या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

|| शुभदा देशमुख 

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील गोंड आदिवासींची दिवाळी कॅलेंडर किंवा पंचांगाप्रमाणे साजरी केली जात नसून प्रत्येक गाव आपल्या सोयीनुसार मराठी कार्तिक महिन्यात ती साजरी करतं. एकूणच शेतीची कामे लक्षात घेऊन त्यानुसार ग्रामसभा घेतली जाते. गावातील सर्वांना त्यांची शेतीची कामे संपली का, त्यांच्या घरात सण करण्यासाठी धान्याची सोय आहे का, कुणाच्या घरात कुणी गंभीर आजारी आहे का, मुलांच्या शाळा, सुट्टी कधी आहे, हे सगळं विचारून नंतर गुराखीला विचारण्यात येते की त्यांना ती तारीख सोयीची आहे का आणि त्यानुसार गावदिवाळीची तारीख ठरवली जाते. आणि मग वाद्यांच्या तालावर, नृत्याच्या लयीवर सर्वसमावेशक दिवाळी साजरी के ली जाते.

आदिवासींची दिवाळी म्हटलं तर बरेचदा अनेकांना वाटतं की, घुंगरं- मोरपीस लावून आदिवासींचा नाच पाहायला मिळणार, काही विशेष पदार्थ खायला मिळणार आणि दारू तर असणारच. बऱ्याचदा कंत्राटदार, व्यापारी किंवा गैर आदिवासी कर्मचारी एवढाच विचार करून त्या त्या भागातील आदिवासी गावात दिवाळी साजरी करायला, पाहायला जातात. पण आदिवासी नाच करतात ते कधीही दुसऱ्यांना रिझवण्यासाठी नाही, तर स्वत:च्या आनंदासाठी. लग्न, काही विशेष सण, एवढंच नाही, तर म्हाताऱ्या माणसाचा मृत्यू झाला असेल तेव्हाही ते नृत्य करतात अर्थात मृत्यूच्या प्रसंगाची वेगळी नृत्यं, गीतं व वाद्यं असतात. नृत्य, गीतं आणि वाद्यं हे आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. यासोबतच सामूहिकता हाही आदिवासी संस्कृतीचा गाभा आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील गोंड आदिवासी दिवाळी खूप आनंदाने साजरी करतात. हा तालुका गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेला आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. इथं गोंड, गोवारी आणि कंवर आदिवासी समुदाय आहे. या भागात दिवाळी कॅलेंडर किंवा पंचांगाप्रमाणे साजरी के ली जात नसून प्रत्येक गाव आपल्या सोयीनुसार मराठी कार्तिक महिन्यात ती साजरी करतं. एकूणच शेतीची कामं लक्षात घेऊन त्यानुसार ग्रामसभा घेतली जाते. गाव पाटील किंवा महाजन सर्वांच्या सहमतीनं दिवाळी कधी साजरी करायची हा निर्णय घेतात. पूर्वी यात आदिवासी स्त्रिया सहभागी नसायच्या, पण अलीकडे त्याही सहभागी होऊ लागल्या आहेत. या निर्णयात पाटील, महाजन यांच्यासह गुराखी (गोवारी) याची महत्त्वाची भूमिका असते. गावातील सर्वांना त्यांची शेतीची कामे संपली का, त्यांच्या घरात सण करण्यासाठी धान्याची सोय आहे का, कुणाच्या घरात कुणी गंभीर आजारी आहे का, मुलांच्या शाळा, सुट्टी कधी आहे,  हे सगळं विचारून नंतर गुराखीला विचारण्यात येतं, त्यांना ती तारीख सोयीची आहे का, आणि त्यानुसार गावदिवाळीची तारीख ठरवली जाते.

प्रत्येक गावात तीन दिवस दिवाळी असते. एका परिवारातील म्हणजे एका गावात एका आडनावाचे जे जे लोक असतील (उइके, गोटा, काटेडे आदी.) ते एकत्र येऊन पूजा व जेवण करतात. सगळ्या घरातील भिंती, मातीच्या असतील तर शेण- मातीनं सारवल्या जातात. अंगणात सडा घालतात. पूर्वी तांदूळ पिठाची रांगोळी घातली जायची. आता तयार रांगोळ्या गावात मिळतात. त्यामुळे रांगोळ्या वापरल्या जातात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गुराखी येऊन प्रत्येक घरी नवीन चुली गाईच्या गोठ्यासमोर तयार केलेल्या असतात, तिथं तो तिरपीन (मोहाची दारू) टाकतो. त्यानंतर घरातील स्त्री छोट्या मडक्यात शेतातला नवीन तयार तांदूळ टाकते. त्यावर मातीचं झाकण ठेवतात व त्यावर दिवा लावला जातो. हा दिवा रात्रभर जळत असतो. या दिवशी सुरुती पूजा करतात. संध्याकाळी गावाबाहेर झाडाखाली ठेवलेल्या देवाला तेल-हळद नेतात. गायींना आंघोळ घालून तेल- हळद लावली जाते. देवासमोर दिवा ठेवताना, ‘सगळी जनावरं आत्तापर्यंत चांगली राहिली, त्यांना तसंच राहू दे’ अशी प्रार्थना केली जाते.

दुसऱ्या दिवशी सकाळी चहांडापेन व भीमनपेन (गोंडी भाषेत देवाला पेन म्हणतात.) यांची पूजा करतात. या दिवशी नवीन तांदळचा भात, नवीन तांदूळ पिठाच्या आकस्या (धिरडी), खिचडी, सुरण भाजी, इतर भाज्या- कोहळा, लाल भोपळा, दुधी भोपळा, माटाळू (वेलीवर लागणारे कंद), इतर नव्याने आलेल्या भाज्या शिजवतात. सुरण, कोहळा, माटाळू दिवाळीत देवाला प्रसाद म्हणून दाखवल्यानंतरच खातात. घरात असणाऱ्या सर्व गायींना नवीन सुपात खिचडी खाऊ घालतात. त्यांची पूजा करतात. या दिवसाला आता गावात लक्ष्मीपूजन म्हणतात. गोवाऱ्याला (गाई राखणारा) तांदूळ, मीठ, तिखट, डाळ व शक्य असेल त्याप्रमाणे पैसे देतात. या पैशांना ‘भोजारा’ म्हणतात. प्रत्येक घरातून असं दान दिलं जातं. गावाच्या विस्ताराप्रमाणे गावात एक-दोन गुराखी असतात. या गुराख्यांना वर्षातून एकदाच अशा प्रकारे मोबदला दिला जातो. भीमनपेनच्या पूजेला स्त्रिया जातात, मात्र चहांडापेन पूजेला त्या जात नाहीत. यामागचे कारण समजू शकलेलं नाही. ज्या गावी दिवाळी नसेल त्या दिवशी नातेवाईक एकमेकांकडे जातात.

तिसरा दिवस हा पाडवा असतो. या दिवशी मांसाहार असतो. प्रत्येक कुळाप्रमाणे त्यांना जे खायला चालत असेल त्याप्रमाणे बकरा, कोंबडा  आदी गावात ठरवून कापले जातात. सर्व कुळातील (गोत्र-आडनाव) लोकांना सर्व प्रकारच्या प्राण्यांचं मांस खाणं चालत नाही. त्यांच्या नियमाप्रमाणे खाण्याचे नियम काटेकोर पाळले जातात. काही गावात अलीकडे नियम ठरवले आहेत, त्यामुळे दारूसुद्धा पूजेला आणि पिण्यासाठीही वापरली जात नाही. मोहाचं पाणी किंवा पूजेपुरती दारू वापरली जाते. गावाचा निर्णय असेल तर हा नियमही काटेकोरपणे पाळला जातो. या दोन दिवसांत तृतीयपंथीय समाजातील लोक येऊन धान्य गोळा करतात. त्यांना ‘मंडली’ म्हटलं जातं. त्यांना सूपभर तांदूळ तरी दिले जातात. तो त्यांचा अधिकार समजला जातो. रात्री युवक, युवती, स्त्री-पुरुष सगळे एकत्र येऊन वाद्याच्या तालावर नृत्य करतात. अलीकडे मनोरंजनाची साधनं आली आहेत,

 पण पूर्वी हेच मनोरंजन असल्यानं नाच व्हायचाच. अलीकडे काही भागात ही कला संपुष्टात येत चालली आहे. या गाण्यात एक मुख्य ओळ   ‘रेला री रेलो’ ही सारखीच असली तरी इतर वर्णन- शेताचं, फुलांचं, विविध भावनांचं, वेळेवर त्या त्या वेळी सुचेल तशी रचना केली जाते. 

या प्रकारे गाव-समाजाशी जोडून असणाऱ्या प्रत्येकाचा वाटा त्याला देऊन निसर्गात नव्यानं आलेल्या भाज्या, धान्य यांची पूजा करून निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. गावातील प्रत्येक घराची सोयसुविधा पाहून सर्वसमावेशक पद्धतीनं दिवाळी खऱ्याखुऱ्या आनंदानं साजरी केली जाते.

म्हणूनच हा समाज मागासलेला नाही तर सुसंस्कृत व कला-गुणांचा चाहता आहे.                         

( लेखिका कुरखेडा, जि. गडचिरोली येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था चालवतात.) 

shubhadadeshmukh1505@gmail.com 

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author shubhada deshmukh article comprehensive diwali festival for tribals akp
First published on: 06-11-2021 at 00:04 IST