सुनील सुकथनकर
माझा पुष्कळ प्रवास चित्रपटांसाठीच झालेला; पण त्याचं वैशिष्टय़ हे, की केवळ ‘लोकेशन’ शोधणं किंवा चित्रीकरण करणं, इतका तो मर्यादित राहिला नाही. अशिक्षित किंवा सुशिक्षित, साधी, ‘खरं’ जगणारी, संघर्ष करून आपली वळणवाट जपणारी माणसं मला दिसली. माणसं, संस्कृती, कधी निवांत, तर कधी अक्राळविक्राळ निसर्ग, यांनी भरलेल्या प्रवासानं असंख्य अनुभवांचा कल्लोळ निर्माण केला. ते संगतवार लावताना माणसांच्याच कितीक नवीन कथांनी मनात जन्म घेतला, हे सर्व या प्रवासाचंच देणं!
I want to reach nowhere Destination, I donl t care… ‘मोर देखने जंगल में’ या आमच्या हिंदी भाषेतल्या चित्रपटातल्या नायकासाठी मी एक गीत लिहिलं होतं, त्याची ही सुरुवात होती. मला अनेकदा वाटतं, की हीच माझी प्रवासाकडे बघण्याची दृष्टी आहे! कदाचित आयुष्याकडेही. एखाद्या ठिकाणी पोहोचायचं ठरवल्यावर पोहोचणं- (एकदाचं किंवा काहीही करून किंवा लवकरात लवकर!) हेच ध्येय होऊन जातं. त्यापेक्षा प्रवास हाच महत्त्वाचा नाही का? असं काहीसं म्हणायचं होतं मला त्या गाण्यातून. आमच्या (मी आणि सुमित्रा भावे) चित्रपटांत सतत प्रवासाचा आणि त्यात होणाऱ्या संभाषणाचा एक तरी प्रसंग असतोच आणि तो महत्त्वपूर्णही असतो. प्रवासात एक वेगळा एकटेपणा मिळतो, अनेक गोष्टींचे ताळेबंद जुळवले जातात, नवनवे प्रश्न उपस्थित केले जातात, शोध घेतले जातात, नात्यांचा अर्थ शोधायला- अगदी भांडायलादेखील अवसर मिळतो. यातूनच हे प्रवासाचे प्रसंग आमच्या चित्रपटांत आले असतील का?..
पर्यटन या शब्दाला मला, आज तरी एक व्यावसायिक आणि उपभोगाचा, काहीसा वरवरचा वास येतो. टूर-पॅकेजेस, टिक-मार्किंग करत स्थळांना भेटी देणं, तिथल्या खरेद्या, त्याची समाज-माध्यम प्रसिद्धी, अशी एक नकारात्मक झाक मनात डोकावल्याशिवाय राहात नाही. निरनिराळे प्रांत, तिथली गाव-खेडी, शहरं, संस्कृतींच्या निरनिराळय़ा टप्प्यांवर असणारे समाज, हे सगळं अनुभवणं हा प्रवासाचा खरा अर्थ मागे पडून बऱ्याचदा ‘परक्या’ पर्यटकांपर्यंत एक दिखाऊ, ‘सोपीकरण’ झालेला माल ‘डिलिव्हर’ केला जातो की काय, अशी शंका येते. आपण आता चित्रपट ही पॉपकॉर्नबरोबर ‘खाण्याची’ गोष्ट मानू लागलो आहोत, तसं पर्यटन हाही एक अनुभव न मानता वस्तू मानायला लागू अशी भीती वाटते. म्हणून मला तरी ‘प्रवास’ या शब्दातच काही तरी सापडत राहतं.
कराड गावातल्या जन्मानंतर भोवतालचा सातारा जिल्हा शालेय सहलींतून पाहण्यापासून जग पाहायच्या माझ्या अनुभवाला सुरुवात झाली. पण खरा आनंद असे तो आजोळी बेळगावला जातानाचा. आगिनगाडीचा प्रवास.. अगदी प्रकाश नारायण संतांच्या लंपनला बेळगावच्या किल्ल्याजवळ पोहोचताना दिसणारी आगगाडी मलाही माझ्या लहानपणी अनुभवायला मिळाली. खिडकीतून दिसणारा बदलता निसर्ग, घरं, माणसं, गुरंढोरं बघत राहणं हा माझा आवडीचा विषय. ‘पळती झाडे पाहू या’ ही काव्यपंक्ती म्हणजे अगदी खरा अनुभव होता. ही पळती झाडं आणि विजेचे खांब, त्यातून वरखाली होणाऱ्या विजेच्या तारा आणि गाडीची खडखड हळूहळू संमोहन केल्यासारखी जादू करायचे. किंवा मुंबईकडे होणारा प्रवास, त्यातही पावसाळय़ात कोसळणारे धबधबे, हिरव्याकंच डोंगर-दऱ्या आणि एकदम गप्प करणारा अंधार निर्माण करणारे बोगदे. कराडजवळची काही खेडी तेव्हाच अनुभवविश्वाचा भाग बनली. कधी खालच्या अंगाला नदी उथळ व्हायची तिथून चालत जाऊन, कधी बैलगाडीतून बोरबनला, कधी ढेबेवाडीला गुळाच्या उकळत्या काहिली टक लावून पाहात केलेला गुऱ्हाळांचा दौरा, कधी सायकल मारत पाचवडला तर कधी बसनं चाफळला.. यातच केव्हा तरी मला माझं समुद्रप्रेम सापडलं. खरं तर एकूण पाण्याबद्दलच मला प्रेम आहे. पाण्याचं एक सुंदर रूप तर आमच्या गावाच्या कृष्णा-कोयना प्रीतिसंगमात रोज पोहायला जाताना अंगवळणी पडून गेलं होतं. पण कधी बांद्याची झुळझुळणारी नदी, पुलाखाली दिसणारी घटप्रभा, लोणावळय़ाजवळचं तुंगार्लीचं तळं, मुंबईच्या वाटेवर खायला थांबण्याच्या जागी अचानक दिसलेला खोल जाणारा गूढ धबधबा, अशा पाण्याच्या अनेक परी भुरळ घालणाऱ्या होत्या. पण गोव्याला शांतादुर्गा-मंगेशी मंदिरांना होणाऱ्या कौटुंबिक भेटीला जोडून गोव्याचा समुद्र भेटू लागला आणि त्याच्याशी कायमची दोस्ती झाली. आजही ‘कुठे जायचं’ याला माझं उत्तर ‘समुद्र’ हेच असतं.
वय वाढत गेलं तसंतसं ‘माणूस’ या प्राण्याबद्दलचं कुतूहल वाढत गेलं आणि मग प्रवास या गोष्टीचा हेतूच ‘माणसं पाहणं’ हा होऊन गेला आणि चित्रपटासारख्या माध्यमानं त्याला खतपाणी घातलं. आजपर्यंतचे असंख्य प्रवास या माध्यमाच्या कामाच्या पूर्वतयारीसाठी करावे लागले आणि ते समृद्ध अनुभव देत राहिले. अनेक चित्रपट महोत्सवांनी दिलेल्या प्रवासाच्या संधी नवनवी क्षितिजं उलगडत गेल्या. लघुपट-चित्रपट मनात तयार होतानाच तो एक काल्पनिक वास्तव घेऊन येतो. पण चित्रपटात ते निर्माण करण्यासाठी अगदी तसाच किंवा मिळता-जुळता भवताल शोधणं, ही एक नितांत आनंदाची प्रक्रिया असते. कधी कधी तर चित्रपटापेक्षा या पूर्वतयारीच्या प्रवासाची लज्जत जास्त वाटू लागते. चित्रपटात आम्ही निवडलेले आणि आमच्यापर्यंत आणले गेलेले बहुविध विषय आम्हाला किती निरनिराळय़ा ठिकाणी घेऊन गेले! ‘पाणी’ लघुपटाच्या वेळी दिवे घाटापायथ्याची दुष्काळी गावं पालथी घातली, तर ‘चाकोरी’ किंवा ‘सरशी’ हे लघुपट आम्हाला सिंहगडाच्या पल्याडच्या रांझे, कल्याण, या हिरव्यागार निसर्गातल्या गावांत घेऊन गेले. ‘संवाद’मधला डांगचा वलसाड-धरमपूरजवळचा, चरखा आणि खादीच्या कामात रंगलेला, सागाच्या जंगलाच्या वाटेनं जाणारा आदिवासी भाग, ‘दोघी’ चित्रपटाला सांधणारं सासवडजवळचं सुकलेल्या अंजीरबागांचं आणि जवळच्या हळदीत रंगलेल्या पिवळय़ा जेजुरीच्या खंडेरायाच्या डोंगराचं, तिथल्या वाघ्या-मुरळीचं वास्तव, ‘ज़िन्दगी ज़िन्दाबाद’च्या अभ्यासात घडलेलं मुंबईच्या रस्त्यावर भटकणाऱ्या पोरांच्या ख्रिश्चन शेल्टर-होमपासून फोरास रोडच्या आणि नंतर पुण्यातल्या दाणे-आळीच्या देहविक्रयनगरीचं विश्वरूपदर्शन, ‘कास्प’ संस्थेच्या लघुपटासाठी पिंजून काढलेली केरळमधली कालव्यांनी वेढलेल्या कोदाड बेटापासून ते उंच पर्वतावर गूढ चर्च असलेल्या काल्वेरी माउंटसारखी निसर्गरम्य खेडी, ‘बेवक्त बारिश’ साठी सापडलेला भरतपूरजवळचा राजस्थान-हरयाणा-दिल्ली यांना सांधणारा, मथुरा-वृंदावनची महती सांगणारा, पण आता हाय-वे संस्कृतीनं पूर्ण नासवून टाकलेला, उंटाच्या गाडय़ा फिरणारा, लेहंगे फलकारत हिंडणाऱ्या देखण्या मुलींचा (ज्यातल्या काही मुंबईला डान्स-बारमध्ये पाठवण्याची प्रथा तयार झालेला आणि एरवी बायांच्या चेहऱ्यावर पूर्ण घुंगट ठेवणारा) विचित्र रुक्ष प्रदेश.. काय काय आणि किती किती दाखवलं या चित्रपट-माध्यम-प्रवासानं!
एका वेगळय़ाच चित्रपट प्रकल्पासाठी कोकणातली अत्यंत आतली खेडी भटकत असताना सापडलेल्या अनेक निर्जन आणि भारावून टाकणाऱ्या देवराया- ज्यांची आठवण नंतर स्किझोफ्रेनियावर संहिता लिहिताना सुमित्राला झाली आणि त्यातून ‘देवराई’ जन्माला आला. सारवलेल्या अंगणांची, कौलारू घरं असणारा, कमळाची तळी आणि दशावतारी खेळ सामावणारे मोठाले सभामंडप असणाऱ्या देवळांचा पाट-परुळे-वालावलचा रम्य प्रदेश, तिथली अनोळख्यालासुद्धा येताच सहज जेवायला बसवणारी साधी माणसं आणि तिथल्या मुलींच्या नजरेतली चलाख चमक पाहून ‘घो मला असला हवा’ हा चित्रपट तयार झाला. त्या संशोधनातच अचानक सापडलं
चिं. त्र्यं. खानोलकरांचं ‘कोंडुरा’, तिथला उसळता समुद्र, लाटा अंगावर घेणारा उंच भिववणारा कातळ आणि गूढ आमराया.. या कोकण भटकंतीत विखुरलेल्या गावांना सांधणारं लाल येष्टीचं जाळं उमजत गेलं आणि पुढे त्यातूनच माहितीच्या अधिकारावर चित्रपट बनवायचा म्हटल्यावर ‘एक कप च्या’साठी कणकवली-मालवणची पार्श्वभूमी, तिथल्या कष्टाळू बस-कंडक्टरची गोष्ट बनून समोर आली. या काळातच प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ शिरीष बेरींशी ओळख झाली होती. त्यांचं ‘हिरवाई’ हे नादवडे गावचं घर नुसतं पाहिलं नव्हतं, तर अनुभवलं होतं. त्यातूनच त्यांच्याच ‘सागराई’ या देवगडच्या किनाऱ्यावरच्या घरात ‘कासव’ चित्रपटाला आपला अवकाश सापडला. निराशेच्या विकाराचा शोध घेता घेता जेव्हा सुमित्राच्या मनात पाण्यातल्या कासवाच्या प्रतीकानं जन्म घेतला, तेव्हा त्यानिमित्तानं दिवेआगरजवळच्या वेळासपासून ते मालवणजवळच्या तांबळडेगपर्यंत किती तरी निर्जन किनारे पालथे घातले गेले! कासवांच्या संवर्धनाचं काम करणारे शोधता शोधता निसर्गाशी नातं जोडणारे अनेक ध्यास घेतलेले वेडे लोक भेटतच गेले. गेल्या वीस वर्षांत कोकणच्या या साध्या लोकांवर होत असलेली शहरी आक्रमणं दिसली. तरीही वळणावळणांचा, गोव्याकडे जाणारा ‘घरगुती’ रस्ता सपाट बेधडक कंटाळवाण्या हाय-वेमध्ये रूपांतरित होताना पाहावा लागला. देवराईतून रस्ता काढण्यानं वेडापिसा झालेला आमच्या चित्रपटामधला ‘मानसिक रुग्ण’ शेष देसाई योग्यच म्हणत होता, हे जाणवलं.
‘वास्तुपुरुष’साठी सातारा जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा पिंजून काढूनही देशावरचा जुना ब्राह्मणी वाडा काही सापडेना. या शोधातून मोठय़ा मोठय़ा शहरांनी आपल्या सांस्कृतिक आणि राजकीय आक्रमणातून गावांची व्यक्तिमत्त्वं किती भ्रष्ट करून टाकली आहेत याचं विषण्ण करणारं दर्शन घडलं. नुसती डागडुजीच नव्हे, तर जीर्णोद्धाराच्या नावाखाली जुन्या मंदिरांचा, घरांचा, वाडय़ांचा होणारा ओंगळ कायापालट थक्क करणारा होता. ‘आधुनिक महाराष्ट्र’ असं म्हणताना आणि इतिहासाचा खोटा गौरव करत राहताना जुन्या, सुंदर, दुर्मीळ वस्तू, ग्रामरचना या साऱ्यांना आपण किती तिलांजली दिलीय हे जाणवलं. याउलट यू. आर. अनंतमूर्तीच्या ‘सूर्यन कुद्रे’ या गोष्टीवर टेलिफिल्म करण्यासाठी हेग्गुडू, तीर्थहळ्ळी आणि शिमोगा, अगुंबे या भागात फिरताना जुनी घरं, ठिकाणं, अगदी अनंतमूर्तीनी लिहिताना जे डोळय़ांसमोर ठेवलंय तेच जणू- असं सापडत गेलं. तिथल्या गावांमध्ये घराघरांत त्यांचं पुस्तक होतं आणि ही कथा त्यांना माहीत होती.
‘बाधा’मधल्या धनगरांची वस्ती शोधत फलटणजवळच्या माळांवर पोचल्यावर अशिक्षित असून संशोधकवृत्ती असणारे सखारामभाऊ लकडे हे मुंडासेवाले धनगर भेटले. ते साक्षात गुंथर सोन्थायमर या महान संशोधकाला साहाय्य करणारे होते, हेही पुढे कळलं. अशी किती उदाहरणं आठवत राहतात. हा चित्रपटाचा उद्योग या गावांमध्ये, घरांमध्ये आणि तिथल्या माणसांच्या मनामध्ये आम्हाला घेऊन गेला. या प्रवासातून आलेली समृद्धी एरवी कुठून येणार होती?
परदेशाचं आकर्षण मला वाटलं असं म्हणता येणार नाही. पण माणसं आणि खाद्यसंस्कृती अनुभवण्याचं कुतूहल मात्र अपार होतं, आहे. अशी पहिली भरारी मी घेतली ती हाँगकाँगच्या दिशेनं. सुमित्रा त्या वेळी आमचा ‘पाणी’ हा लघुपट ऑस्ट्रेलियाला दाखवून गौरी देशपांडे या तिच्या लेखक मैत्रिणीकडे हाँगकाँगला येणार होती. मी तिथे आधीच स्वतंत्रपणे पोहोचलो. मुंबईला ढगांतून विमान वर जातानाचा आणि हाँगकाँगला जवळजवळ समुद्रात उतरण्याचा अनुभव मला कधीच विसरता येणार नाही. विशीतल्या मला गौरीकडून, तिच्याबरोबर हाँगकाँग भटकताना, तिच्या तिरकस टोमणेवजा शेऱ्यांमधून देश-परदेशची माणसं, आंतरराष्ट्रीय राजकारण, याची गुंतागुंत समजून घ्यायला खूप मजा आली. नंतर मिल-व्हॅलीसारख्या अमेरिकन महोत्सवाच्या निमित्तानं पाहिलेली नापा-व्हॅलीची वाईनयार्डस् असोत, की रोममध्ये पायी भटकत पाहिलेले गल्लीबोळ असोत. फ्लोरेन्समधला डेव्हिडचा नजरबंदी करणारा पुतळा असो, की व्हेनिसमधल्या कालव्याकाठच्या जुन्यापुराण्या इमारती असोत, बार्सिलोनामध्ये रस्त्यावर निवांत चाललेले संगीताचे जलसे असोत किंवा तिथल्याच पिकासो संग्रहालयाजवळ असणाऱ्या कलावंतांच्या कॅफेमध्ये धूम्रवलयानं भरलेल्या वातावरणात अनुभवलेली कावा आणि अन्चोवी माशाची डिश असो, तिथल्याच छोटय़ाशा गल्लीतलं ऑक्टोपस टांगलेलं रेस्टॉरंट असो, की बार्सिलोनाच्या मंडईतलं वांगी आणि टर्की घातलेलं ऑम्लेट असो, लंडनचे तीनशे वर्ष जुने पब्स असोत, की एडिनबराचा किल्ला असो.. जर्मनीत हाईडलबर्गमध्ये भल्या पहाटे रस्त्यावर एकटीच पाव आणायला डुगडुगत निघालेली म्हातारी पाहून मनावर न विसरणारा आघात झालाय.. हे सारं अनुभवताना तिथल्या तिथल्या माणसांचे इतके अनुभव गाठीशी आहेत की त्यावर कादंबऱ्याच लिहायला हव्यात!
इटलीमध्ये मोन्ते-कातीनीच्या उबदार झऱ्यापाशी फेलिनीच्या ‘एट अँड हाफ’ चित्रपटामधला प्रसंग मला आठवला. तिथल्या संयोजकांना हे सांगताच ते म्हणाले, ‘‘हो, इथंच तर झालंय ते शूटिंग! पण आता खूप बदललंय!’’ व्हॅटिकन सिटीमधलं मायाकेलान्जीलोचं महान काम पाहून येताना एखादी गल्ली ओळखीची वाटे आणि लक्षात येई, अरे, इथे तर ‘बायसिकल थीफ’मधले बाप-लेक निराश होऊन बसले होते किंवा इथेच तर ग्रेगरी पेक ऑड्री हेपबर्नला घेऊन स्कूटरवर फिरला होता ‘रोमन हॉलिडे’मध्ये! रोममध्ये अली या इराकमधून विस्थापित चित्रकाराच्या घरी राहताना किंवा व्हॅन्कूव्हरच्या सुझान दुश्काकडे तिच्या बुद्धिस्ट आध्यात्मिक नजरेतून एमिर कुस्तुरिका हा सर्बियन जिप्सी दिग्दर्शक समजून घेताना किंवा मॉन्ट्रियालला थॉमस वॉच्या समंजस नजरेतून भारतीय सिनेमाबद्दल ऐकताना जो विश्व-कुटुंबाचा अनुभव आला आहे, तो शब्दांत सांगणं कठीण आहे. निसर्गाचं अत्यंत अपरिचित रूप कधी विक्राळ नायगारा धबधब्यासारखं समोर येतं, तर कधी स्विस पर्वतरांगांमधल्या ग्लेशियर ट्रेनमधून, पांढऱ्या बर्फावरून पूर्ण काचेच्या छपरांतून परावर्तित प्रकाश घुसवून डोळे दिपवून टाकतं. असंख्य अनुभवांचा कल्लोळ!
गेली दोन-तीन वर्ष माझी पत्नी शिल्पा भारतभर फिरून एक माहितीपट बनवते आहे. त्यानिमित्तानं मीही संधी मिळेल तेव्हा भारतभ्रमण चालू ठेवलं आहे. नुकतंच मेघालयहून परत आल्यावर तिथली भातावर डाळ आणि पोर्कचा रस्सा घातलेली बशी आठवत राहतेय, की वेडी-वाकडी पसरलेली गुहा आठवत राहतेय, की ढगांनी आच्छादलेल्या दरीमधली शांत देवराई, याची उकल मला होत नाही. या काळात सोलोंगजवळच्या बर्फातून फिरताना किंवा कोचीच्या प्रदर्शनांमधून हिंडताना किंवा कच्छच्या रणातल्या विस्तीर्ण मिठागरांमध्ये राबणाऱ्या लोकांना भेटताना नव्या नव्या कहाण्या माझ्या मनात जन्म घेताहेत. त्याचं रूपांतर कलाकृतींमध्ये करण्यासाठी तिथे पुन्हा पुन्हा जावं लागेलच. प्रवास सुरूच आहे, सुरूच राहील..
sunilsukthankar@gmail.com