साडी व पूर्ण मोत्यांचे दागिने घालतात. रुक्मिणी मातेच्या अलंकारांचे वर्णन करणारी श्रीधरस्वामी नाझरेकर यांची दुर्मीळ आरती आमच्या संग्रही आहे.  त्यातील काही ओळी-

पायी पैंजण वाळे अनुवट पोलारे

नेसली भरजरी ओढुनिया पदरे

तोडे पाटल्या वाक्या जडताचे दोरे

तन्मणी पेटय़ा पदके कनकाचे हार

जय देवी जय देवी जय रुक्मिणी अंबे

इच्छिले पूरविसी प्रणमये जगदंबे।।१।।

असे हे सावळे सुंदर रूप मनोहर! याचं हे पृथ्वीमोलाचं अलंकार वैभव. पण या मौल्यवान दागिन्यांचा मोह त्याला नाही. त्याला मोह आहे, तो  भुके ला आहे फक्त भक्तांच्या प्रेमळ भावाचा. त्यासाठी भक्तांची वाट पाहात कर कटावरी ठेवून सुंदर ते ध्यान विटेवर उभे आहे.. वर्षोनुवर्षे..

meerautpat66@gmail.com

(बडवे आणि उत्पात यांच्या कुटुंबाकडे परंपरागत पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या अलंकार महापूजेचा मान होता. लेखातील फोटो बडवे आणि उत्पात कुटुंबियांच्या सौजन्याने.)

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about 600 years old ornaments of vitthal rakhumai ashadi ekadashi zws
First published on: 17-07-2021 at 01:08 IST