डॉ. साधना सुधीर कुलकर्णी
काही वेळा हृदय क्रिया अचानकपणे बंद पडते परंतु अशा मृतवत स्थितीतही मेंदू तीन ते चार मिनिटे जिवंत राहू शकतो. यावेळी पुनरुज्जीवन देणारा ‘सुप्रसाद’ जर त्यांना मिळाला तर त्यांची जगण्याची शक्यता वाढते. मात्र अनेकदा ती व्यक्ती जिवंत झाली नाही तर लोक आपल्याला दोष देतील किंवा पोलिसांना आपली माहिती द्यावी लागेल या भीतीने अनोळखी माणसे पुढे येत नाहीत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चांगल्या हेतूने अशी मदत करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही. तेव्हा या ह्रदयसंजीवकाची माहिती प्रत्येकाने घ्यायला हवी.
जीवन ही आपल्याला मिळालेली अनमोल देणगी आहे. आपण अमर नसलो तरी सन्मानपूर्वक मृत्यू यावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आजकाल अचानक ह्रदयक्रिया बंद पडून मृत्यू झाल्याचे वारंवार कानावर येते. व्यायामशाळेत व्यायाम करत असताना होणारे तरुणांचे अकाली मृत्यू ऐकून तर मन सुन्न होते.
पीडित व्यक्तीला दवाखान्यात नेण्याची घाई करताना कोणी त्याच्या छातीवर दाब का देत नाही हा विचार मला नेहमी भेडसावतो. पण असं वाटतं त्याक्षणी सामान्य माणूस इतका घाबरतो की आपण काही उपचार करू शकतो हे त्याच्या लक्षातच येत नाही. सर्व ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असणे शक्य नाही. म्हणूनच अशा वेळी सर्वसामान्य माणसाने गोंधळून न जाता काय करायला हवे, काय करता येऊ शकते हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच.
आपलं हृदय एका पंपासारखे काम करत असते. सर्व अवयवांना ते ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवत असते. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसे आणि इतर अवयव सुरळीतपणे काम करत असतात. काही वेळा हृदय अचानकपणे बंद पडते आणि शरीराची सर्व कार्ये थांबतात. त्यामुळे ती व्यक्ती बेशुद्ध होते, तिचा श्वास हालचाल थांबते. अशा मृतवत परिस्थितीतही आपला मेंदू तीन ते चार मिनिटे जिवंत राहू शकतो. या काळात जर योग्य पद्धतीने उपचार झाले तर त्या व्यक्तीला जिवंत राहण्याची संधी दोन ते तीन पटीने वाढू शकते. मृत्यू केव्हाही, कुठेही आणि कोणालाही गाठू शकतो. हृदय क्रिया थांबल्यावर कोणताही सामान्य माणूस छातीवर दाब देऊ शकतो. त्या उपचारासाठी फक्त एक शब्द लक्षात ठेवायचा, ‘सुप्रसाद’.
‘सुप्रसाद’ या शब्दामध्ये हृदय क्रिया परत सुरू करण्यासाठी काय करायचे हे सांगितले आहे. ‘सु’ म्हणजे सुरक्षितता. आपली आणि पीडित व्यक्तीची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे. आजूबाजूला आग लागल्यामुळे किंवा विषारी गॅस गळती झाल्यामुळे ऑक्सिजन कमी पडून वा घुसमटून हृदय क्रिया बंद पडू शकते. अशा वेळी त्या व्यक्तीला तेथून बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. तसेच इलेक्ट्रिक शॉक बसून हृदय क्रिया बंद पडली असल्यास प्रथम स्विच बंद करणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हालाही शॉक बसू शकतो. रस्त्यात अपघात होऊन ह्रदय क्रिया बंद झाल्यास पीडित व्यक्तीला एका बाजूला हलवा आणि नंतर उपचार सुरू करा.
‘प्र’ म्हणजे प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स. दोन्ही खांद्यावर थाप मारून, हाक मारून ती व्यक्ती शुद्धीवर आहे का याची खात्री करून घ्या. तोंडावर पाणी शिंपडून किंवा गालावर थप्पड मारून उठवायचा प्रयत्न करू नका. शक्यतो चेहऱ्याची आणि मानेची हालचाल होणार नाही याची काळजी घ्या. कारण त्या व्यक्तीच्या मानेच्या मणक्यांना इजा झाली असल्यास मानेच्या हालचालीमुळे हातापायाचे अपंगत्व येऊ शकते.
‘सा’ म्हणजे साद द्या, मदतीसाठी बोलवा. १०८ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून आपण ‘इमर्जन्सी अॅम्बुलन्स’ वा रुग्णवाहिकेला मदतीसाठी बोलवू शकतो. दूरध्वनी करताना तुम्ही कोण आहात, कोठे आणि काय झाले आहे, किती लोक ग्रस्त आहेत, त्यांचे वय काय आहे ही माहिती द्या. शेवटी तुम्ही येईपर्यंत मी काय करू शकतो हे विचारून घ्या आणि त्यांना सर्व माहिती मिळाली असल्यास त्यांच्या परवानगीनेच फोन बंद करा. रुग्णाच्या छातीवर दाब देत तुम्ही फोन स्पीकर मोडवर ठेवून बोलू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला फोन करायला सांगून तुम्ही छातीवर दाब द्या. १०८ क्रमांक हा टोल फ्री क्रमांक असल्याने तुमच्या मोबाइलमध्ये बॅलन्स नसेल, अगदी अजिबात पैसे शिल्लक नसले तरी तुम्ही फोन करू शकता.
रुग्णवाहिकेबरोबर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही. तसेच पोलिसांना तुमचे नाव, दूरध्वनी क्रमांक देण्याचे बंधन नाही. रुग्णास छातीवर दाब दिल्यानंतरही ती व्यक्ती जिवंत झाली नाही तर आपल्याला दोष देण्यात येईल ही भीती मनातून काढून टाका. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, चांगल्या हेतूने अशी मदत करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही.
‘द’ म्हणजे दाब द्या, छातीवर दाब देणे ही पुनरुज्जीवनाची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. रुग्ण कठीण पृष्ठभागावर झोपलेला असावा. जर पलंगावर, गादीवर असेल तर पाठीखाली रजिस्टर किंवा लाकडी फळी ठेवू शकता. रुग्णाला जमिनीवर ठेवणे शक्य झाल्यास दाब देणे सोपे होईल. छातीच्या मध्यभागी असलेल्या हाडावर दाब द्यायचा आहे. या हाडाचे खालचे टोक शोधा. त्याच्या दोन बोटे वर अंतरावर (छायाचित्र १) मध्ये दाखवल्याप्रमाणे तळहाताचा मनगटाजवळील भाग ठेवा. दुसऱ्या हाताची बोटे त्यामध्ये गुंतवून मनगट, कोपर आणि खांदा एका सरळ रेषेत घेऊन छातीवर दाब देणे सुरू करा. हाताचे कोपरे वाकवू नका. (छायाचित्र २) छाती पाच ते सहा सेंटीमीटर खाली दाबली गेली पाहिजे. एका मिनिटात १२० वेळा किंवा एका सेकंदात दोन वेळा छातीवर दाब द्या. दाब देणे आणि सोडणे या दोन्ही क्रिया महत्त्वाच्या आहेत. आपण जेव्हा दाब देतो तेव्हा हृदयातील रक्त मेंदू व इतर अवयवांना जाते. तसेच दाब सोडल्यावर इतर अवयवातील रक्त हृदयाकडे परत येते. छातीचे मधले हाड व पाठीचा मणका यामध्ये हृदय दाबले जाते. त्यामुळे फक्त मध्यभागीच छातीवर दाब द्या. छातीच्या डाव्या भागात दाब देऊ नका. दाब देताना एक ते ३० आकडे मोजा. एक ते ३० ची पाच आवर्तने (सायकल्स) झाल्यावर दुसऱ्या व्यक्तीस दाब देण्यास सांगा किंवा यापूर्वीच तुम्ही थकल्यास दुसऱ्या व्यक्तीला दाब देण्याची विनंती करू शकता. दाब देत असताना कधीही दहा सेकंदापेक्षा जास्त थांबू नका.
काही सार्वजनिक ठिकाणी (विमानतळ, रेल्वे स्थानक, हॉटेल्स, मॉल्स इत्यादी) अचानक ह्रदयक्रिया बंद पडल्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल वैद्याकीय उपकरण अर्थात ‘ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर’ (AED) हे उपकरण उपलब्ध असते. काही वेळा आपले हृदय पूर्ण न थांबता त्याची अल्प, अनियंत्रित अशी फडफड (ventricular fibrillation) चालू राहते. पण ती रक्तपुरवठा करण्यासाठी अपुरी असते. या व्यक्तीची स्थिती हृदय पूर्ण थांबलेल्या व्यक्तीसारखीच असते. या हृदयाला छातीवरून शॉक दिल्याशिवाय हृदयक्रिया पुन्हा सुरळीत होऊ शकत नाही. शॉक देण्यासाठी आपण AED वापरतो. मशीन सांगते त्याप्रमाणे सूचना पाळायच्या आणि शॉक देण्यासाठी बटण दाबताना पीडित व्यक्तीला कोणी स्पर्श करीत नाही एवढी काळजी घ्यायची आणि लगेच छातीवर दाब देण्यास सुरू करायचे असते. रुग्णालयाबाहेर हृदय क्रिया थांबल्यास शॉक दिल्याशिवाय ‘फिब्रिलेशन’ असलेल्या रुग्णाचे हृदय सुरू होत नाही. म्हणून हे उपकरण जास्तीत जास्त ठिकाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विशेषत: शारीरिक क्षमतेची चाचणी चालू असताना, जिममध्ये, खेळाचे सामने चालू असताना, मोठ्या प्रमाणावर मेळावे/ परिषद असल्यावर अचानक होणारे मृत्यू AED मुळे कमी करता येऊ शकतील. ज्या ठिकाणी AED उपलब्ध आहे, तिथल्या लोकांना त्याचा वापर कसा करायचा याचे नियमित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
मला माहीत असलेल्या घटनेत दोन विमानतळांवर कर्मचारी वर्गाला काचेच्या पेटीत असलेले AED मशीन बाहेर कसे काढायचे माहीत नव्हते. अशा प्रसंगात ऐनवेळी धावपळ करून उपयोग नाही. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमध्ये AED असते. काही कारणाने रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास विलंब असल्यास पीडित व्यक्तिला डिफिब्रिलेटर असलेल्या जवळच्या दवाखान्यात ताबडतोब हलवा. अशा रुग्णालयांची माहिती असणे आवश्यक आहे. गाडीतून जाताना छातीवर दाब देणे चालू ठेवा.
१०८ क्रमांकाची रुग्णवाहिका आल्यावर किंवा रुग्णाची काही हालचाल दिसल्यास तुम्ही छातीवर दाब देणे थांबवू शकता. अनेकदा एखाद्या व्यक्तीचे हृदय थांबून बराच वेळ झालेला असतो. त्याचे हातपाय लाकडासारखे ( Rigor Mortis) झाले असतील तर अशा व्यक्तीला छातीवर दाब देणे उपयोगाचे ठरणार नाही.
पुनरुज्जीवनासाठी काही वेळा कृत्रिम श्वास आणि छातीवर दाब या दोन्हीचा उपयोग केला जातो याला ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ किंवा बी.एल.एस. असे म्हणतात. पण यासाठी विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. केवळ हाताचा उपयोग करून ‘कॉम्प्रेशन ओन्ली लाइफ सपोर्ट’ (COLS) द्वारे ‘सुप्रसाद’प्रमाणे छातीवर दाब देऊन काही काळ मेंदू जिवंत ठेवता येतो. पीडित व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता वाढते.
हृदयविकाराचा झटका आणि हृदय क्रिया थांबणे या दोन्ही अवस्थेत फरक आहे. हृदयाला जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा आल्याने हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका आलेला रोगी छातीत दुखतंय असे सांगत असतो. त्याचा श्वास चालू असतो. यासाठी छातीवर दाब न देता वेगळ्या उपचाराचा अवलंब केला जातो. हृदयाचे ठोके अचानक अनियमित झाल्याने हृदय क्रिया थांबते. याला ‘कार्डियाक अरेस्ट’ असे म्हणतात. जेव्हा हृदयाची क्रिया बंद होऊन रुग्ण बेशुद्ध होतो त्याच वेळी छातीवर दाब दिल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता असते.
मी आणि माझे सहकारी १९८१पासून वैद्याकीय विद्यार्थ्यांबरोबरच खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्गालाही पुनरुज्जीवन प्रशिक्षण देत आहोत. तसेच १९८८ पासून शाळा, महाविद्यालये, पोलीस, केंद्रीय तुरुंग, विमानतळ, लायन्स क्लब, कंपन्यांमध्ये, जिमनॅशिअम प्रशिक्षक, स्विमिंग पूल वा तरणतलाव जीवरक्षक, हॉटेलमधील कर्मचारी, खेडेगावातील जत्रा, आरोग्य शिबिरे, शिशुविहारातील आया, अनाथाश्रम यामध्ये जाऊन तेथील लोकांनाही प्रशिक्षण देत आहोत.
दररोज छत्रपती संभाजीनगर येथील ‘एमजीएम वैद्याकीय महाविद्यालया’तील बाह्य रुग्ण विभागात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विद्यार्थ्यांमार्फत (सीओएलएस)चे प्रशिक्षण दिले जाते. गेल्या ८ वर्षांत ४४ हजारांपेक्षा जास्त लोकांना महाविद्यालयाच्या ‘स्किल लॅब’ने (American heart Association प्रमाणित) प्रशिक्षण दिले आहे. यांच्यापैकी १५ लोकांनी रुग्णालयाबाहेर पीडित व्यक्तींचे प्राण वाचवले आहेत. स्थानिक डॉक्टरांशी आणि वैद्याकीय संस्थांशी संपर्क साधून जास्तीत जास्त प्रशिक्षण वर्ग आयोजित केले पाहिजेत. अशा जीवरक्षकांचा दरवर्षी प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान केला जातो. या उपक्रमासाठी व्यवस्थापनाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रशिक्षण वर्ग घेतले गेले पाहिजेत.
इतकेच नाही तर आम्ही विविध शाळांत विद्यार्थ्यांना नियमित आणि सोप्या पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकांची मदत घेत आहोत. प्रशिक्षणासाठी प्लास्टिक कचरा वापरून बाहुल्या (manikins) तयार केल्या आहेत. मराठीत पोस्टर्स बनविली आहेत. ‘सुप्रसाद’ भित्तिपत्रकाचे कॉपी राईट मिळाले आहे. काही दिवसांत उपक्रमाचा अहवाल उपलब्ध होईल. सर्वांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉक्टर्स अपुरे आहेत. शिक्षकांची मदत घेऊन हे काम सोपे होईल अशी आशा आहे.
‘कॉम्प्रेशन ओन्ली लाइफ सपोर्ट’ (सीओएलएस) च्या मार्गदर्शक सूचना गाइडलाइन्स ‘भारतीय पुनरुत्थान परिषदे’ने (इंडियन रिसेसीटेशन कॉन्सिलने) तयार केल्या आहेत. (२०१७) याचा भारतीय म्हणून सर्वांना अभिमान आहे. ‘आपले शरीर’ या अमूल्य देणगीचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ह्रदय क्रिया बंद पडलेल्या व्यक्तीला कोणत्याही उपकरणाशिवाय केवळ हातांचा योग्य वापर करून कोणतीही व्यक्ती वाचवू शकते. त्यासाठी हा हृदयसंजीवक ‘सुप्रसाद’ सर्वांपर्यंत पोहोचवायला हवा. जीवरक्षक व्हा आणि इतरांना प्रेरित करा.
–डॉ. साधना सुधीर कुलकर्णी
(लेखिका भूलतज्ज्ञ व छ. संभाजी नगर येथील ‘इमर्जन्सी मेडिसीन’मधील एमेरिटस प्रोफेसर आहेत.)
