आपण स्वत:च एक सर्वश्रेष्ठ निसर्गनिर्मिती आहोत याची जाणीव झाली की त्या निर्मितीमागचा हेतू ध्यानात येईल. चिंता, नैराश्य, संताप अशासारखे विकार नष्ट करण्यासाठी आपल्या मनाची डिस्क साफसूफ केली तर मन हलकं, मोकळं होईल. त्यासाठी ज्ञात्याच्या दृष्टीने आपण आपल्याकडे का पाहू (देखू) नये?

गगनाला भिडणारी एखादी उंच इमारत असो, समुद्र पार करणारा एखादा बळकट पूल असो की प्रचंड डोंगराच्या पोटातून वाट काढत जाणारा बोगदा असो, मानवाच्या या निर्मितीचं आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या सर्व निर्मितीमागे इंजिनीअरिंग वा अभियांत्रिकी कार्य करत असते हेही आपण जाणतो. पण कोणत्याही मानवनिर्मित अभियांत्रिकी आश्चर्यापेक्षाही अद्भुत गोष्ट म्हणजे निसर्गनिर्मित स्वत: मानवच. मानवी देहाइतकं श्रेष्ठ आणि प्रगत अभियांत्रिकी कार्य जगात कुठेही पाहायला मिळणार नाही.
मानवी शरीर हे लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर तयार झालेलं आहे. प्रथम ही उत्क्रांती शारीरिक पातळीवर झाली व सर्व प्राणी-सृष्टी तयार झाली. देहरचना प्रगत होत गेली पण मन आणि बुद्धी यांची वाढ मर्यादितच राहिली. पण माणूस तयार होताना निसर्गानं रचनाकारात एक फार मोठा आणि क्रांतिकारक बदल केला. इतर प्राण्यात असलेला पाठीचा आडवा कणा, माणसात मात्र उभा केला. इतर प्राण्यांमधल्या आडव्या कण्यामुळे मेंदूपासून जननेंद्रियापर्यंत सगळी कार्ये एकाच पातळीवर राहिली. पण उभ्या कण्यामुळे निसर्गाने या मानवी देहाचा निर्मिती उद्देशच प्रकट केला. माणसाचा मेंदू सर्वात उच्च ठिकाणी आला व विचार, विवेक, भावना या गोष्टींनी पुढील उत्क्रांती माणसाने स्वत:च करून घ्यावी असा संदेश दिला. विज्ञान, कला, संस्कृती, अध्यात्म क्षेत्रातली प्रगती हेच दर्शविते.
निसर्ग आपल्याकडे कसं पाहतो ते आपण बघितलं. आपण स्वत: आपल्याकडे कसं पाहतो? आरशात आपल्या प्रतिबिंबाकडे पाहताना आपण आपल्या देह रचनेकडे पाहतो तेव्हा आपला चेहरा, कपडे, केशरचना, दागिने इत्यादी गोष्टी नीट आहेत ना हे पाहतो. शरीराच्या आत काही तक्रार असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो. ते आपल्या आत काय चाललं आहे ते तपासतात. पण ‘मेड इन नेचर’ माणसाची देहरचना ‘अशीच का?’ अशा कुतूहलानं पाहायचं झालं तर? केवळ दृश्याकडेच न बघता, बुद्धीच्या अंगाने, समग्रपणे आणि उंच पातळीवरून एखादी गोष्ट समजून घेणे म्हणजे ‘ज्ञात्याचे देखणे’. अतिशय सुंदर असा हा शब्दप्रयोग श्रीसमर्थानी दासबोधात केला आहे. ते म्हणतात ‘देखिले ते सत्यचि मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे’ म्हणूनच मानव म्हणून आपल्या देहरचनेकडेसुद्धा त्यातील अवयवांच्या स्थानाचं वैशिष्टय़ या अंगाने जाणीवपूर्वक पाहणे म्हणजे ‘ज्ञात्याचे देखणे’. तर काय दिसेल?
बुद्धी हे माणसाचं वैशिष्टय़ व सर्वात महत्त्वाचं कार्य. म्हणून त्याचं ऑफिस ‘मेंदू’ सर्वात वर (लाक्षणिक अर्थानेदेखील) म्हणजे अर्थात डोक्यामध्ये. हेड ऑफिस हा शब्ददेखील त्यातूनच आला. महत्त्वाचं म्हणून अत्यंत सु-रक्षित अशा कवटीच्या हाडामध्ये बंदिस्त. त्यावरील दाट केसांनी अधिक सुरक्षा आणि सौंदर्यदेखील बहाल केलं (बॉसची केबिन ना?). हेड ऑफिसला मदत करण्याकरता ऑफिसला लागूनच (चेहऱ्यामध्ये) चार इंटेलिजन्स एजन्सीजची नेमणूक केलेली आहे. हेड ऑफिसला लागणारी सर्व माहिती याद्वारे आत येते. बाहेरचं दृश्य ही सर्वात महत्त्वाची माहिती म्हणून दृष्टीचं इंद्रिय-डोळे समोरच्या बाजूला. या एकाच कामासाठी दोघांची नेमणूक. का? तर यथार्थ माहिती मिळण्याकरिता (शिवाय काही कारणाने एक रजेवर असेल, तरी काम थांबणार नाही ही बॅक-अप योजना). दृष्टीबरोबरच पण जरा त्या खालोखाल महत्त्वाची माहिती (शिवाय अंधारात उपयोगी) म्हणजे आवाज. म्हणून त्याचं स्थान त्याच पातळीवर पण चेहऱ्याच्या बाजूला. पुन्हा एकच काम पण दोघं (कान) मिळून करतात. बाहेरील दृक्श्राव्य माहिती समतोल आणि सर्वागीण स्वरूपाची पुरवणं ही या चार एजंट्सची जबाबदारी.
एवढय़ाने काम भागत नाही. थोडय़ाशा खालच्या पातळीवर नाक आणि तोंड ही दोन शरीराच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाची कार्यालये. त्यातल्या त्यात तोंडाला फारच दक्षतेनं काम करावं लागतं. या एकाच यंत्रणेवर दोन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. इतकं त्याचं महत्त्व. एक म्हणजे हेड ऑफिसकडून आलेले संदेश बाहेरच्या जगात प्रसृत करणं (बोलणे) आणि दुसरी जबाबदारी शरीर-यंत्रणेला लागणाऱ्या इंधनाचा (अन्न-पाणी) पुरवठा करणं (खाणे). संदेश प्रसारणासाठी जीभ नावाची साहाय्यक असते. तिनं तिचं नेमून दिलेलं कामच करावं अशी अपेक्षा असते, म्हणजेच हेड ऑफिसच्या मान्यतेशिवाय स्वत:हून काही प्रेस कॉन्फरन्स घ्यायची नाही. त्याकरिता दात नावाचे बत्तीस कॅमेरे तिच्यावर लक्ष ठेवून असतात. जिभेचं दुसरं काम तोंडावाटे शरीरात जाणाऱ्या अन्नपदार्थाची परीक्षा करणं (क्वालिटी कंट्रोल). या कामाकरिता तिला घ्राणेन्द्रियाचे (नाक) साहाय्य असते. या दोन्ही साहाय्यकांमुळे संभाव्य हानिकारक पदार्थाचे सेवन रोखलं जातं. तोंडाच्या रचनेचं अजून एक वैशिष्टय़ म्हणजे हे कार्यालय जरुरीपुरतेच उघडे ठेवण्याची सोय. ओठांच्या दरवाजाने ते सतत बंद असतं; असायला हवं. प्राणवायू (नावातच सगळं काही आलं) आत घेणं आणि कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकणं ही कामं नाक न सांगताच चोवीस तास बिनबोभाट करतच असतं. पण जास्त प्राणवायू आत घेण्याची जबाबदारी (प्राणायाम) मात्र आपली. तर ही झाली हेड ऑफिसची (डोके) रचना. निसर्गाची अजून कमाल म्हणजे हे ऑफिस मानेच्या अॅक्सिसवर चहूबाजूनं रडारसारखं फिरतं असतं.
महत्त्वाचं हेड ऑफिस तर बघितलं. पण कोणचीही संस्था किंवा कंपनी म्हटलं की त्याच्या मुळाशी एक मिशन स्टेटमेण्ट (ध्येयवाक्य) असतं ते त्या संस्थेच्या कामामागचं स्फूर्तिस्थान असतं. ते म्हणजे आपलं हृदय – शरीरशास्त्रानुसार रक्त शुद्ध करणारा अवयव पण लाक्षणिक अर्थानं आपल्या जीवनाचं ध्येय किंवा आदर्श जिथे आपण धरून ठेवतो ती जागा; ‘मी’ असं म्हणताना आपला हात जिथे स्वाभाविकपणे जातो ती जागा; किंवा कुणी आपलं कौतुक केलं की त्याचा नम्रपणे स्वीकार करताना आपलं हात जिथे जातो ती जागा. सबंध मानवी शरीराचं यंत्र सतत चालू ठेवण्याचं महत्त्वाचं काम इथून होतं. म्हणूनच याला यथायोग्य अशी हाडांच्या बरगडय़ांची झेड प्लस सेक्युरिटी दिलेली आहे. हृदयाला लागणारा प्राणवायू तितकाच महत्त्वाचा. म्हणून फुप्फुसेही त्याच्या अगदी जवळ.
या शरीररूपी यंत्राला लागणारं इंधन (अन्न) तोंडावाटे आत येतं खरं. पण त्यावर प्रक्रिया होऊन त्यातून ऊर्जा निर्माण होण्याकरिता हृदय व फुप्फुसांच्या खाली येते पचनसंस्था. आलेल्या इंधनातून अन्नातील योग्य तेच अन्नघटक आत घेणं व नको असलेले पदार्थ मलनिस्सारण करणं ही दोन्ही कामं ही संस्था करते. रक्तात शोषून घेतलेले पोषक अन्नपदार्थ, फुप्फुसाद्वारे शोषून घेतलेला प्राणवायू आणि ऊर्जा निर्मितीसाठी लागणारे इतर किती तरी घटक पदार्थ, सर्व पेशींपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. हे काम सर्व शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्या (लांबी अंदाजे साठ ते पासष्ट हजार किलोमीटर!!) करतात. याचबरोबर मज्जासंस्था (नव्र्हस सिस्टीम) ही सबंध शरीरभर पसरलेली असून तिच्यामार्फत शरीराच्या बाहेरील आणि आतील संवेदना आणि त्यावर दिलेला प्रतिसाद हा इलेक्ट्रॉनिक वेगाने दिला जातो. सर्वात खालच्या पातळीवर असते ती जननसंस्था. कारण इतर संस्थांच्या तुलनेत या संस्थेचं काम खूप कमी प्रमाणात असतं.
या शरीरयंत्राला आणखी उपयोगी करण्याकरिता निसर्गानं हे यंत्र मोबाइल बनवलं आहे. त्याकरिता दोन सशक्त पाय दिलेले आहेत. तसंच शरीराच्या दोन्ही बाजूंना दोन खांदे आणि बाहू दिलेले आहेत ज्याद्वारे अत्यंत कुशल आणि शक्तिमान कामं केली जातात. यंत्र तर तयार झालं, पण त्याचं पॅकेजिंग? इतकं रक्त, मांस, हाडे, अनेक अवयव इत्यादींनी एकत्र जोडलेलं शरीर, पण निसर्गानं काय पॅकेजिंग तयार केलंय! दाद दिलीच पाहिजे. या पॅकेजिंगचं नाव त्वचा. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव. इतकं परफेक्ट पॅकेजिंग कुठेही पाहायला मिळणार नाही. तसंच बाजारात मिळणाऱ्या इतर यंत्रांप्रमाणे हे ‘मास-प्रॉडक्शन’सारखं नसतं, तर प्रत्येक, हो प्रत्येक, यंत्र ही एकमेवाद्वितीय अशी कलाकृती असते. हा युनिकनेस आपण लक्षात घेतला पाहिजे, जपला पाहिजे. सगळे पोपट सारखे दिसतात, तसं आपलं नाही (निसर्गाला तसं करणं सहज शक्य होतं!) त्यामुळे आपल्याला कुणाचीही कॉपी करण्याची किंवा अनावश्यक तुलना करण्याची गरज नाही. बऱ्याच वेळा ताण निर्माण होण्याचं ते कारण असू शकतं.
एकदा आपण स्वत:च एक सर्वश्रेष्ठ निसर्ग निर्मिती आहोत याची जाणीव झाली की त्या निर्मितीमागचा हेतू ध्यानात येईल व तिची देखभाल उत्कृष्ट रीतीनं कशी करावी, तिच्या उपयोगातून मानवी जीवनात उच्च आनंद कसा मिळवावा याचा शोध घेता येईल. त्याकरता मन नावाचं एक सॉफ्टवेअर निसर्गानंच लोड करून दिलेलं आहे. ते स्वत: शिकणारं आहे, पण ते अपडेट करण्याची जबाबदारी आपली. बऱ्याच वेळा आपल्या अनवधानानं किंवा काही दूषित पूर्वग्रहानं हेड ऑफिसच्या फायलिंग कॅबिनेटमध्ये (मेमरी) वर्षांनुवर्षे साठवलेला पण आता निरुपयोगी असलेला डेटा भरलेला असतो. त्या भाराचं रूपांतर चिंता, काळजी, नैराश्य, संताप अशासारख्या मनाच्या विकारात होतं आणि त्याचे शरीराच्याही आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
म्हणूनच वर्षांतून एकदा तरी (उदा. आपल्या वाढदिवशी) आपल्या मनाची डिस्क साफसूफ करायला काय हरकत आहे? त्या वेळी माहितीचं रूपांतर ज्ञानात आणि ज्ञानाचं रूपांतर शहाणपणात, बुद्धी वापरून करता येईल. स्मरणशक्तीवरचा भार कमी झाला की मन हलकं होईल, मोकळं होईल. आतला आनंद आपोआपच बाहेर येईल. हे जर सत्य आहे तर ज्ञात्याच्या दृष्टीने आपण आपल्याकडे का पाहू (देखू) नये?

अंजली श्रोत्रिय
 health.myright@gmail.com