आमच्या पिढीनं नवीन तांत्रिक शिक्षणाची सुरुवात वयाच्या पस्तिशी-चाळिशीत केली. पण आता ६५ व्या वर्षीसुद्धा त्याची रुची कमी झालेली नाही. आमच्यासाठी ही तांत्रिक गोष्टींची सुरुवात इलेक्ट्रॉनिक टंकलेखनानं झाली. त्याच्यावर हात बसेपर्यंत कॉम्प्युटर्स आले. कधीही कॉम्प्युटरचे वर्ग नाही केले, पण मला त्या वेळचे वरिष्ठ अधिकारी खूप चांगले मिळाले होते. त्यांचं प्रोत्साहन संगणक शिकण्यात कामी आलं. त्या वेळच्या ‘वर्डस्टार’मध्ये टाइप करायला शिकले. मग फोटोकॉपी करणं, स्कॅन करणं,
इ-मेलनं फाइल पाठवणं, वगैरे बरंच काही गरजेचं नवीन शिकत गेले.




‘नोकिया’चा पहिला मोबाइल घेतला आणि त्याचे धडे घेणं चालू केलं. नंतर लॅपटॉप हाती आला. त्यामध्येही इंग्रजी-मराठी टायपिंग करणं, मेल पाठवणं, ‘एमएस ऑफिस’वर काम शिकणं गरजेचं झालं. निवृत्तीच्या आधी ‘अॅपल’चा लॅपटॉप घेतला. त्यावर हात बसवणं सोपं नाही गेलं. पण जिद्दीनं ते केलं. खरं पाहता जे काही येत आहे ते फारच थोडं आहे. पण जिथे अडतं तिथे गूगलची मदत घ्यायला शिकलेय. नवीन फोन घेतल्यावरही सर्व नवीन भासे, पण माझ्यापेक्षा लहानांना विचारताना मी कधी संकोच ठेवला नाही. फक्त एकच समस्या येते, की त्यांच्याकडे वेळेची कमतरता असते आणि थोडं त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. गंमत अशी, की एकीकडे मी इतरांकडून शिकत होते आणि त्याच वेळी माझ्या ८५ वर्षांच्या आईला यूटूयबवर नवीन पाककृतींचे व्हीडिओ कसे लावायचे, ते मी शिकवत होते. मागील वर्षी मी ‘चतुरंग’मधील ‘सोयरे सहचर’ या सदरासाठी एक लेख पाठवला होता. त्यासाठी ‘पीडीएफ’ करणं, वर्डमध्ये सॉफ्ट कॉपी पाठवणं भाच्यानं शिकवलं होतं. तेव्हा खूप मजा आली होती. आज जवळजवळ सर्व व्यवहार घरी बसून ऑनलाइन करायला जमतात. सर्व बिलं, कार आणि स्कूटरची पॉलिसी, पैसे ट्रान्सफर करणं, फ्लॅटचा मेन्टेनस भरणं, प्रॉपर्टी टॅक्स भरणं, क्रेडिट कार्डचं पेंमेंट वगैरे. संपूर्ण बाजारहाट मोबाइलवरून पैसे भरून करत आहे. एका विचित्र अनुभवानं मात्र मला साखरझोपेतून खडबडून जागं केलं आणि फोन वापरताना आपण अधिक सजग राहायला हवं याचा चांगलाच धडा दिला.
हेही वाचा >>> मोडला नाही कणा..
करोनाकाळात आई जेव्हा मला एकटं करून जगातून निघून गेली, त्यानंतर नवीन तंत्रानंच मला हात दिला होता. त्या काळात खूप वेबिनार्स ऑनलाइन अटेंड केली. योग वर्ग, वर्कआऊट वर्ग, गाणी ऐकणं, यामध्ये जीव रमला. पण हे तांत्रिक शिक्षण जितकं आत्मसात करणं आवश्यक आहे, तेवढीच त्यातल्या धोक्यांची जाणीव ठेवणं आवश्यक आहे, हे मला एका प्रसंगानं शिकवलं. तीन वर्षांपूर्वी मी एका ऑनलाइन फसवणुकीच्या प्रसंगाला सामोरी गेले. आईच्या उतारवयातल्या आजारपणामुळे तेव्हा माझ्या झोपेच्या वेळा अनियमित झाल्या होत्या. सतत जागरण होत असल्यामुळे दैनंदिन आयुष्यात एका क्षणी मी काय करतेय हेच मला कळलं नाही आणि मला आलेल्या एका फोनवरच्या व्यक्तीनं एक ‘ओटीपी’ विचारताच मी त्याला तो सांगून टाकला. आतापर्यंत इतकं शिकून, घोटून फोनचं तंत्र अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत असूनही त्या एका कृतीनं मी मोठं आर्थिक नुकसान करून घेतलं. ही गोष्ट घडत होती तेव्हा जणू मी संमोहित झाल्यासारखी वागत होते. आणि जेव्हा भान आलं तेव्हा जे व्हायला नको ते घडून गेलं होतं. पुढचे काही दिवस माझा फोनवर ऑनलाइन व्यवहार करण्यातला आत्मविश्वास पार गेला होता. पण नंतर निग्रहानं मी त्यातून बाहेर पडले. असो!
हेही वाचा >>> ‘जगी व्याधी नाही असा कोण आहे?’
इंटरनेटवर ऑनलाइन व्यवहार करण्याविषयीचा आत्मविश्वास नंतर मी माझ्या दोन मैत्रिणींनाही दिला. नवीन पिढीबरोबर काम करताना काळाच्या मागे राहून चालणार नाही, याची मनाशी खूणगाठ बांधली. मला याची पूर्ण जाणीव आहे, की मी जे काही आत्मसात केलं आहे ते खूपच कणभर आहे. प्रचंड वेगानं बदलणारं तंत्र सतत शिकत राहावं लागणार आहे. पण जे काही शिकले आहे किंवा शिकण्याची ऊर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचं समाधान आहे. असो. शोध ही काळाची गरज आहे, तसंच शिकत राहणं हीसुद्धा काळाची गरज आहे हेच खरं!
npshere@rediffmail.com