घिसाडी समाजातील माणसं एक वेळच जेवतात. मुलांना भूक आवरता आली पाहिजे म्हणून बालवयातच पोटावर तप्त लोखंडाच्या सळईने डागण्या दिल्या जातात. वयाच्या १२ वर्षांपर्यंत मुली लोखंडावर घण घालायच्या कामात तरबेज होतात. इतक्या की ग्रामीण महाराष्ट्रात घिसाडी समाजाच्या या व्यवसायात ६० ते ७० टक्के योगदान महिलांचे आहे.
‘शि क्षनाचं म्हंजी शाळचं विचारताय व्हय? दुपारची खिचडी मिळायची चांगली सोय हाय म्हनून वस्तीतली झाडून सारी लेकरं जातात शाळत. चवथी पाचवीपत्तोर जातात. लेकरांना पुढ शिकविन्याची मुळात माय-बापाचीच इच्छा व्हत न्हाई. लई झाल तर, काई काई लेकरं सहावी-सातवीपत्तोर जातात शाळत. पोरगं असो की पोरगी, सहा-सात वर्साची झाली की घरच्या धंद्याची शिकवणी सुरू होते. शाळा शिकलेल्यांना शिक्षनाचा काई फायदा झालाय, नोकऱ्या लागल्यात असा अनुभाव न्हाई बघा आमच्या सग्या-सोयऱ्यात. माझ्याच नवऱ्याचं उदाहरन घ्या की. बघा कसा उंचापुरा धडधाकट हाय की न्हाय?  पोलीस व्हायची लई इच्छा व्हती त्याची. मोप बारावी पास होईपत्तोर शिकलाय. नापास न्हाई झाला कधी. कालेजात पळण्यात, खेळण्यात पन पुढं होता सर्वाच्या. आता झुरळ-उंदरं खात हाईत त्या दाखल्यांना. तायक्वांदो का काय म्हणत्यात त्या चढाओढीत ‘सिलव्हर मिडल’ मिळविलाय अप्पुट राज्यात. पोलीस भरतीसाठी लिव्हायच्या, पळायच्या, मेहनतीच्या परीक्षेत पासबी झाला. पन तोंडी परीक्षेत नापास. एक लाख रुपये फीस व्हती म्हन त्येची. ती कुठनं आणायची? ती भरता आली न्हाई. मग आला आपल्या बापजाद्याच्या धंद्यात. हेच करायचं व्हतं तर आयुष्य आणि पैसा बरबाद करणारी शाळा कशाला शिकविली असं विचारून नातेवाइक शेन घालतात तोंडात.’’  सांगत होती गंगासागर अंकुश साळुंके. जिल्हा नांदेड, तालुका व गाव देगलूर, पेठ अमरापूर गल्लीत राहणारी. गल्लीतल्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या घिसाडी जमातीची तिची वस्ती. ही वस्ती म्हणजे रस्त्याच्या कडेला, त्यांचा परंपरागत कारखाना आणि घर एकत्र असलेल्या उघडय़ा झोपडय़ांतील साठ-सत्तर लोकांची घिसाडी वसाहत.
महाराष्ट्रातील काही घिसाडी जमातीचे लोक सांगतात की, प्राचीन काळी हे लोक, राजपूत सैन्याच्या तलवारींना धार लावण्याचे काम करायचे आणि त्यांच्याबरोबर एका युद्धभूमीपासून दुसऱ्या युद्धभूमीकडे जायचे. यांना घिसारी (घासून धार लावणारे) म्हटले जायचे. पुढे घिसारीचे घिसाडी झाले. त्यांचे पूर्वज सैन्याला लागणाऱ्या ढाली-तलवारी तयार करणारे कारागीर आणि प्रसंगी लढणारे लढवय्ये होते आणि महाराणा प्रतापसिंहांचे आम्ही वंशज आहोत अशीही त्यांची भावना आहे. देशभरात साधारणपणे यांचे प्रसिद्ध नाव म्हणजे गाडिया लोहार किंवा गाडी लोहार. गडोलिया लोहार किंवा गडुलिया लोहार ही नावेसुद्धा त्यांच्या गाडीला उद्देशूनच आली आहेत. त्यांची गाडी म्हणजे, बैलगाडीपेक्षा थोडीशी मोठी व उंच, लोखंडाची परंपरागत कलाकुसर व नक्षीकाम असलेली सुबक व सुंदर गाडी असते. ही गाडी उंट किंवा बैलाकडून ch16ओढली जाते. लोहारकी करण्यासाठीची आवश्यक हत्यारे, अवजारे आणि स्वत:चे घरगुती सामान एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी या गाडीचा उपयोग होतो. पावसात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात, गाडीच्या वर ताडपत्री टाकली की गाडीत एक खोली आणि गाडीच्या खाली एक खोली असे घर तयार होते. पिढय़ान् पिढय़ा हेच त्यांचे भटके घर. या वैशिष्टय़पूर्ण गाडीमुळेच यांना गडोलिया लोहार, गाडिया लोहार किंवा गाडी लोहार असे म्हणतात.  
शेतकऱ्यांसाठी बैलगाडी तयार करणारे म्हणजे गाडी लोहार असा समज महाराष्ट्रात पसरलेला आहे, तो चुकीचा आहे. शेतकऱ्यांच्या परंपरागत बैलगाडीत लोहारकाम कमी आणि सुतारकाम अधिक असते. इराण, पाकिस्तान आणि भारतात असलेल्या गाव-गाडय़ातील बलुतेदार लोहारांपासून, देव-देवता, भाषा, चालीरीती, विवाहसंबंध या बाबतीत हे भटके गाडिया लोहार किंवा घिसाडी भिन्न आहेत, असे त्यांच्या संघटना आणि शास्त्रज्ञांचे मत आहे.
देशभरात पसरलेल्या या जमातीतर्फे असे सांगितले जाते की, मोगल बादशहा अकबर याने चितोडगडावर केलेल्या स्वारीत राणाप्रतापसिंह जखमी झाले आणि चितोडगडचा पराभव झाला तेव्हा हे सारे लोक परागंदा झाले. त्यांनी भटके जीवन स्वीकारले. जोपर्यंत मेवाड प्रांताचे स्वातंत्र्य व वैभव परत मिळून चितोडगडावर राणा घराण्याचे वर्चस्व स्थापित होणार नाही तोपर्यंत खालील पाच बंधने पाळण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. ती बंधने म्हणजे- १. चितोडगडास परत येणार नाही. २. कायमच्या स्थिर घरात राहणार नाही. ३. रात्री दिवा-बत्ती पेटवणार नाही. ४. सुखासीन पलंगावर झोपणार नाही. ५. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी आवश्यक दोर जवळ बाळगणार नाही.
सदरची बंधने पाळण्याच्या निर्धाराने या जमाती खूप मागास राहिल्या. व्यवहारात त्यांना खालचा दर्जा प्राप्त झाला. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजात जागृती व संघटन कार्य सुरू करण्याच्या हेतूने, एप्रिल १९५५ च्या पहिल्या आठवडय़ात चितोडगड येथे या समाजाचा राष्ट्रीय मेळावा आयोजित केला होता. तेव्हा देशभरातून या जमातींच्या महिलांचा या मेळाव्यास झालेला विरोध, त्यांचा आक्रोश पाहता, त्यांचे अश्रू पुसण्यात कार्यकर्त्यांच्या नाकी नऊ  आले. कारण पूर्वजांपासून काटेकोरपणे पाळत आलेल्या वरील पाच प्रतिज्ञांपैकी पहिलीच प्रतिज्ञा मोडली तर कालिमाता आणि दुर्गादेवीचा कोप होऊन मेळाव्यासाठी चितोडगडास जाणाऱ्या पुरुषांचे जीवन बरबाद होईल अशी त्यांची भीती होती.
घिसाडी समाजाच्या उपजीविकेचे परंपरागत साधन म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आणि घरगुती उपयोगाची लोखंडाची हत्यारे, अवजारे बनविणे. देगलूर तथा ग्रामीण महाराष्ट्रात घिसाडी समाजाच्या या व्यवसायात ६० ते ७० टक्के योगदान महिलांचे आहे. त्यासाठी भट्टी लावणे, तप्त लाल लोखंडावर गरजेप्रमाणे ७ ते १५ किलो वजनाचे घण मारणे, ग्राइंडर मशीन नसल्यास काणसीने जोर लावून हत्यारे घासणे, बनवलेली हत्यारे, अवजारे आसपासच्या गावांतील आठवडी बाजारात जाऊन विकणे ही कामे महिलाच करतात. शिवाय रोज सकाळी पाणी उपलब्ध करण्यापासून सगळी घरगुती कामे करणे, मुले सांभाळणे, त्यांना शाळेत पाठवणे ही कामेही त्यांना करावीच लागतात. उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी त्यांना पहाटे चार ते रात्री बारापर्यंत अंगमेहनत करावी लागते. तेव्हा कुठे त्यांना दोनशे रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते.
बाहेरचे ऊन आणि भट्टीची उष्णता मिळून उष्णतेची जबर झळ त्यांना सोसावी लागते. वजनदार घण मारून तप्त लोखंडाला आकार देण्याचे काम करताना उडालेले लोखंडाचे तप्त कण हे काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या अंगात घुसतात. शरीरात त्याच्या गाठी बनतात, त्याने हातपाय घट्ट बनतात. बऱ्याच जणांच्या हाता-पायाला लोहचुंबक लावले असता चिटकून बसते. इतकी भयानक अवस्था आहे मात्र त्यांच्यात याविषयी असा समज आहे की लोह अंगात असल्यास भूतपिशाच्चापासून माणूस सलामत राहतो. खरं तर या लोहकणांच्या गाठी म्हातारपणात त्रास देतात. हे काम करणाऱ्या सर्व लोकांची ही समस्या आहे. कामातून फुरसत व दवाखान्याच्या खर्चासाठी पैसा नाही या कारणाने या गाठीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही.
त्यांना आधार कार्ड आणि मतदानाचे ओळखपत्र मिळाले आहे. पण रेशन कार्ड वा जातीचे प्रमाणपत्र मात्र मिळालेले नाही. त्या प्रत्येक प्रमाणपत्रासाठी तीन हजार रुपये खर्च येतो अशी त्यांची माहिती आहे.
भोवताली पक्क्या घरांची लोकवस्ती आणि तेथील रस्त्याच्या कडेला या घिसाडी जमतीच्या झोपडय़ा पसरलेल्या असतात, त्यामुळे दूपर्यंत आडोसा मिळत नाही. शौचालयाची सोय नाही, म्हणून पहाटे चारला उठून या महिलांना शौचासाठी दूर उघडय़ावर जावे लागते. पाण्याची हक्काची सोय नाही. जवळच्या शाळेतून पिण्याचे पाणी मिळाले तर ठीक, अन्यथा दोन-तीन किलोमीटर लांबून पाणी आणावे लागते. भोवतालच्या पक्क्या घरातल्या लोकांनी वापरायचे पाणी दिले तर दोन-तीन दिवसातून एकदा आंघोळ होते. सांडपाण्याची व्यवस्था नाही. झोपडीशेजारीच गोलाकार खड्डा करून त्यातच कपडे-भांडी धुण्याचे पाणी, शिवाय मुलांबाळांच्या आंघोळीचे पाणी साठवायचे आणि दिवसभरात साठलेले पाणी संध्याकाळी उशिरा दूर नेऊन फेकायचे हे रोजचे काम महिलांच करतात.
अन्नपद्धतीत फारसा फरक नसला तरी महत्त्वाचा फरक हा आहे की, दिवसातून एकदाच अन्न शिजविले जाते व एकदाच जेवले जाते. म्हणूनच व्यवहारात एक म्हण प्रचलित आहे, ‘घिसाडय़ांची न्याहरी, सांच्यापारी.’ लहान मुले गरजेप्रमाणे दुसऱ्या दिवशी शिळे अन्न खातात. ज्वारीची रोटी रोजची असते. पूर्वीप्रमाणे कोळसा सहजासहजी उपलब्ध होत नाही. दूर दूर फिरून जमा केलेला कोळसा वीस-पंचवीस किलो वजनाचा झाला की, रिक्षा भाडे वाचविण्यासाठी, डोक्यावर हे वजन घेऊन किमान २-३ कि. मी. चालावे लागते. नवीन लोखंड विकत घेणे परवडत नाही म्हणून जुन्याचा शोध घेत फिरावे लागते. वेळ मिळाला तर दुपारनंतरही भट्टी पेटवून काम करावे लागते. साधारणपणे ५० रुपयांचा कोळसा वापरून केलेल्या कामातून १०० रुपये मिळतात.
वस्तीतील शेवंताबाई मारुती चव्हान यांचे लग्न तीस वर्षांपूर्वी झाले तेव्हा त्यांचे वय होते पाच वर्षांचे. तसेच मंगलबाई माधव चव्हान यांचे लग्न त्यांच्या चौथ्या वर्षी झाले. पण आजच्या पिढीत सुधारणा होऊन लग्नाचे वय १४ ते १५ वर्षे झाले आहे. परंपरेप्रमाणे मुलाकडून मुलीला मागणी घातली जाते. पूर्वी मुलाच्या कुवतीप्रमाणे ३०० ते ५०० रुपयांची वधू रक्कम द्यावी लागत असे. पुढे ती रक्कम ५०० ते ५००० झाली. लग्नाचा खर्च मुलाकडून केला जायचा. मुलाची आर्थिक परिस्थिती गरिबीची असेल तर मुलीचे वडील लग्न खर्च करतात. पण लग्नानंतर नवदाम्पत्याने मुलीच्या वडिलांच्या घरी राहून त्या खर्चाचे कर्ज फेडल्यानंतरच त्याना स्वतंत्रपणे विभक्त राहता येते. आजही आंतरजातीय विवाहास जातपंचायत मुळीच मान्यता देत नाही. तसे घडलेच तर त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना वाळीत टाकले जाते. बहिणीच्या मुलीबरोबर किंवा मामाच्या मुलाबरोबर लग्न करण्यास प्राधान्य दिले जाते. प्रत्येक लग्नास पंचाची मान्यता आवश्यक असते. जन्म, लग्न, मृत्यू या महत्त्वाच्या प्रसंगी सोयऱ्याला ‘धरून’ राहायची रीत आहे.  दुर्गा माता ही त्यांची कुलदेवता आहे. त्यांचा प्रत्येक सण, आनंदाचा, दु:खाचा प्रसंग किंवा जातपंचायतीच्या निर्णयाचा अंमल हा बकरे कापल्याशिवाय होत नाही.
 मुलगा असो मुलगी असो बाळाच्या जन्माचे आनंदाने स्वागत केले जाते. बाळ जन्मल्यानंतर वार आणि इतर टाकाऊ  वस्तू झोपडीतल्याच एका कोपऱ्यात पुरल्या जातात. पाचव्या दिवशी न्हाणीपूजनाचा आणि सटवाईपूजनाचा कार्यक्रम होतो. सटवाईला बकऱ्याचा बळी दिला जातो. झोपडीजवळ गोल खड्डा करून त्यात बाळ-बाळंतणीला बसवून आंघोळ घातली जाते. नंतर तो खड्डा बुजवून तेथेच पूजा करून बकऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो. या पूजेनंतर बाळंतपणाचा विटाळ संपला असे समजतात. महिला घण मारायला, इतर कामे करायला मोकळी होते.  मुलीच्या सातव्या वर्षांपासून तिला झेपेल असा घण (किमान अडीच कि लोचा) तिच्या हातात दिला जातो. पोटाचे विकार होऊ  नयेत आणि भूक आवरता आली पाहिजे म्हणून बालवयातच पोटावर तप्त लोखंडाच्या सळईने डागण्या दिल्या जातात.
साधारणपणे वयाच्या १२ वर्षांपर्यंत मुली आपल्या कामात तरबेज होतात. ‘चांगले काम केले की चांगला नवरा मिळतो’ हे तिच्या बालमनावर बिंबवले जाते. गरोदरपणात आठव्या महिन्याच्या शेवटपर्यंत महिला घण घालतात. कुटुंबाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने महिलांच्या हातात आहे मात्र पुरुषांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे महिलांवर शिवीगाळ, मारझोड खूप होते. सोलापूर, गंगाखेड, नांदेड भागात महिला जळून मेल्याचे प्रमाण लक्षणीय आहे. प्रचंड अंगमेहनत व अंगदुखीमुळे काहीजणी रात्री झोपण्याआधी दारू पितात.
 मृत्यूनंतर अविवाहितांच्या प्रेताला पुरले जाते तर विवाहितांच्या प्रेताला अग्नी दिला जातो. ग्रामीण भागात प्रेतांचा अन्त्यविधी करण्यासाठी अनेकदा समस्या उद्भवतात. दोन महिन्यांपूर्वी परभणी जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील, येवली गावातील हिरामण तुळशिराम हरणमारे यांचा मृत्यू झाला. त्यांचा अन्त्यविधी करण्यासाठी गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत दोन वेळा सरण रचले परंतु दोन्ही वेळा अन्त्यविधीस विरोध झाल्याने रचलेले सरण व प्रेत हलवावे लागले. शेवटी हातापाया पडून तिसऱ्यांदा सरण रचले व अन्त्यविधी केला गेला. हा समाज भटका, निराधार व भूमिहीन असल्यामुळे असे प्रसंग वारंवार उद्भवतात. गोरमाटी, वाघरी, मेवाडी, मारवाडी मिश्रित यांची एक स्वतंत्र ‘तरीमुखी’ भाषा ही त्यांची बोलीभाषा आहे.
यांची परंपरा, मानसिकता, कुशलता, सवयी, साधनविहीनता व अगतिकता लक्षात घेऊन, खास करून महिलांची जिद्द व सचोटीकडे दुर्लक्ष न करता प्राप्त परिस्थितीत त्याना जीवनाधार व विकासाची संधी देणारे नव नवीन पर्याय शोधण्याची निकडीची गरज आहे.    n