राजन खान

लहानपणापासून मी सारखा नव्या गावांत, नव्या माणसांत राहिलो, भटकलो. पर्यटनंही केली काही, ज्ञान-भान वाढवणारी. गेली ऐंशी हजार वर्ष माणसं पृथ्वीवर इकडून तिकडं जातायत. या प्रवासात त्यांनी जगण्याच्या आणि ज्ञानाच्या असंख्य शाखा शोधल्या. जगण्याचं स्थैर्य शोधलं. माणसाच्या जगण्याच्या शिक्षणाची शाळा माणसांमध्येच असते. या शाळेसाठी माणसांनी सतत प्रवासरत राहिलं पाहिजे. जगभरची ठिकाणं तर पाहिलीच पाहिजेत, पण आयुष्यात जमेल तितक्या माणसांना भेटत राहिलं पाहिजे.. हे सर्व करता करता माझाही निखळ, निव्वळ ‘माणूस’ होण्याचा, माणूस जाणून घेण्याचा प्रवास सुरूच आहे!

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा

पर्यटन आणि प्रवास यांत फरक आहे. मी प्रवास भरपूर केला, पण पर्यटन सहसा नाही. तशी वेळच कधी आली नाही न् संधीही मिळाली नाही. स्वत:च स्वत:चा वेळ ठरवून काही तरी मुद्दाम पाहायला जाणं म्हणजे पर्यटन आणि कुठल्या तरी कामाचं निमित्त मिळून कुठे तरी जावं लागणं म्हणजे प्रवास. तो मी अगदीच लहानपणापासून केला.

वडील सरकारी नोकरीत होते आणि कामात फारच प्रामाणिक होते. आलेल्या पगारात जगणं बसवावं, या विचाराचे होते. त्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे कधी वर्ष-दोन वर्षांना आणि कधी सहा महिन्यांतसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. वयात येण्याच्या वयापर्यंत अशी खूप गावं, तिथे राहून, पाहून झाली. मला आईकडून तीन गावं आणि वडिलांकडून तीन, अशी सहा गावं जोडून मिळाली. कुडाळ, मेढा, मुंबई ही माझी आजोळं. शिरगाव, तांदुळवाडी, पुणे ही वडिलांकडची गावं. वडीलधाऱ्यांबरोबर या सहा गावांमध्ये हेलपाटे घालण्यात माझं बालपण गेलं. सोबतीला वडिलांच्या बदलीच्या गावांचा सहवास वयात येईपर्यंत राहिला. वयाच्या आठव्या वर्षांपासून पुन्हा वडील, त्यांच्या नोकरीनिमित्त होणाऱ्या भटकंतीत, प्रवासात नव्हे, सोबत घेऊन फिरायला लागले. त्यांच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून त्यांना दुर्गम, आडबाजूच्या आणि डोंगराळ भागात बदल्या मिळत. तिथे वाहनांनी प्रवास शक्य नसे. पायी भटकंती करावी लागे. पायवाटा, चढणी, उतार चालावे लागत. वडील हौसेनं सोबत घेऊन जात. जेव्हा विकासाच्या नावाखाली डोंगररांगांची वाट लागली नव्हती, तेव्हा मी वडिलांबरोबर डोंगर, दऱ्या, नद्या, जंगलं असलेल्या किंवा नसलेल्या, स्वत:च तयार केलेल्या पायवाटांनी मुबलक फिरलो. कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा कार्यक्षेत्रातल्या कितीही छोटय़ा वाडी, वस्तीपर्यंत जाण्याची वडिलांची सवय होती. तो त्यांच्या कामाचा भाग होता आणि मौज म्हणून शाळा बुडवायला लावून ते मला घेऊन फिरत. यात माझं जगण्याचं समृद्ध शिक्षण झालं.

आमच्या घरात नांगर, शस्त्रं आणि लेखणी अशा तीनही परंपरा होत्या. त्यामुळे घरातली माणसं चौकस, चिकित्सक, बोलकी, ज्ञानी होती. आजोबा, आई, वडील असे तिघंही बोलके. त्यांच्याबरोबर लहानपणचं फिरणं झालं. सपाटीपासून पर्वतांपर्यंत, वाडीपासून महानगरापर्यंत. या फिरण्यात जे संदर्भ येतील, त्यांची माहिती होत गेली. अगदी पिसवा, ढेकणांपासून जळवांपर्यंत. शेतातल्या पिकांपासून जंगलातल्या वनस्पती, झाडांपर्यंत, झोपडय़ांपासून बंगल्यांपर्यंत. आणि प्रत्येक बदलत्या गावात आयुष्यात येत गेलेली माणसं. त्यांचं अन्न, राहणी, बोलणी, स्वभाव.. अशी विविधता भरपूर. दारातल्या कुत्र्या-मांजरांपासून, रानातल्या गाई-म्हशींपासून, जंगलातल्या लांडग्या, कोल्ह्या, वाघ, अजगरांपर्यंत! वयाच्या पंधरा-सोळा वर्षांपर्यंत आई, वडील, आजोबा यांच्या आधारावरची ही सतत फिरती शाळा राहिली. याच फिरस्तीत आईनं घर कसं चालवायचं, सांभाळायचं, पालक कसं व्हायचं, हे शिकवलं! परक्या गावांत, माणसांत आपलं होऊन कसं जगायचं ते सांगितलं. घरातली धुणी, भांडी, स्वयंपाक करण्यापासून बाजारातल्या व्यवहारापर्यंतच्या गोष्टी शिकवल्या. कष्ट आणि पैसे यांची किंमत किती असते न् पत्रास किती ठेवायची तेही शिकवलं.

या गावोगावच्या फिरस्तीत, दरम्यान कागदं शिरली आयुष्यात. ती शाळेत तर आलीच आयुष्यात, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे घरातही आली. वाचायचा नाद लागला. पुस्तकं वाचणं हा तर मेंदूचा मोठा, अखंड प्रवास. तो सुरू झाला. हाती पडेल तो छापील कागद वाचायचाच, ही सवय झाली. मग चित्रं काढण्यासाठी कागदं आयुष्यात आली. मग लिहिण्यासाठीही त्यांचा वापर सुरू झाला. पुढे रेषांपेक्षा अक्षरांमध्ये बोलणं जास्त सोपं आणि सयुक्तिक वाटू लागलं. पंधरा-सोळाव्या वर्षांपर्यंतच्या मन, मेंदू, शरीर यांच्या प्रवासातच जगण्यातल्या वास्तव आणि काल्पनिक गोष्टींमधला फरक कळू लागला. जात, धर्म, देव, लिंगभेद या काल्पनिक, निर्थक गोष्टी आहेत आणि माणूस, भोवतीची सृष्टी वास्तव आहे, याची जाणीव होऊ लागली. पुढचं आयुष्य मग याच प्रवासाला निघालं.

पंधराव्या-सोळाव्या वर्षीच मग घरातल्या लोकांपासून मानसिकरीत्या सुटा झालो, एकटा झालो आणि मन, मेंदू, शरीराचा एकटय़ाचा, स्वतंत्र प्रवास सुरू झाला. पैसाही कमवू लागलो. त्याची भटकंती सुरू झाली. शिक्षणासाठीचीही भटकंती होती सोबत. त्यासाठी तर उत्तर भारतापर्यंत प्रवास झाला. एका समवयस्काच्या शेतात राबलो. रंगारी झालो. त्यासाठी पुन्हा वाडय़ा-वस्त्यांपासून शहरी वस्त्यांपर्यंत आणि छोटय़ा कुटुंबांपासून, सार्वजनिक संस्थांपर्यंत हिंडणं होऊ लागलं, माणसांचे, व्यवहारांचे अनुभव घेऊ लागलो.

दुसऱ्या बाजूला समवयस्कांबरोबर रोज जशी सुचेल तशी दिशाहीन भटकंती सुरू झाली. तेव्हा सायकल हे वाहन दुर्मीळ आणि महाग, पण कसंबसं करून ते मिळालं. तर मग भटकंतीचा आवाका वाढायचाच. त्यात मग पायी डोंगर, दऱ्या, किल्ले फिरणं, सायकली घेऊन गावं, जत्रा-खेत्रा-यात्रा, कीर्तनं, तमाशे, सिनेमे, नाटकं पाहायला जाणं, एकटय़ानंच कुठल्याही शहराला भिडून येणं सुरू झालं. सोबतीला रोजगार, शिकणं, वाचणं, लिहिणं. मग मुंबईला शिकायला गेलो. तिथं मजुरीपण केली. मग उत्तर प्रदेशात गेलो शिकायला. तिथं सायकल रिक्षाही चालवली. मग मास्तरकी केली. मग पत्रकारिता केली. मग संपादकपणा केला.. मग प्रकाशनातही आलो. दरम्यान, लिहिणं छापून यायला सुरुवात झाली. लोक लेखक म्हणू लागले, तर तोही प्रवास सुरू झाला. सोबत राहिला कायम.

या सर्वात मुख्य आला तो प्रवास चळवळय़ा लोकांचा. वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षांपासूनच हे लोक आयुष्याला स्पर्शू लागले. या सर्वाच्या अनुभवांतून शेवटी एकच झालो, की पूर्ण भेदरहित झालो. राष्ट्र सेवा दलवाले आले आयुष्यात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले आले, छात्रभारतीवाले आले, शेतकरी आंदोलनवाले आले, स्त्रीमुक्तीवाले आले, साम्यवादी आले, शिवसेनावाले आले, दलित पँथरवाले आले,भटके-विमुक्तवाले आले, आदिवासीवाले आले, कामगार आंदोलनवाले आले, रिक्षावाले आले, समाजवादी आले.. या सर्व चळवळींमागनं हळूच आणि नेहमी धर्मवाले आणि राजकारणी येतातच, आणि ते तर सर्वच आले. सर्वच धर्म आणि सर्वच पक्ष आले. विचारधारा आल्या. या सर्वाचा सहवास आणि स्पर्श नियमित होत राहिला. हा प्रवास फार दांडगा झाला! रोजगार, शिक्षण यांसाठी तर प्रत्यक्ष प्रवास खूप केला सर्वत्र. पण या चळवळीवाल्यांमुळे तर प्रत्यक्षात गावोगावी, देशभर फिरलो. डोंगरांमधल्या आदिवासींच्या कुडाच्या मोडक्या झोपडय़ा, भटक्यांची वाऱ्यावरची पालं, कामगारांच्या झोपडपट्टय़ा ते पुढाऱ्यांचे बंगले. जंगल ते शहर असं लई भटकलो! आणि भटकलो नाही, तर राहिलो त्यांच्यात. जगलो.. आणि या सगळय़ांनी शेवट मला माणूस केलं. खरा माणूस. निव्वळ माणूस! लक्षात आलं, की चांगलं, नैतिक माणूस म्हणून जगायचं असेल, माणूस म्हणून आपलं आयुष्य पूर्ण करायचं असेल, तर कुठल्याच वादाच्या नादाला लागायचं नाही. आयुष्यात जगण्याचा मूलभूत वाद एकच असतो. स्वत:चे कष्ट करा, प्रामाणिक राहा, नैतिक राहा. स्वत:च्या कष्टाचं दोन वेळा जेवा, एकदा परसाकडे जा. भाकरी उरलीच असली स्वत:कडे, तर ती जवळच्या गरजवंत माणसाला द्या. दुसऱ्या माणसाला स्वत:इतकाच माणूस म्हणून सन्मान द्या. मग एकदा नैसर्गिक आयुष्य पूर्ण करून मरा आणि मरण्यानंतर स्वत:कडे काहीही शिल्लक ठेवू नका. हा जो काही जगण्याचा सगळा प्रवास झाला, त्या प्रवासानं एवढी छोटी, सुंदर पण महत्त्वाची गोष्ट शिकवली.

या सगळय़ा प्रवासात असंख्य स्थानं आली, असंख्य माणसं आली, असंख्य टोळय़ा आणि समूह आले, असंख्य अनुभव आले, असंख्य साधनं आली, अनेक प्रकारची शिक्षणं आली आणि सगळय़ाच्या शेवटी लक्षात आलं, की बाकी सगळी रूपं घेऊन जगतो आपण, कुठल्या तरी एका भेदाचं आवरण अंगावर घेऊन आयुष्य काढतो आपण, पण ज्यासाठी आपला जन्म झाला, ते केवळ, निव्वळ, निखळ, निर्मळ माणूस म्हणून जगायचं राहूनच जातं आपलं! तर आपण तसं केवळ माणूस म्हणून जगायचं. कुठल्याच भेदात गुंतायचं नाही, कुठल्याच भेदाची बाजू घ्यायची नाही, कुठलाच भेद करायचा नाही. अभेद माणूस म्हणून जगायचं!

प्रवासाबद्दल आणि पर्यटनाबद्दल माझी वेगवेगळी मतं आहेत. स्थलांतर, प्रवास माणसानं जरूर करावा. कारण या गोष्टी माणसाला ज्ञान देतात. अनेक अर्थानी समृद्ध करतात. पर्यटनही काही ज्ञान, भान देणारं असेल तर जरूर करावं. पण त्यात नुसतीच मजा असेल, वेळ घालवणं असेल, तर ते करू नये, असं मला वाटतं. आणि आताच्या जगात ज्ञाना-भानाचं पर्यटन गायब आहे, असंच दिसतं. माणसं मौज करतात, खर्च करतात, धर्माच्या नावाखाली पर्यटन करतात. पर्यटनाच्या मौजेत पुन्हा निर्थक खरेद्या करणं, दारू पिणं, जुगार खेळणं, इतरही काही असेल, तर ते मला वाह्यातपणाचंच वाटतं. सर्वच जाती-धर्मातील लोक धार्मिक पर्यटनाला जातात. पण त्यातही व्यर्थता वाटते. ही सृष्टी संपूर्ण परमेश्वरानं तयार केली आहे, सृष्टीच्या चराचरात देव भरलेला आहे, असं म्हणायचं आणि वर पुन्हा तीर्थस्थळांच्या यात्रा करायच्या. सृष्टीच जर देवानं निर्माण केली असेल, तर अख्खी सृष्टीच तीर्थस्थळ आहे की! मग तुम्ही जिथं राहता, ते ठिकाणही आपोआपच तीर्थस्थळ आहे. तर मग आणखी वेगळय़ा तीर्थस्थळी जाण्याची गरज काय? आणि देव जर चराचरात भरलेला आहे, तर मग जिथं तुम्ही जगता, तिथंच देवाला मनोभावे हात जोडा की! देव भेटून जाईल. देवावर विश्वास आहे आणि सर्वत्रात आणि स्वत:तही तो भरून आहे, असा विश्वास असणारे लोक कुठेही धार्मिक यात्रा, जत्रा, फेऱ्यांना जाणं शक्य नाही, असं वाटतं. आणि धार्मिक यात्रांनी धंदा, व्यवसाय होतो, वगैरे म्हणणारे लोक, तर वंगाळच वाटतात!

दारू, जुगार, खरेद्या आणि वेश्या यांच्यासाठी प्रवास करून दूरवर जाणारे आणि तशा सोयी त्यांना उपलब्ध करून देणारे लोक तर मला भ्रष्ट भांडवलशाही आणि भ्रष्ट मानवीपणाचे प्रतिनिधी वाटतात. ठरवून लोकांना वाईट मार्गाला लावणं आणि लोकांनी ठरवून वाईट मार्गाला जाणं, हाच प्रकार मला या पर्यटनात दिसतो. यात वेश्या म्हणून स्त्रियांना वापरणं, हा तर मानवी समाजाचा किळसवाणा कलंक आहे. स्वत:ला आधुनिक, प्रगत समजणाऱ्या मानवी समाजात स्त्रियांना वेश्या व्यवसाय करावा लागणं, हेच अतिशय घृणास्पद आहे. खरेद्या तर आता तुम्ही कुठेही करू शकता. दारू आणि जुगारही सर्वत्र उपलब्ध असतं. पर्यटनाला जाऊन पुन्हा याच गोष्टी का करायच्या? असं माझं मत आहे.

माणसांच्या स्थलांतरांनी, प्रवासांनी जग घडवलं, जगाचा विकास केला. आज ज्याला केनिया म्हटलं जातं, तिथून ऐंशी हजार वर्षांपूर्वी मानवजातीनं स्थलांतरं सुरू केली आणि ती पृथ्वीभर सगळीकडं पसरली, असं मानलं जातं. गेली ऐंशी हजार वर्ष माणसं पृथ्वीवर इकडून तिकडं जातायत. या प्रवासात त्यांनी माणसाच्या जगण्याच्या आणि ज्ञानाच्या असंख्य शाखा शोधल्या. मानवी जगण्याचं स्थैर्य शोधलं. माणसाच्या जगण्याच्या शिक्षणाची शाळा माणसांमध्येच असते. एका माणसाकडून दुसरा माणूस आणि एका पिढीकडून दुसरी पिढी जगणं शिकत राहते, तर या शाळेसाठी माणसांनी सतत प्रवासरत राहिलं पाहिजे. जगभरची ठिकाणं तर पाहिलीच पाहिजेत, पण आयुष्यात जमेल तितक्या माणसांना भेटत राहिलं पाहिजे, असं मला वाटतं.
अख्ख्या सृष्टीसमोर पृथ्वी कणभर आहे. या पृथ्वीवर प्रत्येक माणूससुद्धा अगदीच कणभर आहे. पण माणसाचा जन्म मौलिक आहे. तर जन्माला आल्यावर प्रत्येक माणसानं आपल्याला जमेल तितकी पृथ्वी जाणून घेतली पाहिजे. ती एका ठिकाणी राहूनही समजेलच, पण तिचे बाकीचेही कोपरे, तिथली माणसं, तिथला निसर्ग थोडं फिरून, हिंडून समजून घेतला, तर एका ठिकाणी चिंचोळा, संकुचित झालेला आपला मेंदू जास्त विशाल होईल, विस्तृत होईल आणि माणूस असण्याचा, होण्याचा अर्थ जास्त व्यापक होईल. माणूस म्हणून जगण्याचा आनंदही जास्त मिळेल, असं मला वाटतं.
पृथ्वीवर असंख्य प्रदेश आहेत. माणसाच्या जगण्याची असंख्य क्षेत्रंसुद्धा आहेत. माणसांनी किमान आपापल्या आवडीच्या क्षेत्रांसाठी तरी जगभर जितकं जमेल तितकं फिरावं, प्रवास करावा. त्यानं क्षेत्रांच्या ज्ञानाचा तर विकास होतोच, पण जगण्याचं सुंदर मनोरंजनही होतं. पुढच्या पिढय़ांसाठी ज्ञानाचा प्रवाह खळखळता राहतो.

मी लिखाण करत राहिलो. माझ्या लिहिण्याचा मुख्य विषय माणूस राहिला. मला नेहमीच भूगोलाची आणि त्यावर जगणाऱ्या माणसांची उत्सुकता वाटत राहिली. ही उत्सुकता हेच काम मी आयुष्यभरासाठी लावून घेतलं आणि याच कामाच्या नादात मी नेहमी भटकत राहिलो. जाईन तिथं हे काम करत राहिलो.. माणूस जाणून घेणं. त्याचा फायदा असा झाला, की जगातल्या सर्व काल्पनिक भेदांशिवाय निव्वळ माणूस, नैतिक माणूस म्हणून जगता येईल, याचा शोध मला लागला..