१३ जुलैच्या ‘चतुरंग’ मधील डॉ.उर्जतिा कुलकर्णी यांचा ‘भांडा सौख्य भरे’ हा नात्यांची उकल करणारा लेख वाचला. भांडणावर केलेले विश्लेषण फारच आवडले. भांडणाचे  आणि ते संपविण्याचे उपाय फार छान शब्दात मांडले आहेत. भांडणे जवळ-जवळ सर्व वयोगटातील मनुष्य प्राण्यांमध्ये होतातच. जगण्यातला तो एक आवश्यक घटक म्हणून त्याकडे पहायला हवे. लग्न झाले की नवरा बायकोकडे मित्र-नातेवाईक विचारणा करतातच, की तुमचे भांडण वगरे होते की नाही? विचारण्याचा उद्देश हा असतो, की भांडण झाल्यावर समेट होतो की नाही? समेट होत असल्यास संसार छान सुरू आहे, असा निष्कर्ष काढला जातो. जुनी म्हण आहेच, की ‘घरात भांडय़ाला भांडं लागणारच.’ म्हणजे लुटूपुटूच्या भांडणाला समाजाने गंभीरपणे न घेता जणू एक मनोरंजन म्हणून मान्यता दिली आहे. भांडणात विशेष करून मीच कसा/कशी  बरोबर आहे हे समोरच्याला आवाजाचे भान न ठेवता पटविण्याचा प्रयत्न असतो.  झोपडपट्टीत राहणाऱ्यांची भांडणे अनेकदा एकदम फ्री स्टाईल असतात. तेथे मारामारीपर्यंत प्रकरण जाते. ते खरे भांडण असते. त्यास आपण अशिक्षित, अडाणी म्हणून संबोधतो. पण भांडण समाजातील सर्व स्तरात होते. उचभ्रू लोकांमध्ये मात्र शीतयुद्ध होते. भांडण झाल्यावर एकाने तरी नमते घ्यावेच आणि अबोला झाल्यास त्याचे वय वाढू देवू नये. त्यानेच ‘भांडा सौख्य भरे’ ऐवजी ‘नांदा सौख्य भरे’ होईल.

– प्रभाकर शेकदार, ठाणे

 

गुंता सुखदच असतो

‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या’ हा प्रज्ञा ओक यांचा लेख वाचला. आपली भारतीय संस्कृती नाती जपणारी, कुटुंब सांभाळणारी असल्यामुळेच शेकडो वर्ष आपली कुटुंब पध्दत टिकून आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अडचणी उद्भवत नसत. एखाद्या भावाची पत्नी अकाली निवर्तली तरी काक्या, माम्या,आत्या मुलांची काळजी घेत असत. पण एकोणिसाव्या शतकात स्त्रिया शिकून स्वावलंबी झाल्यापासून कुटुंबातील नाती गुंत्यासारखी वाटू लागलीत. नोकरी करणारी सासू अíथकदृष्टय़ा स्वावलंबी असल्यामुळे नातवांची जबाबदारी टाळून स्वतंत्र रहाते. पण पुढे वयोपरत्वे आजारपण किंवा गात्रं शिथिल झाल्यावर ती कोणत्या तोंडाने सुनेकडे जाऊ शकेल? त्यामुळे नात्यांच्या गुंत्यात गुंतून रहाण्यातच आयुष्य सुखी होऊ शकते. लेखात उल्लेख केलेले आजोबा नातवात गुंतल्यामुळेच त्रास सोसूनही सुखात जगत आहेतच ना?

– रमेश वेदक, मुंबई</strong>