प्रिन्स ऽ ए प्रिन्स… झोपतोस काय लेका? आपण इथे सनराइज एन्जॉय करायला आलोय ना?’’ पप्पाने पेंगणाऱ्या चिरंजीवाच्या कानात म्हटलं तेव्हा चौफेर प्रचंड गर्दी- गोंगाट-प्रकाशझोत वगैरे होतं आणि चिरंजीव प्रिन्स त्यातही डुलक्या घेऊ शकत होते. ‘‘ऊठ ऊठ ऊठ… आता होईलच हं सनराइज.’’मम्माही प्रयत्न करत होती. पण पोरगं बधायला तयार नव्हतं, म्हणून बघायलाही तयार नव्हतं.
टूरगाइडने भल्या पहाटे बळेबळे या टुरिस्टांना झोपेतून उठवून, जंगलवाटा-बोचरं वारं कापत, जीपमधून इथे आणलं तेव्हा प्रिन्स बऱ्यापैकी जागा होता.‘‘अजून किती वेळ आहे सनराइजला? आजचा सनराइज कॅन्सल झाला तर? लवकर करा ना सनराइज शो.’’ वगैरे वाक्यं पुटपुटत होता. पण आता त्याला तेवढंही भान राहिलं नव्हतं. काल मुंबईहून कोचीकडे येणारं विमान लेट झाल्यापासून रखडपट्टी सुरू झालीच होती. विमानतळावर प्रचंड गर्दी, उगाचच इकडून तिकडे धावपळ, तिथल्या स्टॉलवरचे खाद्यापदार्थ संपणं, रांगा लावाव्या लागणं वगैरे गोंधळ होताच. पण दरवेळी मम्मापप्पा म्हणायचे, ‘‘आपण केरळ एन्जॉय करायला चाललोय की नाही? मग इथला थोडासा गोंधळ चालवून घ्यायचा. कोचीला पोचलो की सुरूच एन्जॉयमेंट.’’
तर एन्जॉयमेंटच्या अभ्यासक्रमातला पहिला विषय होता हा सनराइज ऊर्फ सूर्योदय. सनराइज बघण्यासाठी ही खास ‘बाल्कनी’तली सीट त्यांनी बक्कळ पैसे मोजून बुक केली होती. पैसे गेले तर जाऊ दे. एन्जॉय झालंच पाहिजे. यावर मम्मापप्पा ठाम होते. पण बाल्कनीतली सीट म्हणजे थंडगार पडलेला दगडी चौथरा गाठल्यापासून पोराला झोप आवरत नव्हती. ‘‘सन राइजला आला की मला उठवा,’’असं पुटपुटत पेंगतही होता. आणि दरीच्या मागल्या सनराइजची वाट बघतानाच मांडीवरच्या आपल्या सनला ‘राइज’ करण्याचं जादाचं काम मम्मापप्पावर येत होतं.
तसे ते दर एक दोन वर्षांआड पर्यटनाला जाणारे होते. तीनचार दिवसांमध्ये एकेका महानगराचाही फडशा पाडू शकणारे होते. त्या लाटेत आता केरळ- मुन्नार वगैरेंचा नंबर लागला होता. सहासहा महिने अगोदर माहिती घेणं, बुकिंग करणं, तारखा ठरवणं- बदलणं, पैसे भरणं-परत मागणं या सगळ्या खटाटोपाचं उद्दिष्ट काय? तर, एन्जॉयमेंट! शाळेच्या -ऑफिसच्या मोठ्या सुट्टीतला क्षण न् क्षण कुठल्यातरी पर्यटनामध्ये घालवायचा. कुठले तरी डोंगर-दऱ्या, किनारे-किल्ले वगैरे एन्जॉय करायचं. रोजच्या जगण्याच्या धकाधकीतून बाहेर पडायचं आणि प्रवासाच्या धकाधकीत जाऊन पडायचं. की लगेच ते वृत्त वेगवेगळ्या सोशल मीडियात जाऊन पडायचं – ‘‘आम्ही सूर्यास्ताचा आनंद घेतोय.’’ ‘‘नदी बघावी तर तिस्ता नदीच. प्रिन्स म्हणतोय, हिच्यातून वाहून गेलं तरी किती मजा येईल ना मम्मा?’’ ‘‘हॉटेलच्या खोलीच्या व्हरांड्यात आले तर समोर साक्षात् कुंडला पर्वतरांग. मानवी जीवनाची क्षुद्रता जाणवून मला कसंसंच झालं.’’ वगैरे वगैरे…
जगातलं सारं नाट्य, काव्य, तत्त्वज्ञान एन्जॉय करण्याची विकतची संधी म्हणजे पर्यटन. ती लुटण्याचा चंग बांधूनच इथे आलेल्या एका घोळक्याने अचानक पिपाण्या वाजवायला सुरुवात केली तेव्हा सूर्य जागा झाला असावा, नाइलाजाने तो उगवायला निघाला. काही मिनिटांतच सगळा घोळका जवळच्या हॉटेलवर स्वारी करून गेला. सूर्योदयाचा स्ट्रेस आल्याने खाद्यापर्यटनप्रेमींना कधी एकदा खातोपितो असं झालं होतं. त्यांच्या चौकश्या, उलटसुलट ऑर्डरी, हॉटेलवाल्याचा चिमुकला जीव, धंद्याची चतुराई या गदारोळात बिचाऱ्या प्रिन्सला खायला हवं ते काही मिळालंच नाही. पण तेवढ्यातही त्याच्या मम्माने हॉटेलवाल्याशी हुज्जत घालून, हात वर करून, त्याने उंचावर ठेवलेल्या थाळ्यातले दोनचार कोरडे तुकडे उचलून पोरासमोर धरले.
प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत संध्याकाळसाठी एका वस्तुसंग्रहालयाची भेट नेमलेली होती. युद्धसामग्रीचं प्रदर्शन होतं तिथे. प्रिन्सला सैनिकाचा वेश चढवून तिथल्या काही हत्यारांसह त्याची रील बनवायचा मनसुबा होता. पण नेमका गावातल्या मुख्य रस्त्यावरून एक प्रचंड मोर्चा जात असल्याने यांची बस अडकली. प्रदर्शनस्थळी पोचेपर्यंत त्याची वेळ संपायची वेळ आली. ‘‘बॉस, आता दहा मिनिटांतच प्रदर्शन एन्जॉय करायचं हं. ओन्ली टेन मिनिट्स. एन्जॉय अॅज मच…’’ गाइडने प्रेमळ ताकीद दिली. तेवढी चपळाई नसणाऱ्या बहुतेकांनी मग त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराचे फोटो काढून घेऊन म्युझियम एन्जॉय केलं. ‘‘आपल्याकडचे लोक फार लढवय्ये होते बरं प्रिन्स.’’ मम्माने लेकराला कौतुकाने सांगायला घेतलं. ‘‘कध्धी कशापुढे हार मानली नाही आपल्या पूर्वजांनी.’’
‘‘ तू तरी कुठे मानतेस? सकाळी कसली फायटर होऊन नाश्त्याचा आयटेम दिलास तू मला त्या हॉटेलातला?’’ पोरानं तोंड भरून दाद दिली. त्याचा अभिप्राय पप्पाने एन्जॉय केला.
जाऊ तिथे वेळा मागेपुढे होणं, गर्दी, गोंधळ, रांगा, कचरा, चढे दर, टुकार माल हे सगळं ‘एन्जॉय ’ करता करता परतीची वेळ येऊन ठेपली. परतीच्या प्रवासासाठी मुद्दाम रेल्वेचा आसरा घेतला होता. पोराला तोही माहिती असावा म्हणून. पण सुट्ट्यांचे दिवस असल्याने रेल्वेला अतोनात गर्दी! या तिघांचे बर्थ कुठेही, कसेही विखुरलेले. ते सोयीने बदलून घेताना काही वेळ उभ्याचा खो-खो खेळायला मिळाला. गाडीने दुसऱ्या दिवशी भरपूर लेट होऊन प्रवाशांना इतर खेळ खेळायलाही वाव दिला. यांना घरी पोचायला फार रात्र झाली. बाहेरून पार्सल मागवून पोटपूजा करायलाही उशीर झाला. शेवटी मम्माने घरीच खिचडी टाकली. तिघांनी ती चाटूनपुसून खाल्ली. माफक आवराआवर, निजानीज होईपर्यंत पप्पाचे निशाचर मित्रांना फोन सुरूच होते. टूर माइंड बॉगलिंग झाल्याचा निर्वाळा देणं सुरू होतं. अंथरुणाला पाठ टेकताना मम्माच्या तोंडून पडलं, ‘‘हुश्श… उद्यापासून आहेच चक्र. पण या ट्रिपमध्येही धकाधक खूपच झाली नाही?’’
‘‘पुढची ट्रिप आरामशीर करू या! आत्ताच सुव्या म्हणत होता, रणथंबोर केलंच पाहिजे प्रत्येकाने. म्हटलं करतोच पुढच्या मोठ्या सुट्टीत!’’ ‘‘आत्ता तर आलोय प्रवासाहून. जरा दम घे.’’ ‘‘आता एवढं एन्जॉय करायचं तर आधीपासून प्लॅनिंग नको? नाहीतर काय, सुट्ट्यांमध्ये एकमेकांची तोंडं बघत घरी बसून राहायचंय? सोऽ डाऊन मार्केट! टूरमधून टूर निघायलाच हव्यात. व्हॉट से प्रिन्स?’’ पप्पाने उत्साहाने म्हटलं. मोठ्ठी जांभई देत प्रिन्स म्हणाला, ‘‘चिल पप्पा. यू प्लॅन. वुई एन्जॉय!’’
mangalagodbole@gmail. com