हेमा होनवाड
गुजरातमधल्या जागिरी या डोंगराळ गावात अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने अथक प्रयत्नाने आणि शिक्षणाच्या जोरावर आदिवासी, अनाथ, बेघर मुलांसाठी शाळा सुरू करण्याचं स्वप्न ‘हेम आश्रमा’च्या माध्यमातून सत्यात आणलं. डांगी, वारली, कुंभी आणि भील जमातीच्या मुलांना येथे शिकण्याची संधी मिळते. स्वत:बरोबर इतरांनाही आपल्यासारखंच आत्मनिर्भरतेच्या वाटेवरून चालायला लावणाऱ्या ध्येयवेड्या बबल आणिशीतलची गोष्ट!
तिन्हीसांजा मिळाल्या… सूर्याची कोवळी किरणं टेकडीवर झाडांच्या शेंड्यावर विसावली. ‘‘चला रे! आम्ही टेकडीवर चाललो बर कां!’’ अशी साद बबलनं दिल्यावर ‘‘होओओ…ओ…ओ…’’ असे खुशीचे चीत्कार करत सगळी मुलं-मुली आमच्या मागे पळू लागली. कोणी जोशात पुढे, तर कोणी मागे रेंगाळतंय! कोणी आमच्याशी गप्पा मारतंय! बबल निवांत आणि मी मात्र अस्वस्थ! ग्रामीण भागात २०१४ पासून काम करूनही असंख्य गोष्टी अजून शिकायच्या बाकी होत्या. बबलला हाक मारून विचारलं, ‘‘अरे, मुलं मोजायची नाहीत का? परत येताना एखादं चुकलं तर?’’
‘‘नाही ताई. मुलं मोजण्याची गरजच नाही. ती कुठेही जाणं शक्य नाही. कारण हेच एकमेव जग आहे त्यांचं. हेच घर आणि हीच शाळा! आम्ही सगळे या छोट्यांचे आई, वडील आणि शिक्षक.’’ गलबललं हे ऐकून! आणि आधीच आपल्या लक्षात कसं आलं नाही? याबद्दल खंतही वाटली. ज्यांचं पालकत्व बबल आणि त्याची पत्नी शीतलनं स्वीकारलं होतं ती सारी मुलं-मुली अनाथ होती.
बबल आणि शीतल गदर! ‘हेम आश्रम’ या संस्थेचे जनक. भारताच्या पश्चिमेकडील गुजरातमध्ये छोट्याशा जागिरी गावात राहून वंचित, अनाथ मुलांसाठी आयुष्य झोकून देणारा हा एक खरा माणूस! देशाच्या पूर्वेकडील बंगालमध्ये मागच्या लेखात भेटलेल्या शुभ्रोचा हा जत्रेत हरवलेला जुळा भाऊ असावा अशी शंका येण्याइतकं दोघांच्या विचार आणि भावनेत साम्य. त्याच्या नावाची गंमत वाटली. बबल म्हणजे बुडबुडा. शब्दकोशातील एक अर्थ क्षणभंगुर. आई-वडिलांना त्याच्या आजोबांचं बबन हे नाव या बाळाला द्यायचं होतं. पण लिहिताना ‘न’ चा ‘ल’ झाला. आणि बबल नावच पुढे रूढ झालं. पण बबलनं कोणत्याच अर्थानं क्षणभंगुर नसलेलं आणि हजारो माणसं प्रेरित होतील असं काम केलं आहे आणि ते बघण्याचं भाग्य मला लाभलं.
बबलची गोष्ट सांगताना रिचर्ड बाख यांच्या छोट्या कादंबरीची आठवण आली. एका समुद्रकिनाऱ्यावर ‘जोनाथन लिव्हिंगस्टन’ हा सीगल (पांढऱ्या रंगाचा कुरव/समुद्रपक्षी) राहात असतो. खरं तर सीगल पक्ष्याच्या पंखात गरुडाच्या पंखाएवढं बळ नसतं. पण जोनाथन अथक प्रयत्नांनी, हार न मानता, जिद्दीनं आकाशात गरुडभरारी मारायला शिकतो. तासन् तास पंख पसरून अतिशय उंच आकाशात विहार करण्याचा आनंद स्वत: तर अनुभवतोच, पण इतर कुरव पिल्लांनाही असाच आनंद अनुभवायला मिळावा म्हणून पुन्हा खाली समुद्रकिनाऱ्यावर येऊन छोट्या पिल्लांनाही भरारी मारण्याची प्रेरणा देतो. म्हणून बबलला ‘जोनाथन’ म्हणावंसं वाटलं.
बबलचा जन्म दक्षिण गुजरातमधील जागिरी, या वलसाड जिल्ह्यातील एका दुर्गम, डोंगराळ गावात झाला आणि तिथेच तो लहानाचा मोठा झाला. गरिबीनं घरी ठाण मांडलं होतं. जेवण मिळेल याची कधीच खात्री नसायची. बबलचे वडील अनाथ होते. ते एका जमीनदाराच्या शेतात काम करायचे. त्या बदल्यात त्यांच्या कुटुंबाला जेवण मिळायचं. आई-वडील दोघंही निरक्षर होते, पण बबलनं यशस्वी व्हावं हे मात्र त्या दोघांचं स्वप्न होतं. ज्या गर्तेत आपण जगलो त्यातून बबल आणि त्याची भावंडं बाहेर पडावी ही त्यांची तीव्र इच्छा होती. इच्छापूर्तीसाठी मनावर दगड ठेवून त्यांनी बबलला वलसाडमधील एका वसतिगृहात पाठवलं. बबलच्या गावापासून वसतिगृह ६० कि.मी.दूर होतं. तिकडे जाण्यासाठी गावात एस.टी. बससुद्धा नियमित येत नसे. कधी तरी एकच बस सुटायची आणि तीही अनियमित. त्यामुळे तिच्यावर कधीच अवलंबून राहता यायचं नाही. बबलला अनेकदा १८ कि.मी. चालल्यावाचून वसतिगृहात पोहोचण्यासाठी वाहनसुद्धा मिळत नसे. आज आई-वडिलांना या गोष्टीचा अतिशय अभिमान वाटतो की, त्यांचा मुलगा दूर वसतिगृहात राहून शिकला आणि पदवीधर झाला. त्यांच्या कुटुंबातील आणि गावातील तो पहिला मुलगा होता. जिद्द, निश्चय आणि शिकण्याची तीव्र इच्छा या गुणांमुळे बबलचा झाला बादल आणि मोठ्या प्रेमानं बरसला त्या नापीक जमिनीवर आणि तिथेच अंकुरला ‘हेम आश्रम’!
प्रत्येक मुलाला त्याचे पालक शिक्षण घेण्यासाठी ६० किलोमीटर अंतरावरील शाळेत पाठवणार नाहीत किंवा प्रत्येक मूल बसच्या थांब्यापर्यंत १८ किलोमीटर चालत जाणार नाही. तेव्हा आपल्यालाच त्यांच्याकडे जावं लागणार हा विचार बबलची पाठ सोडत नव्हता. आदिवासींच्या यातना अनुभवून आणि विकासाच्या मार्गातले अडसर पार करून बबल पुढे गेला होता. मोकळ्या आकाशात उडण्याचा आनंद या जोनाथनने अनुभवला होता. आता तोच आनंद, तोच आत्मसन्मान जागिरीतील छोट्यांना अनुभवायला मिळाला पाहिजे हा ध्यास त्याला लागला होता.
आपल्या खेड्यातील इतर आदिवासींपेक्षा आपण अधिक भाग्यवान आहोत असा बबलचा विश्वास आहे. त्याच्या यशामागचं रहस्य म्हणजे त्याचा हा सकारात्मक दृष्टिकोन आहे. एक तर त्याला वडिलांनी शिक्षणासाठी लहान वयातच एकट्याला बाहेर पाठवण्याचं धाडस दाखवलं, आणि त्याच्यातील गुण पाहून त्याच्या शिक्षणाचा आर्थिक भार एका अज्ञात उदार व्यक्तीनं उचलला. आजही ती व्यक्ती कोण हे बबलला ठाऊक नाही.
आपली सामाजिक जबाबदारी उचलण्याची ही किती सुंदर पद्धत आहे. नाहीतर दुसऱ्यानं आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली नेहमी दबून राहावं अशी इच्छा सामान्यपणे माणसांच्या मनात असते. ही आर्थिक जबाबदारी त्यांनी उचलल्यावर बबलचं काम फक्त अभ्यासावर लक्ष देऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत जाणं हे होतं. पण आई-वडील आणि भावंडांना मदत व्हावी म्हणून वर्षातून दोन वेळा तो सुट्टीत वलसाडमध्ये बांधकामावर मजुरी करून कुटुंबाला हातभार लावत असे. शाळा पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षण ‘सिक्कीम मणिपाल विद्यापीठा’त दूरस्थ विद्यार्थी म्हणून त्यानं पूर्ण केलं.
२००३ मध्ये हैदराबाद येथे एका शिबिरामध्ये त्याला शीतल भेटली आणि दोघांची सहज मैत्री झाली. अनाथ आणि वंचित मुलांसाठी काम करायचं त्याचं स्वप्नं ऐकल्यावर शीतलही प्रभावित झाली आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करायला सिद्ध झाली. तिनं इंग्रजी वाड्मयाचा अभ्यास करून पदव्युत्तर शिक्षण आणि नंतर बी.एड्.ची पदवी घेतली. बबलच्या सकारात्मक विचारामुळेच समविचारी जीवनसाथी त्याला लाभली असावी. त्याच्या मनात कायम एक गोष्ट सलत असायची. त्याच्या छोट्या गावात त्याच्यासारखीच असंख्य आदिवासी मुलं होती. बबलच्या आई-वडिलांकडे पैसा नसला तरी मुलानं उत्तम शिक्षण घ्यावं ही तळमळ होती. तशी ती सगळ्या आई-वडिलांकडे नव्हती. त्यामुळे आपणच काही तरी करायला हवं हा ध्यास त्यानं घेतला. ही सुद्धा माझी भावंडंच आहेत ही आत्मीयता बबलच्या मनात पूर्णपणे झिरपली असावी. बबल सांगत होता आणि त्याची गोष्ट ऐकतच राहावी असं आम्हाला वाटत होतं.
नंतर मी विचार करत होते, थोडेसे पैसे खर्च करून मंदिराची एक पायरी बांधायला हातभार लावला तरी त्या पायरीवर आपलं नाव कोरणारे महाभाग आपण पाहतो. शाळांना, संस्थांना आर्थिक साहाय्य देऊन शाळ-महाविद्यालयांना संस्थापनेच्या काळात १०० वर्षांपूर्वी दिलेलं मूळ नाव बदलून स्वत:चं नाव संस्थेला देण्याचा आग्रह करणारी माणसं आणि नाईलाजानं संस्थेनं ते मान्य केल्याची उदाहरणं आपल्या सर्वांना ठाऊक आहेत. देणग्या देऊन ग्रंथालयाला, किंवा कोणत्याही वर्ग खोलीवर आपलं नाव कोरण्याचा आग्रह देणगीदार धरतात हे आपण पाहतो. पण अज्ञात राहून मदत करण्याचं औदार्य फारच विरळा. यामुळेच बबलच्या मनातील कृतज्ञता आणि आपल्या गावातील मुलांसाठी काम करण्याच्या इच्छेचा स्फुल्लिंग जिवंत राहिला असावा.
आर्थिकदृष्ट्या थोडं स्थैर्य आल्यावर बबल आणि शीतल यांनी आपल्या आदिवासी भावंडांसाठी आणि अनाथ, बेघर मुलांसाठी शाळा सुरू करण्याचं आपलं स्वप्न सत्यात आणलं आणि २००८ मध्ये ‘हेम आश्रम’ ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून तेथील डांगी, वारली, कुंभी आणि भील जमातीच्या सदस्यांना आत्मविकासाची संधी मिळावी हा त्यांचा हेतू होता. ‘हेम आश्रमा’तील शिक्षण इंग्रजी माध्यमात दिलं जातं, कारण इंग्रजीमुळे स्वयंविकासाची दारं उघडली असा बबलचा स्वत:चा अनुभव आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंग्रजी अत्यावश्यक आहे असं त्याचं ठाम मत आहे.
त्यानं आपल्या वडिलांच्या घरात केवळ ३५ विद्यार्थी आणि एका शिक्षकासह शाळा सुरू केली. सुरुवातीला घरोघरी जाऊन, ‘‘गालीचे तयार करण्याच्या कारखान्यात मुलांना कामाला पाठवण्यापेक्षा शाळेत शिकायला पाठवा.’’ हे पालकांना समजवावं लागलं. हळूहळू बदल झाला आणि मुलं, विशेषत: मुलीसुद्धा शाळेत दाखल होऊ लागल्या. आज ‘हेम आश्रमा’त एकूण २८३ विद्यार्थी आहेत, त्यापैकी ९४ अनाथ आहेत. या मुलांपैकी ६०टक्के मुलं त्यांच्या कुटुंबातील पहिल्यांदा शाळेची पायरी चढणारी आहेत. तिथे एकूण ३२ कर्मचारी समर्पण भावनेनं काम करत आहेत. शीतलने ‘कार्पोरेट’ क्षेत्रातल्या करिअरला सोडून गावातील निवासी शाळा बांधण्यासाठी मदत केली. सुरुवातीला एक लहान, उधार घेतलेली जागा वापरली आणि मग त्या दोघांच्या पगारातून शाळेला छप्पर बांधलं. विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली तशी दोघांनी नवी दिल्लीमध्ये एक ‘आयटी’ कंपनी सुरू केली. त्या उत्पन्नातून ‘हेम आश्रमा’ला आठ वर्षं आर्थिक आधार मिळाला.
आज २०२५ मध्ये त्यांच्या कामाचा भरपूर विस्तार झाला आहे. ८०० पेक्षा जास्त युवकांनी संगणक आणि इंग्रजीची मूलभूत कौशल्ये आत्मसात केली आहेत, तसेच ११३४ प्रौढ साक्षर झाले आहेत. जागिरीमध्ये २४/७ मोफत दवाखाना चालू केला आहे आणि दरवर्षी जवळच्या गावात १२ ते १५ वैद्याकीय शिबिरे आयोजित केली जातात. ४७ विधवा स्वहस्ते वस्तू बनवून विक्री करतात आणि आत्मनिर्भर झाल्या आहेत. स्थानिक शेतकरी सेंद्रिय शेती शिकले आहेत आणि आजूबाजूच्या गावात ३०,०००हून अधिक झाडं लावली आहेत.
शीतल सांगत होती, ‘‘आमच्या मुलांना सतत भावनिक आधार व समुपदेशनाची आवश्यकता असते. भावनिक संतुलन आणि सामाजिक जाणिवांच्या विकासाकडे आम्ही जातीने लक्ष देतो. त्यामुळे शाळेची परंपरा मुलं पुढे नेतील याची खात्री वाटते. हे सगळं मानसिकदृष्ट्या थकवणारं असतं, पण आमच्या कष्टाच्या फळांची चव अगदी गोड आहे. आमच्या माजी विद्यार्थ्यांची प्रगती प्रशंसनीय आहे. १८ जणांचा व्यवसाय छान चालला आहे आणि २७ जणांचे वेगवेगळ्या शहरांमध्ये उच्च शिक्षण चालू आहे.’’
मराठवाडा, ब्रजबल्लवपूर, जागिरी यांसारख्या असंख्य ठिकाणी जोपर्यंत अनेक अज्ञात जोनाथन पिल्लांची काळजी घेत आहेत तोपर्यंत माणसातील ‘माणूस’ नक्की जिवंत राहील हे खरं!
hemahonwad@gmail.com