० बदलत्या जीवनशैलीत आपण नैसर्गिक वागणे विसरून कृत्रिमपणे वागत राहतो. तसे न करता सहज आणि नैसर्गिकपणे वागा.
० आपली शरीर यंत्रणा नैसर्गिक आहे. त्यामुळे आपले शरीर जेव्हा काही सूचना, इशारे देते तेव्हा त्यांचे पालन करा.
० झोप आली तर लगेच झोपा. कारण झोप ही शरीराची प्राकृतिक क्रिया आहे. झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळते. रात्री वेळेत न झोपल्यास किंवा जागरण झाल्यास दुसरा दिवस आळसात जातो. कामाच्या ठिकाणी अवेळी डुलक्या येऊ लागतात, कामावर परिणाम होऊन कामात चुका होतात.
० झोप पूर्ण होऊन जाग आली असेल तर अंथरुणावर उगाचच लोळत राहू नका.
० शौच किंवा लघवीचा वेग अडवून धरू नका. त्याचे त्वरित विसर्जन करून टाका. मलविसर्जन योग्य प्रकारे झाले नाही तर बेचैनी वाढून गॅसही वाढतो. पोट ताठरल्यासारखे होऊन बेचैनी वाढते.
० घराबाहेर जायचे आहे आणि बाहेर गेल्यावर गडबड नको म्हणून शौच-लघवीचा वेग आला नसतानाही आपण कुंथून मल-मूत्र विसर्जनाचा प्रयत्न करतो. अशा वेळी जोर-जबरदस्तीने मल बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गुदद्वाराच्या त्वचेला जखम होऊ शकते.
० वारंवार शौचास होत असल्यास त्याची कारणे शोधा. ताण, भीती, अति काळजी करणे यामुळे, सतत फिरतीची नोकरी असेल तर, निरनिराळ्या ठिकाणचे पाणी पिण्याने, मसालेदार किंवा शिळे अन्न खाल्ल्याने शौचाची भावना होते.
० भूक लागली तर त्वरित खा. शरीराला आवश्यक असणारी शक्ती अन्नातून मिळते. भुकेच्या वेळी जेवलो नाही तर डोके दुखणे, चक्कर येणे, थकवा वाटणे, घशात जळजळणे, पित्त वाढणे हे विकार होतात. पोट भरले असेल तर खाणे थांबवा. आवडते म्हणून जास्तही खाऊ नका. त्यामुळे शरीराला जडत्व येते, अपचन होते किंवा उलटी होते. भूक लागली नसेल तर अजिबात खाऊ नका.
० तहान लागली तर लगेच पाणी प्या. पाणी घटाघटा न पिता घोटाघोटाने प्या. उन्हात फिरून आल्यानंतर, व्यायाम किंवा शारीरिक श्रम केल्यानंतर, गरम जेवण जेवल्यानंतर, दूध प्यायल्यानंतर, फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.
० जांभई आली तर अवरोध न करता कडकडून जांभई द्या.
० शिंक आली किंवा ढेकर आल्यास अडवून धरू नका. शिंकताना डाव्या किंवा उजव्या बाजूला मान करून शिंका. समोरच्या बाजूने जोरात शिंक देताना मानेला, खांद्याला हिसका बसतो.
० बैठय़ा जीवनशैलीत गॅस होणे वा वायू धरणे स्वाभाविक आहे. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. यामुळे गॅसचा अवरोध न करता गॅस निवारण करणे केव्हाही चांगले. गॅस कोंडून राहिल्यास निरनिराळ्या ठिकाणी वेदना सुरू होतात. छातीत, पाठीत भरून येते. श्वास लागतो आणि काल्पनिक भीतीने मन:स्वास्थ बिघडते.
० डोकेदुखी ही मोठी समस्या आहे. अगदी लहान मुलेही डोके दुखण्याची तक्रार करीत असतात. डोके दुखले की वेदनाशामक गोळी न घेता त्याचे कारण शोधा. डोके उष्णतेने दुखते, थंडीमुळे दुखते, सर्दीमुळे दुखते, वातामुळे दुखते, अति कामामुळे दुखते, भुकेमुळे दुखते, गडबड-गोंगाटाने दुखते, पोट फुगल्याने दुखते, पित्त झाल्यामुळे दुखते, झोप अपुरी झाल्यामुळे दुखते की मानसिक ताणामुळे दुखते हे जाणून घेऊन त्याप्रमाणे उपचार करा.
० अंगाला कंड सुटणे ही समस्याही वातावरणातील बदलामुळे वाढू लागली आहे. त्वचेला खाज कशामुळे येतेय हे आधी समजून घ्या. थंडीत त्वचा शुष्क होते त्यामुळे कंड सुटते. अंगावर पित्त उठल्याने खाज येते, उन्हाळ्यात सूर्याच्या तेज किरणांनी त्वचेवर अ‍ॅलर्जी येऊन खाज येते, काही वेळा खाद्यपदार्थामुळे खाज येते. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास खाज येते. मादक पदार्थाच्या सेवनाने खाज येते, अंगाचा साबण किंवा सौंदर्य प्रसाधन बदलल्यामुळे खाज येते. खाज कशामुळे येते हे पाहून योग्य उपाय करा. जास्तीत जास्त पाणी किंवा सरबत यासारख्या द्रवपदार्थाचे सेवन करा.
० शरीर व मन तरतरीत ठेवण्यासाठी आळोखेपिळोखे देत शरीर सैल करा. काम करून आलेला थकवा, झोपेतून उठल्यावर आळसावलेले शरीर, एकाच ठिकाणी बसून काम करताना जखडून गेलेले शरीर किंवा काही काम नाही म्हणून आलेला कंटाळा घालवायचा असेल तर दिवसातून निदान ३-४ वेळा तरी उभे राहून मस्तपैकी आळोखेपिळोखे देऊन आळस काढून ताजेतवाने व्हा.
० शरीरावर दाब येईल असे घट्ट, तंग कपडे वापरू नका. घट्ट कपडय़ाने रक्ताभिसरण व श्वासोच्छ्वास सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो, जिथे कपडा काचला जातो तेथील त्वचा काळी होते.
० स्वत: स्वत:ला ओळखा, स्वत:ची काळजी घ्या, स्वत:शी बोला, हे आपल्या आरोग्याशी
संबंधित आहे आणि आपल्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.
० शरीराकडून येणाऱ्या नैसर्गिक सूचनांचा अनादर केल्यास शारीरिक पीडा सुरू होऊन क्षीणता येते. यापुढे निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण राहण्यासाठी शरीराच्या हाका ऐका आणि आजाराला लांब ठेवा. नवीन वर्षांच्या शुभेच्छा!

संकलन- उषा वसंत
unangare@gmail.com
(सदर समाप्त)