डॉ भूषण शुक्ल
सर्वजण निवडतील त्या मार्गानं जाऊन जमेल तेवढं शिकायचं, पदवी पदरात पाडून नोकरीस लागायचं आणि नोकरी शेवटपर्यंत टिकवायची… हा शिरस्ता पाळलेले ज्येष्ठ आज जगातली महत्त्वाकांक्षा पाहून भंजाळून जातात. पण एक गोष्ट त्यांनाही जाणवते, की त्यांच्या काळी जसा सरधोपट शिक्षणाचा प्रत्यक्ष जगण्याशी संबंध नव्हता, तसाच तो आताही नाहीये. आता तर बदलाची गरज मोठी आहे. कसे पाहतात ते नातवंडांच्या शिक्षणाकडे?

काल माझ्या नातीच्या, मित्राच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा दिवस होता. शाळेचा पहिला दिवस. ती जेमतेम तीन वर्षांची झाली आणि तिची शाळा सुरूही झाली. युनिफॉर्म, बॅग, टिफिन, अभ्यासक्रम आणि प्रगतिपुस्तकसुद्धा. सगळं काही एकदम मोठ्या शाळेसारखं. मित्राची शाळा सुरू होण्याआधी शाळेनं तिच्या आई-बाबांची परीक्षा घेतली. शाळेची ओळख व्हावी म्हणून मित्रा गेल्या महिन्यात अनेकदा तिथे खेळायला आणि इतरांची ओळख करून घ्यायला गेली होती. त्यामुळे मी- म्हणजे तिचा आजोबा काल तिला बसवर सोडायला गेलो, तर ती मुळीच बावरली नव्हती. अगदी हसत हसत ‘सी यू सून आजोबा,’ म्हणून भुर्रकन निघूनसुद्धा गेली.

माझ्याच डोळ्यांत जरा पाणी आलं. मला तिचा बाबा आठवला. तो फार रडायचा! लहान गट आणि मोठा गट हे दोन्ही वर्ग त्यानं रडूनच काढले. शाळा साधी होती. घराजवळ होती. पण तो रोज रडायचाच. एक-दोन वेळा तर त्यानं माझा बेदम मारसुद्धा खाल्ला होता. पुढेसुद्धा तो शिक्षणासाठी घर सोडून गेला नाही. सगळी शाळा-कॉलेजं एकाच शहरातली. मित्रा बहुतेक आईवर गेली असावी. हसतमुख आणि एकदम धीट! मी खूप प्रयत्न करूनही मला काही माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवला नाही. शाळा, मित्र, वर्ग, वगैरे सर्व आठवतंय, पण पहिला दिवस वगैरे काही आठवत नाही. गल्लीतले सगळे जण गट करून चालत शाळेत जायचे, तसा मी पण गेलो बहुतेक! शाळा लांब होती. मध्ये महामार्ग होता! पण मुलं हे सर्व स्वत:च करायची. कोणी मोठी मंडळी सोडायला आल्याचं आठवत नाही.

हेही वाचा : ‘एका’ मनात होती : पुरुषी एकटेपण

माझी शाळा सोपी होती. अकरावी म्हणजे मॅट्रिकपर्यंत शाळा गावातच. त्यानंतर जवळच्या मोठ्या गावी प्री-डिग्री आणि शहरात ‘बी.ए.’ आणि ‘बी.एड.’. एकटे रूमवर राहून, स्वत:चा स्वयंपाक करून. लग्न होईपर्यंत! तेव्हा ‘बी.ए.-बी.एड.’ म्हणजे खूप मोठं शिक्षण होतं. लगेच चांगली नोकरी मिळायची. तसंच झालं आणि त्याच एका शाळेत चाळीस वर्षं नोकरी. लग्न, मुलं, घर, सगळं तिथेच. सगळं आयुष्य तिथे गेलं. बायकोसुद्धा शिक्षकच केली, पण मुलं लहान असताना कोणाचा आधार नव्हता म्हणून तिनं नोकरी सोडली आणि घरीच शिकवण्या केल्या. तेव्हा हे सगळं सोपं होतं असं आता वाटतंय. साधी नोकरी, संसार, घर, एवढं जमलं म्हणजे खूप झालं. अजून काय हवं आयुष्यात? पण गोष्टी खूप बदलल्या. मोठी मुलगी जात्याच हुशार. बारावीनंतर डॉक्टर झाली. आता ती आणि जावईबापू मुंबईला असतात. पण आमचा धाकटा- म्हणजे मित्राचा बाबा फारच नाठाळ निघाला. शाळा बुडवून घरी राहायचा. टीव्ही बघायचा, नाही तर खेळत बसायचा. कसाबसा बारावी झाला आणि कॉमर्सला गेला. याचं कसं होणार, या चिंतेत आम्ही असायचो. पण ‘बी.कॉम.’ करताना त्याचे ग्रह पालटले. तो आणि त्याचे चार मित्र एका चांगल्या प्राध्यापकांच्या संपर्कात आले आणि त्यांचे भक्तच झाले! त्यांनी या सर्व मुलांना ‘सी.ए.’ वगैरेच्या फंदात न पडता ‘एम.बी.ए.’ करायचा सल्ला दिला. हा त्या ‘एम.बी.ए.’ कॉलेजातून थेट नोकरीलाच लागला.

आणि काय सांगू… शाळा-कॉलेजात अगदी यथातथा असलेला हा मुलगा आमूलाग्र बदलला. त्याला काम आवडलं आणि वरिष्ठांची मर्जीसुद्धा बसली. भराभर पायऱ्या चढत आणि नोकऱ्या बदलत आता स्वकर्तृत्वावर मोठ्या पदाला आहे. प्रवाससुद्धा भरपूर करतो आता.
हे किती वेगळं जग आहे! शिक्षक होण्याशिवाय काही माहीत नसलेला मी आणि माझी पत्नी. आणि आमची ही खूप प्रगती केलेली मुलं. विशेषत: आवडतं काम सापडल्यावर इतका झरझर प्रगती करणारा मुलगा, हे वेगळंच आहे. पूर्ण चाळीस वर्षं एका संस्थेत राहिलेला मी आणि दरवर्षी नोकरी बदलणारे हे सून आणि मुलगा! गाडी चार-पाच वर्षं वापरतात आणि नोकऱ्या दरवर्षी बदलतात. काय हे!

हेही वाचा : ॲलर्जीचं ‘वावडं’!

मित्राचं आयुष्य कसं असेल बरं? इतक्या महागड्या शाळेत जाते. रिटायर होताना माझा अर्ध्या वर्षाचा पगार होता, तितकी हिची लहान गटाची फी आहे!
मित्राची बस तिला शाळेतून घेऊन येणार म्हणून दुपारी सोसायटीच्या दारातल्या बाकावर बसलो होतो, तेव्हा हाच विचार चालू होता. ‘‘मी का गेलो शाळेत? मुलांना का पाठवलं? अगदी हाणून, मारून पाठवलं! पण का?’’
आमच्या वेळेस शाळा पूर्ण केली की नोकरीची हमी असे. शिक्षकांमुळे चार चांगल्या गोष्टी कानावर पडतील, बऱ्या सवयी लागतील, एवढीच अपेक्षा ठेवून मला शाळेत पाठवलं असणार. मीसुद्धा तेच केलं.
शिक्षक म्हणून नेमून दिलेले विषय, नेमून दिलेल्या पुस्तकांमधून वर्षानुवर्षं शिकवले. काही खूप नवीन नाही. मात्र माझ्या परीनं शिकणं आकर्षक करायचा प्रयत्न केला. पण मुलं रोज शाळेत येत होती, आदरानं ऐकून घ्यायची, ती वर्षानुवर्षं ओळख ठेवतात, रस्त्यात भेटली तरी पायाला हात लावून नमस्कार करतात, हीच माझी पुण्याई. पण मला विद्यार्थी म्हणून काय मिळालं शाळेत जाऊन?… माझ्या मुलाला काय मिळालं?… आणि नातीला काय मिळणार आहे ?
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेजारी आणि नातेवाईक यांशिवाय वेगळं जग बघायला मिळालं. भरपूर मित्र मिळाले. त्यांच्याकडून खूप शिकलो. त्यांनाही चार गोष्टी मी शिकवल्या. ज्यात खूप काही रस नाही, अशा रटाळ गोष्टी रोज ५-६ तास शिकलो. कडक शिस्तीत भीतीनं शिकलो. तोंड उघडायची सोय नाही म्हणून वर्षानुवर्षं निमूटपणे शिकलो, घोकंपट्टी केली. आणि नंतर हेच काम म्हणून आयुष्यभर केलं.

पण माझ्या मुलाला यातलं काही पटलंच नाही. मित्र सोडले, तर शाळेत त्याच्यासाठी काही नव्हतं. अभ्यास त्याला रुचला नाही. पटत नाही ते करायचं नाही, असा स्वभाव असल्यानं त्यानं हा सर्व छळ कसातरी सहन केला. छळच म्हणायचा आणि काय! ज्यामध्ये आपल्याला दमडीचाही रस नाही, अशी गोष्ट रोज, वर्षानुवर्षं करायची. ती तुम्ही किती व्यवस्थित करणार, यावर तुमची शाळेत लायकी ठरणार. कसं सहन केलं असेल त्यानं हे सगळं? कधी विचारलं नाही त्याला. त्यानंही कधी सांगितलं नाही. आता यशस्वी आहे, आनंदात आहे. पण किती वर्षं हे सहन केलं त्यानं.

हेही वाचा : ‘भय’ भूती : भीती आहे, म्हणून तर…

माझ्या शिक्षणाचा माझ्या कामाशी फारसा संबंध नव्हता. मुलाचासुद्धा अनुभव तोच. डॉक्टर झालेली मुलगीपण तेच म्हणते. दरवर्षी नवीन गोष्टी शिकत राहिल्या तरच प्रॅक्टिस चालते असं म्हणते. मुलगासुद्धा हेच म्हणतो. सतत अपडेट राहावं लागतं. तंत्रज्ञान, कायदे, कंपनी पॉलिसी बदलत राहतात. मार्केट बदलतं. सतत नवीन विचार करावा लागतो म्हणे! बापरे! मला पोटासाठी असलं काही करावं नाही लागलं. जमलं असतं का मला? मग मित्राचं कसं होणार? कसं असेल तिचं जग? सतत जगावर लक्ष ठेवून नवीन शिकत राहणं हेच तिचं आयुष्य असेल, तर शिकणं हीच एक महत्त्वाची कला तिला जमायला पाहिजे. नुसती घोकंपट्टी नाही. समजून उमजून शिकणं, मनापासून शिकणं आणि इतरांबरोबर शिकणं. मित्राची शाळा हे सर्व करेल का? तिचे शिक्षक माझ्यापेक्षा वेगळे असतील ना?…

शेजारची आर्या मोठी आहे. ती सांगत होती, की तिची टीचर वर्गात गाणं म्हणते, गोष्टी सांगते, यूट्यूबच्या लिंक वर्गात देते आणि प्रोजेक्टपण देते. आता मला हे सर्व नीट शिकावं लागणार. मित्रासाठी. तिचा प्रोजेक्ट तिला करू देण्यासाठी मुलाला आणि सुनेला आवरावं लागणार. ओबडधोबड असला तरी चालेल, पण तो तिला ‘माझा’ वाटला पाहिजे. तर आवडीनं करेल ती. मार्क जाऊ दे, पण परीक्षा न घाबरता देता आली पाहिजे. स्वत:चं स्वत: शिकता आलं पाहिजे. अगदी यूट्यूब वापरूनसुद्धा. उगाच शिकवण्या नकोत मार्कांसाठी. तिच्या मित्रमंडळींना घरी बोलावून एकत्र प्रोजेक्ट करायला हवा. एकमेकांना मदत करतील तरच माणूस होतील ना?

हेही वाचा : स्त्री‘वि’श्व: लढवय्या स्त्रियांपुढचे पेच

मी विचार करत होतो, तेवढ्यात मित्राची बस आली. खिदळत तिनं माझ्या गळ्यात हात टाकले. ‘‘आजोबा, आम्ही उद्या स्कूलमध्ये सँडविच बनवायला शिकणारे! मला टोमॅटो आणायचा आहे. तू नेशील ना आता मार्केटमध्ये मला? मी स्वत: निवडून रेड-रेड टोमॅटो घेणार आहे. आणि नाईफसुद्धा. तू नेशील ना मला मार्केटला?’’ मी तरी काय म्हणणार? ‘‘शाळेत सुऱ्या आणायला सांगताहेत का?… ठीक आहे. आपण आणू हं!’’ म्हणून तिचा चिमुकला हात धरून आम्ही कोपऱ्यावरच्या दुकानात निघालो. शुभं भवतु!

chaturang@expressindia.com