विश्वासाचे मोल

मी अकरावीत असताना बाबांनी मला एक सोनेरी अक्षरांचे कव्हर असलेली डायरी दिली आणि सांगितले की, ‘‘तुला कुठल्याही व्यक्तिबद्दल, प्रसंगाबद्दल, परिस्थिीतीबद्दल किंवा आपण पाहिलेल्या चित्रपट- नाटकाबद्दल जे काही वाटतं, जे मनात येतं ते या डायरीत लिही. त्या डायरीमुळे कोऱ्या कागदाला सामोरे जाण्याची मनाला सवय लागली. मनातील विचार, भावना, कल्पना, प्रतिक्रिया शब्दांत मांडण्याची आवडही निर्माण झाली आणि पुढच्या लेखनाचा तो पाया ठरला.

आपल्या मुलींनी केवळ संसार, मुलांचे संगोपन यातच न रमता त्यापलीकडे जाऊन कलांचा विशेषत: साहित्याचा आस्वाद घ्यावा यासाठी त्या काळातही ‘स्त्री’, ‘किलरेस्कर’, ‘अमृत’, ‘किशोर’ अशा मासिकांचे सभासदत्व घेतले होते. आमच्या कॉलेजच्या साहित्यिक वर्तुळात मला मैत्रिणींपेक्षा मित्रच जास्त होते. ७०च्या दशकात बऱ्याचशा पालकांना ते मान्य नसायचे. पण माझे बाबा त्याबाबत खुलेपणाने गप्पा मारीत. घरी आलेल्या मित्रांबरोबर गप्पांमध्ये सहभागी होत. एकदा आमच्या दूरदर्शनवरील कविता वाचनाच्या कार्यक्रमानंतर आम्ही काही मित्रमैत्रिणी एकत्र जमून गप्पा मारीत होतो. कवी शंकर वैद्य सर सोबत होते. बघता बघता वैद्य सरांनी काव्य-मैफलच रंग्विली. पहाटेचे चार वाजले तरी वेळेचे आम्हाला भान नव्हते. उशीर झाल्याबद्दल घरी कळविण्यासाठी संपर्काचे काही साधन नव्हते. वैद्य सर आम्हाला टॅक्सीने सोडून पुढे सायनला जाणार होते. माझ्या घराजवळ आल्यावर माझ्याबरोबर एका मित्राला घरापर्यंत सोबत देण्यास सांगून वैद्य सर टॅक्सीत बसून राहिले. घरी पोचल्यावर बाबांनी त्याला आत बोलावले. सर्व विचारपूस केली. त्यांच्या चेहऱ्यावर स्वाभाविकच काळजी स्पष्ट दिसत होती. पण ते रागावले नाहीत. उलट आमच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाबद्दल ऐकल्यावर त्यांना आनंदच झाला. त्या काळाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मला पुढे आयुष्यात खूप काही देऊन गेला.      – सुनीता टिल्लू, पुणे

   .. अंतर्मुख झालो.              

हा किस्सा आहे माझी मुलगी दीपिका जेव्हा जीवनाच्या क्रॉसरोडवरती उभी होती तेव्हाचा! बारावीची परीक्षा पास झाल्यावर करियरचा कोणता मार्ग निवडायचा, हा प्रत्येक घराला पडणारा प्रश्न समोर आ वासून उभा होता. ती मेरिटमध्ये आल्यामुळे अ‍ॅडमिशन न मिळण्याची धास्ती नव्हती. मी स्वत: इंजिनीयर असल्यामुळे आणि माझ्या कुटुंबात असलेल्या डॉक्टर्सना जीवनात स्थिरावण्यास खूप वेळ लागत असल्याचे बघून, तिने शक्यतो इंजिनीयर (लक्ष्मीवर डोळा ठेवून) व्हावे, असे माझे ठाम मत होते. तर ती डॉक्टर होण्यावर ठाम होती. झालं! संघर्षांचे बीज पेरले गेले आणि बापलेकीमध्ये सुरू झाले वैचारिक तुंबळ युद्ध! दोघेही तसूभरही माघार घेईनात! त्याच वेळी माझ्या डॉक्टर मेव्हण्यांशी गप्पा मारतांना ते मला म्हणाले, ‘‘तुमची मुलगी गुणवान आहे, जिथे जाईल तिथे भरारी घेईल. तुम्ही काळजी करू नका.’’  त्यांच्या वाक्याने जादू व्हावी तसे मला अंतर्मुख केले. विचार करू लागलो की आपण आपला निर्णय तिच्यावर लादत तर नाही ना? आपणच तिच्या निर्णयक्षमतेचे पंख छाटून तिला जगात उन्मुक्त उडण्यापासून परावृत्त तर करत नाही ना? शेवटी माणूसपणाने माझ्यातील वडिलांवर मात केली आणि मी तहाचे पांढरे निशाण फडकाविले. यथावकाश ती डॉक्टर झाली आणि ब्रीच कँडी (मुंबई), अपोलो हॉस्पिटल(हैदराबाद) सारख्या प्रख्यात हॉस्पिटल्समध्ये काम करून आता स्वत:च्याच व्यवसायात स्थिरावली आहे. आता जेव्हा मी सिंहावलोकन करतो तेव्हा बाबापण निभावताना, तिचा निर्णय स्वीकारताना मला केवढा त्रास झाला हे मान्य करावे लागेल. आज त्याची आठवण येते आणि मंद स्मिताची एक लकेर ओठावर प्रकटते.   – राजीव शेवडे, डोंबिवली (पूर्व.)

कष्टाचे मोल

आमचे वडील, अण्णा लिंबाजी मारोती अवचार. आम्ही चार भावंडे. अण्णांचा संघर्ष बघून आजही माझ्या डोळ्यात पाणी येते. आर्थिक परिस्थिती बेताची असताना आम्हा चारही भावंडांना उच्च पदावर बसवण्याची त्यांची किमया. शेतात मजुरी करून आम्हा चौघांना त्यांनी घडवलं. बाजीराव अवचार शिक्षक आहेत, तर दिनकर ग्रामसेवक, पांडुरंग वैद्यकीय अधिकारी तर प्रभाकर एलएल.बीचं शिक्षण घेत आहे. जोपर्यंत आम्ही भावंडे शिक्षण घेत होतो ते कधीच रिक्षाने आलेच नाहीत. पैशाची बचत म्हणून ते नेहमीच पायी पायी यायचे. अशिक्षित असूनही त्यांनी आम्हाला जे संस्कार दिले, जी शिकवण दिली ती खरंच आमच्या जन्माची शिदोरी ठरली आहे.      -बाजीराव अवचार

आश्वासक आधार

माझ्या वडिलांचे नाव क्षितिज! अर्थातच मी त्याला ‘अरे .. तुरे’ म्हणतो. यंदा मी आठवीत गेलो. आयुष्याच्या वळणा-वळणाच्या प्रवासात मला बाबाची भीती किंवा धाक कधीच वाटला नाही. खरं तर तो आय.टी.मध्ये सॉप्टेवअर इंजिनीअर! सतत बिझी! मात्र अतिशय निश्चयी, ठाम आणि विचारांनी प्रगल्भ! कारण कुठलीही कौटुंबिक, सामाजिक अथवा नोकरीविषयक चर्चा करताना तो इतके सहज, सुंदर बोलतो की सर्वजण त्याचे ‘मित्र’ होतात. निसर्गावर जीवापाड प्रेम करणारा तो वृक्ष तोडणी दिसली की अस्वस्थ होतो. इतक्या व्यापातून त्याने घराच्या टेरेसवर बाग फुलवली आहे. मध्यंतरी मुंबईतील, गोरेगाव (पश्चिम) येथील रेन ट्रीजना (पर्जन्यवृक्षांना) कीड लागली होती. तेव्हा त्या किडीला खाणारे कीटक त्याने बेंगलोर येथील सायन्स इन्स्टिटय़ूटमधून मागवले. मग त्याने अन् मी ते त्या झाडांवर जाऊन सोडले. अशा कामातून मिळणारा निर्भेळ आनंद हीच समाधानाची पोतडी असे त्याचे मत! खरोखरच मी भाग्यवान आहे की मला असा बाबा मिळाला.    -चिन्मय अष्टेकर, गोरेगांव

बापमाणूस

मित्रांचा आलेला फोनही ज्यांना चालायचा नाही, असे कडक आप्पा हळूहळू बदलत गेले. नंतर माझ्या मित्रांचे, जावयांचे आणि घरातल्या प्रत्येक लहान-मोठय़ांचे जवळचे विश्वासू मित्र बनले. माझ्या आणि त्यांच्या नात्याची नाळ वाचनाची आवड आणि माणसं जोडण्याची ओढ यामुळे घट्ट जोडली गेली. पूर्वी ते आम्हाला पत्राचा मजकूर सांगायचे आणि आम्ही लिहायचो. मायना एकदा शिकवला आणि पुढच्या वेळी पुन्हा कसा लिहू विचारला की खर नसायची. तेच आप्पा नंतर माझ्याकडून फेसबुक, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग शिकून घ्यायचे, तेव्हा स्वत:लाही तेच तत्त्व लागू करायचे. एकदा सांगितले की डोक्यात पक्के.

माझ्या आणि त्यांच्या नात्यातही ताणाचे प्रसंग आलेच. माझ्या वक्तृत्व स्पर्धा, मित्रमैत्रिणी माझे वयात आल्यानंतरचे आडमुठे वागणे यामुळे ते कधीमधी एक-दोन महिने बोलणे बंद करायचे असेही व्हायचे. तेव्हा खरे तर अध्र्याच्या वर रस्ता चालून तेच मला समजून घेऊन माझ्या मनापर्यंत पोचायचे. आमच्या नात्याने हळूहळू कात टाकली आणि मित्रत्वाचा प्रवास सुरू केला. मला बोटाला धरून मला घेऊन ते सगळीकडे फिरले. बँक, पोस्ट, त्यांचे मित्र, विविधरंगी दुनिया, जात-पात, धर्म, कर्मकांड यापुढे जाऊन खरा माणूस पाहायला आणि स्वीकारायला त्यांनी शिकवला. माझी नोकरी, प्रेमविवाह, आजारपणे, मुलाला पाळणाघरात ठेवणे या प्रत्येक प्रसंगात ‘बापमाणूस’ म्हणून उभे राहायचे. आता मी पालक झाल्यावर त्यांचं बापपण जास्त समंजस आणि प्रेमळ होतं हे जाणवतंय.  -कल्पना लाळे, आणंद, गुजरात

 ..पुढेच जायचे

वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी नाशिकला स्टेट बँकेत लिपिक पदावर रुजू झालो. पुढच्या परीक्षा अवघड असल्याने द्यायच्या नाहीत, असे ठरवले पण बाबा म्हणाले, ‘‘चार टक्के रिझल्ट म्हणजे शंभरात चार जण पास होतातच ना – मग त्या चारमध्ये तू यावेस.’’ बसलो परीक्षेला. पुढे नावापुढे बी.कॉम. सी.ए.आय.आय.बी. पदवी सुखावू लागली. ऑफिसर व्हायचे नाही, असे ठरवले होते. वडिलांना समजले तेव्हा त्यांनी मोजकेच शब्द वापरले. ‘‘अरविंद क्लार्क आणि ऑफिसरमध्ये मोठा फरक असतो. साधी गोष्ट तुमचे हेडक्लार्क तुला बँकेत हॉलमध्ये हाक मारतात – ‘ए खडमकर, इकडे ये..’ कदाचित ते मैत्रीच्या नात्याने अशी एकेरी हाक त्यांच्या टेबलावरून मारत असतील. पण तू जर ऑफिसर झालास तर ते कधीच एकेरी हाक मारणार नाही, तर ‘अहो खडमकर’  असेच म्हणतील. स्वत: तुझ्याकडे येतील.. घेतले प्रमोशन आणि जाणवले ‘ऑफिसर’चा मान काही और असतो.

बँकेत ‘स्केल वन टू’ झालो आणि वाटले आता थांबावे. कारण स्केल थ्रीची बदली दुसऱ्या जिल्ह्य़ात, किंवा इन्स्पेक्शन डिपार्टमेंटला म्हणजे दुसऱ्या राज्यात. प्रपंच सुरू झाला होता. मुलांच्या शाळा, प्रकृती तेव्हा थांबूया. पुन्हा वडिलांनी सुचविले – आता ऑफिसर म्हणून तू पुढे जात राहावे. जितका पुढे जाशील तितका मान, अधिकार मिळेल. बँक तुम्हाला पुढे जाण्याची संधी देते ती नाकारू नकोस. वडिलांचे ऐकले. निवृत्त होताना ‘चीफ मॅनेजर’ पदावरून निवृत्त होताना आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.  – अरविंद ज. खडमकर, कल्याण (प)

बाबापण जगतो आहे

‘मदर्स डे’च्या दिवशी लेक म्हणाली, ‘हॅप्पी मदर्स डे, बाबा.’ मदर्स डे असल्याची जाणीव करून दिल्यावर म्हणाली, ‘बाबा, तुम्ही पण मला आईसारखे आहात.’ मन भरून आलं. मनातील भावनांनी आठवणींच्या सीमा कधीच पार केल्या. जन्माला आल्यावर जुईला दोन्ही हातात अलगद घेतले त्याक्षणी एका जबाबदार पित्याचा जन्म झाला. जुईला भाऊ नसल्याने रक्षाबंधन, भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बनलो. तिच्या छोटय़ा हाताने जमिनीवर लाटलेली चपाती बहीण बनून आवडीने खाल्ली. कधी आई बनून पल्स पोलिओचा डोस पाजायला गेलो. आता ती तारुण्याच्या उंबरठय़ावर असल्यामुळे आईची भूमिकाही निभवावी लागते. ज्या प्रश्नांच्या उत्तरांना आई लागते, तिथे पण तिला बाबा चालतात. याला कारण तिला आयुष्य घडताना दिलेले स्वातंत्र्य. त्यामुळे ती स्वत: निर्णय घेऊ शकते. आम्ही सर्व लांबून तिचं निरीक्षण करत असतो. बाबापण जगलो, जगतो आणि जगत राहणार.  -गणेश यशवंत गांगण

कठोर बाबांचे वात्सल्य 

ज्यावेळी मी क्रिकेट खात, पित आणि जगत होतो तेव्हा क्रिकेट वर्ल्डकपचे सामने पहाटे लागायचे. सकाळची शाळा चुकवून मी मित्राकडे सामने पहात बसायचो व शाळा सुटण्याच्या वेळेस घरी यायचो. एका आठवडय़ानंतर आईला हे कळले. आई भयंकर रागावली आणि जाड पट्टीने मला ‘फोडून’ काढलं. आईच्या हातचा मार खाण्याची ती पहिलीच वेळ. माझे हातपाय चांगलेच सुजले होते. मारता मारता आई ‘‘बाबांना येऊ  दे. चांगलच बदडायला सांगते’’ म्हणत होती. आईचा मार थांबल्यावर भीतीने मी दुसऱ्या खोलीतील पलंगाखाली जाऊन लपलो. काही वेळाने बाबा आले. घरात येण्यापूर्वीच घडला प्रकार त्यांना समजला होता. माझी शोधाशोध सुरू झाली. आईने मला शोधून बाबांच्या पुढय़ात उभे केले. बाबाचा कठोरपणा माहीत होतं. परंतु बाबांनी मला प्रेमाने जवळ बसवलं. तितक्याच प्रेमानं विचारलं, ‘‘तुला शिकायचं नाही का? आपल्या हॉटेलमध्ये फडकं मारायला तुला आवडेल का?’’ मी नकारार्थी मान हलवली. ‘‘मग शिकायचं तर शाळेत जायला हवं की नाही?’’ या त्यांच्या प्रश्नाला मी होकारार्थी मान हलवली. या एका प्रसंगाने मला प्रेमळ आईची कठोरता व कठोर बाबांच्या वात्सल्याचं दर्शन घडवलं. बाबा आता कुठेतरी समजून घ्यायला मी शिकतोय.. त्यांच्या पश्चात! शल्य एकच, ‘बाबांची मिठी’ तेवढी राहूनच गेली.    – देवेन साळुंखे

बाबा नावाची फॅक्टरी

नारायण वायंगणकर, माझे बाबा ९१ वर्षे समाधानी आयुष्य जगले. वास्तव शिक्षण देणारी बाबा नावाची फॅक्टरीच ठरले. मी कॉलेजला असताना काही मुलांनी मला त्रास दिला. बाबांना सांगितले तर ते म्हणाले, ‘‘अगं, तू मोठी झालीस. मुले तुझ्याकडे बघणारच, हे वयच असते. तू स्वत:ला सांभाळले पाहिजेस, निर्णय घेताना चुका होणारच, पण आपले मनच आपला शिपाई असतो, चूक केली तर मन लगेच धिक्कार करतो, ते समजून आपण सुधारले पाहिजे.’’ कॉलेज झाल्यावर बाबांनी नोकरीकरिता नावनोंदणी करण्यास सांगितले. रस्ता माहीत नव्हता तर म्हणाले, ‘‘चालत जा आणि काम झाल्यावर तशीच चालत ये. म्हणजे रस्ता कळेल आणि अनुभवसुद्धा मिळेल.’’

त्यांनी वर्तमानात जगायला शिकवले आणि वर्तमानात चांगली वागलीस तर तुझा भूतकाळ आणि भविष्यकाळ चांगलाच राहील, याची खात्री दिली. त्यांच्यामुळे आज माझे आयुष्य कणखर आणि निश्चिंत झाले आहे.    -कविता भ. पाटणकर, अंधेरी पूर्व

बाबांच्या हातचं जेवण

बाबांची खास आठवण माझ्या प्रसूतीच्या वेळेची. मला पंधरा दिवस बेडरेस्ट सांगितली होती. आईने बाळंतपणासाठी सुट्टी घेतल्याने तिला आधी मिळणार नव्हती. मग पप्पांनीच पूर्ण १५ दिवस सुट्टी घेतली. सकाळ-संध्याकाळ गरमागरम नाश्ता जेवण ते स्वत: करायचे. नवीन नवी रेसिपी पाककृती पुस्तक वाचून तर काही वेळा टीव्हीवर बघून. खूप छान वाटायचं. आजही त्यांच्याविषयी अभिमान आणि कौतुकही वाटतं.     – धर्मिष्ठा राजे

मेरे पास पापा है..

साधारणपणे वयाच्या पाचव्या वर्षांपासून आईच्या आजारपणामुळे माझे बाबाच (आम्ही दादा म्हणतो) आई आणि वडील होते. आम्हाला आंघोळ घालणे, दप्तर भरणे, शाळेत सोडणे, स्वयंपाक करणे, प्रसंगी घास भरवणे सारं काही बाबांनी केले. आज सर्व सुख पायाशी लोळण घेत असतानाही बाबापण निभावणं किती जटिल असू शकतं हे लक्षात येतं. औषध घेऊन आई झोपली की तिचे डोळे लवकर उघडत नसत अशा वेळी रामरक्षा म्हणावयास  लावून आमच्यातल्या अनामिक भीतीचे काहूर आशादायी होण्यास बाबाच कारणीभूत आहेत. म्हणूनच शशी कपूरच्या तोऱ्यात मला म्हणावंसं वाटतं, ‘‘मेरे (आस) पास पिताजी हैं।’’   – संजय श्याम सौंदलगे, कोल्हापूर</strong>

तरीही खंत आहेच..

शाळा-कॉलेजमध्ये असताना मी खूप हुशार होतो, पण परिस्थितीप्रमाणे मला डॉक्टर किंवा इंजिनीअर करण्याचा खर्च परवडणे शक्य नव्हते. परंतु जेव्हा मी बाबा तेव्हा ठरवलं मुलांना उच्चशिक्षण द्यायचं. मोठय़ा मुलास बी.ए.एम.एस.ला प्रवेश मिळाला. यथायोग्य कालावधीत तो आयुर्वेद डॉक्टर पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाला. पुढे त्याला एम.डी.ची पदवी मिळाली. पण त्याची खंत होती की आपण अ‍ॅलोपथीमधील एम.डी. व्हावे. त्याची इच्छा अपूर्ण राहिली. याची खंत मला अजूनही सतावत असते. दुसरा मुलगा इंजिनीअर झाला. त्याला एम.बी.ए.पर्यंत शिकवले नाही, याची खंत आहे. बाबापण निभवताना नात्यात ताण आलेला आहे हे मला जाणवते. आणि माझ्या नात्याची बाप होणे आणि बापपण निभावणे यात कसोटीच लागली. तरीही त्यात आनंद एवढाच की आज दोघेही मोठय़ा हुद्दय़ावर आहेत. आनंदात आहेत.    – अ‍ॅड. रामचंद्र कापरे, कल्याण

 म्हणायचं राहून गेलंय..

लग्नानंतर वर्षभरातच मी ऑस्ट्रेलियाला आले. त्यानंतर दोनेक वर्षांनी आई-बाबा आमच्याकडे आले होते तेव्हाचा प्रसंग. आई-बाबांच्या परतीची वेळ अगदी दोन-तीन दिवसांवर आली होती. मी सोफ्यावरच बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून निजले होते. अपेक्षा ही की लहानपणीसारखं आता हे मला उठवून लावणार किंवा अगदीच आग्रह केला तर ‘‘किती वेळ असं बसायचंय?’’ म्हणून विचारणार, पण बाबांचा हात चक्क डोक्यावरून फिरायला लागला आणि पाठोपाठ ‘‘किती लांब आलात तुम्ही रहायला..?’’ हेसुद्धा. मी चटकन उठून डोळ्यांतलं पाणी डोळीच राहील याची काळजी घेत बाल्कनीत जाऊन उभी राहिले.. ‘‘देव करो अन् पोटची माया ओठी कधीही न येवो.. बाबा.. मी सांडून जाईन.’’ हे म्हणायचं राहून गेलंय.. आजवर..     – जुई जोशी, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया. 

उणीव कायम भासते

माझ्या छोटय़ा बहिणीचा जन्म झाला तेव्हा मी सहावीत होते. त्यामुळे मी अगदी जवळून पाहिलंय बाबांना ‘बाबापण निभावताना..’ मी दहावीला असताना सायली तीन चार वर्षांची होती. तिला खूप दंगा मस्ती करायची असायची आणि मला अभ्यास! मग दोन खोल्यांच्या त्या घरात माझा अभ्यास शांततेत होण्यासाठी बाबा तिला बागेत खेळायला घेऊन जायचे. ४४-४५ व्या वर्षी ते तिला पाठीवर बसवून घोडा घोडा करायचे. त्याचवेळी माझ्या अभ्यासातील प्रगतीवर लक्ष द्यायचे. मी तेव्हा १०-१२ वीच्या टप्प्यावर होते. खासगी क्लासेसची फी खूप होती. तुटपुंज्या पगारात दोन मुलींची शिक्षण आणि घर चालवताना त्यांची ओढाताण व्हायची हे माझ्या लक्षात यायला लागलं आणि तेव्हा कळलं की आम्हाला चांगलं शिक्षण मिळण्यासाठी का त्यांची एवढी धडपड चालू असायची ते.

ही ओढाताण आमच्या नजरेस पडू नये म्हणून ते जपायचे. खासगी नोकरीत होणारा त्रास आणि अचानक कर्करोगासारख्या आजाराने घातलेला विळखा हे दोन्ही लपवताना केवढय़ा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संकटाना ते सामोरे जात होते हे त्यांना आणि आईलाच माहिती.. इतक्या सगळ्या आर्थिक विवंचना असतानाही त्यांनी मला इंजिनीअिरगच्या पहिला वर्षांला प्रवेश घेऊन दिला. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये बाबा गेले. बाबांची उणीव भासतेच.. कारण आता आनंदाच्या क्षणी बाबांची कौतुकाची थाप पाठीवर नाही पडत..  – दीप्ती कुडके 

तुझ्यामुळे झालो बाबा

बाप होणं आणि नंतर निभावणं हे मनाला समाधान देणारं आणि काही वेळा कसोटी पाहणारंही असतं. त्याच्या बालपणाचा आनंद आम्ही म्हणावं त्या प्रमाणात नाही अनुभवू शकलो. कारण आम्ही दोघं नवरा बायको वैद्यकीय व्यवसायात आहोत.. डॉक्टर आहोत! आता तो दहावीच्या टप्प्यावर आहे. आणि त्याच्यात भावनिक / लैंगिक होणाऱ्या बदलामुळे त्याची चिडचिड वाढलीय, मोठय़ाने बोलायला लागलाय. पण अशा वेळेस त्याचा ‘बाप’ होणं महत्त्वाचं आहे. त्याला जवळ घेऊन न चिडता काही गोष्टी समजाव्या लागतात. सर्व गोष्टीवर मी त्याच्याशी बोलतो.. अगदी लैंगिक विषयावरही! त्यास धन्यवाद द्यावेसे वाटतात की मी त्याच्यामुळेच तर बाप आहे!      – डॉ. सतीश बबनराव झगडे, हडपसर, पुणे

आणि बंडखोरी विझून गेली

अकरावी-बारावीमध्ये माझ्या आजूबाजूला सिगरेट ओढणारी मुली-मुले दिसायला लागली होती. मी एकदा बाबाकडे माझी सिगरेट ओढून बघण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मला तो ओरडून भले मोठे लेक्चर देईल असे वाटले. पण त्याने शांतपणे सांगितले, ‘बघ एकदा ओढून.’  या उत्तराने माझ्यातली होती नव्हती ती बंडखोरी विझून गेली. आता मी इंटरवूला जाते तेव्हा तिथल्या अ‍ॅप्टिट्यूड परीक्षेत माझ्यातली स्पर्धात्मकता कमी आहे, असे प्रकर्षांने जाणवते. या गोष्टीला काही प्रमाणात बाबा कारणीभूत आहे. प्रवेश परीक्षेआधी जिथे इतर पालक मुलांकडून उजळणी करून घेत होते तिथे माझा बाबा मला ‘ही वेगळी परीक्षा आहे, तुला मजा येईल बघ’ असे सांगत होता. स्पर्धात्मकता कमी असली तरी त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता आणि अस्वस्थता माझ्यात नक्कीच नाही आहे हे मी निश्चितपणे सांगू शकते.   – मुक्ता आठवले

शाळेचे मास्तर

माझे वडील, उत्तमराव शेळके, प्रत्येक मुलाप्रमाणेच माझेही लहानपणापासूनचे हिरो. प्रतिकूल परिस्थिती असतानाही पप्पांनी त्या काळी बी.ए.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. परिस्थितीमुळे एसटीमध्ये वाहकाची नोकरी त्यांनी स्वीकारली. मला आठवतंय, पप्पा आमचा दहावीपर्यंत अभ्यास घ्यायचे. औरंगाबाद जिल्ह्यतल्या अब्दीमंडी या आमच्या लहानशा गावात तेव्हा बऱ्याचदा रात्री वीज नसायची पण आमचा अभ्यास त्यामुळे कधी थांबला नाही. मला वाटतं, खऱ्या अर्थाने आम्ही गावातले सगळ्यात श्रीमंत होतो, कारण खास आमच्या अभ्यासासाठी पप्पांनी स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली होती. या श्रीमंतीचा फायदा आमच्यासोबत गावातल्या कितीतरी मुलांनी घेतला. आमच्याकडे रात्रीच्या वेळेस जणू एक शाळाच भरायची आणि त्या शाळेचे मास्तर आमचे पप्पा असायचे. या शाळेत पप्पांनी पुस्तकातल्या गणितांसोबतच कित्येक मुलांची आर्थिक गणिते सोडवण्यासही मदत केली. कित्येक मुलांना आत्मविश्वास दिला, मानसिक बळ दिलं.  – रुपेश उत्तमराव शेळके

गाण्यांमधलं सुंदर आयुष्य

बाबांमुळे आम्हाला एक छंद अगदी त्यांच्याही नकळत लागला तो म्हणजे ‘गाणी ऐकण्याचा’. मी पाळण्यात असल्यापासून गाणी ऐकत आले आहे. बाबा झोळीच्या बाजूला हळू आवाजात रेडिओ लावून ठेवायचे. त्यामुळे मी गाणी ऐकता ऐकता शांत झोपून जायचे. बाबांकडे जुन्या गाण्यांच्या खूप कॅसेट्स होत्या. त्या ऐकून ऐकून ती गाणी, त्यांचे बोल, संगीतामधली मधुरता या गोष्टी लक्षात येऊ  लागल्या आणि या सर्वामुळे नकळतच चांगली गाणी ऐकण्याची सवय लागली. आज आमच्या दोघांच्याही व्हॉट्सअप स्टेट्सला एखादं तरी जुनं गाणं असतंच. बाबांप्रमाणेच ही गाणी माझ्याही आयुष्याचा एक हिस्सा बनली आहेत. बाबांचं आयुष्य म्हणजे ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’ हे गाणं. आणि बाबांनी आम्हालासुद्धा अशा सुंदर गाण्यांमधून आयुष्य जगायला शिकवलंय.   – कोमल केळकर, विरार.

..आणि मनावरचं दडपण गेलं

मला माझ्या बारावीच्या परीक्षेअगोदरचा एक प्रसंग आठवतोय. मला परीक्षेचं खूप दडपण आलं होतं, पण मी घरात कुणाला काहीच बोलले नव्हते. पण कसं कुणास ठाऊक हे बाबांनी नेमकं ओळखलं. त्या रविवारी सकाळी सगळं आवरल्यावर बाबा मला म्हणाले, ‘‘ओवी, चल आपण आज पाचगणीला जाऊ या.’’ मी म्हणाले, ‘‘पण माझा अभ्यास?’’ तर बाबा म्हणाले, ‘‘असु दे आज अभ्यासाला सुट्टी दे. आपण मस्त फिरून येऊ.’’ मग आम्ही दोघे गाडीवरून पाचगणीला फिरायला गेलो. दिवसभर खूप फिरलो, मजा केली. संध्याकाळी आम्ही घरी आलो. त्या रात्री छान झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आली खूप फ्रेश वाटत होतं. मनावरचं दडपण कुठल्या कुठे गेलं होतं. बाबांचं आवरून बाबा बँकेत जाण्यासाठी निघाले. निघताना मला म्हणाले, ‘‘मग, ओवी झाली का परीक्षेची तयारी?’’ मी फक्त बाबांच्याकडे बघून समाधानाने हसले आणि डोळ्यांनीच त्यांना थ्यँक्यू म्हटलं.  – ओवी सलगरे

मुलंच मला सांभाळतात

गेली आठ र्वष सकाळी सहा वाजता सुरू झालेला माझा दिवस रात्री ११ वाजता संपतो. नोकरी आणि घरकाम करताना सर्व व्यवधानं सांभाळताना माझी तारेवरची कसरत होत आहे. माझी पत्नी राधिकाचं स्तनाच्या कर्करोगानं ३६व्या वर्षी निधन झालं. आम्हा दांपत्याला रोहन आणि सोनाली ऊर्फ सुकन्या ही अपत्य आहेत. दोन्ही मुलं अगदीच लहानच असल्यानं रोजचाच दिवस कसोटीचा, परीक्षेचा घेऊन उजाडू लागला. आपण तिघंच एकमेकाला आहोत, हे मी त्यांच्या मनावर पूर्णपणे बिंबवलंय. मुलं मोठी होत आहेत. सर्वच बाबतीत आता दोन्ही मुलं एकमेकांना छान सांभाळून राहतात आणि मलाही सहकार्य करतात. मी त्यांना नव्हे तर, तेच मला सांभाळत आहेत. त्यांनीच मला अनुभवांनी समृद्ध केलंय.   – रवी कुलकर्णी, कोल्हापूर

बाबांचा खंबीर आधार 

खरा गोंधळ माझ्या बी.एस्सी.नंतरच झाला. पुढची अ‍ॅडमिशन जिथे मला हवी होती तिथे मिळाली नाही. बरोबरचे सगळे पुढे गेले मीच राहिले असे एक ना अनेक विचार मनात गोंधळ घालत होते. पण बाबांनी मला नाउमेद होऊ दिलं नाही. पुढे मी एका ठिकाणी अ‍ॅडमिशन घेतली अगदी वर्षभराने मिळाली म्हणून मीही खूश होते, पण ४ दिवसात ‘मला इथे राहायचं नाही, मी राहू शकत नाही. मला न्यायला या.’ असा बाबांना फोन केला, दुसऱ्या दिवशी बाबा हजर. ना त्यांनी आरडाओरडा केला ना कटकट. म्हणाले, ‘‘अजून खूप शिकायचंय, खूप पुढे जायचंय. अपयश- यश हुलकावण्या देतच राहणार आपण त्यातून आपला मार्ग निवडायचा.’’ अ‍ॅडमिशन कॅन्सल करून आम्ही निघालोसुद्धा. तुझा बाबा तुझ्या मागे खंबीरपणे उभा आहे हेच ते मला सारखं सांगत होते. नंतर मी डेहरादूनला एम.एस्सी. केले आता पीएच.डी.साठी प्रयत्न करतेय. त्यांची सोबतच मला पुढे नेतेय.    – वैभवी शिर्के, चिपळूण

बाबांचा सिंहाचा वाटा

लहानपणापासूनच बाबांचा माझ्या संगोपनात मोलाचा हातभार होताच. आता मी स्वत: आई झाले आहे आणि त्या टप्प्यावरसुद्धा माझ्या मदतीसाठी ते माझ्या पाठीशी उभे आहेत. मला मुलगी झाल्यानंतर माझ्या नवऱ्याला बंगळूरुला नोकरी मिळाली. म्हणून मीसुद्धा मुंबईसोडून बंगळूरुला प्रोजेक्ट मिळेल का या प्रयत्नात होते. मला बंगळूरुचं प्रोजेक्ट मिळालं त्यावेळी माझी मुलगी स्वरा ८ महिन्यांची होती. माझ्या बाबांनी तेव्हा आम्हाला भक्कम आधार दिला. आमचं सामान हलवून नवीन घरात लावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पुढे दोनदासुद्धा आम्ही जेव्हा घरं बदलली तेव्हा ते संपूर्ण वेळ आमच्यासाठी कामं करत होते. स्वरालाही त्यांनी संपूर्ण वेळ सांभाळलं. त्यामुळेच मी बिनधास्तपणे नोकरी करू शकले. स्त्रीपुरुष समानतेबद्दल चर्चा होत असतातच, माझ्या बाबांचा माझ्या पायावर उभा राहण्यात सिंहाचा वाटा आहे.     – धनश्री शिरोडकर

आश्वासक शब्द

असे खूप अनुभव आहेत-अगदी लहानपणापासून – त्यातून नेहमीच शिकत आले. एक महत्त्वाची घटना, दहावीची बोर्ड परीक्षा जवळ आलेली. माझं गणित खूप कच्च होतं. खूप प्रयत्नांनंतर हताश झाले. ‘नाही होत पप्पा!’ असे सांगून एक अख्खा दिवस गणिताकडे लक्षच दिले नाही. पप्पाही त्या दिवशी काहीही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी मला येऊन सांगितले, ‘‘हे बघ बाळा, आपलं गणित कच्चं आहे हे आपल्याला माहीत आहे. आता ते आपण बदलू शकत नाही. आता या क्षणी काय करायचं हे आपल्या हातात आहे. अजून थोडा प्रयत्न कर आणि तुला नक्की जमेल. तू तुझं शंभर टक्के दे पुढे जे होईल ते चांगलंच होईल.’’ त्यानंतर अर्थातच मला चांगले मार्क मिळाले. ते शब्द अजूनही माझ्या कानात आहेत. आता काही जमत नसेल तर हे संभाषण परत आठवते, जेणे करून मी माझं बेस्ट देईन, मला यश मिळेल.    – पूर्वा मिलिंद कुलकर्णी

बाबांची साथ

आम्ही चौघी बहिणीच, बाबांनी आम्हा बहिणीवर कधीच कोणत्याच अपेक्षा लादल्या नाहीत. आम्हाला आमच्या मनाप्रमाणे शिक्षण दिले. आज आम्ही चौघी बहिणी स्वत:च्या पायावर उभ्या आहोत, ते फक्त बाबामुळेच. माझ्या वैवाहिक जीवनात खूप कठीण प्रसंग आले. जवळच्याच नातेवाईकांनी फसवले, घटस्फोट घेण्याची वेळ आली. सर्व नातेवाईकांनी पाठ फिरवली, बोलून बोलून जिणं नकोसं केलं. त्यात शिक्षण अर्धवट, अक्षरश: पूर्ण कोलमडून गेले होते मी. पण त्या काळात भक्कमपणे माझ्या बाजूने उभे राहिले ते फक्त माझे बाबा. त्यांनी सतत मला खंबीर नि भक्कम आधार दिला. त्यांच्यामुळेच आज मी माझं शिक्षण पूर्ण करून ताठ मानेनं ज्ञानदानाचं काम करत आनंदानं उभी आहे.     -तेजस्विनी पंडित

जबाबदारीची जाणीव

दहावीत असताना एका विषयात नापास झालो, पण वरच्या वर्गात ढकलण्यात आले. अकरावी बोर्डाची परीक्षा. माझा आत्मविश्वास लयास गेलेला. घराणं गावात बुद्धिमान समजलं जाणारं. पण वडील म्हणाले, ‘‘या वयात लक्ष विचलित होतच असते. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींचे आकर्षण असते, यापुढे लक्ष देऊन अभ्यास कर.’’ त्यांच्या न रागावण्याने मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली. पुढे मी कधीच नापास झालो नाही.     -विनोद मुळे, पुणे.

बाबा मित्र झाले

आमच्या कुटुंबात भ्रमंती करायची सर्वानाच हौस. माझे आजोबा आणि वडील म्हणजे दादा दोघांनी मनसोक्त भारतभ्रमण केलंय. कोणत्याही टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सशिवाय. एकदा मी दादांची २१ दिवसांची युरोपवारी घडवून आणली. माझे वय २४ आणि दादांचे वय ६० पण दरम्यान आमच्यात मैत्री झाली. आम्ही मनसोक्त भटकलो. व्हिएन्ना शहर सायकलने फिरलो, स्लोवेनियाच्या खेडय़ात एका शेतकऱ्याच्या घरी राहिलो. टूरिन शहरात माझ्यासाठी ते फुटबॉल मॅच बघायला आले तेव्हा झालेली चेंगराचेंगरी, आमची थोडय़ा वेळासाठी झालेली ताटातूट आणि काळजी, यात आमचं नातं जास्त घट्ट झालं.   – स्वराज राजेंद्र ठाकरे.

सुपरहिरो

मला माझे वडील खऱ्या अर्थाने सुपरहिरो वाटतात. कारण आजपर्यंत त्यांनी कोणत्याही संकटापुढे वा कोणत्याही अडचणीपुढे हात टेकवलेले मी पाहिले नाही. एक प्रसंग आठवतो, आमचे दहावीचे उन्हाळी वर्ग सुरू झाले होतो आणि मी सायकलवरून शाळेत जाण्याचा निर्णय घेतला होता, कारण बसने खूप वेळ वाया जायचा. एक जुनी नादुरुस्त सायकल आमच्या गोठय़ात पडलेली होती. वडिलांनी ती दुरुस्तीसाठी तालुक्याच्या गावाला नेण्याचा निर्णय घेतला, जे की आमच्या गावापासून दहा कि.मी.वर होते. पुरेसे पैसे नव्हते म्हणून त्यांनी मेच्या भर उन्हात ती सायकल पायी लोटत तालुक्याच्या गावाला नेली आणि पुन्हा चालवीत आणली. मला ही गोष्ट त्यानंतर खूप दिवसांनी आईने सांगितली. आणि नकळत माझ्या डोळय़ांतून अश्रू टपकले. आणि तेव्हाच मी ठरवले की आयुष्यात असे काही करायचे की त्यातून आपण आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज करू.    – राजू वाकचौरे

यशाची चढती कमान

तुषार, माझ्या मुलाला मराठी माध्यमात घातलं पण त्यानेही निर्णयाचा पश्चात्ताप करण्याची वेळ कधीही आली नाही. चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत शाळेत पहिला आणि मुंबईतून दुसरा येऊन त्याची यशाची कमान शिक्षण पूर्ण होईपर्यंत चढीच राहिली. ‘केमिकल इंजिनीयरिंग’चा त्याचा निर्णय ठाम होता. परदेशात जाणं सहजशक्य असूनही इथे राहण्याच्या त्याच्या निर्णयाने माझ्या आनंदात आणखी भर पडली. त्याचा मित्र परिवार, बोलका स्वभाव माणूस म्हणून घडताना त्याला श्रीमंत करून गेले, याचं समाधान आहे.     -विकास ताम्हणे, सानपाडा

बाबा आठवताना..

‘‘बा देवा महाराजा..’’ रवींद्र नाटय मंदिर मालवणी गाऱ्हाणं ऐकत स्तब्ध झालं होतं. तो खडा आवाज होता माझ्या बाबांचा! सुप्रसिद्ध लोककला अभ्यासक डॉ. तुलसी बेहेरे माझे बाबा. बाबा जेवढे आमचे होते तेवढेच दशावताराचे होते. त्यांच्या लेखणीचे होते. कोकणातील दशावतार या लोककलेच्या व्यासंगामुळे त्यांचा शब्द पहिला आणि अंतिम मानला जायचा.

सकाळी आम्हाला उठवायला ‘उठा उठा चिऊ ताई’ कविता म्हणायचे. रस्ते कसे ओलांडावे हे ते अभिनय करून समजवायचे. स्कूटी चालवायचे धडेही त्यांनी अभिनय करून दिवाणखान्यात दिले. त्यांच्यातला सर्जनशील रंगकर्मी सतत जागरूक असायचा. त्यांचा कधी दरारा वाटला नाही, पण जेव्हा वळण लावायचं, शिकवायचं तेव्हा त्यांनी ते केलं. ते एकदाच रागावले, ‘एकतर अभ्यास कर नाहीतर टीव्ही बघ, दोन्ही एकत्र नाही.’ त्यानंतर त्यांना कधीच सांगावं लागलं नाही. ते म्हणायचे, ‘‘प्रत्येक वेळी तुम्हाला सोडायला मला जमणार नाही. आपल्या जबाबदारीवर या.’’ मुली असल्याचा बाऊ  त्यांनी कधी केला नाही. त्यांनी बाबापण खूप छान निभावलं. अभियांत्रिकी प्रवेशासाठी सामान्य बापासारखे रांगेत उभे राहिले. आमच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहिली. स्वत:च्या लिखाणातील सातत्यातून अभ्यास कसा करावा हे दाखवून दिलं. सचोटीने वागण्याची उदाहरणे स्वत:च्या वर्तनातून दिली.

आयुष्याच्या लढाईत आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. सगळं जग तुझ्या विरुद्ध गेलं तरी मी तुझ्या सोबत राहीन, ही ग्वाही दिली. ते कधी खाऊ  आणणारे, खेळायला नेणारे बाबा नव्हते. ते कलाकार होते, पण अडचणीच्या वेळी बापाच्या छत्राची गरज भासली तेव्हा त्यांनी डोक्यावर आभाळ धरलं.   – तन्मयी तुळशीदास बेहेरे

नव्या जगाची ओळख

आमच्या घरात पुस्तकाने एक कपाटच भरलेलं आहे. पण तरीही आम्ही काही त्याला हात लावत नाही हे बघून एक दिवस बाबांनी त्यातलं एक पुस्तक हाती घेतलं. ‘वनवास’ प्र. ना. संत यांनी त्यांचं बालपण त्यात अप्रतिम रेखाटलंय. बाबांनी त्यातली पहिली कथा मोठय़ाने वाचायला सुरुवात केली. आम्हीही बसल्या बसल्या ऐकत होतो. कथेतले चढउतार बाबांनी उत्तम पकडले आणि एका अशा वळणावर ती कथा संपवली की कथेत पुढे काय होईल याची ओढ आम्हाला लागली. पण बाबांनी तिथेच ब्रेक घेतला आणि मग ते पुस्तक हातात घेऊन वाचण्याखेरीज दुसरा मार्गच आमच्याकडे राहिला नाही. आणि यानिमित्ताने एका नव्या जगाशी आमची ओळख त्यांनी करून दिली. बाबांनी आम्हाला कधीच ‘हे वाचू नको, ते वाचू नको’ अशी बंधनं आणि मर्यादा घातल्या नाहीत. सगळ्याच गोष्टी कळल्या पाहिजेत आणि त्यांची माहिती असल्यानंतर, काय चुकीचं आणि काय बरोबर याची परख स्वत:ला करता आली पाहिजे हेच त्यांनी बिंबवलं.   – मनाली कुलकर्णी

बदलण्याची ताकद हवी

मी रामचंद्र, भालचंद्र, कीर्ती, भाग्यश्री, सौरभ यांचा बाबा. मी एका माध्यमिक हायस्कूलवर शिक्षक म्हणून कार्यरत होतो. पत्नी वासंती आणि चार मुले संसार सुखाचा चालला होता, अचानक सौरभच्या जन्माच्या वेळी पत्नी वारली. सौरभला माझ्या भाऊ-भावजयीने नेले. तेव्हा मी उंब्रज (कराड) येथे राहत होतो आणि तेथून माझी शाळा खेडय़ात १२ कि. मी. दूर होती. तेव्हा भालचंद्र आणि कीर्ती दुसरीत आणि भाग्यश्री बालवाडीत. रोज मी पहाटे चार वाजता उठायचो. स्वैंपाक करायचा डबा करायचा, भरायचा, मुलांना पाचला उठवायचे, अंघोळी घालायच्या, कपडे घालायचे, मुलींना वेणीफेणी करायची. थोडे खाऊ घालायचे व बसने शाळा गाठायची. पुन्हा संध्याकाळी मंडईत जाऊन भाजीपाला आणायचा आणि पुन्हा जेवणखाणं करून रात्री नऊच्या दरम्यान झोपी जायचो, पण झोप कसली सारखी हुरहुर. मुलांचे काय होणार मी हे पार पाडू शकेन? पत्नीची आठवण यायची. मनसोक्त रडायचो, पण हुंदका दाबून.

एकदा छोटी भाग्यश्री कट्टय़ावरून पडली आणि हात मोडला. तिला प्लास्टर करून आणले. तीन महिने तिला रात्री ताप भरायचा. जागूनच तिची सेवा करावी लागली. नंतर मुलांना आडाचे पाणी कसे ओढायचे, कळशा कशा भरून न्यायच्या, भाज्या कशा निवडायच्या, धान्य कसे निवडायचे, स्टोव्ह कसा पेटवायचा, गॅस कसा पेटवायचा हे सर्व  माझ्यासोबत घेऊन शिकविले. मुले शिकत गेली. अभ्यासातही मुले हुशार होती. भालचंद्रला केमिकल इंजिनीअर केले. कीर्तीला इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलेकम्युनिकेशन इंजिनीअर केले आणि भाग्यश्रीला बी.एच.एम.एस. डॉक्टर केले. जीवन जगताना अनेक अडचणी येतात त्यावर मात करून जगता आले तर.. ते जीवन सुंदर बनते. वेळ तीच राहत नाही, सर्व काही बदलते. ती बदलण्याची ताकद आपणात हवी एवढेच.     -आर. एम. कटम, सातारा

मेरे पास बेटा है..

माझ्या लंब्या आयुष्यातील आठवणीतला एक प्रसंग अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वीचा. ज्या दिवसापासून माझं आणि मुलगा समीर याचं ‘बाँडिंग’ सुरू झालं आणि ते आजतागायत.  माझं ओपन हार्ट ऑपरेशन होतं. समीर तीन वर्षांचा होता. त्याही वयात मला बिलगून म्हणाला ‘‘बाबा तुम्ही बरे होऊन लवकर घरी येणार आहात.’’ ऑपरेशनचा दिवस उजाडला. लेकाबरोबर त्याची आई (माझी पत्नी) घरीच थांबली होती. केव्हा तरी तिला रडू कोसळले. त्याबरोबर हा आमचा तीन वर्षांचा मुलगा कुशीत शिरून आईला म्हणाला ‘आई, ‘मी आहे ना तुझ्याजवळ.’ त्याने ते आश्वासन आजपर्यंत म्हणजे त्याच्या पन्नाशीपर्यंत पाळले आहे. म्हणून मी म्हणतो, ‘मेरे पास बेटा है तो सब कुछ है!    – मधुसूदन फाटक, ग्रँट रोड

बाबांनी पुनर्जन्म दिला

नवऱ्यापासून अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यापासून ते पोटगी, मुलींचा ताबा, पुरावे या सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडेपर्यंत एक खंबीर हात सदैव पाठीशी होता तो म्हणजे माझ्या वडिलांचा, शंकर रघुनाथ घाटे यांचा! माहेरी आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी मला एलएलबीचे शिक्षण घेण्यासाठी घेतलेले श्रम आठवतात आणि मी आज वकील म्हणून नावारुपाला आल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. दोन मुलींना सांभाळत, कुटुंबाच्या पाठिंब्याने खऱ्या अर्थाने मी अनुभवसमृद्ध होत होते. माझा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला गेला, त्यावर मात करत आज मी माझ्या निश्चित ध्येयापर्यंत पोहचले आहे. याचे श्रेय वडिलांना! माझ्या वडिलांनी मला पुनर्जन्म दिला आहे.      -प्राजक्ता घाटे, भांडुप (प)

सामंजस्यपणा

मी शासकीय कार्यालयात नोकरीला होतो. माझी पत्नी महागर टेलिफोन निगममध्ये कामाला आहे. तिची अत्यावश्यक सेवा असल्यामुळे बदलत्या पाळ्यांमध्ये कामाला जावे लागते. सिद्धेश एकुलता एक मुलगा. सात-आठ महिन्याचा झाल्यावर पत्नीबरोबर मीसुद्धा त्याची शी-शू काढू लागलो. आंघोळ झाल्यावर पावडर, कपडे घालून बाटलीतून दूध पाजून पाळणाघरात सोडून कामाला जात असे. एकदा मला जनगणनाची डय़ुटी लागली. आमचे सुपरवायझर घरी आले असताना सिद्धेश झोपेतून उठून भुकेने रडायला लागला. मी लगेच त्याला एखाद्या सराईत स्त्रीप्रमाणे मांडीवर घेऊन बाटलीतून दूध पाजत थोपटू लागलो. ते बघून ते आश्चर्यचकित झाले.

 

हल्लीची पिढी खूप समंजस आहे. आपण त्यांना धाकात न ठेवता स्वातंत्र्य दिले तर त्याचा ते योग्य उपयोग करतात असे वाटते. कॉलेजमध्ये असताना एकदा माझ्या पत्नीला त्याच्या तोंडाला बियरचा / सिगरेटचा वास आला. तेव्हा ती त्याच्यावर खूप रागावली. एके दिवशी पत्नी रात्रपाळीच्या डय़ुटीवर गेली असता मी त्याला मित्राबरोबर बोलावे तसे त्याविषयी बोललो. काही दिवसांनी तोच म्हणाला, ‘‘बियर / सिगरेट पिण्यात काही थ्रिल नाही. समाजातील काही लोक कामधंदा / परिवार सोडून याच्या आहारी जाऊन जीवन उद्ध्वस्त का करून घेतात, हेच मला समजत नाही.’’ त्याचंच त्याला कळलेलं पाहून बरं वाटलं.     – मंगेश पै, माहीम

दुराग्रही, पण.. 

माझे बाबा.. अतिशय कष्टाळू, निव्र्यसनी, प्रेमळ, पण हट्टी! एकदा तर जीवावर बेतलं होतं तरी डोक्याला बँडेज लावलेल्या अवस्थेत हा माणूस ऑफिसला पसार. पुढे काही कौटुंबिक कारणास्तव आमच्यात कमालीचे गैरसमज झाले, नात्यात दरी आली. पण माझ्या अडचणीच्या प्रसंगी पर्वतासारखे उभे राहिले, तेव्हा त्यांची माफी मागितली, त्यांना समजावलं पण सगळं वाया.. मोडेन पण वाकणार नाही, हा बाणा. १२ नोव्हेंबर २०१४ ला ते गेले.. कायमचे दूर! महिनाभरात माझं पीएच.डी. थिसिस लिहिणं भागं होतं, त्या स्थितीतही ते बळं कुठून मिळालं माहीत नाही, पण थिसिस लिहिताना सतत माझ्यामागे ते उभे असल्याचा भास होत असे मला! त्यांना मला पीएच. डी झालेलं बघायचं होतं! ते राहूनच गेलं. आज फक्त डोळ्यात अश्रू आहेत.    -डॉ. मनीष रवींद्र भट. (बेलापूर)

मोठा झालेला मित्र

माझ्या सुख-दु:खात समरस होणाऱ्या अनेक मित्रांपैकी माझा लाडका मित्र म्हणजे माझा आल्हाद. माझा छोटा मित्र खरोखरी मोठा झालेला जाणवले.. मी चित्रकार असल्याने माझ्या चित्रप्रदर्शनासाठी पुढच्या वर्षी ‘जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई’ येथे गॅलरी मिळाली. पण आता आयुष्याच्या संध्याकाळी  खर्चाचा विचार करून माघार घेण्याचा विचार माझ्या मनांत डोकावला. माझ्या या मित्राने विचारले, ‘‘बाबा आपण यापूर्वी कधीही पैशाच्या जमा -खर्चाचा विचार केला नाही? मग आत्ताच का? काही झाले तरी तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसला पाहिजे. तुमची चित्रे सर्वाना पाहायला मिळाली पाहिजेत. काम करण्यास सुरुवात करा. मी आहे ना सोबत..’’ माझ्या आनंदासाठी त्याने फोर व्हीलरचे स्वप्न मागे सारल्याचे आईकडून समजले.. असा ‘बापमूल’ सगळ्यांना मिळो.   – प्रकाश गणेश कब्रे, शिरोडा

 ‘तुझ्याबरोबर आहोत’चा विश्वास

‘‘आप अपने बेटे को दो-चार साल तक खिला पिला सकते हो ना, तो उन्हें बिझनेस करने दिजिए, हम इतनी तो मदद कर सकते हैं.’’ माझे वडील विनायक तेरे माझ्या व्यवसायातील भागीदार नीलच्या वडिलांना सांगत होते. मी आणि माझे दोन मित्र, आम्ही नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आमच्याकडे होते ना भांडवल; ना अनुभव.. प्रत्येकी सात हजार रुपये भांडवल आणि आईवडिलांचा खंबीर पाठिंबा याच्या बळावर आम्ही तिघांनी प्रिंटिंग व्यवसायाची सुरुवात केली. हा निर्णय खूपच धाडसी होता. नीलचे वडील साशंक होते. तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांची समजूत घातली आणि आमच्या व्यवसायासाठी पाठिंबा मिळवला. मी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा आग्रह धरला तेव्हा इतर चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा माझ्या शिक्षणाचा खर्च जास्त होता; जो माझ्या वडिलांना परवडण्यासारखा नव्हता. तरीही त्यांनी सर्व तडजोडी करून मला पाठवलेच. तीस वर्षांपूर्वी वेगळ्या वाटेने जाणाऱ्या मला ‘आम्ही तुझ्याबरोबर आहोत’ हा विश्वास देणाऱ्या वडिलांशी माझे नाते कायम मित्रत्वाचे राहिले. – संदेश विनायक तेरे, वसई

लाडूबाबा

बारावीत मला मोठा अपघात झाला होता, तेव्हापासून मी स्कूटी चालवणार नाही, असे ठरवले होते. एक दिवस बाबा मला खाली घेऊन गेला, हातात स्कूटी  दिली आणि म्हणाला ‘‘आरोही, पिल्लू अशी संकटे येतच असतात, रडायचे नाही, लढायचे. मी आणि आई आयुष्यभरासाठी नाही तुमच्यासोबत. स्वत:लाच मजबूत व्हावे लागणार’’ असे म्हणून पाठीवर हात फिरवला आणि म्हणाला, ‘जा दोन राऊंड घे’ आणि मी स्कूटीवर चक्क पाच – दहा राऊंड घेतले. बाबा सतत सोबत असतो, अगदी परीक्षेचे दडपण आले म्हणून चित्रपट दाखवायला नेणारा (दुसऱ्या दिवशी बोर्ड पेपर असताना) रात्री लाँग ड्राइव्हवर घेऊन जाणारा, कॉलेजच्या सर्व प्रोजेक्टमध्ये मदत करणारा, कोणत्याही विषयावर आमच्याशी गप्पा मारणारा, धम्माल, मस्ती करणारा माझा लाडूबाबा!   – आरोही पाटील

स्षष्टवक्ती झाले

मी एस. एस. सी. ला प्रथम वर्गात पास झाले आणि महाविद्यालयात प्रवेश घेतला. मी दादाचा अभिमान होते. त्यांनी मुलगा-मुलगी भेद केला नाही. त्यामुळे न्यूनगंड आला नाही. खरं तर तो काळ मुलींकरता अतिशय परंपरावादी होता. काही प्रमाणात महाविद्यालयात रॅिगग होत होतं, मला ‘लेडीस बॉस’ म्हणून चिडवायचे. त्यामुळे मी शिक्षणालाच रामराम ठोकण्याच्या विचारात होते. दादांनी मला धीट केलं, धाडसाने एखाद्या गोष्टीचा मुकाबला कसा करायचं हे शिकवलं. चिडणाऱ्या मुलांना सडेतोड उत्तर असं दे की, परत ते तुझ्या वाटेला आले नाही पाहिजेत. ‘‘अरे ला, का रे उत्तर दिलेच पाहिजे नाही तर आणखी आपल्या घाबरवतील.’’ त्याचं म्हणणं खरं करत मी परखड आणि स्पष्टवक्ती झाले.    – शांता पवार

बाप माणूस

बाबा अंतर्मुख आणि मितभाषी असल्यामुळे ते फार कमी वेळेस व्यक्त होत असत. एक प्रसंग आठवतो, माझा वैद्यकीय शिक्षणासाठी औरंगाबादला बाबा सोबत आले होते. माझी सर्व व्यवस्था त्यांनी उत्तम रीतीने लावून दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हिंगोलीला जाण्याकरिता निघाले. औरंगाबाद बस स्टॅण्डवर मी त्यांना सोडण्याकरिता आलो होतो. जसजशी गाडी सुटण्याची वेळ झाली, तसं दोघांमध्ये काहीतरी तुटतंय असं जाणवत होतं, अन् दुसऱ्या क्षणी आम्ही दोघेही रडत होतो. बाबांना असं भावनिक अवस्थेत मी पहिल्यांदा पाहत होतो. वडीलकीचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कमालीचा संयमी, संतुलित, निगर्वी, गर्द सावली देणारा, साधा, सरळ, माझा बाप माणूस.. होता तो..    – डॉ. राहुल श्यामसुंदर परसवाळे, हिंगोली

हळवे बाबा

मी आठवीत असतानाची गोष्ट आहे. मी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण केले होते. भाषण उत्कृष्ट झाले होते. भाषण ऐकायला गावातील मंडळी होती, पण दादा नव्हते. पण दादांच्या मित्रांनी त्यांना सांगितले, ‘काय भाषण दिलं तुझ्या मुलानं. खूप छान.’ दादा आनंदी झाले. भाषणात काय काय बोललो म्हणून त्याला जिज्ञासेने विचारू लागले. हळवे झाले. घरी येताना आवर्जून मिठाईचा बॉक्स आणला. माझ्या समोर नाही पण आई समोर खूप कौतुक केले. मी जेव्हा भीमजयंतीला भाषण दिलं तेव्हा दादा होते. त्यांची नजर एकटक माझ्यावर होती. मी काय बोलतोय. कसा बोलतोय एवढय़ानेच आभाळ ठेंगणं झालं होतं! मी बारावीत असताना आईचे निधन झाले. त्यापूर्वी तिच्या आजारपणात तिला सांभाळत त्यांनी आम्हाला वाढवलं. दादांनी सगळ्याच परिस्थितीत खूप साथ दिली. ती शब्दांत सांगता येत नाही. एवढीच प्रार्थना, माझ्या दादांना सुखी ठेव.   – सुमित जाधव 

 

आजही जाणवणारं बाबाचं अस्तित्व

माझे वडील शंकरराव चिलमवार व्यवसायाने प्राथमिक शिक्षक होते. मी फार रुसूबाई होते. रागावले की जेवायचे नाही. वडील तेव्हा काही बोलायचे नाहीत, पण रात्री सगळे झोपल्यावर हळूच दूधपोळी, तूप साखरपोळीचा रोल करून जेवायला घालायचे. दहावीला असताना आम्ही अभ्यास करावा म्हणून ते रेडिआ ऐकत किंवा पुस्तकं वाचत आमच्यासोबत बसायचे. फायनलचा निकाल त्यांच्या डोळ्यातच कळला मला. समोरच्यांनी सहज त्यांना म्हटले, ‘मास्तरसाहेब. आज माई मुलगा असती तर तुम्हाला आधार झाला असता. एवढं शिकवून लग्न करून ती दुसऱ्यांची होणार.’ तेव्हा त्यांचं उत्तर मोठं मार्मिक होतं. ते म्हणाले ‘‘ती मुलगी आहे हेच बरं आहे. दोन घराण्यांचं नाव पुढे चालवेल. मुलगा असता तर फक्त आमच्याच घराण्याचं नाव पुढे गेलं असतं.’’ आज १५ वर्षांनंतरही त्यांचं नसणं मला जाणवतं.    – रजनी राजेंद्र

मुलगा झाला बाबा 

अक्षय साधारणत: १५ /१६ वर्षांचा असताना एक दिवस माझ्या छातीत दुखायला लागलं. प्राथमिक उपचार आणि आवश्यक सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी मला एन्जोग्राफी करण्यास सांगितले. त्याने त्याच्या आईच्या, नातेवाईकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये नेले. आम्ही दोघेही फार घाबरलो होतो. पण तो आम्हा दोघांच्या पाठीशी पहाडासारखा उभा होता. त्याच्याकडे पाहून मला जाणवते, ‘आज तो माझा बाबा बनलाय’. अशा प्रकारचे अनेक प्रसंग आमच्या कुटुंबावर – कुटुंबातल्या जवळच्या माणसांवर आले त्यात माझा मुलगा माझा बाबा झाल्याचे प्रकर्षांने – अभिमानाने जाणवले.   – दिलीप भास्करराव राणे, अंधेरी

बाबांची शिकवण

बाबांचे नाव जनार्दन रामचंद्र जोशी. निर्भीड, वेळ आणि कामाची शिस्त पाळणारे, कर्तव्यात कधीही कसूर न करणारे आणि खूप मोठय़ांदा हसणारे! मला आठवतंय, लॉ करत असताना एका पेपरच्या वेळी एका लग्नघरी खूप मोठय़ांदा रेकॉर्ड लावून ठेवलेली होती. माझा अभ्यास होईना. बाबांना सांगितलं, तर म्हणाले, ‘काय करू या?’ म्हटलं, ‘इथून लांब जाऊ या’. क्षणात म्हणाले, ‘चल’. आम्ही दोघे रात्री स्टेशनवर येऊन बसलो. १२ वाजता घरी गेलो तरी आवाज चालूच. मला रडू येऊ  लागलं. बाबांना म्हटलं की, ‘‘मी पोलिसात फोन करू का?’’ म्हणाले, ‘हा, घे नंबर’. मी आधी पोलिसात फोन केला आणि नंतर त्या लग्न-घरीही फोन केला. साधारण १५ मिनिटांनी आवाज बंद झाला. मला आधी खूप भीती वाटली आणि नंतर काहीतरी जिंकल्यासारखं वाटू लागलं. त्या दिवशी जे शिकले ते आजही कामी येतेय.      – संध्या विनायक रानडे, मुलुंड (पूर्व)

खऱ्याची किंमत

आई आम्हाला जवळची म्हणून तिला आम्ही एकेरी संबोधनाने हाक मारतो, तूही तितकाच जवळचा म्हणून आज नेहमीचं ‘अहो’ टाळून ‘अरे’च म्हणणार आहे मी तुला. तुझ्याविषयी बोलताना खरंतरं माझ्याविषयीच बोलावं लागणार कारण माझ्या प्रत्येक पावलावर तुझीच छाया आहे. सहावी सातवीत असेन मी, शाळेत सहलीला गेलो असताना ५० रुपये पडले माझे, माझ्या मागेच असलेल्या माझ्या वर्गमित्राने ते उचलून सरांना दिले. सरांनी ते मला न देता ‘वडिलांना बोलावून आण,’ असं सांगितलं, मी तुला काय घडलंय ते न सांगता फक्त पैसे सरांकडून आणायचे आहेत, एवढंच सांगितलं. माझ्याकडून पैसे पडल्याचं आणि ते सापडल्याचं सरांकडून तुला कळलं. ‘असं काही घडलंच नाही, माझा मुलगा माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही’ म्हणून भांडलास सरांशी, तेही चिडले, म्हणाले, ‘जाऊन विचारा मुलाला.’ तू घरी आलास मला विचारलेस, मी खरं सांगितलं, वाटलं, आता मार पडणार पण तू फक्त म्हणालास की ‘तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि त्या परक्या माणसासमोर मी खोटा ठरलो.’ बाबा, माझेही केस आता पांढरे झालेत रे, पण आजतागायत पुन्हा खोटं बोलायची हिंमत नाही झाली.    – चंद्रशेखर पाचपांडे 

 अंतर्बा बदलवणारा क्षण

आठव्या इयत्तेत गेले त्यावेळची गोष्ट.. शाळेत जायला लागल्यापासूनच शाळा सुरू व्हायच्या आधीच नवीन वहया, पुस्तकं, दप्तर यांची लगबग सुरू व्हायची.. आठवीत गेले, नेहमीप्रमाणे नवीन वह्य, पुस्तके वडिलांनी घेऊन दिली. नेहमीप्रमाणे घराघरात असणारा संवाद आमच्यातही सुरू झाला की, इतका खर्च करतो आम्ही तुमच्यासाठी, जे मागितले ते मिळते तर अभ्यासावर ही लक्ष देत चला. चांगला अभ्यास करा वगैरे.. पण त्यावेळचे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव काकुळतीचे वाटले. आतूून गलबलल्यासारखे झाले की मीच जास्त समजदार झाले होते कुणास ठाऊक? आणि तोच क्षण मला अंतर्बा बदलवणारा ठरला. त्या वर्षी झपाटून अभ्यास केला. कधी पहिल्या दहात न येणारी मी वर्गात दुसरा नंबर मिळवला. त्या यशाने आयुष्यभर पुरेल इतका आत्मविश्वास मी कमावला. परत मागे फिरून पाहिले नाही. निकालपत्र बघून वडिलांच्या डोळ्यांत अश्रु.. जे पुढे प्रत्येक यशाच्या वेळी नेहमीच बघायला मिळाले ..   – नयना पगार

जळते निखारे झेलले

मी साधारण एक वर्षांचा असेल. आम्ही राहायचो ते घर छप्पराचे होते. प्रचंड डास चावायचे. म्हणून रोज रात्री वडील डासांपासून वाचण्यासाठी घराच्या सगळ्या कोपऱ्यात वायर जाळायचे. हा सुरक्षित उपाय नव्हताच. पण शांत झोप लागणे गरजेचे होते. एके दिवशी मी आईच्या मांडीवर झोपलेलो होतो. आणि वडील घराच्या सगळ्या कोपऱ्यात पेटवलेली वायर फिरवत होते. एक पेटता थेंब माझ्या अंगावर पडणार असे लक्षात येताच आई मोठय़ाने ओरडली आणि क्षणाचाही विलंब न करता वडिलांनी आपली मांडी पुढे केली. आणि जळत्या वायरचे वितळणारे थेंब वडिलांच्या मांडीवर पडले. मोठी जखम झाली आणि खूप दिवस राहिली. त्या जखमांचे दोन मोठे व्रण शेवटपर्यंत वडिलांच्या मांडीवर होते. आमच्या वडिलांनी असे अनेक जळते निखारे काळजावर झेलले होते. तो व्रण पाहिला की जाणवायचे पालकत्व किती कठीण असते आणि आईबाप लेकरांसाठी खस्ता खातात, म्हणजे नेमकं काय काय करतात.   -अरुण सीताराम तीनगोटे, औरंगाबाद.

कष्टाचा वारसा

माझ्या बाबांच्या दत्ता धामणस्कर यांच्या करिअरची सुरुवात एक कामगार म्हणून झाली. नंतर ते कंपनीत युनियन लीडर झाले. कामगारांच्या कल्याणासाठी ते खूप लढले, अतोनात कष्ट घेतले. त्यासाठी त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला. पुढे मी त्यांना ‘मॅनेजमेंट’ करायला सांगितलं. खूप आढेवेढे घेत त्यांनी ते केले. मला पदवीनंतर एम.पी.एम. (मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट) करायचं होतं. पण बाबा या गोष्टीला तयार नव्हते. ते नाराज झाले. कोर्सची फीसुद्धा भरली नाही. हळूहळू बाबांना ‘मॅनेजमेंट’मध्ये रस येऊ लागला. त्यांनी नोकरीही बदलली. बरीच वर्षे एचआरमध्ये सव्‍‌र्हिस केल्यानंतर पाच वर्षांपूर्वी मी स्वत:ची ‘तेजस कन्सल्टिंग अ‍ॅण्ड ट्रेनिंग’ ही कंपनी स्थापन केली आणि बाबांबरोबर कामगारांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमधून ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. ज्या वडिलांना माझ्या करिअरवर राग होता ते वडीलच गेली ५ वर्षे कामगारांच्या जगात माझ्यासोबत अविरत काम करत आहेत. आजपर्यंत आम्ही जवळ जवळ सहा हजार लोकांना प्रशिक्षण दिले आहे. ७०व्या वर्षीही बाबा आठ तास उभे असतात. त्यांनी दिलेला हा वसा खूप मोठा आहे.    – निखिला शिरोडकर, पुणे

साभार पोच

१) यशवंत सुरोशे – ठाणे  २) दीपक घोलप  ३) श्री. ग. घन, हिंगोली  ४) चंद्रकांत मधुकर भंडारे ५) चंदा जोशी, खोपोली   ६) सतीश पाध्ये, कोल्हापूर ७) शुभा प्रधान, वाशी  ८) विभा भोसले, मुलुंड ९) सूर्यकांत भोसले  १०) शशिकांत कुलकर्णी, गोरेगांव ११) ऋ चा अनिरुद्ध मायी, दिल्ली १२) बाळू १३) सुशीला तिवारी  १४) वैभव काटे  १५) गिरीश शहा  १६) अतुल पाटील  १७) उदय जोशी  १८) श्वेता दाबरे १९) सुप्रिया भिडे  २०) वैभवी करंदीकर  २१) डॉ. सतीश झगडे  २२) हिरासिंग जाधव २३) प्राप्ती विठलानी  २४) कीर्ती कोकाटे, मुंबई  २५) डॅनियल फ्रान्सिस मस्करणीस  २६) वर्षां जयेश विठलानी  २७) अंजली महाजनी  २८) अक्षया ढोले,  २९) सविता पाटील, पनवेल  २०) श्रीधर कांबळे  ३१) समीर सहस्रबुद्धे, मुंबई  ३२) माधवी सातवे  ३३) अथर्व कुमावत  ३४) सुनयना सोनावने, लातूर  ३५) क्रितिदा शेळके, पनवेल  ३६) वसंत चाळके ३७) कपिलकुमार जिने – पुणे ३८) कल्याणी भागवत  ३९) विना मुळे ४०) काकासाहेब लेंभे – औरंगाबाद ४१) मनोहर विभांडिक, नाशिक ४२) आकाश सानप, सायखेडा ता. निफाड, जि. नाशिक.  ४३) प्रकाश आठल्ये, मालाड, मुंबई.  ४४) सेजल हरिहर धुतमल, नांदेड.  ४५) चैताली पिसे  ४६) वृषाली गोगटे, पुणे.  ४७) संचित जिंतूरकर  ४८) संज्योत जगताप, मुलुंड.  ४९) मानसी पाटणकर  ५०) श्रीश्मी साबळे  ५१) सुरेश गणराज, वर्धा ५२) प्रकाश वैद्य, कल्याण  ५३) संजय सौंदलगे, कोल्हापूर  ५४) तारा ठाकरे, नाशिक  ५५) मंदार हितेंद्र सिनकर ५६) सतीश पिंपळे  ५७) सरिता कोकरे ५८) प्रज्ञा वझे – घोरपडे  ५९) योगिता शिंदे   ६०) डॉ. सुप्रिया कुलकर्णी – रावते  ६१) श्रद्धा जोशी, संकेत जोशी ६२) सचिन सावंत – नाशिक ६३) क्षितिजा वाईकर, पनवेल  ६४) कुमार देशपांडे – जालना ६५)  मंदार मोरे  ६६) डॉ. देवेंद्र पांडुरंग टेकाळे  ६७) मनोज हाडवळे, जुन्नर  ६८) सावित्री जगदाळे  ६९) विश्वास मोरे, कल्याण  ७०) राजीव वैद्य, पुणे  ७१) अभिषेक येन्नावार  ७२) प्र. अ. जोशी, दादर   ७३) मक्र्युरी मोघे ७४) मनोज राणे  ७५) डॉ. निशा साने  ७६) रत्ना कुंटे – मॅसच्युसेट्स ७७) मकरंद चांदवडकर   ७८) अशोक गायकवाड, लातूर.   ७९) उमेश अहिरे, पुणे.  ८०) प्रसन्न गोस्वामी  ८१) डॉ. दिलीप शिंदे, सांगली.  ८२) प्राची पिंपरकर, अकोला   ८३)  आनंद वानखेडे, चंद्रपूर   ८७) किमया गावडे – परब,  ८८) हरेश झरकर  ८९) स्मिता जिंतुरकर  ९०) विश्वेंद्र मांजरेकर, वांद्रे ९१) अश्विनी मछिंद्र लब्दे, पुणे ९२) किमया गावडे-परब  ९३) सुवर्णा इंदोरे, पुणे   ९४) भरत भगवानराव भुतेकर, जालना  ९५) महेन्द्र चव्हाण, धानोरा ९६) हेमंत श्रीपाद पराडकर ९८) निर्मला साळुंखे, शहापूर ९९) चंद्रहास रत्नाकर आणेकर,  नवी मुंबई १००) विनोद अच्युत बांदोडकर, ठाणे १०१)  मृदुला शहाणे १०३) संतोष म्हामूणकर  १०४) वंदना कुचिक, कोपरखराणे  १०५) मिनाक्षी सामंत  १०६) संदीप वरकड १०७) विजय पाटील   १०८) सुबोध विजय देसाई, सिंधुदुर्ग  १०९) स्नेहल मधुकर दांडगे, औरंगाबाद  ११०) अमिता, कोल्हापूर  १११) प्रिया प्रकाश निकुम, नाशिक  ११२) सरिता कोकरे, घाटकोपर  ११३) डॉ. सतिश बबनराव झगडे, पुणे  ११४) देविदास ससाणे, कल्याण   ११५) प्रियंका लिखार, नागपूर  ११६) भाग्यश्री दिनकर खोबरेकर  ११७) राम हांडगे  ११८) डॉ. पवन सत्यनारायण चांडक  ११९) संतोष पंढरीनाथ आव्हाड, ठाणे  १२०) प्रणय हाडगे  १२१) शुभदा भालचंद्र टिळेकर, पुणे  १२२) अश्विनी पाध्ये  १२३) राहुल जाधव  १२३) प्रणिता गजने, भांडुप  १२४) प्रा. अविनाश गंगाई कळकेकर, नांदेड १२५) वैभव राजेंद्र कोप्पे १२६) संगीता गुरव, सातारा १२७) श्रीराम कुमठेकर १२८) कीर्ती कोकाटे, मुंबई  १२९) मुकेश देशपांडे