संगीतात ताला-सुरांचा चैतन्यदायी प्रवाह असतो. संगीत श्रवणामुळे विचार थांबतात, भूतकाळाची भीती आणि भविष्याची चिंता काही काळासाठी आपोआप थांबते. यासाठी असंख्य विचार आणि त्यांच्या परिणामांमुळे मेंदूवर येणारा ताण दूर करण्यासाठी संगीत हे आनंदाचं सोपं साधन आहे.
संगीताचा आस्वाद घेणं हे केवळ करमणुकीचं साधन नसून उत्तम शारीरिक आरोग्यासाठी ते एक वरदान कसं ठरू शकतं, हे आपण ‘ध्वनिसौंदर्य’ या सदराच्या काही भागांतून पाहिलं. याच विषयावर अधिक सखोल चिंतन करीत, मिरज येथील नामांकित एंडोक्रिनोलॉजिस्ट, मधुमेहतज्ज्ञ तसेच मेंदूविज्ञानाचे गाढे अभ्यासक, संगीत रसास्वादक डॉ. मिलिंद हरी पटवर्धन यांनी शरीर, मन, स्मृती, स्व-प्रतिमा, आनंद व अनुभूती, अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. या पैलूंना स्पर्श करणारा हा उर्वरित भाग …
आनंद हा जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू, आणि तो अनुभवण्याचं सोपं साधन म्हणजे संगीत. संगीत श्रवणाने होणारा आनंद आपलं शरीर तर ताजतवानं करतोच, शिवाय मन प्रसन्न ठेवणारी ती एक जादूची कुपी आहे. या कुपीत शरीरातील विविध ऊर्जा केंद्रे (energy centers) आणि ‘भावनाकोश’ प्रवाही आणि विकसित करण्याची जादू लपलेली असते. संगीतातील ध्वनीलहरी मेंदूत विशिष्ट प्रकारचे स्मृती-प्रवाह (memory flow) निर्माण करीत असतात; जे आपल्या मेंदूच्या ‘मेमरी फोल्डरमध्ये’ साठवले जातात. कालांतराने जेव्हा आपण पुन्हा संगीत ऐकतो, तेव्हा ही ‘मेमरी फोल्डर्स’ मागे ऐकलेल्या संदर्भासह उघडली जातात आणि मेंदूने साठवलेले स्मृतीप्रवाह ताजे होऊन वाहू लागतात. या प्रक्रियेतून मनाचा भावनाकोश आणि मेंदूतील स्मरणशक्ती तल्लख होत जाते. म्हणून मेंदू आणि मनाच्या निरामय आरोग्यासाठी उत्तम संगीताचा व्यासंग करणं, दर्जेदार संगीत सतत ऐकणं व शक्य असल्यास ते प्रत्यक्षात शिकणं हे सगळ्यांसाठीच फायद्याचं ठरतं.
मन हा शरीरातील अवयव नसला तरी कुणी काही बोललं तर ते ‘मना’ला लागतं, म्हणजे कुठे लागतं? मन असतं कुठे? तज्ज्ञाच्या मते ‘मन’ म्हणजे आपल्या मेंदूचाच न दिसणारा विस्तार. विचार करणे हेही मेंदूचं काम आहे. शब्दांतून विचार आणि विचारांतून मन घडत असतं. दिवसाला सर्वसाधारणपणे ५० ते ७० हजार विचारांच्या जाळ्यावर आपला मेंदू विशिष्ट प्रक्रिया करीत असतो. मेंदूवर शब्द आणि सुरांच्या संवेदना आदळत असतात. या संवेदनांना अर्थ देण्यासाठी ‘मी’ नावाचं एक मुख्य मेमरी फोल्डर मेंदूने कायमस्वरूपी तयार करून ठेवलेलं असतं. कोणताही विचार करीत असताना ‘मी’ नावाचा संदर्भ (self reference point) आला रे आला की हे फोल्डर ‘अॅक्टिव्हेट’ होत असतं. मग त्यात ‘मी’शी निगडित असलेले विचार ‘स्टोअर’ होत जातात. माझे नाव, गाव, पत्ता, माझ्या संबंधातली व्यक्ती, परिसर, समाज, शब्द, सूर, संकेत, विचार, शिक्षण इत्यादी गोष्टींमुळे समोर येणारे अनेक संदर्भ मेंदूकडून तपासले जातात. त्यांची छाननी होते आणि त्यातून प्रसंगानुरूप अर्थ काढणं, दृष्टिकोन तयार करणं हे काम आपला मेंदू करीत असतो. योग्य वेळी हे ‘मी’ नावाचं फोल्डर उघडतं आणि आपल्याला ‘मी’शी संबंधित सारे काही, स्वत:च्या दृष्टिकोनासह आठवू लागतं.
या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत हा जो ‘मी’ तयार होत जातो, ती म्हणजे आपली ‘स्व-प्रतिमा’… या स्वप्रतिमेचं एक प्रकारचं वैचारिक ओझं आणि ताण घेऊन आपण अहोरात्र शब्द आणि विचारांभोवतीचं जीवन जगत असतो. पण मनाने हलकं व्हायचं असेल तर शब्द, अर्थ आणि विचारात गुंतलेल्या या स्वप्रतिमेचं काही वेळा विसर्जन होणंही आवश्यक असतं. संगीतातील आनंद अनुभूतीत हे शक्य असतं, कारण संगीतातील सूर आणि लयीमुळे शब्दजन्य विचारांना विश्रांती मिळते. ‘विचार’ म्हणून ‘मी कोणीतरी आहे’ ही एक स्वीकृत भावना असू शकते पण तीच ‘अविचार’ म्हणून मनात आली, तर विकृतही ठरू शकते. स्वप्रतिमेला नियमितपणा, सातत्य ( continuity) असल्यामुळे ती जपण्यासाठी आपला मेंदू अहोरात्र विचारांचे जाळे वीणत असतो. या जाळ्यात नकळतपणे खरा चेहरा हरवण्याची भीती असते.
पण स्वप्रतिमेवरील संस्कारांच्या मुळाशी जर दर्जेदार संगीत श्रवणासारखी एखादी आनंददायी कला अवगत असेल तर ‘मी’पणा येण्याची शक्यता कमी होत असते, कारण संगीताच्या प्रवाहात ‘मी’पणाचं विसर्जन होत असतं. बुद्धीनं, सामर्थ्यानं, बळानं अथवा विचारांनी मिळणाऱ्या यशामुळे ‘मी कोणीतरी आहे’ ही अहंभावना वाढीस लागते; संगीतात मात्र ‘मी कोणीच नाही’ ही अनुभूती येऊ शकते, कारण संगीतात ताला-सुरांचा चैतन्यदायी ‘प्रवाह’ असतो. संगीत सादर करणारे कलाकार स्वत:ची आणि श्रोत्याची स्वप्रतिमा या प्रवाहाच्या अनुभवात रममाण करीत असतात. संगीत श्रवणाच्या आनंद अनुभूतीत भौतिक जग आणि स्वप्रतिमेला छेद देता येतो. ही एक उच्च प्रतीची मनोरंजन प्रक्रिया असते, जिच्यात बुद्धी, सामर्थ्य, बळ, शब्द आणि विचार या पलीकडे नेणारी एक प्रकारची शरणागतीची भावना (feel of surrender) असते. शब्द, विचार आणि अर्थ यामुळे जड होत जाणारं स्वप्रतिमेचं ओझं उतरवून ठेवण्यासाठी या सगळ्यांच्या पलीकडे नेणारे सूर फार महत्त्वाचे ठरतात. कारण सुरांच्या श्रवणाने मनुष्य नि:शब्द आणि निर्विचार अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. शब्द आणि अर्थ यांच्या पलीकडे नेणारी ती एक उच्च कोटीची ध्यानावस्था असू शकते.
सामान्यपणे व्यक्तींचे सगळे विचार हे स्वप्रतिमेच्या आणि भौतिक जगाच्या आजूबाजूने होत असतात, पण संगीतात निर्विचार अवस्थेचा आनंद अनुभव घेता येतो कारण आनंद हा ‘वर्तमाना’त असतो; आणि संगीत ऐकत किंवा गात असताना वर्तमानाशी एकरूप व्हावंच लागतं. एरवी आपलं मन एक तर भूतकाळाचा पस्तावा किंवा भविष्याची काळजी करीत असतं पण त्याच वेळी ‘आपलं शरीर वर्तमानात जगतंय’ हे आपण विसरतो. शरीर आणि मनात निर्माण होणारी हीच विसंगती आपल्या दैनंदिन जगण्यात विसंवाद निर्माण करते. संगीतातून मिळणाऱ्या आनंदामुळे हे विसंवाद सुसंवादी होतात, कारण संगीत वर्तमानात ऐकू येत असतं. संगीत श्रवणाने विचार थांबतात, ज्यामुळे भूतकाळाची भीती आणि भविष्याची चिंता काही काळ आपोआप थांबते.
आजच्या मानसशास्त्राच्या भाषेत ताणतणाव दूर करण्यासाठीचं ‘माइंडफूल मेडिटेशन’ म्हणतात ते हेच. एकाच वेळी कलाकार, श्रोता आणि संगीत या तिन्ही गोष्टी एकाच अस्तित्वाच्या प्रवाहात विरघळून जातात आणि म्हणून त्यावेळी स्वप्रतिमेचं ओझं जरा बाजूला ठेवता येतं. धावणं या शर्यतीच्या खेळात ‘अॅथलिट हाय’ असा एक प्रकार असतो, ज्यात पळता पळता एक क्षण असा येतो की धावणाऱ्याला असं वाटू लागतं, माझं शरीर आपोआप धावतंय, पण मी त्या शरीरापेक्षा वेगळा असून मी हलका झालोय, मी उडतोय… ही अवस्था म्हणजे शरीराच्या भाराचं विसर्जन. संगीत श्रवणात अगदी असंच होत असतं, स्वत:च्या प्रतिमेचं विसर्जन… तत्त्वज्ञानाच्या भाषेत यालाच ‘फ्लो’ असं म्हणतात. तो गवसावा म्हणून अस्तित्वाच्या प्रवाहाशी एकरूप होणं आवश्यक असतं. संगीतातून मिळणाऱ्या आनंदात हे सहज शक्य होतं. जीवनाचा खरा प्रवाह अनुभवता यावा यासाठी अनेक लोक मॅरेथॉन, गिर्यारोहण, पोहणे, साहसी खेळ यात मुद्दाम भाग घेत असतात. परंतु सगळ्यांनाच ते जमेल असं नाही. संगीतातील आनंदाचा आस्वाद घेणं हे त्यामानानं सगळ्यांसाठी सोपं… या आनंद प्रवाहात आपल्याला पोहता येतं, त्यात विरघळून जाता येतं आणि त्यानंतर काही क्षणांनी आपण भानावर येतो तेव्हा लक्षात येतं की त्या आनंदात शरीराबरोबरच मनाचाही भार हलका झालाय.
हा अनुभव इतर मार्गांनीही घेता येतो पण त्यात बरेच कष्टही करावे लागतात, त्यामानानं संगीताचा रसास्वाद घेणं हा सोपान मार्ग … म्हणूनच योग, ज्ञान, ध्यान, जप, तप, साधना, उपासना याहीपेक्षा संगीताकडे आनंदाचं सोपं साधन म्हणून पाहिलं जातं. असंख्य विचारांमुळे आणि त्यांच्या परिणामांमुळे मेंदूवर येणारा ताण विसर्जित करायचा असेल तर त्यासाठी काही काळ निर्विचार अवस्थेत गेलं पाहिजे, संगीत हे त्यासाठी उत्तम साधन आहे. स्वत:चं ‘वेगळं’ असं अस्तित्व न ठेवणं हे आरोग्यपूर्ण तनाचं आणि तणावरहित मनाचं लक्षण आहे. संगीत श्रवणातून ‘आय एम नथिंग’ ही मनाची बैठक तयार होऊ शकते. डॉ. पटवर्धन यांचे हे विचार अधिक नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी ‘संगीत आणि आत्मानुभूती’ (भाग दोन) या विषयावरील चिंतनात्मक विवेचन ‘नाद-माधुरी’ या यूट्यूब चॅनलवर विनामूल्य उपलब्ध आहे. असं म्हणतात की, भाषेच्याही आधी संगीत निर्माण झालं आहे. वैद्याकीय शाखेतील संशोधक म्हणतात की संगीतातून मिळणाऱ्या आनंदामुळे शरीरात डोपामिन, ऑक्सिडोसिन, इंडोर्फिन ही संप्रेरके प्रवाहित होत असतात, ज्यामुळे शरीरस्वास्थ्य तर सुधारतेच पण मनाला आनंदाची आणि प्रसन्नतेची अनुभूती मिळते. आनंदाच्या या वाटेवर चालणं अगदी सोपं आहे, कारण संगीत ऐकायला कोणतंही ‘व्याकरण’ कळावं लागत नाही. कुणीही यावं आणि या आनंद प्रवाहाशी एकरूप व्हावं अर्थात, आपण ऐकत असलेलं संगीत हे आनंददायक आहे की उत्तेजक हे मात्र ठरवता आलं पाहिजे.