मिलिंद वराळे
एका जोडप्याची आयुष्यभराची कमाई असलेले कागदपत्र मिळवून देण्यासाठी मी मदत केली आणि दुसऱ्या दिवशी नेमकी माझीही महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग बसमध्ये राहिली… आपण चांगलं काम केलं की त्याची परतफेड होते का?

१९८७-८८मध्ये अकोला येथे माझी बदली झाली. त्या काळात घडलेला एक प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर तसाच उभा राहतो. का कोण जाणे, पण त्या घटनेचा माझ्या जीवनातील मूल्यांशी काहीतरी संबंध आहे असे वारंवार वाटत राहते. अनेक वर्षे तो फक्त एक साधा प्रसंग म्हणून मनात होता, पण कालांतराने त्याचे महत्त्व जाणवू लागले. काळ, ठिकाण, समाज आणि माणसे बदलली तरी त्या प्रसंगाची आठवण मात्र जशीच्या तशी राहिली हाच या आठवणीचा गाभा. म्हणूनच हा प्रसंग कागदावर उतरवण्याचा निर्णय घेतला.

मी एका सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनीत १९८७-८८ या वर्षी विक्री अधिकारी होतो. माझ्या विक्री क्षेत्रात अकोला, बुलढाणा, नांदेड व परभणी हे जिल्हे होते, तर विभागीय कार्यालय नागपूर येथे होते. या सर्व भागांत सतत फिरावे लागत असे. त्या वेळी माझ्याकडे चारचाकी नव्हती, त्यामुळे प्रवास मुख्यत: बस किंवा रेल्वेनेच होत असे. एका हातात कामाच्या कागदपत्रांची ब्रीफकेस आणि दुसऱ्या हातात कपड्यांची बॅग जी नेहमीचीच साथीदार.

एकदा विभागीय कार्यालयाकडून मला नांदेड जिल्ह्यातील तालुका बिल्लोळी येथे नवी ‘केरोसिन एजन्सी’च्या उमेदवाराचा तपासणी अहवाल,एफआयआर तयार करून सादर करण्याचे महत्त्वाचे काम दिले गेले होते. आदल्या दिवशी नांदेड येथे मुक्काम होता. माझ्यासोबत आमचाच एक व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी सैबल मुखर्जी होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बिल्लोळीला जाण्याची तयारी केली. बसने जाण्याचे ठरले होते, पण नांदेडमधील एका विक्रेत्याने आम्हाला आपली हिरो होंडा मोटारसायकल देऊ केली. कारण बिल्लोळीला एस.टी. बस फारच कमी होत्या. आमचे काम वेळेवर व्हावे म्हणून मोटरसायकलचा पर्याय निवडला. चालवण्याची जबाबदारी माझी असल्याने सैबलने होकार दिला. आम्ही नाश्ता करून निघालो. नांदेड ते बिल्लोळी अंतर सुमारे ७५ किमी. सकाळी रस्त्यावर फारशी वाहतूक नसल्यामुळे व पहिल्यांदाच इतक्या दूर मोटारसायकल चालवण्याचा अनुभव छान वाटत होता.

नांदेडपासून ४० किमी. अंतरावर एक मोठा चौक लागतो. उजवीकडे ३०-३५ किमी. अंतरावर मुखेड हे गाव, डावीकडे ३५ किमी.वर बिल्लोळी (माझे कामाचे ठिकाण) आणि सरळ ४० कि.मी. गेले की देगलूर हा तालुका. त्या चौकावर आम्ही चहासाठी थांबलो. टपरीसमोर मोटारसायकल लावत असतानाच, सुमारे चाळीस-पंचेचाळीस वयाचे एक खेडूत जोडपे धापा टाकत आमच्याजवळ आले. तो पुरुष रडकुंडीने म्हणाला, ‘‘साहेब, आताच जी बस नांदेडकडे गेली, त्यातून आम्ही उतरलो. पण गाडीत आमची पिशवी राहिली.’’ त्याच्या बरोबरची स्त्रीदेखील घाबरलेली व हताश दिसत होती, जणू त्यांच्या जीवनातले फार मोठे काहीतरी हरवले होते असे चेहऱ्यावर भाव दिसत होते. मी क्षणाचाही विलंब न करता सैबलला सांगितले, ‘‘तू थांब, मी जाऊन येतो.’’

त्या खेडुताला मागे बसवून मी मोटारसायकल वळवून सुसाट नांदेडच्या दिशेने दामटली. अंदाजे १५-१८ किमी. गेल्यावर समोर ती बस दिसू लागली. खेडुताने बोट दाखवून मला खात्री दिली की, ‘‘हीच एस.टी. बस.’’ मी बसला ओव्हरटेक करून तिच्या पुढ्यात थांबलो. चालकाने बस थांबवली. खेडूत वर चढून सामान ठेवायच्या कप्प्यामध्ये त्याच्या पिशवीचा शोध घेऊ लागला आणि नशिबाने पिशवी त्याला तिथेच मिळाली. त्याने ती आनंदाने हातात घेतली. आम्ही बसचालकाचे आभार मानून पुन्हा चौकावर परतलो. तिथे त्या बाई आमचीच वाट बघत होत्या. पिशवी पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. त्या दोघांनी हात जोडून नमस्कार केला. उपकृत भावनेने आम्हाला पैसे देण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न मी नम्रपणे नाकारला. खेडूत म्हणाला, ‘‘साहेब, या पिशवीत माझी आयुष्यभराची कमाई आहे. नांदेडला एका जमिनीचा व्यवहार करायला चाललो होतो, तुम्ही भेटला आणि मला माझी पिशवी परत मिळाली.’’ त्यांच्या चेहऱ्यावरची कृतज्ञता स्पष्टपणे जाणवत होती. आम्ही आपापल्या मार्गी लागलो.

दुसऱ्या दिवशी आम्ही बिल्लोळीचे काम आटोपून नांदेडला परतलो. मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी मी नांदेड-अकोला बसने निघालो. वाटेत वाशिम बस स्थानकावर चहासाठी बस थांबली. भूक लागल्याने मी तिथल्याच एस. टी. उपाहारगृहात जाऊन उपमा व चहा घेतला. बाहेर आलो तोवर बस निघून गेली होती, त्यात माझी बॅग व कागदपत्रांची ब्रीफकेस होती. ‘एफआयआर’ केलेले कागदपत्र त्यातच राहिले होते. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत एस. टी.स्टँडबाहेर आलो, तर एक तरुण आपली मोटारसायकल उभी करून थांबला होता. मी त्याला विनंती केली की, ‘‘इथून नांदेड-अकोला बस नुकतीच निघाली आहे. कृपया, मला घेऊन ती बस गाठता येईल का?’’ तो ताबडतोब तयार झाला. १५ मिनिटांतच आम्ही ती बस गाठली. माझ्या बॅगा सुरक्षित होत्या. त्या तरुणाचे मन:पूर्वक आभार मानले. तो ‘सिव्हिल’ ड्रेसमधला पोलीस हवालदार निघाला.

या दोन दिवसांच्या दोन प्रसंगांनी मला खोल विचारात पाडले. बिल्लोळी फाट्यावर मी ज्यांना मदत केली, तशीच मदत मला दुसऱ्या दिवशी वाशिममध्ये मिळाली. हा योगायोग होता की जीवनातली परतफेड? याचे उत्तर आजही सापडले नाही. पण आठवण मात्र मनात घर करून राहिली आहे.